मंगळवार, २३ जून, २०१५

अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींनी निवासी शाळेत वेळेत प्रवेश घ्यावा

धुळे दि. 22 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची निवासी शाळा, सोनगीर व अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची निवासी शाळा, भाडणे ता. साक्री या ठिकाणी सन 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तात्काळ  प्रवेश घ्यावा. अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची निवासी शाळेत प्रवेशित विद्यार्थी / विद्यार्थीनींना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य, गणवेश, खेळ, करमणुक तसेच इतर सर्व सोयी सुविधा शासनामार्फत मोफत पुरविल्या जातात. प्रवेश घेण्यासाठी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, रहिवाशी दाखला, गुणपत्रक इ. प्रमाणपत्राच्या सत्यप्रती इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. तरी गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी श्रीमती वनिता शिवाजी बेरड,  मुख्याध्यापक, एस. एन. सोनवणे, गृहपाल, अनुसूचित जाती व नवबौध्द मलांची निवासी शाळा, सोनगीर, श्रीमती दिपमाला पानपाटील,  मुख्याध्यापक, श्रीमती एस. आर. वळवी, गृहपाल,  अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची निवासी शाळा, भाडणे ता. साक्री जि. धुळे  या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त वैशाली हिंगे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000


जवाहर नवोदय विद्यालयाचा इयत्ता सहावीचा निकाल जाहीर

धुळे, दि. 22 :- मेहेरगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा इयत्ता सहावी वर्गाचा  सन 2015-16 चा निकाल  नुकताच जाहीर करण्यात आला आहे.  सदर निकाल विद्यालयाच्या नोटीबोर्डवर तसेच  www.nvsropune किंवा www.navodaya.nic.in  या  वेबसाईटवर उपलब्ध आहे.  तसेच निकालाची प्रत शिक्षणाधिकारी, धुळे व गट शिक्षणाधिकारी, धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर यांच्या कार्यालयात उपलब्ध  असल्याची माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. पी. बोरसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

24 जून रोजी निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा

धुळे, दि. 22 :- जिल्हा कोषागारामार्फत  बुधवार दि. 24 जून, 2015 रोजी सकाळी 11-00 वाजता संतोषी माता चौकातील शिवतीर्थाजवळील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला  आहे.  तरी ज्या निवृत्ती वेतन धारकांना आपल्या निवृत्ती वेतन विषयी अडचणी, शंका असतील अशा निवृत्ती वेतन धारकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी बी. डी. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयाच्या शिल्पकारागीर प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 24 जून

मुंबई, दि. 22 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे चालविण्यात येणा-या  मुंबईतील एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत कोपा (1 वर्ष). डी.टी.पी. (1 वर्ष) ह्या ट्रेडकरीता प्रवेशसत्र ऑगस्ट 2015 करीता प्रवेश उपलब्ध आहेत. या ट्रेडकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा अंतिम मुदत 24 जून 2015 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरायचा आहे. हा प्रवेश अर्ज www.admissian.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावा, असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई यांनी कळविले आहे.

0000000

राज्यातील अभयारण्यांची संख्या वाढवण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री

मुंबई दि. २२:  राज्यातील  अभयारण्यांची संख्या वाढवण्याचा महत्वाचा निर्णय पुनर्रचित वन्यजीव मंडळाच्या आजच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
            महाराष्ट्र राज्य पुनर्रचित वन्यजीव मंडळाची पहिली बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्य मंत्री राम शिंदे,  आमदार  बंटी भांगडिया,
श्री. प्रभुदास भिलावेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे, राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) अनिल सक्सेना, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, आणि वन्यजीव  मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.
            आजच्या बैठकीत  राज्यात नवीन अभयारण्य आणि संवर्धन राखीव निर्मितीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यात ठाणे खाडी फ्लेमिंगो  अभयारण्य (१६.९० चौ.कि.मी), विस्तारित कर्नाळा अभयारण्य (६.८५४ चौ.कि.मी, तोरणमाळ संवर्धन राखीव क्षेत्र (९१.५२ चौ.कि.मी),  अंजनेरी संवर्धन राखीव (५.६९ चौ.कि.मी ) या प्रस्तावांचा समावेश आहे.  ठाणे खाडी क्षेत्र हे आशिया खंडात आढळणाऱ्या मोठ्या खाडी क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. या खाडीच्या दोन्ही बाजूस चांगल्या प्रकारचे कांदळवन आढळून येते. येथे भरती आणि ओहोटीच्या काळात  हजारोच्या संख्येने फ्लेमिंगो आणि इतर  २०५ प्रजातींचे विविध पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. ही बाब विचारात घेऊन या क्षेत्राला पक्षी अभयारण्याचा दर्जा देऊन रामसर साईट म्हणून मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव युनेस्कोकडे सादर करण्याचेही आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
            वर्धा-नागपूर जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन  (क्षेत्रफळ 661.16चौ.कि.मी. ) तसेच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन  (क्षेत्रफळ 1247.46 चौ.कि.मी.) घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण स्थापन करण्यात यावे,  अशी सूचना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्य वन्यजीव रक्षक यांना प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांच्या कल्याणाकडे पुरेसे  लक्ष देणे शक्य नसल्याने राज्यात असे प्राधिकरण स्थापन करणे उपयुक्त ठरेल, जेणेकरून राज्यातील विविध यंत्रणांमार्फत चालविण्यात येणारी प्राणीसंग्रहालये एकाच छताखाली येतील.
            राज्यातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात जे विकासात्मक प्रकल्प केंद्र शासनाच्या अंतिम मंजूरीनंतर केले जातात त्या प्रकल्प यंत्रणेकडून प्रकल्प किंमतीच्या २ टक्के निधी वन विभागाकडे जमा केला जातो.  या निधीचा विनियोग वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी करण्याच्या दृष्टीने स्वतंत्ररीत्या महाराष्ट्र वन्यजीव निधीस्थापन करण्यात यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


 ब्ल्यू मॉरमॉन  राज्य फुलपाखरू
            महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्‍ट्राचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राज्य वृक्ष आंबा व राज्य फूल जारूल यापूर्वीच घोषित करण्यात आलेले आहे. याच धर्तीवर राज्यातील राज्य फुलपाखरू म्हणून आजच्या बैठकीत ब्ल्यु मॉरमॉन  यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दक्षिण भारतात आढळणाऱ्या आकाराने सर्वात मोठ्या असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर ब्ल्यू मॉरमॉन हे फुलपाखरू महाराष्ट्रातील सर्वात मोठे फुलपाखरू  आहे.
            राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या धर्तीवर राज्यात वन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली  स्थायी समितीची स्थापना करणारा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
            आजच्या बैठकीत राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यात व त्याच्या १० कि.मी परिसरात विकासात्मक कामे करण्यासाठी वनजमीन वळतीकरण तसेच अभयारण्याच्या सीमेत बदल करण्याच्या काही प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्यात आली. यामध्ये  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये २.७२ एकर एवढे क्षेत्र हवाई दलास  ३० वर्षाच्या भाडेतत्त्वावर यापुढे लीज देण्यास मान्यता देण्यात आली.
            बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच चंद्रपूर येथे देखील बिबट सफारीसही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
            राज्यात जमा होणाऱ्या  सीएसआर निधीतील  (corporate social responsibilityfund)  काही रक्कमराज्यातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षण राखीव क्षेत्रांच्या विकासासाठी, वृक्ष लागवडीसाठी  उपयोगात आणता  येऊ शकेल का , यादृष्टीने वन विभागाने नियोजन विभागाशी संवाद साधून अधिक माहिती घ्यावी अशी सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

0000

विमानतळ परिसरातील विनावापर जमीनी उद्योजकांकडून परत घ्याव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.22: मिहान प्रकल्प विमानतळानजीकची जमीन उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना वितरीत करण्यात आली होती. तथापि, उद्योजकांनी त्यासंदर्भात कुठलीही कार्यवाही केली नाही.त्यामुळे अशा जमीनी परत घेण्याबाबत धोरण तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.
            महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची50 वी बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी.एस.मीना, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक अशिषकुमार सिंह, नागपूर सुधार न्यासचे अध्यक्ष श्याम वर्धने आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नागपूर येथील मिहान प्रकल्पाच्या क्षेत्रात आयटी टाऊनशिप करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करावे. स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होईल याचेही नियोजन करावे. विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योग निर्मितीसाठी कार्यवाही सुरु केली आहे. त्यांना सवलत देण्याबाबत विचार करावा. शिर्डी येथील विमानतळ परीसर विकास करण्यासाठी नियोजन प्राधिकारी म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस नियोजन प्राधिकारी म्हणून मान्यता देण्यात आली आहे तसेच मिहानसाठी विकास नियंत्रण नियमावली व आराखडा नव्याने तयार करण्यास या बैठकीस मान्यता देण्यात आली.
            विमानतळ परिसरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छतेची सप्तपदी कार्यक्रम राबवावी. अमरावती, गडचिरोली, औरंगाबाद येथील विमानतळ विकासित करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
0000


शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणात एकही घर, वाडी-वस्ती सुटणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे, दि. 20 :- 6 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य बालकांचे  दि. 4 जुलै, 15 रोजी जिल्ह्यात होणाऱ्या सर्वेक्षणात एकही घर, वाडी-वस्ती सुटणार नाही अशी लोकचळवळ जिल्ह्यात व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात राज्यातील शाळाबाह्य बालकांचे एक दिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षणाच्या जिल्हास्तरीय समिती सभा जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. राहूल चौधरी, महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, सर्वेक्षण अधिकारी म्हणून जिल्हा परिषद शिक्षक आणि खाजगी माध्यमिक शाळांचे शिक्षक घ्यावेत, 20 सर्वेक्षण अधिकाऱ्यांवर एक झोनल ऑफीसर म्हणून खाजगी, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांची नियुक्ती करावी.  20 झोनल ऑफीसरांवर एक नियंत्रक अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उप अभियंता, विस्तार अधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, तालुका पातळीवर  सर्वेक्षण अधिकारी, झोनल ऑफीसर व नियंत्रक अधिकारी यांच्यासाठी  दि. 29 जून  रोजी धुळे व साक्री तालुका, दि. 30 जून, 15 रोजी शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात कार्यशाळा घेण्यात याव्यात.  तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तालुकास्तरीय समितीची बैठक आयोजित करून पुढील नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000000