सोमवार, १० ऑगस्ट, २०१५

कौशल्य वृध्दीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


            धुळे, दि. 10 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ज्या  कुटुंबांनी  100 दिवसांपेक्षा जास्त काम केले आहे.  अशा कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील  पात्र लाभार्थ्यांना कौशल्य वृध्दीसाठी शासनामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विविध कौशल्य वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमांचा  लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज केले.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कौशल्य वृध्दीसाठी उपक्रम राबविण्याकरिता  बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. एन. पाटील,  नाबार्ड सहाय्यक प्रबंधक अरविंद सोनवणे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक एस. एस. ईखारे, जिल्हा ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण केंद्राचे आर. पी. भदाणे, उपविभागीय कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. नंदकिशोर चव्हाण,  गट विकास अधिकारी श्रीमती मोरे (धुळे), बी. एस. कोसोदे (शिरपूर)  वाय. डी. शिंदे (साक्री),  शिंदखेडयाचे विस्तार अधिकारी एस. एच. मोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, कौशल्य वृध्दीसाठी  चारही तालुक्यातून 3,500 कुटुंबांचे सर्वेक्षण  करण्यात आले असून कौशल्य वृध्दीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.  यात कृषि विषयक बाबींमध्ये फळबाग, पॉली हाऊस, ठिबक सिंचन, शेडनेट, शेतीसंबंधी यंत्र चालवणे व त्यांची देखभाल दुरूस्ती तसेच बांधकाम विषयक व इतर 36 प्रकारच्या कुशल कामांचा समावेश आहे.  तसेच स्वयंरोजगारासाठी दुग्ध व्यवसाय, मत्स्य पालन, मेंढी पालन, मधुमक्षिका पालन, वाहन दुरूस्ती असे 5 स्वयंरोजगाराचे पर्याय उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.
       या बैठकीमध्ये कृषि विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाबार्ड, जिल्हा ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा उद्योग केंद्र, आय. टी. आय., शासकीय तंत्र निकेतन यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्याबाबतचे नियोजन संबंधित यंत्रणांनी त्वरित सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या.

00000000

शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

लामकानी रोपवाटिकेस जिल्हाधिकाऱ्यांची भेट



                 धुळे, दि. 8 :- शिंदखेडा वन परिक्षेत्रांतर्गत असलेल्या लामकानी रोपवाटिकेस जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज भेट दिली.  त्यांचे समवेत उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसिलदार दत्ता शेजूळ, जलयुक्त शिवार अभियान सदस्य डॉ. धनंजय नेवाडकर, वृक्षमित्र वसंतराव ठाकरे आदी उपस्थित होते.
            रोपवाटिका परिसरातून जाणाऱ्या नाल्यावर सिमेंट नाला बांध बांधण्यात यावा  व वाहून जाणाऱ्या पाण्याचा साठा करून त्याचा उपयोग रोपवाटिकेसाठी करण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
           यावेळी शिंदखेडा वनक्षेत्रपाल पी. ए. पाटील यांनी लामकानी रोपवाटिकेतील रोपांच्या बाबत माहिती दिली.  या रोपवाटिकेचे क्षेत्र एक हेक्टर असून या रोपवाटिकेतील सिताफळ, अंजन, खैर, निम, आवळा आदी रोपांची जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी पाहणी केली.  यावेळी वनपाल सविता पाटील, वनरक्षक सुवर्णा उशिरे तसेच वन कर्मचारी उपस्थित होते.
000000        


लामकानीने ठेवला पाणलोट क्षेत्र विकासाचा आदर्श --जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ



         धुळे, दि. 8 :- लामकानी गावाने लोकसहभागातून आदर्श पाणलोट क्षेत्राचा विकास केला असून लामकानीचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांनीही घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज केले.
            धुळे तालुक्यातील लामकानी एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लीश स्कूल व कै. दादासो. मगनराव पाकळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात बिजारोपण आणि वृक्षारोपणकार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसिलदार दत्ता शेजूळ, प्रभारी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील, जलयुक्त शिवार अभियान सदस्य डॉ. धनंजय नेवाडकर, वृक्षमित्र वसंतराव ठाकरे, सरपंच शिवराम तेले, उपसरपंच श्रीमती सुमित्रा बागुल, पंचायत समिती सदस्या पुष्पलता शिरोडे, संस्थेचे चेअरमन पुरूषोत्तम पाकळे, सचिव सुरेश पाकळे, प्राचार्य आर. एच. निकुम,  शिंदखेडा  वनक्षेत्रपाल पी. ए. पाटील आदी उपस्थित होते.
            लामकानी गावात  15 वर्षाच्या मेहनतीतून आदर्श पाणलोट क्षेत्राचा विकास केल्याबद्दल ग्रामस्थ, ग्राम पंचायत पदाधिकारी, डॉ. धनंजय नेवाडकर आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी म्हणाले, आदर्श पाणलोटाचा  विकास कसा करावा यासाठी एका कार्यशाळेप्रसंगी मी  हिवरेबाजार या गावी गेलो होतो.  त्यावेळी लामकानी गावाने केलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामही पाहणे आवश्यक होते, असे मला वाटते.  लामकानी गाव चराई बंदी, कुऱ्हाड बंदीचा उपक्रम राबवित असल्यामुळे पाणलोट क्षेत्राचा विकास झाला आहे.  या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींचा मोठा सहभाग असल्याने सर्व विद्यार्थी-विद्याथीनीही अभिनंदनास पात्र असल्याचे ते यावेळी म्हणाले.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले,  लामकानी गावात बॅक ऑफ बडोदा शाखा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.  त्याचबरोबर ग्रामीण रूग्णालयाच्या जागेचा प्रस्ताव तहसिलदारांनी उप विभागीय अधिकारी कार्यालयामार्फत सादर करावा तसेच शाळेची जागा नियमित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात  येणार असल्याचेही त्यांनी  यावेळी सांगितले.
         सचिव सुरेश पाकळे यांनी  शैक्षणिक संस्थेच्या विकासाची माहिती  देऊन गावाच्या अडचणी मांडतांना प्रामुख्याने ग्रामीण रूग्णालयासाठी जमिन मिळावी, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, साठवण बंधारा मंजूर करावा असे सांगितले.
            वृक्षमित्र वसंतराव ठाकरे म्हणाले, जिल्ह्यात ऐतिहासिक  फडपध्दत सुरू होती.  दूधाच्या उत्पादनात जिल्हा अग्रेसर होता.  शेताचे पाणी शेतात, गावातलं पाणी गावांत, माथा ते पायथ्याचे पाणी जिरवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
            प्रास्ताविकात डॉ. धनंजय नेवाडकर म्हणाले की, लामकानी गावात 15 वर्षापूर्वी पाणी टंचाईची समस्या भेडसावत होती.  पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी गावकऱ्यांच्या लोकसहभागातून सुमारे 450 हेक्टर क्षेत्रात 15 वर्षापासून पाणलोट क्षेत्र विकसित करण्यात आला आहे.  लामकानी गावाच्या पाणलोट क्षेत्राचा विकासात सातत्य राहण्यासाठी गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी बिजारोपण, वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.  लामकानी गावास मिळालेल्या पुरस्कारांची माहिती देऊन त्यांनी लामकानी पाणलोट क्षेत्र विकासाची पाहणी करण्यासाठी गावात माहिती केंद्र स्थापन केले असून  गावास भेटी देण्याकरिता  सहली येत असल्याचेही आवर्जून सांगितले. वसुधा संस्थेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देतांना धुळे शहराजवळील लळींग कुरण विकसीत करण्यासाठी चळवळ उभारण्यात येईल, असेही त्यांनी  सांगितले.
            प्रारंभी विद्यार्थीनींनी ईशस्तवन, स्वागतगीत, पर्यावरण गीत सादर केले.  जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते वारकरी सांप्रदायातील ज्ञानेश्वर भजनी मंडळास साऊंड सिस्टीम देण्यात आली.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख यांनी केले तर एस. एम. न्याहळदे यांनी सर्वांचे आभार मानले.  या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, मान्यवर तसेच गावकरी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थीनींनी लामकानी पाणलोट क्षेत्राच्या परिसरात  निंबोळया, कोया, जांभुळ बी, आवळा आदींचे मोठया प्रमाणात बिजारोपण केले.  यावेळी डॉ. धनंजय नेवाडकर यांनी पवन्या जातीच्या गवताची आणि इतर वृक्षांची माहिती  दिली.
000000


गुरुवार, ६ ऑगस्ट, २०१५

राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे, दि. 6 :- सर्व नागरिकांनी भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करावा.  राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना करणे हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध ) अधिनियम, 1950 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे. राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
            आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सातपुडा सभागृहात भारतीय स्वातंत्र्याचा 68 वा वर्धापन दिन म्हणून 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्या बैठकीत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. मिसाळ बोलत होते.  यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, महानगरपालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, होमगार्ड जिल्हा समादेशक अनिल बागुल, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एन. सैंदाणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  प्रवीण  पाटील,  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले   आदी  उपस्थित होते. 
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, दरवर्षी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी तसेच 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो.  सदर कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात.  त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. लहान आकारातील कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री मोठया प्रमाणावर होत असते.  शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्यासह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात.       
हे ध्वज त्याचदिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी इतस्तत: टाकले जातात व त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. रस्त्याने इतस्तत: विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लास्टिकचे असतील तर प्लास्टिक बरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज बरेच दिवस त्या ठिकाणी दिसतात.  राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे.  केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही, असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. मिसाळ यांनी सांगितले.
 कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरावर तहसिलदार व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आलेले आहेत, अशी माहिती यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.
या बैठकीत भारतीय स्वातंत्र्याचा 68 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट, 2015 च्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांना करावयाच्या कामांचे वितरण करून त्याबाबतचा सर्वांगिण आढावा घेण्यात आला.
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी

·        प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी.
·        राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियमानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान दंडनीय अपराध.
·        राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.

·        कार्यक्रम पार पडल्यानंतर इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज अशासकीय संस्थांमार्फत जिल्हाधिकारी
      व तहसिलदार यांना सुपूर्द करणार.
00000000


मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

नवनिर्मित शिरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्यांची हद्द निश्चित पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील

धुळे, दि. 4 :- शासनाच्या गृह विभागाने दि. 4 मार्च, 2015 च्या शासन निर्णयान्वये शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या निर्मितीस मान्यता दिली आहे.  त्यानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याची व शिरपूर शहर पोलीस ठाण्याची सुधारित हद्द निश्चित करण्यास दि. 13 जुलै, 2015 रोजी मान्यता दिली आहे.
            त्यानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत 47 गावांचा समावेश असून शिरपूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत 60 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
            शिरपूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत गावांची यादी
महादेव दोंदवाडा, बोराडी, बुडकी, गधडदेव, फत्तेपुर फॉ, चाकडु, उमर्दा, गुऱ्हाळपाणी, काकडमाळ,
वकवाड, हाडाखेड, खैरखुटी, हेंदऱ्यापाडा, दहिवद, सुळे, हिगांव, हिवरखेडा, लाकडया हनुमान, देविसिंगपाडा, आंबा, बोरमळी, धवळीविहीर, वडेल खु. फत्तेपुर कनगाई, मालपुर, न्यु बोराडी, कोडीद, मालकातर, बोरपाणी, वाकपाडा, झेंडेअंजन, शेमल्या, मोहिदा, दुरबळया, सांगवी, पनाखेड, पळासनेर, हातेड, चिलारे, रोहिणी, भोईटी, खामखेडा प्र. आ., खंबाळे, जोयदा, अंजनपाडा, भिलाटपाडा, जामन्यापाडा.
            शिरपूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत गावांची यादी
शिरपूर शहर, मांडळ, अजंदे बु., खर्दे बु. बाळदे, हिंगोणी बु. साकवड, रूदावली, खर्देपाथर्डे, अर्थे खु., विखरण खु., भरवाडे, टेंभे बु., खामखडा प्र. था., जुने भामपुर, भटाणे, तऱ्हाडकसबे, जवखेडा, अंतुर्ली, ममाने, वाडी बु., वासर्डी, कुवे, चांदसे, सुभाषनगर, हिंगोणीपाडा, करवंद, निमझरी, आमोदे, कळमसरे, उटांवद, जातोडे, बोरगांव, शिंगावे, वनावल, गिधाडे, उप्परपिंड, अर्थे बु. , विखरण बु., मुखेड, चांदपुरी, टेकवाडे, नवे भामपुर, उखळवाडी, वरूळ, जळोद, लोंढरे, तऱ्हाडी त. त., अभाणपुर, वाडी खु., नांदर्डे, बलकुवे, वाघाडी, लौकी, नटवाडे, वरझडी, सावळदे, टेंभेपाडा, बाभुळदे, चांदसुर्या.
            सदर हद्द निश्चितीची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000


सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी ‘एस.टी.’ सज्ज

नाशिक, दि.4 – अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवासी सेवेचा अविरत ध्यास घेतलेली  राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘एसटी’ सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. तीन हजार बसेस त्यासाठी सहा हजारपेक्षा अधिक चालक-वाहक, आपत्कालिन परिस्थितीतील दुरुस्ती यंत्रणा, नूतनीकरण केलेली बसस्थानके, प्रवाशांच्या माहितीसाठी अद्ययावत ‘माहिती कक्ष’, नाममात्र दरात ‘पर्वणी पासेस’ अशा विविध सुविधा ‘एस.टी.’ ने उपलब्ध करुन दिल्या आहेत.
एस.टी.च्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळावी यासाठी तीन हजार बसेसचे नियोजन करण्यात आले असून या बसेसकरिता सहा हजारपेक्षा अधिक वाहक-चालक, पर्यवेक्षक, कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. पर्वणीकाळात प्रत्येक बस दर 8-10 तासात स्वच्छ होईल यावरही महामंडळाचा विशेष भर राहणार असून हरितकुंभाची संकल्पना ध्यानात घेऊन बसस्थानकांच्या स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक बाह्य वाहनतळावर बस दुरुस्तीची कार्यशाळा आवश्यक त्या यंत्रांसह कार्यन्वित केली जाणार असून याच ठिकाणी कर्मचाऱ्यांना विश्रांती कक्ष, शुद्ध पाणी, स्वच्च्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. नाशिकरोड आगाराचे काम पूर्ण झाले असून महामार्ग बसस्थानकाचे तसेच त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा बसस्थानकाचेही नूतनीकरण केले आहे. सात बसस्थानकांवर कायमस्वरुपी सीसीटीव्ही लावले आहेत.
पर्वणी काळात एका दिवसासाठी 100 रुपये शुल्क भरुन पर्वणी पास प्रवाशांना घेता येईल. या पासद्वारे दिवसभर नाशिक, त्र्यंबक शहरांतर्गत ठिकाणी तिकिट न काढता भाविकांना प्रवास करता येईल. त्याशिवाय नाशिक, शिर्डी, सप्तश्रृंगीगड, भीमाशंकर आदी ठिकाणी जाण्यासाठी 847 रुपये भरुन 4 दिवस प्रवासाचा पास देखील दिला जाणार आहे. राज्यातील सर्व बसस्थानकांवर हे पास प्रवाशांना उपलब्ध होतील. धार्मिक, पर्यटनस्थळे पाहण्यासाठी 40-50 प्रवाशांच्या गटाने जर एकत्र बसचे आरक्षण केल्यास लगेच बस पुरविण्यासाठी ‘कोठूनही कोठे’ प्रवास संकल्पना कार्यन्वित केली जाणार आहे. प्रवासाच्या एक दिवस अगोदर  राज्यात कुठल्याही आगारात  हे आरक्षण करता येईल, असे विभागीय नियंत्रक श्रीमती यामिनी जोशी यांनी सांगितले.  
एस.टी. महामंडळाच्या वतीने नाशिकरोडला ‘माहिती कक्ष’ कार्यन्वित करण्यात येणार असून 0253-2318308 या क्रमांकावर कुठूनही संपर्क साधल्यास कुंभमेळ्याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील हरितकुंभ संकल्पनेबद्दल जनजागृतीसाठी पोपटी रंगाच्या नव्या 200 बसेस रस्त्यावर धावत असून प्रवाशांसाठी त्या आकर्षण बिंदू ठरल्या आहेत. कुंभमेळ्यात सेवाभावी परंपरा आणि सूक्ष्म नियोजनातून प्रवाशांना सुखद धक्का देऊन ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद सार्थ ठरविण्यासाठी एस.टी. ने सूक्ष्म नियोजन केले आहे.

00000

सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

क्रांतिसिंह नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


धुळे, दि. 3 :- क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून   अभिवादन करण्यात आले.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उप जिल्हाधिकारी रविंद्र भारदे, श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एन. सैंदाणे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जे. आर. वळवी, तहसिलदार (महसूल) सुरेश थोरात,  अधिकारी व  कर्मचारी  उपस्थित होते.
000000