गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र कायद्याचे उल्लंघन करणा-या डॉक्टरांवर टास्क फोर्स पथकाने कारवाई करावी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन


धुळे :- धुळे शहरात आजही बाहेरचे रुग्ण येवून काही डॉक्टरांच्या मदतीने गर्भलिंग तपासणी सारखे गंभीर प्रकार करत असून त्यांना मदत करणा-या डॉक्टरांवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या टास्‍क फोर्स पथकाने अचानक अशा दवाखान्यांची तपासणी करुन त्यांच्या ए फॉर्ममध्ये काही त्रुटया असल्याचे दिसले तर सरळ त्यांच्यावर गुन्हे नोंदवावीत अशा सुचना जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी दिल्या.
       जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त हनुमंत भोंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लाडीकर, जिल्हा परिषदच्या समाज कल्याण अधिकारी श्रीमती देवरे, डॉ. कुळकर्णी, रविंद्र इंगळे, मनपाचे डॉ. डी. बी. माळी, डॉ. प्रदिप पाटील, अड.गणेश पाटील, सचिन कुंभार उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यावेळी म्हणाले की, गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंद) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण भागात कार्यशाळा घ्यावी. तसेच डॉक्टरांनी पेशंटची एमपीटी करण्यापूर्वी आरोग्य विभागात त्याची माहिती दिली पाहिजे. त्याशिवाय एमपीठी केल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे ए फॉर्म मध्ये नोंदणी करतांना काही त्रुट्या आढळल्यास टास्क फोर्स पथकाचे संबंधित डॉक्टरांनावर केसेस दाखल करुन त्यांचे सोनोग्राफी सेंटर सिल करावित. तसेच काही डॉक्टर सोनोग्राफी मशिन बंद असल्याचे सांगून गर्भलिंग निदान सारखे उद्योग करीत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील. याची संबंधित डॉक्टरांनी नोंद घ्यावी. सामाजिक स्वास्थ बिघडू नये यासाठी डॉक्टरांनी असे कृत्य करणाऱ्याला जनतेसमोर आणून प्रशासनाला मदत करावी असेही जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी सांगितले. तसेच असे कृत्य कोणी करत असेल तर www.amchimulgi.com यावर एस.एम.एस. करावा. असेही आवाहन त्यांनी जनतेस केले आहे.
       प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लाडीकर यांनी सांगितले की, आता न्यायालयाच्या निर्णयानेच पोर्टबेल सोनोग्राफी मशीन वापरण्यास बंदी आणली असून ते जर कोणी डॉक्टर वापरत असतीलतो गुन्हा आहे. काही औषध विक्रेते जर गर्भपात करण्यासारखी औषधे बेकायदेशिरपणे विक्री करत असल्याचे आढळले तर अशा औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

शनिवार, ३ डिसेंबर, २०११

महानगरपालिकेत डिसेंबर-2011 मधील लोकशाही दिन होणार नाही


धुळे, दि.2:- महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. वरील निवडणूका कालावधीत दि.1 नोव्हेबर,2011 पासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली असल्यामुळे माहे डिसेंबर-2011 च्या पहिल्या सोमवारी दि. 5 डिसेंबर, 2011 रोजी आयोजित करण्यात आलेल्या महानगरपालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले नाही.याची सर्व नागरिकानी नोंद घ्यावी असे धुळे महानगरपालिकेचे आयुक्त हनुमंत भोंगळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

96 वी अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेसाठी शिकाऊ उमेदवारानी अर्ज करावे


धुळे दि.2 :- राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एन.सी.व्ही.टी)मार्फत घेण्यात येणारी शिकाऊ उमेदवारांची 96 वी अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा एप्रिल-2012 च्या शेवटच्या आठवडयात अपेक्षित असुन  शिकाऊ उमेदवार व संबधीत आस्थापनांच्या मालकांनी याची नोंद घ्यावी असे मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे अंशकालीन प्राचार्य व्ही.एम.राजपूत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
       महाराष्ट्र राज्यातील परिक्षेस बसणा-या उमेदवारानी शिकाऊ उमेदवाराचे संविदा /करारपत्र ज्या मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रात सादर केलेले आहे. त्याच मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रामध्ये फारमेट-3 व 3 ए हया विहित नमुन्यात उमेदवारांची माहिती आस्थापनेच्या पत्रासह दि.20 डिसेबर,2011 पर्यत पाठवावी. आस्थापनांनी शिकाऊ उमेदवाराचे पात्रता प्रमाणपत्र विहित केलेल्या फारमेट-4 मध्ये अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा सुरु होण्यापूर्वी 15 दिवस अगोदर परिक्षा केंद्रास पाठविण्यात यावे. परिक्षेस बसण्यास पात्र असणा-या सर्व शिकाऊ उमेदवारांनी विहित नमुन्यात परिक्षा अर्ज शुल्क रुपये 10/- व एक वर्ष अभ्यासक्रमाकरिता परिक्षा शुल्क रु.50/- व दोन वर्षे अभ्यासक्रमाकरिता परिक्षा शुल्क रु.75/- दि.31 डिसेबर,2011 पुर्वी भरावे.
       शिकाऊ उमेदवाराबरोबर खालीलप्रमाणे अटी पूर्ण  करणा-या खाजगी उमेदवार म्हणून परिक्षेस बसू इच्छिणा-या व माजी खाजगी उमेदवारांनी अर्जाच्या विहित नमुन्यासाठी व सविस्तर माहितीपत्रकासाठी संबधीत जिल्हयातील जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या शासकीय ‍औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याशी संपर्क साधुन दि.15 जानेवारी,2012 पूर्वी अर्ज सादर करावेत.
       एन.सी.व्ही.टी परिक्षेस बसणा-या शिकाऊ उमेदवाराच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. उमेदवार शिल्पकारागिर प्रशिक्षण योजने  अंतर्गत संबधीत व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच एन.टी.सी नंतर 1 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 4 वर्ष व 2 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे., उमेदवार कार्यरत असलेली आस्थापना शिकाऊ उमेदवारी योजनेतंर्गत अथवा शासकीय/ निमशासकीय उपक्रमातंर्गत कार्यरत असावी. 

नगरपरिषदांच्या मतदानाच्या तारखेत बदल 177 नगरपरिषदांसाठी 11 डिसेंबरला मतदान



मुंबई,  राज्यातील 188 नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या निवडणुका 8 डिसेंबर 2011 रोजी होणार होत्या. परंतु बऱ्याच नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या प्रभागांतील उमेदवारी अर्जांसंदर्भात न्यायालयात अपील दाखल झाल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता 177 नगरपरिषदांच्या निवडणुका 11 डिसेंबर 2011 रोजी, तर आज 
(ता. 2 डिसेंबर) न्यायालयाचा निकाल लागलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका 13 डिसेंबर 2011 रोजी होणार आहेत.
ज्या नगरपरिषदा/नगरपंचायतींसंदर्भात अपील दाखल झालेले नाही, तसेच जेथील अपिलांवरील न्यायालयाचा निर्णय 1 डिसेंबर 2011 पर्यंत प्राप्त झाला आहे. त्यांचे मतदान 11 डिसेंबर 2011 रोजी घेण्यात येईल. या निवडणुकांचा जाहीर प्रचार 9 डिसेंबर 2011 रोजी रात्री बारा वाजता संपेल. त्यांची मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबर 2011 रोजी होईल.
ज्या नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या काही प्रभागात अपील झाले होते व ज्या अपिलांवरील निर्णय 2 डिसेंबर 2011 रोजी प्राप्त झाले आहेत त्यांचे मतदान 13 डिसेंबर रोजी होईल. त्यांचा जाहीर प्रचार 11 डिसेंबर 2011 रोजी रात्री बारा वाजता संपेल. त्यांची मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबर 2011 रोजी होईल.
ज्या नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या मुदती 16 डिसेंबर 2011 पर्यंत संपणार आहेत आणि ज्यांच्या अपिलांचे निकाल 2 डिसेंबर 2011 पर्यंत प्राप्त झालेले नाहीत. त्या नगरपरिषदांची स्थापना करण्यासाठी, अपील झालेल्या जागांशी संबंधित प्रभाग वगळून उर्वरित प्रभागांतील जागांची संख्या जर नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या एकूण जागांच्या 2/3 (दोन तृतीयांश) किंवा त्यापेक्षा अधिक होत  असल्यास सदर नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या अपिलात नसलेल्या प्रभागातील जागांसाठीचे मतदान 11 डिसेंबर 2011 रोजी होईल. तसेच ज्या प्रभागांतील जागांकरिता अपील झालेले आहे, परंतु निकाल लागलेले नाहीत व ज्या नगरपरिषदांची मुदत 16 डिसेंबर 2011 रोजी संपत आहे. त्या नगरपरिषदांची स्थापना करण्यासाठी अपील झालेल्या जागांशी संबंधित प्रभाग वगळून उर्वरित प्रभागातील जागांची संख्या जर नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या एकूण जागांच्या 2/3 (दोन तृतीयांश) किंवा त्यापेक्षा अधिक होत नसेल तर सदर नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या प्रलंबित अपिलात असलेल्या जागा वगळून उर्वरित सर्व जागांसाठी 11 डिसेंबर 2011 रोजी मतदान होईल.
                                             
नगरपरिषदांच्या मतदानाच्या     

जाहीर प्रचाराची समाप्ती त्या त्या दिवशी रात्री बारा वाजता होणार असली तरी राजकीय पक्ष व उमेदवारांना रात्री दहा नंतर सार्वजनिक सभा, मोर्चे, ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारणे अथवा नाकारण्याच्या निर्णयाविरुद्ध नगरपरिषद निवडणूक नियम 1966 च्या नियम 15 मधील तरतुदीनुसार संबंधित उमेदवारास जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल करता येईल, अशी तरतूद असल्याने बऱ्याच प्रभागातील उमेदवारी अर्जांसंदर्भात अपील दाखल झाले आहेत. या अपिलांचा निकाल जाहीर झाल्यापासून उमेदवारी मागे घेण्याकरिता तीन दिवसांचा कालावधी देण्याची तरतूद या नियमात आहे आणि उमेदवारी मागे घेण्याच्या दिनांकापासून आठव्या दिवसाचा दिनांक मतदानाकरिता पुनर्निर्धारित करण्याची तरतूद आहे.
वेगवेगळ्या प्रभागांमधील अपिलांचे निकाल वेगवेगळ्या दिवशी लागल्यामुळे सर्व नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या निवडणुका एकाच दिवशी म्हणजे 8 डिसेंबर 2011 रोजी घेता येणे शक्य नाही. तसेच बहुतेक नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या मुदती 16 डिसेंबर 2011 रोजी संपत आहेत. या कालावधीत नवीन नगरपरिषदा/नगरपंचायतींची स्थापना होणे आवश्यक आहे.
दरम्यान, 23 डिसेंबर 2011 रोजी होणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली, मुदखेड, मुखेड, कंधार, कुंडलवाडी, देगलूर या सहा आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ही एक अशा एकूण सात नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या निवडणुका पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच होतील.
                         0-0-0


शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

तूर व हरभरा पिकावरील किड व रोग नियंत्रणासाठी उपाययोजना करावी


धुळे, दि. :- राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत  तूर व  हरभरा पिकावरील किड व रोगाचे धुळे जिल्हयातील 14 स्काऊटमार्फत निरिक्षण घेण्यात आले.  या निरीक्षणाबाबतची माहिती एनआयसीपीएम, दिल्ली यांना इंटरनेटद्वारे कळविण्यात आली होती.  त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार शेतक-यांना पुढीलप्रमाणे सल्ला दिलेला आहे, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी, यांनी कळविले आहे.
       तूर पिकांची पेरणी केलेल्या शेतक-यांनी तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळीसाठी थायमेथ्रोझाम 25  डब्ल्युजी 5 मिली/लिटर किंवा मिथील डेमेथॉन 25 ईसी @ 10 मिली पाण्यातून फवारावे.
       हरभरा पिकांची पेरणी केलेल्या शेतक-यांनी  हरभ-यावरील घाटेअळींच्या   प्रादुर्भाव टाळण्यासाठी 5 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी

खत वितरण प्रणालीची 5 डिसेंबर नंतर नोंदणी होणार नाही

धुळे, दि. :- सर्व खत वितरकांना सूचित करण्यात येते की, ऑनलाईन खत प्रणालीसाठी दि. 5 डिसेंबर, 2011 नंतर नोंदणी होणार नाही.  तरी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन राष्ट्रीय केमिकल अन्ड फर्टिलायझर्स लि. प्लॉट नं. 146, जयहिंद कॉलनी, देवपूर, धुळे येथे त्वरीत संपर्क साधावा व नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

डिसेंबर-2011 मधील लोकशाही दिन होणार नाही


धुळे, दि.2 :- राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.  त्याबाबतची आचारसंहिता दि.1 नोव्हेंबर, 2011 पासून लागू करण्यात आलेली आहे.  आचार संहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये असे शासनाने दि. 4  नोव्हेंबर, 2011 च्या पत्रान्वये कळविले आहे.
       शासनाच्या स्थायी सूचनेनुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.  उपरोक्त परिस्थितीमुळे माहे डिसेंबर-2011 मधील लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 5 डिसेंबर, 2011 रोजी होणार नाही याची नोंद घ्यावी, असे निवासी जिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.