बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जगात नावलौकिक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नाशिक दि. 19:- सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जगभरात नावलौकिक असून या महापर्वाचे उत्तम आयोजन करण्याचे प्रयत्न शासनामार्फत करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
साधूग्राम येथील प.पू. सद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, महापौर अशोक मूर्तडक, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी उपमुख्यमंत्री आम. छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित, योगेश घोलप, जयंत जाधव, डॉ. सुधीर तांबे, प्रा. अपूर्व हिरे आदी उपस्थित होते.
          श्री.फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्यासाठी जगभरातील भाविक, साधू-महंत एकत्र येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविक आणि साधू-महंतांना त्रास होऊ नये यासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्याच्या सूचना केल्या होत्या . त्यानुसार शासनाने चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यात त्रुटी असल्यास साधू-महंतांच्या मार्गदर्शनाखाली दूर करण्यात येतील. आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. कुंभमेळ्याचे उत्तम नियोजन करण्यात येत असून त्याचे श्रेय साधू-महंतांना आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रशासनाने केलेल्या तयारीचीही त्यांनी प्रशंसा केली.  स्थानिक जनतेने आयोजनात चांगले सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देताना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्री. शहा म्हणाले, की कुंभमेळा म्हणजे अत्युकृष्‍ट व्यवस्थापनाचे आगळे- वेगळे उदाहरण आहे. व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही संशोधनाची मोठी संधी आहे.  शासनाच्या मदतीने विविध आखाडे येणाऱ्या  साधू- संत, महंत आणि भाविकांची उत्तम व्यवस्था करतात. या सोहळ्याचे धार्मिक महत्वदेखील आहे. कुठलेही निमंत्रण नसताना मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात आणि कुंभपर्व यशस्वी करतात. जागतिक स्तरावरदेखील देशातील चार ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्याचा विशेष लौकीक आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. भुसे म्हणाले, की कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाने चांगल्याप्रकारे आर्थिक मदत केली आहे. नाशिककर जनतेच्या सहकार्याने कुंभमेळा यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अण्णासाहेब मोरे यांनी कुंभमेळ्यादरम्यान देशाच्या सौख्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल, असे सांगितले. ग्यानदास महाराज यांनी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू- महंतांसाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. शासन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे कुंभमेळा खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे, असे ते म्हणाले.  
श्री. भुजबळ म्हणाले, की कुंभमेळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांमुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होईल. त्याचा नाशिककरांना लाभ होईल. त्यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करीत त्यांना ‘अतिथी देवो भव’ चा अनुभव मिळवून द्या, असे  आवाहन त्यांनी केले. महापौर मूर्तडक यांनी प्रास्ताविक केले.
 कार्यक्रमाला स्वामी समर्थ पीठाचे अण्णासाहेब मोरे, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज, नरेंद्राचार्य महाराज, वल्लभाचार्य महाराज, रामानंदाचार्य महाराज, हंसानंदाचार्य महाराज, माधवाचार्य महाराज, धर्मदास महाराज, राजेंद्रदास महाराज, संजयदास महाराज, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह साधू- महंत, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पंडित उपेंद्र भट, मीना परुळेकर यांनी अभंगवाणी सादर केली, तर नाशिकच्या ढोल पथकाने प्रात्यक्षिके दाखविली.        मान्यवरांच्या हस्ते दिगंबर आखाडा, निर्मोही आखाडा आणि निर्वाणी आखाड्यांचे ध्वजारोहण करण्यात आले.
          ***************        

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

सहा जिल्ह्यांत राबविणार पथदर्शी उपक्रम ‘आपले सरकार’च्या दुसऱ्या टप्प्याचा आज प्रारंभ

मुंबई, दि. 14 : जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व सूचना ऑनलाईन पद्धतीने थेट शासनासमोर मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ उद्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
            जनतेला ऑनलाईन सेवा देण्याच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर आपले सरकार हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले होते. आता ही सेवा जिल्हास्तरावर विस्तारण्यात येणार आहे. पथदर्शी तत्त्वावर राबविण्यात येणारा हा उपक्रम सुरुवातीला सहा जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून त्यामध्ये ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पोर्टलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, नगरपालिका, पोलीस विभाग आणि जिल्हा परिषदांसंदर्भातील अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प 30 जिल्ह्यांत सुरू करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्पात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करुन अंतिमत: परिपूर्ण पोर्टल कार्यान्वित करण्यात येईल.
            या उपक्रमाचा पहिला टप्पा 26 जानेवारी 2015 रोजी जनतेसाठी सुरू करण्यात आला होता. नागरिकांकडून मंत्रालय स्तरावरील 9 हजार 200 तक्रारी आजपर्यंत प्राप्त झाल्या असून त्यापैकी 78 टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे. पोर्टलवर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार नागरिकांच्या तक्रारींचे समाधानकारक निपटाऱ्याचे प्रमाण 84.5 टक्के इतके लक्षणीय आहे. निपटारा न झालेल्या आणि गुंतागुंतीच्या तक्रारी मासिक ई-लोकशाही बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री स्वत: सोडविणार आहेत.
            नागरिकांना घरबसल्या शासनाच्या सेवा मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून देण्यासाठी आपले सरकार’ या पोर्टलचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोर्टलच्या माध्यमातून आपल्या तक्रारी शासनाकडे मांडण्यासाठी किंवा शासनाचे कामकाज, धोरणासंबधी जनतेला सूचना-अभिप्राय देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या तक्रारींचे 21 दिवसात निराकरण केले जाते. सुशासनासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जनतेला घरपोच सेवा देण्यात येत आहेत. या पोर्टलवर तक्रारी, अर्ज, माहिती अधिकार आणि प्रतिसाद या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. माहिती अधिकाराचा कायदा ऑनलाईन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

-----०००-----

रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

जिल्ह्यात जलयुक्त शिवारातील कामांचे जलपुजन संपन्न शेंदवड येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मुख्य जलपुजन

            धुळे, दि. 16 :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातील निवडलेल्या 27 गावांमधील पूर्ण झालेल्या कामांमध्ये साठलेल्या पाण्याचे जलपूजन एकाच दिवशी करण्यात आले.   त्यापैकी साक्री तालुक्यातील शेंदवड येथे राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री  दादाजी भुसे यांच्या हस्ते पांझरा नदीचे खोलीकरण व बांधलेल्या सिमेंट नाला बांधमुळे अडविलेल्या पाण्याचा मुख्य जलपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.  त्यांचे समवेत जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, आमदार डी. एस. अहिरे, साक्री पंचायत समितीच्या सभापती श्रीमती ताराबाई बहिरम, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसिलदार माणिक आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. एन. पाटील, तालुका कृषि अधिकारी सी. के. ठाकरे, लघुसिंचन विभाग (जलसंधारण विभाग) कार्यकारी अभियंता बी. व्ही. देसले, मंडळ कृषि अधिकारी ए. व्ही. पवार, पिंपळनेरचे कृषि सहाय्यक जितेंद्र देसले, श्रीमती प्रियंका भामरे, एन. आर. पवार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
0000000


महाराजस्व अभियानाचा जनतेने लाभ घ्यावा -पालकमंत्री दादाजी भुसे




धुळे, दि. 16 :- शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात मंडळ निहाय महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून त्याचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
            साक्री तालुक्यातील पिंपळपाडा खु. येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजना व दाखले वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी आमदार डी. एस. अहिरे, जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, साक्री पंचायत समितीच्या सभापती श्रीमती ताराबाई बहिरम, हिलाल माळी, उपविभागीय अधिकारी  विठ्ठल सोनवणे, तहसिलदार माणिक आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. एन. पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बी. एम. पाटील, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अरविंद बोरसे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे, ग्राम पंचायत सरपंच श्रीमती झेलुबाई बागुल, पिंपळगाव आश्रमशाळेचे अध्यक्ष त्र्यंबक सोनवणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी, पंचक्रोशितील नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
              पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, महाराजस्व अभियानांतर्गत शासन जनतेच्या दरबारात जाऊन लोकांपर्यंत पोहचत आहे. या अभियानातंर्गत 2,859 लाभार्थ्यांना लाभ होत आहे.  अधिकाऱ्यांनी जनतेची कामे सहजरित्या करण्यासाठी प्राधान्य द्यावे.  यापूर्वी दाखले, शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, सातबारा उतारे आदींसाठी नागरिकांची, विद्यार्थ्यांची झुंबड राहत असे.  यासाठी नागरिकांना जाण्या-येण्याचा खर्च, वेळही मोठ्या प्रमाणात लागत असे. 
            पुढे बोलतांना  पालकमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होत असलेल्या बंधाऱ्यांचा उपक्रम चांगला आहे.  या बंधाऱ्यातून शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होऊन पिकांच्या उत्पादनात निश्चित वाढ होणार  आहे आणि शेतकरी सक्षम होऊन देश प्रगतीपथावर राहण्यासाठी मदत होणार  असल्याचे सांगितले.
               जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे महसूल विभागांतर्गत कार्यालयांकडे असलेले दैनंदिन प्रश्न तत्पर निकालात काढणे आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्याच्या दृष्टीने राज्यात दि. 1 ऑगस्ट, 2015 पासून  महाराजस्व अभियान हा महात्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.  महाराजस्व अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी महिन्यातील विशिष्ट दिवस निश्चित करून मंडळ स्तरावर अथवा तालुकास्तरावर एकत्र येऊन जनतेच्या समस्यांचे  निराकरण करण्यासाठी विस्तारीत समाधान योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
          आमदार डी. एस. अहिरे यांनी महाराजस्व अभियानातून आवश्यक दाखले घरपोच मिळण्याची सोय शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे तसेच जलयुक्त शिवार अभियानातून शेतीला सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होणार आहे याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे सांगितले.   प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी महाराजस्व अभियानाची माहिती दिली.  मान्यवरांच्या हस्ते यावेळी  शिधापत्रिका, सातबारा उतारा, जातीचा दाखला लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी तहसिलदार माणिक आहेर यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  बी. एन. बिरारी यांनी केले.      
            वृक्षारोपण
             यावेळी सामाजिक वनिकरण वनविभागाच्या वतीने पिंपळपाडा खु. आश्रमशाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले.  
                                                               0000000




पिण्याच्या पाण्याचा प्राधान्याने विचार करून चाऱ्याचे नियोजन करावे -पालकमंत्री दादाजी भुसे



             धुळे, दि. 16 :- पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देऊन ते राखून ठेवले पाहिजे, गुरांसाठी चाऱ्याचे नियोजन  करावे त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोच्या माध्यमातून यंत्रणांनी मजुरांना सेल्फवरील कामे उपलब्ध करून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
           पाणी टंचाई, म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो, शेतीकर्ज पुनर्गठन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली काल  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सरला पाटील, आमदार अनिल अण्णा गोटे (धुळे), कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजीराव दहिते, आरोग्य सभापती मधुकर गर्दे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महानगरपालिका आयुक्त डॉ.नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, श्रीमती हेमांगी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, तहसिलदार दत्ता शेजूळ, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती व्ही. एन. देवरे, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अरविंद बोरसे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे, जिल्हा उपनिबंधक रामेंद्रकुमार जोशी, लघुसिंचन विभाग (जलसंधारण विभाग) कार्यकारी अभियंता बी. व्ही. देसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भदाणे, कार्यकारी अभियंता (रोहयो) अनिल पवार, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
            पालकमंत्री दादाजी भुसे  म्हणाले, खरीप हंगामात पेरणीनंतर पावसात खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना   दुबार पेरणी करण्याची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा अहवाल कृषि विभागाने एका आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा.  जिल्ह्यात गुरांसाठी चारा उपलब्ध राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन चाऱ्याची माहिती घेऊन पुढील नियोजन करण्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना पालक मंत्री म्हणाले, जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या तसेच होणाऱ्या कामांची माहिती ग्रामस्थांपासून सरपंच, आमदार, खासदार आदी मान्यवरांपर्यंत द्यावी.  जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून त्यात लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी आमदार अनिल गोटे म्हणाले, जनावरांना चारा मुबलक मिळण्यासाठी हायड्रोफ्लोरीक सिस्टीमचे तंत्रज्ञान राज्यात उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.  हे तंत्रज्ञान विकसित केल्यास जनावरांचे आजार कमी होतील, दुग्ध उत्पादन वाढीस मदत मिळेल.  हे तंत्रज्ञान नॉर्वे, स्विडन, इस्त्रायल देशात चांगल्या प्रकारे विकसीत  करण्यात आले  आहे.
आमदार कुणाल पाटील, जि.प. उपाध्यक्ष शिवाजी दहिते, आरोग्य सभापती मधुकर गर्दे  यांनी 
सांगितले की,  खरीप पिकांच्या पेरणीनंतर पावसात खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी अनुदान उपलब्ध  होणे आवश्यक होते.  जिल्ह्यात जनावरांसाठी उपलब्ध असणारा चारा आणि त्याचे योग्य नियोजन करण्याची  आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ  म्हणाले, जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरणीनंतर पावसात खंड पडल्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम झालेला असून एकरी उत्पन्न कमी येण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याचा साठा, पाणी पुरवठा, चाऱ्याची उपलब्धता, खरीप 2014 व गारपीट अनुदान आदींची माहिती देऊन जिल्ह्यात बँकांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पीक कर्ज वाटप करून चांगले काम केलेले आहे.  शेतकऱ्यांनी पीक विमा घेतल्यास नैसर्गिक आपत्तीवर त्यांना धैर्याने सामोरे जाता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच आतापर्यंत जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचे मुल्यांकन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले असून  यापुढे देखील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गुणवत्ता पूर्ण कामे झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी  सांगितले.
            बैठकीचे सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी केले.
0000000


शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न



धुळे, दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात आज सकाळी 9-05 वाजता संपन्न झाला. यावेळी  पोलीस दलातर्फे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
            यावेळी महापौर श्रीमती जयश्री अहिरराव, आमदार अनिल गोटे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सरला पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी दहिते, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मधुकर गर्दे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती किरण पाटील, माजी आमदार पी.डी.दलाल,किसन खोपडे, जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, जिल्हा होमगार्ड समादेशक अनिल बागुल,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, मनपा आयुक्त डॉ.नामदेव भोसले,ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक महादु मोतीराम चौधरी,रामदास नारायण फुलपगारे,निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे,उपजिल्हाधिकारी श्रीमती.हेमांगी पाटील,शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एन.सैदाणे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी,जे.आर.वळवी, तहसिलदार दत्ता शेजूळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल भामरे,समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती.व्ही.एन.देवरे, उपवनसंरक्षक डी.यु.पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले,लखन भतवाल, हिलाल माळी,संजय गुजराथी,भुपेद्र लहामगे, अतुल सोनवणे,श्यामकांत सनेर, रमेश श्रीखंडे, युवराज करनकाळ,मुकूंद कोळवले, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ नागरिक, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, पोलीस व होमगार्ड पथक, विद्यार्थी, विद्यार्थीनी  उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उत्तराखंडात जून 2013 मध्ये नैसर्गिक आपत्तीत बचाव कार्य करीत असतांना हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले आय.टी.बी.पी मधील जवान शशिकांत रमेश पवार यांच्या वारस पत्नी श्रीमती सोनाली उर्फे सुवर्णा शशिकांत पवार यांना आपत्ती व्यवस्थापन प्रभाग,मंत्रालय,मुंबई यांचेकडून रु.3.50 लाख रुपयांचा  धनादेश यावेळी देण्यातआला.
            राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6 धुळे या आस्थापनेवरील सहायक पोलीस उप निरीक्षक श्री.विश्वास धनराज सोनवणे यांना मा.राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल पोलीस पदक मंजूर झाल्याबाबत पालकमंत्री यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.
            तसेच यावेळी पालक मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सामाजिक वनीकरण संचालनालयातर्फे सन 2014-2015 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निंबध स्पर्धा (महाविद्यालयीन गट इ.11 वी व पुढे ) मध्ये कु.नमिता सुनिल पाटील ,एच.आर.पटेल,कन्या महाविद्यालय,शिरपूर जि.धुळे हिला प्रथम क्रमांक बक्षिस रक्कम रु.1000/- व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पुर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2015 इयत्ता 4 वी मध्ये जिल्हायातील राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केल्याबद्दल कु.हितेषा प्रदिप पाटील,जयहिंद प्राथमिक शाळा,धुळे, कु.कनिष्का विलास पवार,जयहिंद प्राथमिक शाळा,धुळे,कु.सोनल आंनदा सोनवणे,जिल्हा परिषद कन्या शाळा कासारे,ता.साक्री जि.धुळे कु.श्रृती दिनेश जाधव,जिल्हा परिषद कन्या शाळा कासारे, ता.साक्री जि.धुळे,कु.सोनल संजिव निकवाडे,जिल्हा परिषद कन्या शाळा कासारे ता.साक्री जि.धुळे, श्री.जयेश नितीन गावळे,जिल्हा परिषद केंद्र शाळा मुले कासारे.ता.साक्री जि.धुळे तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा 2015 (माध्यमिक विभाग) श्री.निखील संजय वसईकर,जयहिंद माध्यमिक शाळा,धुळे या विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
                        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी जगदीश देवपूरकर आणि वाहिदअली यांनी केले. 

0000

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

स्वातंत्र्य दिनानिमित्त मटन मार्केट व बीफ मार्केट बंद ठेवावी

धुळे, दि. 14 :- धुळे महानगरपालिका हद्दीतील सर्व स्लाटर हाऊस, मटन मार्केट व बीफ मार्केट  शनिवार  15 ऑगस्ट, 2015 रोजी  भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त  बंद ठेवावी.  तरी संबंधितांनी नोंद घेऊन स्लाटर हाऊस व बीफ मार्केट बंद ठेवावीत, असे आवाहन धुळे महानगरपालिकेचे वसुली अधीक्षक  यांनी जाहीर नोटीसीद्वारे केले आहे.
000000