बुधवार, ४ एप्रिल, २०१२

नाशिक येथे 7 ते 16 एप्रिल दरम्यान सैन्य भरती मेळावा


मुंबई, दि. 3 : नाशिक येथे 7 ते 16 एप्रिल 2012 दरम्यान सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक आणि ठाणे पात्र उमेदवारांना या मेळाव्यात प्रवेश दिला जाणार आहे.
            हा मेळावा सर्व पात्र उमेदवारांसाठी खुला असून इच्छुक उमेदवारांनी थेट लाईट रेजिमेंन्ट, देवळाली कॅम्प, नाशिक येथे दिलेल्या वेळा पत्रकाप्रमाणे हजर रहावे. यामध्ये मुंबई व नवी मुंबई मधील सोल्जर ट्रेडसम्न सोडून सर्व उमेदवारांना 10 एप्रिल 2012 रोजी तर नाशिक, रायगड, ठाणे या ठिकाणच्या सर्व पात्र उमेदवाराना 11 एप्रिल रोजी सहभागी होता येईल. फक्त सोल्जर ट्रेडसम्न उमेदवारांची 13 एप्रिल 2012 रोजीच्या मेळाव्यात सैन्य भरती केली जाणार आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी 15 व 16 एप्रिल 2012 रोजी सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी केली जाणार आहे. यामध्ये माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण, वय 17 वर्ष 6 महिने ते 21 वर्षे या वयोगटातील उमेदवार पात्र असून त्याकरिता 168 सें.मी उंची, 50 किलो वजन, छाती 77/82 सें.मी अशी शारिरीक पात्रता आवश्यक आहे.
            या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे: सैनिक जीडी पदासाठी 45 टक्के मार्कासह शालांन्त परीक्षा उत्तीर्ण तर तंत्र सैनिक आणि नर्सिंग सहाय्यक पदासाठी 12 वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
            उमेदवाराने आपल्या सोबत दहावी, बारावीच्या निकालाची सत्य प्रत, चारित्र्य पडताळणीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जिल्हा दंडाधिकाऱ्याने  दिलेले जात प्रमाणपत्र, त्यासोबतच 5x4 आकाराचे अलिकडच्या काळातील 15 फोटो, भाषिक उमेदवारांना वास्तव्याचा दाखला ही प्रमाणपत्रे आवश्यक आहेत असे मुंबई शहर सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.
0000

यशवंतराव चव्हाण यांचे कार्य महाराष्ट्रासाठी दिशादर्शक - मुख्यमंत्री


मुंबई, दि. 3 : स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य हे द्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी दिशादर्शक ठरणारे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
            महाराष्ट्र विधानमंडळ आणि राष्ट्रकु संसदीय मंडळ यांच्यावतीने येथील मध्यवर्ती सभागृहात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे लिखित, 'महाराष्ट्र काल, आज आणि उद्या' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
            व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप   वळसे -पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, संसदी कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, प्रा. अरुण गुजराथी, आमदार हेमंत टकले, प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असताना संरक्षण, गृह, परराष्ट्र वित्त या महत्त्वाच्या चारही खात्यांचे मंत्रीपद भूषविणारे ते एकमेव मंत्री होते. त्यांच्या विचारांची स्फुर्ती घेऊन द्याच्या महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
            विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी विकासाचा चौफेर आराखडा तयार करुन कृतीशिलतेला प्राधान्य दिले. त्यांच्या जीवनावर संशोधनपर लिखाण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            'यशवंतराव महाराष्ट्रातले, यशवंतराव दिल्लीतले ' या विषयावरील आपल्या भाषणात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक साहित्यिक क्षेत्रातील कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. कृष्णाकाठ, सह्याद्रीचे वारे, ऋणानुबंध या महत्त्वाच्या ग्रंथलिखाणाबरोबरच 22 पुस्तकांची प्रस्तावना त्यांनी लिहीली. सात  साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद पाच साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष पदही त्यांनी भूषविले. यशवंतराव चव्हाण यांची शेतकऱ्यांविषयीची आस्था, त्यांची शिक्षणाबद्दलची तळमळ आदी गोष्टींचीही मधुकर भावे यांनी माहिती दिली.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार उल्हास पवार यांनी समारोपाचे भाषण आमदार हेमंत टकले यांनी केले.
000

शनिवार, ३१ मार्च, २०१२

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मिळणार एसटीचे स्मार्ट कार्ड



            मुंबई, दि. 30 :  राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना येत्या दोन महिन्यात एसटीचे स्मार्टकार्ड देण्यात येईल असे  परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज मंत्रालयात सांगितले.
            मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) साध्या  व निमआराम बसेसमधून विनामूल्य प्रवासासाठी वार्षिक पासेसचे वितरण मंत्रालयातील पत्रकार कक्षात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
            परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांना महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांना आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक प्रमोद नलावडे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विलास मुकादम यांना एसटीचे वार्षिक पासेस देण्यात आले.
            याप्रसंगी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद  धस तसेच पत्रकार  मोठया संख्येने उपस्थित होते.
            श्री. गुलाबराव देवकर पुढे म्हणाले की, पत्रकारांना स्मार्ट कार्ड देताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक  त्या सूचना देण्यात येतील.
            मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी राज्यमंत्री देवकर , महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. कपूर व महासंचालक श्री. नलावडे यांचे  स्वागत  करुन  सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.  कार्यवाह संजीव शिवडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
0 0 0 0

मराठी तारका सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मराठी चित्रपट तारका झळकल्या एकाच मंचावर


          मुंबई, दि. 30 : मराठी बोलपटाला 80 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त निर्माता-दिग्दर्शक  महेश  टिळेकर यांनी काल रवींद्र नाट्य मंदीर, प्रभादेवी येथे मराठी अभिनेत्रीच्या नृत्यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम  `मराठी तारका` सादर केला.
          यावेळी  सांस्कृतिक  कार्यमंत्री  संजय देवतळे, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, हिंदी अभिनेत्री हेलन, झीनत अमान, रती अग्निहोत्री, वर्षा उसगावकर, अभिनेता संजय नार्वेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
          आपल्या सौदर्याने रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या प्रख्यात मराठी अभिनेत्रींनी लावणी, लोककला, नृत्य कला प्रकार या कार्यक्रमात सादर केले. सुधा चंद्रन, रेशम टिपणीस, शर्वरी जमेनीस,  क्रांती रेडकर, दिती भागवत,  नूतन जयंत, मेधा घाडगे, भार्गवी चिरमुले, किशोरी गोडबोले, स्मिता शेवाळे, मानसी नाईक, पूजा सावंत, प्रिया बापट, तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे, तेजा देवकर, अमृता खानविलकर या अभिनेत्रींनी यात भाग घेतला होता.  
          तसेच विनोदी कलाकार विजू खोटे, किशोरी अंबिये, दिगंबर नाईक, संदिप पाठक, दिपक देशपांडे यांनी देखील विनोदी कार्यक्रम सादर केले.
          या कार्यक्रमाचे  आयोजन निर्माता- दिग्दर्शक  महेश टिळेकर  यांनी केले होते. तर नृत्यदिग्दर्शन दीपाली विचारे यांनी केले होते.
000

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात 2 एप्रिल 2012 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


          मुंबई, दि.30 : नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा जलदगतीने व्हावा, त्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पहिला मजला, ओल्ड कस्टम हाऊस,शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई, येथे सोमवार दिनांक 2 एप्रिल 2012 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी, नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
          मुंबई शहर जिल्ह्याच्या शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी सदर दिवशी उपस्थित राहून तीन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने लोकशाही दिनी स्वीकारली जाणार नाहीत. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. सेवा व आस्थापना विषयक तक्रारी, विविध न्यायालये, प्राधिकरण, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी (उदा.राजस्व, अपिल्स इ.) स्वीकारल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.
000

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे मंगळवारी विधानभवनात व्याख्यान


मुंबई, दि. 30 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि महाराष्ट्र विधानमंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष यानिमित्त `यशवंतराव महाराष्ट्रातले, यशवंतराव दिल्लीतले` या विषयावर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे            मंगळवार, 3 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मध्यवर्ती सभागृह, विधानभवन येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
          मधुकर भावे लिखित `महाराष्ट्र : काल, आज आणि उद्या` या पुस्तकाचे प्रकाशन विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, एकनाथ खडसे, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.  
000

महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, वाहतूक क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांना सहभागाची मोठी संधी : मुख्यमंत्री अमेरिकेचे वाणिज्यमंत्री जॉन ब्रायसन - मुख्यमंत्री यांच्यात चर्चा


मुंबई, दि. 30 :  मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या शहरांबरोबरच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, वाहतूक, पर्यटन आदी क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. परस्पर फायद्याच्या अशा या विपुल संधींचा फायदा अमेरिकन कंपन्यांनी घ्यावा. विकासाच्या या प्रवाहात राज्य सरकार एका भागिदाराची भूमिका निभावेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज अमेरिकेचे वाणिज्य मंत्री जॉन ब्रायसन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली.
या शिष्टमंडळात अमेरिकेचे मुंबईतील महावाणिज्यदूत पीटर हास, वाणिज्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अमेरिकेतील विविध 16 उद्योग समुहांचे उच्चाधिकारी उपस्थित होते. राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री. ब्रायसन आणि त्यांच्या सोबतच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. ते म्हणाले अमेरिका आणि भारत यांच्यातील वाणिज्य व आर्थिक क्षेत्रातील सहकार्याची परंपरा फार जुनी आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशाला महाराष्ट्रासारख्या प्रगतीपथावरील राज्यात अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र हे झपाट्याने नागरिकरण होणारे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. वाढत्या नागरिकरणामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने उभी होत आहेत.  विशेषत: पायाभूत सुविधांची उभारणी, शहरी वाहतुकीच्या सुविधा आणि घरबांधणी या क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी शासनाने खासगी-सार्वजनिक सहभागातून विकास करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अनेक ठिकाणी हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. 
मुंबई शहरामध्ये मेट्रो, मोनो रेल या माध्यमातून वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यात येत आहे.  नागपूर हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे उपराजधानीचे शहर आहे. या ठिकाणीही विशेष आर्थिक क्षेत्राची उभारणी करून नव्या आंतरराष्ट्रीय अद्ययावत कार्गो हब व विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारनेही दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक निर्यात करणारे, सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेले
औद्योगिक राज्य आहे.  राज्यात पर्यटन विकासाच्याही अमर्याद संधी उपलब्ध आहेत.  या सर्व दृष्टीने महाराष्ट्रात अमेरिकन कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या विविध संधींचा फायदा घेऊन महाराष्ट्राच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी शिष्टमंडळातील विविध उद्योगांच्या प्रतिनिधींना केले. 
वित्तीय क्षेत्रात काम करण्यासाठीही उत्सुक – ब्रायसन
            अमेरिकेचे वाणिज्य मंत्री जॉन ब्रायसन यांनी महाराष्ट्रातील विविध संधी आजमावण्यासाठीच आपण मुद्दामच आपल्यासमवेत अमेरिकेतील महत्त्वाच्या उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींना सोबत आणले आहे, असे स्पष्ट केले.  महाराष्ट्रातील औद्योगिक, पायाभूत सुविधा क्षेत्रातील संधींचा फायदा नक्कीच घेण्यात येईल आणि भारत व अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.  महाराष्ट्र शासनाचा आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. औद्योगिक गुंतवणुकीबरोबरच वित्तीय क्षेत्रात काम करण्यासाठीही आम्ही उत्सुक आहोत, असेही श्री. ब्रायसन म्हणाले. 
या चर्चेवेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहूल अस्थाना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा, सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
            या शिष्टमंडळात ऑटो डेस्क, ब्लॅक अँड व्हिटेक कार्पोरेशन, सी. एच. रॉबिनसन वर्ल्डवाईल्ड, सीएचटूएम हिल इंडिया, ईएचडीडी आर्कीटेक्चर, जनरल इलेक्ट्रीक, इनोवारी, जेकब्ज इंजिनिअरिंग ग्रूप, लॉर्ड कार्पोरेशन, मॅझेटी नॅश, मिडवेस्टॉवको कार्पोरेशन, ओसी सॉफ्ट, प्राईसवॉटरहाऊसकुपर्स, टार्गेट इंजिनिअरिंग ग्रूप, सिनेरेन टेक्नॉलॉजी कार्पोरेशन, यूआरएस कार्पोरेशन आदी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. 
-----०-----