सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास अनुमती


मुंबई, दि. 5 : लोकसभा, विधानसभा तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाने व राज्य निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे.
          यासंदर्भात शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, दि. 5 जुन 2010 च्या परिपत्रकानुसार मतदारांना ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. तथापि, ज्या मतदारांकडे ओळख पटविण्यासाठी, शिधापत्रिकेव्यतिरिक्त अन्य विहित केलेले पुरावे उपलब्ध नाहीत, अशा मतदारांना त्यांच्या घटनादत्त अधिकारापासून वंचित रहावे लागू नये म्हणून दि. 5 जुन 2010 च्या परिपत्रकात अंशत: बदल करुन केवळ मतदानाच्या दिवशी मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास अनुमती दिली आहे.  
0 0 0 0




मुख्यमंत्र्यांना निवेदने, पत्रे पाठविण्यासाठी नवीन ईमेल पत्ता वापरण्याचे आवाहन


मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री सचिवालयाचा chiefminister@maharashtra.gov.in हा ईमेल पत्ता बंद करण्यात आला असून त्याऐवजी cm@maharashtra.gov.in आणि cm-mh@nic.in असे दोन नवीन ईमेल पत्ते तयार करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारी, निवेदने, पत्रे पाठविण्यासाठी आता जुन्या पत्त्याऐवजी नवीन पत्त्यांचा वापर करावा, असे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत कळविण्यात येत आहे.
शासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे शासनाचे धोरण असून सर्व कार्यालयांचे संगणकीकरण झालेले आहे व इंटरनेटच्या माध्यमातून सर्व कार्यालये जोडली गेलेली आहेत. ईमेलद्वारा पत्रव्यवहार झाल्यास कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरण संरक्षणासही मदत होणार आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी नव्या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                          0000000

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

दहावीची परीक्षा 1 मार्च पासून


मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे मार्च, 2012 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळात 1 मार्च 2012 पासून  सुरु होत आहे.
विज्ञान व पूर्व व्यावसायिक शाखेमधील विषयांची प्रात्यक्षिके, तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, विज्ञान विषयाच्या लेखी परीक्षेच्या कालावधीत आणि तोंडी व श्रेणी परीक्षा सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी तर तंत्र व पूर्व व्यावसायिक विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2012 या कालावधीत घेण्यात येईल.
            मुकबधीर, बहुविकलांग या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शरीर व आरोग्यशास्त्र तसेच गृहशास्त्र या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा सोमवार दिनांक 23 एप्रिल 2012 रोजी अनुक्रमे सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये घेण्यात येईल. प्रात्यक्षिक परीक्षेची निश्चित तारीख व दिवस इत्यादी माहितीसाठी परीक्षार्थींनी शाळा प्रमुखांकडे 11 फेब्रुवारी 2012 पूर्वी संपर्क साधावा.
परीक्षार्थींनी परीक्षेच्या दिवशी परीक्षास्थळी सकाळी 10 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा सुरु होण्याच्या नियोजित वेळेनंतर 30 मिनीटांपेक्षा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही व सदर विषयाला अनुपस्थित समजण्यात येईल.
अंध तसेच सेरेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग, अल्पदृष्टी, कॅन्सरग्रस्त, मज्जातंतू विकारग्रस्त, स्वमग्न विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा प्रत्येक तासाला 20 मिनिटे या प्रमाणात जास्त वेळ तर  मुकबधीर विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी एकूण 30 मिनिटे आणि अध्ययन अक्षमता विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी लेखी परीक्षेच्या निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा 25 टक्के जास्त वेळ देण्यात येईल. सर्वसाधारण परीक्षार्थ्यांपेक्षा बहुविकलांग परीक्षार्थींना 90 मिनीटे जादा वेळ प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी देण्यात येईल. परंतु यासाठी मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
परीक्षार्थींनी आपल्या उत्तरपत्रिकेवरील व पुरवणीवर विहीत जागेवर आपला बैठक क्रमांक अक्षरात व अंकात बिनचूक लिहावा. उत्तरपत्रिका व पुरवणीच्या अन्य कोणत्याही भागात बैठक क्रमांक लिहिल्यास किंवा ओळख पटविण्यासाठी सांकेतिक खुण केल्यास या सूचनेचा भंग केला म्हणून त्याची शिक्षासूचीनुसार संपादणूक रद्द करण्यात येईल. परीक्षार्थींना परीक्षा कक्षात कोणतेही पुस्तक वा कागद आणण्यास मनाई आहे.
            सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकेवर बारकोड पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना बारकोड संबंधीची माहिती परीक्षा सुरु होण्यापूर्वी देण्यात येणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 30 मिनिटे अगोदर परीक्षागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका एकच असून त्यामध्ये भाग 1 व 2 असे दोन वेगवेगळे भाग आहेत. त्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका प्रत्येक भागाप्रमाणे सोडविण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
00000000

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून


मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी / मार्च 2012 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी)  तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळात दिनांक 21 फेब्रुवारी 2012 पासून  सुरु होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.
परीक्षार्थींनी प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षेचे निश्चित स्थळ व वेळेबाबत उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांशी संपर्क साधून खातरजमा करावयाची आहे. प्रात्यक्षिक /तोंडी परीक्षा/ श्रेणी परीक्षा गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी ते शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2012 या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, श्रेणी परीक्षेची ''आऊट ऑफ टर्न'' परीक्षा शुक्रवार  दिनांक 30 मार्च व शनिवार दिनांक 31 मार्च 2012 रोजी घेण्यात येईल. स्टेनोग्राफी (इंग्रजी) या विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी  तर स्टेनोग्राफी (मराठी) या विषयाची परीक्षा गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2012 रोजी घेण्यात येईल.
परीक्षार्थींनी परीक्षेच्या दिवशी परीक्षास्थळी प्रथम सत्रात सकाळी 10.30 वाजता व द्वितीय सत्रात दुपारी 2.30 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा सुरु होण्याच्या नियोजित वेळेनंतर 30 मिनीटांपेक्षा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षार्थींनी उत्तरपत्रिकेच्या व पुरवणीच्या मुखपृष्ठावर ठराविक जागेवरच आपला बैठक क्रमांक अक्षरात व अंकात बिनचूक लिहावयाचा आहे. ठराविक जागा सोडून अन्यत्र कोठेही लिहिण्यास सक्त मनाई आहे. या सूचनेचे उल्लंघन  केल्यास विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यात येईल. बारकोडसंबंधी उत्तरपत्रिकेवरील सूचना वाचून त्याप्रमाणे निश्चित केलेल्या जागी बारकोड स्टीकर व होलोग्राफ स्टीकर चिकटविणे आवश्यक आहे.
प्रवेशपत्राशिवाय परीक्षार्थ्यांस परीक्षेस बसण्यास अनुमती दिली जाणार नाही. परीक्षार्थींना परीक्षा कक्षात कोणतेही पुस्तक, कागद, मोबाईल फोन, पेजर, आयपॉड, तत्सम साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे तसेच प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेकरीता कॅल्क्युलेटर किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणार नाही. अध्ययन अक्षमता विद्यार्थ्यांना फक्त गणित आणि पुस्तपालन व लेखाकर्म या विषयाच्या लेखी परीक्षेसाठी कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी आहे परंतु यासाठी मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा एक तास जास्त वेळ देण्यात येईल. मुकबधीर, कर्णबधीर विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा अर्धातास जास्त वेळ दिला जाईल. तसेच अंध, अस्थिव्यंग, शारीरिक अपंग व सेरेब्रल पाल्सी या व्याधीने बाधित असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा प्रत्येक तासाला वीस मिनिटे या प्रमाणात जास्त वेळ देण्यात येईल. परंतु यासाठी मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
माहिती तंत्रज्ञानाची परीक्षा सोमवार दिनांक 26 मार्च ते बुधवार 28 मार्च 2012 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षार्थींनी त्यांच्या मूळ महाविद्यालयाच्या अथवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून परीक्षेच्या वेळेची माहिती करून घ्यावी, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
00000000

शासकीय रेखाकला परीक्षा- 2011 चे निकाल जाहीर


मुंबई, दि. 31 : राज्यातील कला संचालनालयातर्फे सप्टेंबर-2011 मध्ये माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षांचे निकाल संबंधित केंद्रांवर जाहीर करण्यात आले आहेत. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल 87.84 टक्के व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 85.48 टक्के लागला आहे.
          अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतून एकूण 857 केंद्रांमार्फत या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. एलिमेंटरी परीक्षेस  बसलेल्या 2 लाख 326 विद्यार्थ्यांपैकी प्रथम श्रेणीमध्ये 5 हजार 958, द्वितीय श्रेणी मध्ये 20 हजार 791 आणि तृत्तीय श्रेणी मध्ये 1 लाख 49 हजार 229 विद्यार्थी असे एकूण 1 लाख 75 हजार 978 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
          इंटरमिजिएट परीक्षेस बसलेल्या 1 लाख 82 हजार 265 विद्यार्थ्यांपैकी प्रथम श्रेणीमध्ये 8 हजार 533, द्वितीय श्रेणीमध्ये 21 हजार 203 आणि तृत्तीय श्रेणीमध्ये 1 लाख 26 हजार 78 असे एकूण  1 लाख 55 हजार 814 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
          या वर्षी राज्यात एलिमेंटरी परीक्षेत डी. ए. व्ही, पब्लिक स्कूल, नवीन पनवेल या शाळेची विद्यार्थीनी कुमारी निपुर्णा प्रविण गवळी ही प्रथम आली असून इंटरमिजिएट परीक्षेत कुमार केशव ऋषिकेश गवांदे हा जिजामाता माध्यमिक विद्यालय, ज्ञानेश्वर नगर,              जि. अहमदनगर या शाळेचा विद्यार्थी प्रथम आला आहे.
000

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

मुलींचे प्रमाण कमी होणे ही समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट --- जिल्हाधिकारी प्रकाश महाजन


धुळे :- राज्यात धुळे जिल्हयाचे मुलींच्या जन्मदराचे प्रमाण अतिशय कमी असून ती आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असून सुशिक्षित समाजाला यासाठी चिंतन व मननाची आवश्यक असून भविष्यात मुलांना लग्नासाठी मुलीच मिळणार नाहीत हा धोकाही समाजाने लक्षात घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा पीसीपीएनडीसीचे अध्यक्ष प्रकाश महाजन यांनी आज केले.
     राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान चाचणी प्रतिबंध कायदा आणि Online From Filling च्या एक दिवशी कार्यशाळेचे जिल्हा शल्य चिकित्सक धुळे, महानगरपालिका, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे दिप प्रज्वलन करुन जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. बी. एन. देशपांडे यांच्या उदघाटन हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी प्रकाश महाजन हे होते. तर प्रमुख पाहुणे मनपा आयुक्त हनुमंत भोगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, आय एम ए चे अध्यक्ष डॉ. के. एल. बोरा, निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुंढे, डॉ. रवि वानखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लाडीकर, डॉ. बी. बी. माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यावेळी म्हणाले की, सुज्ञ लोकच समाजाचे मोठया प्रमाणात नुकसान करत असून त्यांना जर कायद्याची भिती वाटत नसेल तर परमेश्वराचा कायदा त्यांना  निश्चितच दंडीत करेल. बुध्दीजीव समाजाने विचार केला पाहिजे. कारण आपण समाजाचे काही तरी देणेदार लागतो. डॉक्टरांनी  पैशाचा लोभापाही समाजाचे नुकसान करु नये,त्यांच्याकडे  असे कृत्य कोणी करायला येत असेल तर त्याला पोलीसांच्या ताब्यात द्यावे असे सांगीतले. ते पुढे म्हणाले की, समाजातील सुज्ञ लोकांनी विपषण केल्यास त्यातून खूप काही मिळते त्यामुळे असे कृत्य करण्यास ते धजावणार नाहीत असे अनेक उदाहरणांसह  जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगीतले.
     आपल्या उदघाटनपर भाषणात न्या. बी. एन. देशपांडे म्हणाले की, समाजातील अशा  प्रतिष्ठित  लोकांवर आम्हाला शिक्षा करण्याची पाळी आणू नये. समाजात काही डॉक्टर विकृत मनोवृत्तीचे असल्यामुळे पैशाच्या हवासापाई केलेले कृत्य समाजाला कुठे घेवून जात आहे. समाजात परमेश्वरानंतर डॉक्टराला देव समजला जातो. काही डॉक्टर
समाजात आपली प्रतिष्ठा लोभापायी खराब करीत असून चारित्र्यवान डॉक्टर प्रलोभनाला बळी पडणार नाही याची मला खात्री असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
     जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यावेळी म्हणाले की, समाजाला नवीन तंत्रज्ञानाचा फायदा जरी झाला असेल तर तोटा मोठा होत आहे. तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेवून काही डॉक्टर गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व लिंग तपासणी करुन मुलींचा समाजाचा रेषो खालावत आहेत. त्यामुळे सामाजिक सुधारणेची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
     आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. के. एल. बोरा यावेळी म्हणाले की राष्ट्रीय व राज्यस्तरावर आय. एम. ए. संघटना आमच्या लोकांविरुध्दच उभी असून असे कृत्य करतांना आमचा व्यवसायिक बंधू जर आढळला त्यावर आय.एम.ए. बंदी घालणार आहोत. असे कृत्य करणा-याला समाजापुढे आणल्यास त्यांना आयएमए तर्फे  एक लाख रुपयाचे  पारितोषिकही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी मनपा आयुक्त हनुमंत भोंगळे म्हणाले की, धुळे जिल्हयाचा मुलींचा हजारामागील रेषो 883 वा आला असून ही गंभीर बाब आहे. सर्व समाजाला विचार करण्याची वेळ आली असून असे कृत्य करणा-या डॉक्टरांना नोटीस देवून भागणार नाही तर त्यांना दंडीत केले पाहिजे. आपली संस्कृती काय आहे हे त्यांना कळलेच नाही, पैशाच्या लोभापायी असे कृत्य करतांना त्यांना समाजाने उघडे पाडावे. समाजात डॉक्टर, वकिल, शिक्षक, पत्रकार,अधिकारी यांच्या मार्फत जनजागृती मोठया प्रमाणात झाली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
     प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लाडीकर यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले की, जिल्हयात 94 सोनोग्राफी सेन्टर असून ग्रामीण भागात 26 तर शहर भागात 68 आहे. त्यापैकी 6 सेन्टर सील केलेले असून यापुढे अध्यक्षांच्या परवानगीने प्रत्येक सोनोग्राफी सेंन्टरची कडक तपासणी करण्यात येणार आहे. स्त्री-पुरुषाचे  प्रमाण समांतर राहण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित डॉक्टरांनीच पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे  सांगितले. 
     कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मेडिकल कॉन्सीलचे कार्यकारणी सदस्य डॉ. रवि वानखेडकर यांनी पीसीपीएनडीसी कायदा व सोनोग्राफी सेन्टर चालविण्यासाठी लागणारे लायसन्स व इतर कागदपत्रांची  डॉक्टरांनी करावयाची पूर्तता याबाबत  माहिती दिली.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाहिदअली यांनी केले तर आभार डॉ.रवि वानखेडकर यांनी मानले.
000

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी सुरेंद्र गांगण उपाध्यक्षपदी संदेश सावंत


मुंबई, दि. 30 : मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये आज झालेल्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक निवडणुकीत डी.एन.ए.चे सुरेंद्र गांगण यांची अध्यक्षपदी निवड झाली असून उपाध्यक्षपदी दै. लोकमतचे संदेश सावंत यांची बिनविरोध निवड झाली.
          या निवडणुकीच्या सायंकाळी घोषित झालेल्या निकालानुसार टाइम्स ऑफ इंडियाचे संजीव शिवडेकर हे कार्यवाह म्हणून तर आकाशवाणीचे दिलीप जाधव हे कोषाध्यक्षपदी निवडून आले आहेत. मनीषा रेगे (पीटीआय), मंदार पारकर (पुण्यनगरी), विनोद जगदाळे (न्यूज 24), खंडुराज गायकवाड (जनप्रवास), अझीझ इजाज (उर्दू टाइम्स) हे संघाच्या कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवडून आले आहेत.
          या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून विनय खरे यांनी काम पाहिले. निकालानंतर संघाचे मावळते अध्यक्ष अनिकेत जोशी यांनी मिनी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदाचा कार्यभार सुरेंद्र गांगण यांच्याकडे सुपूर्द केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
0 0 0 0 0