गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.


राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता                                                
40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
                                            
            राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 12 व्या पंचवार्षिक योजनेत ( वर्ष 2016-17 पर्यंत) एकूण 2,111 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या धोरणांतर्गत सवलतीमुळे राज्यात वस्त्रोद्योग क्षेत्रात 40 हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक तसेच 11 लाख नवीन रोजगार निर्मिती होईल.
या वस्त्रोद्योग धोरणाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
सहकारी सूतगिरण्या :
            विदर्भ/मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील सहकारी सूत गिरण्यांना सध्याच्या आकृतीबंधाप्रमाणे अर्थसहाय्य देण्याची योजना चालू ठेवावी. (5:45:50),          ज्या तालुक्यात सहकारी तत्वावरील सूत गिरण्यांना यापूर्वी शासनाकडून भाग भांडवल स्वरुपात मदत करण्यात आलेली आहे अशा तालुक्यात सहकारी तत्वावरील नवीन सूत गिरणी उभारण्यास 5:45:50 या आकृतीबंधाप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार नाही.
यंत्रमाग (वार्पींग/विव्हींग/सायझिंग/डाईंग/प्रिटींग/गारमेंटींग/निटींग युनीट इ.)
            शटललेस यंत्रमाग/ वार्पींग/ सायझिंग/ यार्न डाईंग/ डाईंग/ प्रोसेसिंग/ गारमेंटींग इत्यादिच्या सहकारी तत्वावरील संस्थांच्या प्रकल्पांना सध्याच्या आकृतीबंधानुसार अर्थसहाय्य देण्याबाबत गुणानुक्रमे विचार करावा. (10:40:50), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अल्पसंख्यांक समाजाच्या सहकारी तत्वावरील यंत्रमाग संस्थांना स्वभाग भांडवल, शासकीय भाग भांडवल कर्ज 10:40:50 ऐवजी 5:5:40:50 या आकृतीबंधानुसार अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु करावी. अशा संस्थांच्या शासकीय भाग भांडवलातील 5% वाढीव हिश्याच्या रकमेवरील खर्चासाठी संबंधित विभागाच्या मंजूर नियतव्ययातून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
            अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अल्पसंख्यांक समाजाच्या यंत्रमाग घटकाचे आधुनिकीकरणासाठी दीर्घ मुदती कर्जाचे प्रकल्प प्रस्ताव तयार करणे, ते प्रस्ताव बँकेकडे सादर करणे आणि बँकेकडून कर्ज मंजूर करुन घेणे यासाठी शासनाकडून काही व्यावसायिक संस्था नेमून मदत करण्याची योजना सुरु करण्यात यावी. अशा व्यावसायिक संस्थांची फी त्यांनी तयार केलेले प्रकल्प प्रस्ताव बँकेने यशस्वीरित्या मंजूर केल्यानंतरच अनुज्ञेय राहिल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अल्पसंख्यांक समाजाच्या ज्या यंत्रमाग घटकाच्या आधुनिकीकरणाच्या प्रकल्पास बँकेची मान्यता प्राप्त झाली असेल अशा घटकांना इतर स्त्रोताकडून मिळणाऱ्या सवलती व्यतिरिक्त यंत्रसामग्रीवरिल भांडवली गुंतवणूकीच्या (TUFS मध्ये मान्य होणाऱ्या प्रकल्पाकरिता  व्याज सवलतीसाठी अनुज्ञेय गुंतवणूकीच्या ) 10% अनुदान देण्याची योजना सुरु करण्यात येईल.
            वरील योजनांवरील खर्च अनुक्रमे सामाजिक न्याय, आदिवासी विकास अल्पसंख्याक विकास विभागाच्या मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत ठेवण्यात येईल.  या योजना सहकारी खाजगी घटकांना लागू राहतील. 
दीर्घ मुदती कर्जावर व्याज सवलत योजना :
            दीर्घ मुदती कर्जावरील व्याज सवलत योजनेसाठी  12.5% किंवा बँकेचे प्राईम लेंडीग रेट यापैकी जे दर कमी असेल तेवढा उच्चतम व्याजदर अनुज्ञेय राहील. यापेक्षा जास्त दराने कर्ज  घेतले असेल तर त्याचा परतावा संबंधित घटकांना करावा लागेल. सर्व स्त्रोतातून (केंद्र पुरस्कृत TUFS, उद्योग विभाग इत्यादी)  मिळणारी व्याज सवलत धरुन  0%   2% एवढे व्याजदर पुढील घटकांना पडेल.

अ.क्र
0% व्याज दर
2% व्याज दर
1
विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील  सर्व पात्र वस्त्रोद्योग घटक.
विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील क्षेत्र वगळता इतर क्षेत्रामध्ये खाजगी सूतगिरणी
2
पूर्ण राज्यात गारमेटींग
 -------------
3
पूर्ण राज्यात अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित नविन यंत्रमाग उद्योग.
खासगी  प्रोसेसिंग युनिट
4
पूर्ण राज्यात यंत्रमाग आधुनिकीकरण
खासगी  निटींग  युनिट
5
पूर्ण राज्यात सर्व प्रकारचे रेशीमचे प्रकल्प
खासगी टेक्सटाईल पार्क
6
पूर्ण राज्यात वस्त्रोद्योगाचे अनुषंगाने कौशल्य विकासाचे प्रकल्प
इतर सर्व खासगी पात्र वस्त्रोद्योग घटक
7
सहकारी क्षेत्रामधील सर्व पात्र वस्त्रोद्योग घटक


            सदर धोरणांतर्गत योजनांच्या अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाच्या TUFS  च्या धर्तीवर  बँकांचा समावेश राहील.  सदर नोडल बँकांची जबाबदारी पुढीलप्रमाणे राहील:-
            कर्ज पुरवठयासाठी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावाची पात्रता तपासणे, कर्ज मंजूर करणे, वितरीत करणे, प्रकल्पास अनुज्ञेय व्याज सवलतीचे क्लेम शासनास सादर करणे. या योजनेअंतर्गत क्लेमची पूर्तता करण्यासाठी शासन प्रथम प्रत्येक नोडल बँकेत बँक खाते उघडेल.  नोडल बँकांकडून प्राप्त झालेल्या व्याज सवलतीचे क्लेमची रक्कम शासनाच्या बँकेतील खात्यात जमा करेल.  सदर जमा झालेली रक्कम नोडल बँक संबंधीत प्रकल्पाच्या कर्ज खात्यावर जमा करेल.
        वस्त्रोद्योग क्षेत्रातील घटकांना स्पर्धा करण्यासाठी त्यांचेकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची आवश्यकता आहे.  या कारणामुळे टफ प्रमाणे राज्य योजनामध्ये कोणकोणती यंत्रसामुग्री सदर धोरणांतर्गत सवलतीसाठी पात्र राहील ते निश्चित करणे आवश्यक आहे. सुरुवातीला केंद्र शासनाच्या टफ योजनेमध्ये निर्धारित केलेली यंत्रसामुग्री निर्धारीत करण्यात येईल त्यानंतर आवश्यकता भासल्यास विभागामार्फत नवीन अद्यावत यंत्रसामुग्री निर्धारीत करण्यात येईल.
        या सवलतीसहकार व खासगी क्षेत्रातील, सर्व पात्र वस्त्रोद्योग घटकांना लागू राहतील.
व्याज सवलत योजनेचे सनियंत्रण :
            व्याज सवलत योजनेचे सनियंत्रण ऑनलाईन करण्यात येईल. यासाठी विभागामार्फत स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात येईल. ही योजना संपूर्णत: वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाशी निगडीत राहील.  
सदर योजनेअंतर्गत देय लाभ तरतूदीच्या मर्यादेत इतर स्त्रोताकडून प्राप्त होणाऱ्या सवलती व्यतिरिक्त राहील. या योजनेअंतर्गत देय व्याज अनुदान 8 वर्षासाठी राहील. (2 वर्षे मोरीटोरीयम कालावधी वगळून) प्रस्तावित योजनेअंतर्गत अनुज्ञेय लाभ फक्त महाराष्ट्रामध्ये उभारण्यात आलेल्या प्रकल्पासाठी राहील. केंद्र शासनाची TUF योजना बंद झाल्यास सदर योजनेचे पुनर्विलोकन करण्यात येईल. या धोरणांतर्गत सवलती वस्त्रोद्योगाशी संबंधित खालील घटकांना अनुज्ञेय ¸üÖÆüß»Ö.
            1) Cotton Ginning and Pressing
            2) Spinning /Silk Reeling & Twisting/ Intregrated  Silk Park / Synthetic Filament /Yarn Texturising,Crimping & Twisting
            3) Wool Scouring, combing and carpet industry
         4) Manufacturing of viscose filament yarn and viscose  staple fibre.
            5) Weaving / Knitting
            6) Technical Textiles and non-wovens
            7) Garment/Made-up manufacturing
            8) Processing of Fibre/Yarn/Fabrics/Garments/made-ups
            9) Modernisation/Expansion/Rehabilitation of  existing texile units
            10) Textile Parks  (as approved by GoI under SITP)
            11) Energy saving & process control equipments for various sectors.
            12) Skill Development Activities

            विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील TUFS अंतर्गत मंजूर होणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांना  मिळणाऱ्या व्याज सवलती शिवाय, TUFS अंतर्गत व्याज सवलतीसाठी मूळ प्रकल्प किंमतीमधील अनुज्ञेय गुंतवणूकीच्या 10% भांडवली  अनुदान देण्यात येईल.  प्रकल्प किंमतीमधील वाढीव गुंतवणूकीवर 10% भांडवली सवलत  अनुज्ञेय राहणार नाही.
            विशेष घटक आदिवासी उपयोजनेअंतर्गत निम्न मानव विकास निर्देशांक असलेल्या जिल्हयांमध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी अर्थसहाय्य देता येईल किंवा कसे, याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.
कामगारांसाठी सुधारणा :
            वस्त्रोद्योग क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे.  त्यासाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या सहाय्याने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येईल. वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांसाठी घरकुल योजना, आरोग्य विमा योजना इ. कामगार कल्याण योजना राबविली जाईल. कामगार विषयक प्रदुषण नियंत्रण कायद्यातील वस्त्रोद्योग उद्येागाला मारक ठरणाऱ्या तरतूदीमध्ये सुधारणा करणे / शिथिलता आणण्यात येईल.
40 हजार कोटींची गुंतवणूक :
            सदर वस्त्रोद्येाग धोरणांतर्गत सवलती याबाबतचा  शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या  संपूर्ण कालावधीमध्ये मंजूर होणाऱ्या नवीन गुंतवणूकीकरिता अनुज्ञेय राहतील.  प्रस्तुतच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सवलतीमुळे राज्यात वस्त्रोद्योग  क्षेत्रात जवळपास रुपये 40,000 कोटी नवीन गुंतवणूक आणि 11 लाख  नवीन रोजगार निर्मिती  अपेक्षित आहे.

    नवीन वस्त्रोद्योग धोरणाच्या अंमलबजावणीसाठी बाराव्या पंचवार्षिक योजनेत खालील प्रमाणे अंदाजे खर्च अपेक्षित आहे.       
(रुपये कोटीत)
वर्ष
दीर्घ मुदती कर्जावर व्याज सवलत योजना
 विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग घटकांना 10% सबसिडी
            एकूण
11-12
1
--
1
12-13
10
--
10
13-14
100
300
400
14-15
200
300
500
15-16
250
300
550
16-17
350
300
650
एकूण
911
1200
2111
----00------

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा कायापालट


            नागपूर, दि. 21 : शासन आणि जनता यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखले जाणारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने बदलत्या काळानुसार हायटेक होण्याकडे पावले उचलली आहेत. अधिकाऱ्यांना हायटेक प्रशिक्षणाबरोबरच लॅपटॉप, महान्यूज व लोकराज्यसाठी फेसबुक पेज, मंत्रालय वार्ताहर कक्षासाठी वायफाय कनेक्शन आणि ऑनलाईन मॅगझिन असे माहिती तंत्रज्ञानाशी निगडित 18 निर्णय महासंचालक तथा माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी येथे घेतले.
       आधुनिक तंत्रज्ञान व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची सांगड घालून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत गतीने पोहोचविण्याचे काम या निर्णयामुळे होणार आहे. या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी माहिती तंत्रज्ञान संचालनालयमार्फत होणार आहे.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा चेहरा बदलणारे निर्णय असे :
            शासकीय योजनांची माहिती माध्यमांना गतिमान पद्धतीने व वेळेत पाठविण्यासाठी  राज्यातील माहिती अधिकाऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे लॅपटॉप, टॅबलेटस माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या अनुदानातून देण्यात येणार आहेत.  
            लोकराज्य मासिकाची  वर्गणी  भरण्याची सुविधा आता वाचकांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. ही सुविधा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन वर्गणी (नवीन वर्गणीदार तसेच वर्गणीचे नुतनीकरण) यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर महासंचालनालयाची वेबसाईट, महान्यूज तसेच लोकराज्य मासिकासाठी फेसबुक पेज तयार करण्यात येईल. जेणेकरुन  या उपक्रमांना नेटीझन्सचा अधिकाधिक प्रतिसाद ‍िमळेल. त्याचबरोबर शासनाचे उपक्रम, ध्येयधोरणे आणि योजनांची माहिती व्यापक प्रमाणावर लोकांपर्यंत जाईल.  
            राज्यातील महत्त्वाच्या घटना, कार्यक्रम, मान्यवरांच्या दौ-यांचे चित्रिकरण, बातम्या, छायाचित्रे इत्यादी मुख्यालयामार्फत वाहिन्यांना तातडीने उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून FTP चा वापर करण्यात येणार आहे. राज्याच्या डेटा सेंटरमध्ये यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ज्यामुळे सर्व जिल्हा माहिती कार्यालये तसेच विविध वृत्त वाहिन्यांमध्ये चित्रिकरण बातम्यांच्या अनुषंगाने गतिमान पद्धतीने आदान-प्रदान होऊ शकणार आहे.
            मंत्रालयाच्या तळमजल्यावर असलेल्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयास तसेच प्रेस रुम येथे वायफाय जोडणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून घ्यावयाच्या काळजीबाबतही माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
            महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या 60 वर्षातील महत्त्वाच्या घटना-घडामोडींची दुर्मिळ छायाचित्रे आणि ऐतिहासिक माहितीपट, समाचारचित्रे महासंचालनालयाकडे उपलब्ध आहेत. हा अनमोल ठेवा खराब होऊ नये म्हणून सर्व छायाचित्रांचे डिजिटलायझेशन आणि व्हिडिओ रेस्टोरेशनचे काम महासंचालनालयाने हाती घेतले आहे.
            हा ठेवा जतन करण्यासाठी राज्याच्या स्टेट डेटा सेंटरमध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वेबसाईटवर याची लिंक देण्यात येईल. ही दुर्मिळ छायाचित्रे विषयानुरुप तसेच छोट्या आकारात वेबसाईटवर उपलब्ध असतील तसेच एखाद्या विशिष्ट प्रसंगाचे छायाचित्र शोधण्याची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध असेल. विहित शुल्क वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने भरल्यावर ही छायाचित्रे मूळ आकारात संबंधितांना डाऊनलोड करुन घेता येतील. माहितीपटांसाठीही अशाच प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.
            गेल्या पन्नास वर्षात प्रसिद्ध झालेल्या लोकराज्यच्या सुमारे एक हजार अंकांच्या डिजिटलायझेशन करण्यात येणार असून त्यासाठी वेबसाईटवर जागा उपलब्ध करून देण्यात येईल. जसजसे अंकांचे डिजिटलायझेशन होत जाईल तसतसे हे अंक माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
            राज्यातील सर्व कार्यालयांसाठी जाहिरात वितरणाचे  एकत्रित असे  केंद्रीय पद्धतीचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार असून त्याद्वारे रोटेशन पद्धतीने वर्तमानपत्रांची निवड झाल्यानंतर वेबसाईटद्वारे संबंधित वर्तमानपत्रांना वितरण आदेश जाहिरातीचा मजकूर पाठविता येणे शक्य होईल. अशाप्रकारे हे सॉफ्टवेअर वेबसाईट एकमेकांना जोडण्यात येतील (linking). तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची सर्व कार्यालयांच्या दैनंदिन स्तरावर वितरीत झालेल्या जाहिराती वेबसाईटवर अपलोड करण्यात येतील.  
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र आणि दिलखुलास' या कार्यक्रमांचे सर्व भाग सर्व्हरवर ठेवण्यात येणार असून महासंचालनायाच्या वेबसाईटवरुन त्याची लिंक देण्यात येईल.
            अधिस्वीकृती पत्रिकेसाठीचे अर्ज यापुढे ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच अधिस्वीकृती पत्रिकाधारकांची माहितीही वेबसाईटवर देण्यात येईल. महासंचालनालयाच्या वेबसाईटवर याची लिंक देण्यात येईल.
            जाहिरात यादीवर नव्याने समावेश करणे तसेच दरवाढ/श्रेणीवाढ करण्यासाठीचे सर्व अर्ज यापुढे ऑनलाईन स्वीकारण्यासाठी महासंचालनाच्या वेबसाईटवर लिंक देण्यात येईल.
            शासकीय कर्मचाऱ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी ऑनलाईन नियतकालिक सुरु  करण्यात येणार आहे. त्याची लिंक महासंचालनालयाच्या वेबसाईटवरुन देण्यात येईल.
            वर्तमानपत्रातील तसेच नियतकालिकांमधील महत्त्वाची कात्रणे मंत्री, सचिवांना स्कॅन करुन  ई-मेलव्दारे पाठविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विकसित करत असलेल्या डॅशबोर्डचा उपयोग करण्यात येईल.
            1 फेब्रुवारीपासून सर्व उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी आणि मंत्रालयातील अधिकारी यांना एमआयएसचे फॉर्म ऑनलाईन भरणे अनिवार्य राहणार आहे.
            राज्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमांचे चित्रिकरण पाठविण्यासाठी राज्यातील सर्व अधिनस्त कार्यालयांना MSWAN  ची जोडणी माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत करुन देण्यात येईल. 
            अधिकारी, कर्मचाऱ्‍यांची सर्व माहिती, ज्येष्ठता सूची, पदोन्नती, रिक्त जागांबाबतची माहिती तसेच  माहितीचा अधिकार याबाबतची सर्व माहिती वेबसाईटवर टाकण्यात येईल.
       महासंचालनालयातील संचालक ते सहायक संचालक या श्रेणीतील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांना माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत अशा क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. हे प्रशिक्षण माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत देण्यात येईल.
             

बुधवार, २१ डिसेंबर, २०११

27 डिसेबर रोजी डाक अदालत


धुळे दि. 21 :- प्रवर अधिक्षक डाकघर,धुळे विभाग धुळे 424001 द्वारा दि.27 डिसेबर,2011 रोजी दुपारी 03-00 वाजता तिमाही डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.पोस्टाच्या कार्यपध्दती विषयी किंवा कामकाजबद्दल ज्या तक्रारीचे निवारण 6 आठवडयाच्या आत झालेले नसेल व समाधान कारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारीची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत : टपाल,स्पीडपोस्ट,काउन्टर सेवा,डाकवस्तु पार्सल बचत बॅक व मनी ऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा.उदा.तारीख व ज्या अधिका-यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इ.संबधितानी डाकसेवेबाबतची आपली तक्रार अधिक्षक डाकघर,धुळे विभाग धुळे 424001 यांचे नावे अतिरीक्त प्रतिसह दि.26 डिसेबर,2011 पर्यत पोहचेल अशा रितीने पाठवावी.त्यानंतर आलेल्या तक्रारीचा निपटारा केला जाईल परंतु डाक अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही.असे जी.डी.सोनार प्रवर अधिक्षक डाकघर,धुळे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

सोमवार, १९ डिसेंबर, २०११

शाहिर शिवाजीराव पाटील यांनी पोवाडयातून वाचन संस्कृतीचं महत्व सादर केले


जळगांव दिनांक  :- सर्व ग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ  ` गीता ` असून प्रत्येक व्यक्तीने जीवनात एक वेळेस तरी गीता वाचन करावे अशी साद शाहिर शिवाजीराव पाटील यांनी काल (दिनांक 17 डिसेंबर रोजी ) झालेल्या `रंग शाहिरी कलेचा` या कार्यक्रमात उपस्थित रसिकांना घातली.
                शासनाने प्रकाशित केलेले ग्रंथ सर्व सामान्यपर्यंत पोहोचावेत म्हणून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत एम.जे.कॉलेजमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन केलेले आहे. सदरच्या ठिकणी सायंकाळी 6 ते 8 या कालावधीत रंग शाहिरी कलेचा या कार्यक्रमात शाहिर शिवाजीराव पाटील यांनी आपल्या भारदास्त आवाजात कवियत्री बहिणाबाईच्या ओव्या, महाराष्ट्राचा पोवाडा सादर केले.
            ग्रंथोत्सवाची महत्‍ती कथन करणारे शाहिरी काव्य यांनी यावेळी सादर केले. त्यातून त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगून ग्रंथ, साहित्य वाचनाने नैतिकतेचा विकास व्यक्तीमध्ये होत असतो असे सांगितले. तसेच अहिराणी भाषेतून ही शाहिर पाटील व त्यांच्या सहका-यांनी ग्रंथ वाचनाविषयी प्रबोधनात्मक पोवाडा सादर केला त्यास उपस्थित रसिकांनी टाळयांच्या कडकडात करुन मोठा प्रतिसाद दिला.
            भारतातील प्राचीन ग्रंथाचे महत्व पोवाडयातून सादर करताना शाहिर पाटील यांनी सर्व ग्रंथामध्ये `गीता` ग्रंथ सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले. त्यांनी पोवडयातून गीता ग्रंथाचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात किती महत्व आहे हे सोप्या पध्दतीने समजावून सांगितले. गीता ग्रंथाशिवाय कोणताही ग्रंथ श्रेष्ठ नाही. जीवनाचे सर्वसार गीता ग्रंथातून स्पष्ट करण्यात आले आहे.
            प्रारंभी शाहिर शिवाजीराव पाटील व त्यांच्या सहका-यांचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे यांनी सत्कार केला.
कार्यक्रमाच्या वेळेत बदल :-
            जिल्हयातील सर्व वाचक व नागरिकांना कळविण्यात येत आहे की, ग्रंथोत्सावात दिनांक 19 डिसेंबर, 2011 रोजी सादर होणारा पथनाटयाचा कार्यक्रम हा सायंकाळी 6 ते 9 ऐवजी त्याच दिवशी सायंकाळी 4 ते 6 या कालावधीत होणार आहे. याची सर्व वाचक, नागरिकांनी नोंद घ्यावी. 
ग्रंथ विक्रीस मोठा प्रतिसाद :-
            ग्रंथोत्सवात शासकीय ग्रंथालयाच्या विक्री केंद्रास वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शनाच्या पाहिल्याच दिवशी शेकडो ग्रंथाची विक्री झाली आहे. आज दुपारी पर्यंत सुमारे 60 ते 70 हजार रुपयांची विक्री झाल्याचे केंद्राच्या सुत्राकडून सांगण्यात आले. 

बुधवार, १४ डिसेंबर, २०११

गुरुवारी ज्येष्ठ साहित्यिकाची प्रकट मुलाखत व समारोप


धुळे,दि. 14 :- दर्जेदार ग्रंथ जनतेपर्यंत पोचण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दि. 13 ते 15 डिसेंबर, 2011 पर्यंत आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव कार्यक्रमाचा गुरुवार दि. 15 डिसेंबर, 2011 रोजी सायंकाळी 6 ते रात्रो 9 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात प्रथितयश लेखकांची प्रकट मुलाखत व ग्रंथोत्सवाचा समारोप आयोजित करण्यात आला आहे.  सुप्रसिध्द मराठी साहित्यिक प्रा. अनिल सोनार यांची मुलाखत मी महाराष्ट्र वाहिनीचे संचालक चंद्रशेखर पाटील हे घेणार आहेत. या मुलाखतीचा जनतेबरोबर महाविद्यालयीन तरुण, तरुणींना भावी जीवनात लाभ होईल त्यादृष्टीने उपस्थित राहणे आवश्यक आहे.    
       यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  तरी शासकीय व खासगी ग्रंथ विक्री केंद्रात अल्पदरात मान्यवर लेखकांचे साहित्य, संत वाडमय आदि उपलब्ध होणार असल्याने साहित्य प्रेमी, नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा तसेच ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी केले आहे.  

ग्रंथोत्सवात रंग शाहिरी कलेचा कार्यक्रम संपन्न




     धुळे, दि. 14 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ग्रंथोत्सव-2011 च्या दि. 13 ते 15 डिसेंबर पर्यंत आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पहिल्या ‍िदवशी सायंकाळी 6 ते रात्रो 9 पर्यंत शाहीर शिवाजीराव पाटील आणि मंडळी यांनी  रंग शाहिरी कलेचा कार्यक्रम सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.
      शाहीर शिवाजीराव पाटील यांचेसोबत शाहीर नामदेव पाटील, लोटन महाजन, शंकर पाटील, सिताराम महाजन, गोकुळ पाटील, नितीन पाटील, जितेंद्र भांडारकर आदिंनी ग्रंथांचा महिमा, बहिणाबाईंची अहिराणी गीते,  हिंदी-मराठी भाषेत लोक प्रबोधन, स्त्री भ्रूण हत्या, भ्रष्टाचार ग्रंथ पोवाडे, अहिराणी लोकगीते, सर्व धर्म समभाव असलेले स्व:लिखीत गितांचा दर्जेदार कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप साळुंखे यांनी केले.  कार्यक्रमास सुप्रसिध्द मराठी साहित्यिक प्रा. अनिल सोनार, जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील, मान्यवर, पत्रकार आदि उपस्थित होते.

वाचनाची आवड वृध्दीगंत होण्यासाठी ग्रंथोत्सवाचा जनतेने जाणिवपूर्वक लाभ घ्यावा. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन





धुळे, दि. 13 :- ग्रंथ, साहित्य वाचल्याने आपला वैयक्तिक विकास होतो. लोकांमध्ये वाचनाची आवड वृध्दीगंत व्हावी या उद्देशाने शासनाच्या वतीने ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  जिल्हयातील व  शहरातील जनतेने ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांचा तसेच ग्रंथ विक्री केंद्राचा जाणिवपूर्वक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी केले.
      राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे सुरु असेलेल्या ग्रंथोत्सव अभियानाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पारोळा रोड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात दि. 13 ते 15 डिसेंबर, 2011 पर्यंत आयोजित ग्रंथोत्सव-2011 कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन उदघाटन आज झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  महानगरपालिका आयुक्त हनुमंत भोंगळे, महाराष्ट्र साहित्य परिषद, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रा. अनिल सोनार, महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते रविंद्र काकड, नगरसेवक भुपेंद्र लहामगे, नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रसाद वसावे, जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील, जिल्हा शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुभाष साबळे आदि उपस्थित होते.
      विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून ग्रंथ तसेच महात्मा फुले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा. सावरकर यांच्या साहित्यांचे आवर्जून वाचन करणे आवश्यक असून जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, वाचन संस्कृतीमुळे शब्दसंग्रह वाढून विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत त्याचा मोठया प्रमाणात फायदा होऊन, विद्यार्थी त्यात यशस्वी होतील. शासकीय ग्रंथालय तसेच शहरातील  ग्रंथालयाचे वर्गणीदार होऊन आपणास व कुटुंबियांना मोठया प्रमाणात साहित्य उपलब्ध करुन घ्यावे.
      जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, शहरातील शासकीय ग्रंथालयाच्या जागेच्या अडचणी तसेच कर्मचा-यांच्या अडचणी त्वरीत सोडविण्यात येतील. 
        सामान्य माणसापर्यंत दर्जेदार ग्रंथ पोचविण्यासाठी शासनाने ग्रंथोत्सवाचे आयोजन केले असल्याचे सांगून प्रा. अनिल सोनार म्हणाले की, जीवनाची समग्रता समजण्यासाठी थोर ग्रंथ वाचले पाहिजे.  थोर महात्म्यांची पुस्तके वाचनीय असतात, त्यामुळे वाचनाची अभिरुची वाढवून आपले जीवन सार्थकी करावे. शासनाने ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून अल्पदरात संत ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आदि ग्रंथ तसेच साहित्यीकांची पुस्तके विक्रीसाठी ठेवली आहेत. त्याची सर्वांनी आवर्जून खरेदी करावी
      भावनांक वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून प्रा. अनिल सोनार म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिंची पुस्तके संस्कार करणारी आहेत. ललित वाड.मय तसेच ललित ग्रंथ त्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत.
      वाचनाशिवाय आपली प्रगती होणार नाही असे सांगून महानगरपालिका आयुक्त हनुमंत भोंगळे म्हणाले की, वाचनाची आवड कमी होत आहे. टी.व्ही. पाहण्याची संस्कृती वाढत आहे. या संस्कृतीमुळे ज्ञान प्राप्त होते असे नाही.  ग्रंथाचा प्रचंड साठा आहे.  ग्रंथ वाचनाने नितीमूल्ये जोपासली जातात.  आपणही थोर साहित्यीकांचा तसेच समीक्षक प्रा. अनिल सोनार यांच्या साहित्याचा अवश्य उपयोग करावा.
       उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून आयुक्त हनुमंत भोंगळे म्हणाले की, टी.व्ही. कार्यक्रम पाहण्याचे आपण नियंत्रण करावे.  जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज पहाटे त्राटक ध्यान करावे.  चांगल्या मित्र, मैत्रिणीची सोबत करुन आपल्या जीवनाचा विकास साध्य करावा.
      प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविकात ग्रंथोत्सवाची माहिती देऊन उपसंचालक (माहिती) प्रसाद वसावे म्हणाले की, राज्यभरात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  ग्रंथ गुरु मानले पाहिजे.  ज्ञान संपादित करण्यासाठी ग्रंथ वाचनाची  आवड वाढविली पाहिजे.  माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे करमणुकीच्या साधनात वाढ झाली असली तरी मराठी प्रकाशन, पुस्तक विक्रीस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या लोकराज्य मासिकातील शासकीय योजना, मान्यवर साहित्यीकांच्या माहितीचा जनतेने लाभ घेण्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
     ग्रंथ विक्री केंद्राचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उदघाटन
     जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते ग्रंथोत्सवात आयोजित केलेल्या शासकीय व खाजगी ग्रंथालय विक्री केंद्राचे फीत कापून उदघाटन करुन ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली.  यावेळी त्यांचेसमवेत मान्यवर उपस्थित होते.  ग्रंथविक्री केंद्रात  शासन मुद्रण, लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई, जिल्हा माहिती कार्यालयाचे लोकराज्य, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, संशोधन मंडळ, समर्थ वाग्देवता मंदिर, किर्ती प्रकाशन, कविता रती आदिंचे ग्रंथविक्री केंद्र सहभागी झाले आहेत.
     ग्रंथदिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद
      जिल्हा शासकीय ग्रंथालयापासून ग्रंथोत्सवाच्या आयोजित केलेल्या ग्रंथदिंडीचे सकाळी सुप्रसिध्द मराठी साहित्यिक प्रा. अनिल सोनार यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.  यावेळी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, महानगरपालिका महापौर सौ.मंजुळाताई गावीत, आयुक्त हनुमंत भोगळे, नगरसेवक हिरामणआप्पा गवळी, भुपेंद्र लहामगे, माहिती उपसंचालक प्रसाद वसावे, ग्रंथपाल सुभाष साबळे आदि उपस्थित होते. कमलाबाई कन्या हायस्कूलच्या विद्यार्थीनीं ग्रंथदिंडीत सहभागी झाल्या होत्या. ग्रंथदिंडी शहरातील प्रमुख मार्गावरुन काढून कार्यक्रमस्थळी ग्रंथदिंडीचा समारोप झाला.  यावेळी शाहीर सुभाष कुळकर्णी, एकविरा देवी हायस्कूलचे विद्यार्थ्यांची लेझिम पथक, जिजामाता कन्या हायस्कूलच्या विद्यार्थीनी, नागरिक, पत्रकारांनी, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.       
      कमलाबाई कन्या हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत तर शाहीर शिवाजीराव पाटील आणि मंडळींनी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप साळुंके यांनी केले तर जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी कवी जगदीश देवपूरकर, मान्यवर, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थीनी आदि उपस्थित होते. ग्रंथोत्सव यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयातील टी.एन.धाकड, राजेश सोनार, संदिप गावीत, सा. ये. जगताप, रा. ना. मोरे, अरुण ओगले, अब्दुलगनी मन्सुरी, श्रीमती यमुनाबाई सोनवणे आदिंनी परिश्रम घेतले.