गुरुवार, ३ सप्टेंबर, २०१५

राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची प्रवेश पात्रता परीक्षा 1 आणि 2 डिसेंबर रोजी

मुंबई दि 2: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी डेहराडून (उत्तरांचल) येथील राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयामार्फत इयत्ता आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा येत्या 1 आणि 2 डिसेंबर 2015 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच असून या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय 1 जुलै 2016 रोजी साडे अकरा वर्ष (अकरा वर्षे सहा महिने) पेक्षा कमी आणि 13 वर्षापेक्षा अधिक नाही असे विदयार्थी सदर परीक्षेस पात्र समजण्यात येतील. याचाच अर्थ विद्यार्थ्यांचा जन्म 2 जुलै 2003 ते 1 जानेवारी 2005 या कालावधीतील असावा, तसेच विदयार्थी दिनांक 1 जुलै 2016 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता सातवीत शिकत असावा किंवा सातवी पास असणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठीची आवेदनपत्रे या महाविद्यालयात उपलब्ध आहेत. या परीक्षेसाठी विदयार्थ्यांनी अनुसूचित जाती/जमातीसाठी रु.435/-(जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह) आणि जनरल संवर्गांतील विदयार्थ्यांनी रु. 480/-  चा स्टेट बँक ऑफ इंडियाचाच डिमांड ड्राप्ट देणे आवश्यक आहे. ड्राप्ट हा कमांडंट, आर. आय. एम. सी. डेहरडून यांच्या नावे काढणे आवश्यक असून परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे 30 सप्टेंबर 2015 पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17 डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे – 411001 यांचेकडे पोहोचतील अशा पध्दतीने पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे येथे अथवा 020- 26123066/67  या दूरध्वनीवर अथवा mscepune@gmail.comया ईमेलवर अथवा www.mscepune.inया वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या परिपत्रकात केले आहे.
००००



शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यासाठी गरज भासल्यास निकष बदलू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

             उस्मानाबाद,दि.2:विकेंद्रीत पाणी साठे तयारकरण्यासाठी शेततळी हा उत्तम पर्याय आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होते. हे लक्षात घेऊन शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येतील. त्यासाठी गरज भासल्यास विद्यमान ‍निकषात बदल करण्याची शासनाची तयारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भूम तालुक्यातील हाडोंग्री येथे सांगितले.
             मराठवाडा विभागातील प्रमुख दुध उत्पादक तालुका अशी ओळख असणाऱ्या भूम तालुक्यात यंदा ऐन पावसाळ्यात जनावरांसाठी चारा छावणी उघडण्याची वेळ आली आहे. भगवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने उघडलेल्या चारा छावणीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी महाराजस्व अभियान तसेच बळीराजा चेतना अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला . यावेळी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आ.राहूल मोटे, आ.ज्ञानराज चौगुले, आ.विनायक मेटे, आ.महादेव जानकर, नितीन काळे, ॲड.मिलींद पाटील, सुरजीतसिंह ठाकूर यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत आदी अधिकारी उपस्थित होते.
         मराठवाडा विभागातील टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कालपासून सुरु झालेल्या आपल्या दौऱ्याचा उद्देश परिस्थितीची पाहणी आणि उपाययोजनांसंदर्भात ग्रामस्थांची प्रतिक्रिया समजावून घेणे हा असल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. अगदी कमी पावसातही शेततळ्यात पाणी साठले आणि त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होऊ लागला हे चित्र काल लातूर जिल्ह्यात पाहता आले. शासनाने यापूर्वीच राज्यात दीड लाख शेततळी निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्याची घोषणा केली आहे. शेत तेथे तळे हे चित्र प्रत्यक्षात आले तर शेतीच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. शिवाय आजच्या परिस्थितीत अतिशय महत्व असलेल्या रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल. मात्र त्यासाठी काही निकष बदलावे लागतील, अशी शक्यता दिसते. शेतकरीही तशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. शेततळ्यांचे महत्व लक्षात घेऊन राज्‍य सरकार आवश्यकतेनुसार निकषात बदल करील.
          मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, यंदा वेळेवर सुरु झालेल्या पावसाने नंतर दडी मारली. मराठवाडा विभागात तर काही भागात अपुऱ्या पावसाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. येथे परिस्थिती बिकट असली तरी अशा प्रसंगी उपायांची नियोजनपूर्वक अंमलबजावणी शासनाकडून केली जात आहे. या उपायांचा शेतकऱ्यांनी उपयोग करुन घ्यावा, तसेच सर्वांनी परस्परांना सहकार्य करत मार्ग काढावा. शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, याची खात्री बाळगावी. धीर सोडू नये आणि खचूनही जाऊ नये. शासन सर्व सामर्थ्यानिशी विपरीत परिस्थितीचा सामना करीत आहे. त्यात जनतेचे सहकार्यही मिळत आहे.
        विद्यमान परिस्थितीत शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी टँकर उपलब्ध करुन देण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. ऐन पावसाळ्यात राज्यात चारा छावण्या काढण्याची वेळ आली असून छावण्यांसाठीचे काही निकष शिथील करण्यात आले आहेत. छावणीत किमान 500 जनावरे असावीत, ही अट शिथिल करुन किमान संख्या 250 वर आणली आहे. चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वैरण विकास कार्यक्रम हाती घेतलेला आहे. कमी जागा , कमी पाणी आणि कमी किमतीत चारा घेण्याचे नवे तंत्रज्ञान उपयोगात आणले जात आहे. राज्यात ज्या जिल्ह्यात विपूल चारा उपलब्ध आहे, तेथून चारा आणला जाईल. शेजारच्या कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यातून चारा आणण्याची सरकारने तयारी ठेवली आहे.
         पाण्यासाठी जेथे रेल्वे वाघिणींचा उपयोग करावा लागणार आहे, तेथे तो केला जाईल आणि याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी आपली चर्चा झाली असून त्यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य शासन मागेल तेवढ्या वाघिणी उपलब्ध करुन दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले आहे.
         शेतकऱ्यांना गेल्या स्वातंत्र्य दिनापासून अन्न सुरक्षा योजनेचा सरसकट लाभ दिला जात असून त्याचा राज्यातील 60 लाख शेतकरी कुटुंबांना उपयोग होणार आहे. ज्या शेतमजुरांकडे रेशन कार्ड नाही, त्यांना ते उपलब्ध करुन द्यावे आणि त्यांनाही या योजनेचा लाभ द्यावा, असे सरकारने सांगितले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
         शेतीसाठी पाण्याच्या प्रश्नाचा उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विभागाला कृष्णा खोऱ्यातील त्याच्या हक्काचे पाणी मिळेल याची ग्वाही दिली. या संदर्भातील प्रकल्पाला गेली दहा वर्षे केंद्रीय पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नव्हते ते आता प्राप्त झाले आहे, असे सांगून त्यांनी या प्रकल्पाबाबतीत पुढील नियोजन केले जाईल, असे नमूद केले.
       राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेचा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमात सहा महिन्यात एक लाख कामे पूर्ण झाली असून राजस्थान सारख्या राज्याने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना या कामाचे महत्व सांगण्यासाठी निमंत्रण दिले. राजेंद्रसिंह यांच्यासारख्या जाणकार जलतज्ञांनी या कामाचा गौरव केला. कमी खर्चात आणि कमी वेळात पाणी साठवण्याचे काम या योजनेमुळे होत आहे. त्यामुळे या योजनेत मोठा लोकसहभाग लाभला असून स्वातंत्र्यानंतरचा मोठा लोकसहभाग असलेली योजना आता जनतेची झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
         राज्यात यंदा पीक विम्यापोटी 1600 कोटी रुपये मिळाले असून पिक विमा योजना अधिक विस्तारीत करण्याचा सरकारचा मानस आहे. आज या योजनेत नुकसान भरपाईसाठी महसूल मंडळ हा निकष गृहीत धरला जातो, तो बदलला जावा आणि गावपातळीवर ही योजना राबविली जावी, अशी सरकारची भूमिका आहे व त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आज राज्यात अवघे 54 हवामान केंद्र असून ही संख्या 2059 एवढी करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होईल. उस्मानाबाद जिल्ह्याने विविध बाबतीत चांगले काम केले आहे. याचा मुख्यमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करुन त्याबद्दल जनतेचे तसेच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणेचे कौतुक केले.
          यावेळी पालकमंत्री डॉ.सावंत यांचे भाषण झाले. त्यांनी राज्य शासन संवदेनशील असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांत आत्मियतेने लक्ष घातले आहे. शासन शेतकरी आणि त्यांची गुरे यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे उदगार त्यांनी काढले.
          चारा छावणी चालवणाऱ्या संस्थेच्या वतीने बाळासाहेब पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली व काही अटी शिथील करण्याची अपेक्षा व्यक्त केली . यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामस्थांना प्रातिनिधीक स्वरुपात विविध प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ प्रदान करण्यात आला. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी प्रास्ताविक केले.

००००

राज्यातील शाळाबाह्य मुलांचे नोव्हेंबरमध्ये मेगा सर्वेक्षण स्वयंसेवी संघटनाच्या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री श्री.विनोद तावडे यांचा निर्णय

मुंबई दि. 2 सप्टेंबर-राज्यातील शाळाबाहय मुलांचे प्रमाण अधिक संख्या असेलेले जिल्हा शोधून या जिल्हयामधील शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संघटना यांची एकत्रित राज्यस्तरिय समिती स्थापन करण्यात येईल. समितीमध्ये शिक्षण विभागाचे दोन-तीन अधिकारी तसेच स्वयंसेवी संघटनामधील प्रतिनिधींचा समावेश असेल आणि ही नव्याने नियुक्त करण्यात येणारी समिती येत्या नोव्हेंबर मध्ये राज्यामधील जिल्हयानिहाय शाळाबाह्य मुलांचे मेगा सर्वेक्षण सुरु करेल असा शालेय शिक्षण मंत्री निर्णय श्री. विनोद तावडे यांनी आज या बैठकीत घेतला.
राज्यातील शाळाबाहय मुलांच्या सर्वेक्षणबाबत शालेय शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक पार पडली. या बैठकीला स्वयंसेवी संस्था, संघटना,शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली. श्री. तावडे यांनी यावेळी उपस्थित स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची मते जाणून घेतली. हे सर्वेक्षण अधिक प्रभावीपण आणि परिणामकारक कश्या पध्दतीने करण्यात येईल याबाबतही चर्चा करण्यात आली. -आजच्या बैठकीमध्ये शाळाबाह्य मुलांना शाळेत पुन्हा आणण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्यात येईल. शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संघटना एकत्रित रित्या सर्वेक्षणाची जबाबदारी पूर्ण करण्यात येईल.
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या कामामध्ये वीटभट्टी कामगार, उसतोडणी कामगार, दगड-खाणी मध्ये काम करणारे मजूर आदी कामगार व मजूरांच्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण प्रामुख्याने करण्यात येईल.या सर्व मुलांना प्रथम शाळेत आणण्यात येईल आणि त्यांना शिक्षण देण्यात येईल. तसेच ज्या राज्यामध्ये ज्या खाणी नोंदणीकृत नाही अश्या खाणी गुगल मॅपिंगच्या सहाय्याने शोधुन काढण्यात येतील आणि तेथे काम करणा-या मजूरांच्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात येईल असेही श्री. तावडे यांनी सांगितले,
काही कामगारांची मुले ही विदर्भामधून छत्तीसगड मध्ये जातात, तसेच छत्तीसगड मधील मुलेही आपल्या पालकांसमेवत विदर्भामध्ये येतात. अशा मुलांची यादी तयार करुन त्यांना पुन्हा शाळेत कशा प्रकारे दाखल करता येईल यासाठी प्राधान्य देण्यात येईल. महाराष्ट्रातील विविध प्रकारचे काम करणारी मुले ही सुरतमध्येसुध्दा जातात, तसेच येथील मुले ही कर्नाटकमध्येही जातात, त्यामुळे अशा सर्व मुलांना शोधून त्यांचे पुन्हा शाळांमध्ये पुनर्वसन करण्याच्या कामाला अधिक प्राधान्य देण्यात येईल असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
याबैठकीला शिक्षण आणि शाळाबाह्य मुलांच्य क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संघटनाचे हेरंब कुलकर्णी, प्रथमच्या फरिदा लांबे,शांतीवन चे दिपक नागरगोजे, श्रमजीवी संघटनेचे किसन चौरे,समर्थनचे रुपेश किर, नरोत्तम सेखसरिया फाऊंडेशनचे हेमांगी जोशी,मुंबई मोबाईल क्रेचेसचे वृशाली पिसपाती, संघर्ष वाल्मिकीचे दिनानाथ वाघमारे,संतुलनचे अड. रेगे शिक्षण विभागाचे सचिव, शिक्षण आयुक्त आदी उपस्थित होते.

मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५

सैन्य भरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर संपर्क साधावा

धुळे, दि. 1 :- धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सैन्य सेवेत भरती होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी 1 सप्टेंबर, 2015 पासून खुली सैन्य भरती प्रक्रिया बंद करण्यात आली असून आता यापुढे सैन्य भरती ही ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारून सुरू करण्यात आली आहे. 
            इच्छुक उमेदवारांनी केंद्र शासनाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधून सर्व प्रकारच्या सैन्य भरती बाबतची तारीख व सखोल माहिती प्राप्त करावी.  तसेच भरती सुरू होण्याच्या दोन महिन्यापूर्वी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून ॲडमीट कार्ड काढून घेणे आवश्यक आहे.  सदरचे रजिस्ट्रेशन हे भरती सुरू होण्याच्या 15 दिवस अगोदर स्वीकारले जाणार नाही, अशी माहिती सेना भरती कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

   000000

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे भरण्याचे आवाहन

धुळे, दि. 1 :-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग  या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक होते.  तथापि सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून केवळ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना किंवा डायरेक्ट द्वितीय वर्षात डिग्री अथवा डिप्लोमा अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 28 ऑगस्ट, 2015 पासून शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून भरावे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि 1: महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन 2015-16 या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून 1 सप्टेंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2015 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र संस्थांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत अनुदान दिले जाणार आहे.
संस्था नोंदणी अधिनियम, 1860 आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या संस्थांनाच अनुदान देण्यात येणार असून महाराष्ट्रात अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या साहित्य संस्था अनुदानासाठी अर्ज करु शकणार आहेत. विहित नमुन्यातील अर्ज व नियमावली www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेशया सदरात अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदानया शीर्षाखाली ‘What’s new’ या सदरात ‘Grant in Aid for Annya Marathi Sahitya Samelan’ या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या www.msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेशया सदरात अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदानया शीर्षाखाली उपलब्ध होतील.
सदर अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटयमंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 (022- 24325931) येथे 1 सप्टेंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2015 या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. सदर अनुदानासाठीचे अर्ज विहित नमुन्यात व विहित कालावधीत (1 सप्टेंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2015) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सादर करणे बंधनकारक राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या अर्जाचा अनुदानासाठी विचार केला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन ‘बिग ग्रीन गणेशा’ उपक्रमाचे उद्घाटन

मुंबई दि.1: गणशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संवर्धन यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पध्दतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे.प्रत्येकान आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल,असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

            पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि 92.7 बिग एफएम यांच्यवतीने आयोजित बिग ग्रीन गणेशाजनजागृती उपक्रमाचे उद्घाटन आज मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री रामदास कदम, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, विधानपरिषदेचे सदस्य पांडुरंग फुंडकर, पर्यावरण विभागाच्या अपर मुख्य सचिव मालिनी शंकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, बिग एफ.एम आणि बिग मॅजिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण कटियाल, बिग एफ.एमचे स्टेशन डायरेक्टर जय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे अभिनंदन केले आणि हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. तो धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, कोणतेही सामाजिक बदल पटकन आत्मसात करण्याची विद्यार्थ्यांची वृत्ती असते. कोणतेही परिवर्तन विदयार्थीच घडवू शकतात असे मी मानतो. आज या अभियानात शालेय विदयार्थ्यांना सामावून घेण्यात आल्याने आगामी काळात हे विदयार्थी या पर्यावरण स्नेही उपक्रमात सर्वांचा सहभाग मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            पर्यावरण विभागाने पर्यावरणपूरक होळीनंतर पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यासाठी उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असल्याचेही मख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या गोष्टी पंचतत्वात विलीन होतात, त्याच गोष्टी ईश्वराशी साधर्म्य साधू शकतात. व्यक्ती मृत झाल्यावर त्या व्यक्तीलाही पंचतत्वात विलीन करतो आणि मग त्यातूनच पुननिर्मिती होते, असे आपण मानतो. तसेच उत्सवांची रचना सुध्दा पंचतत्वाच्या आधारेच केली आहे. गणपती विर्जित केल्यावर गणपतीच्या मूर्तीची आणि निर्माल्य यांची होणारी दशा आपण पाहतो. यामुळेच आपला दृष्टीकोन बदलून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. रद्दीच्या आणि कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात येणारी इको फ्रेंडली गणेशमूर्ती हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून आगामी काळात प्रत्येक मूर्ती ही पर्यावरणपूरक असेल, अशी इच्छाही श्री. फडणवीस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
 आपला प्रत्येक सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा रामदास कदम

            पर्यावरण मंत्री श्री. कदम यावेळी म्हणाले की, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पर्यावरण विभाग प्रयत्न करीत आहे. यापुढेही असेच विविध उपक्रम राबवून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पर्यावरण विभाग कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. आपले सगळे सण यापुढे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे व्हावे यासाठी आपला विभाग प्रयत्न करीत आहे. पर्यावरणाचे रक्षण ही पर्यावरण विभागाची जबाबदारी आहे, असे मी मानतो. गणपतीच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास गणपतीचे विर्सजन केल्यानंतर या मूर्ती तत्काळ विर्जित होतात आणि म्हणूनच प्रत्येकाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडयाच्या दौऱ्यावर जात आहे. दौऱ्यावर जाण्यापूर्वी आज गणेशाचे आशीर्वाद घेऊन जात आहेत. मराठवाडयात पाऊस पडेल आणि गणपती बाप्पा येथील दुष्काळ दूर करेल, अशी मला आशा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            पर्यावरण विभागाच्या अपर मुख्य सचिव मालिनी शंकर यावेळी आपल्या भाषणात म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम चांगला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या इको फ्रेंडली गणेशोत्सव उपक्रमार्फत समाजाचे प्रबोधन केले जात असून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जात आहे. या चळवळीत आता विद्यार्थ्यांनाही सामील करुन घेतल्याने या उपक्रमाला आणखी गती येणार आहे.

            महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकेत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि 92.7 बिग एफ.एम. यांच्या मार्फत गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या मर्ती विविध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.


            या कार्यक्रमात इको बाप्पा या मोबाईल ॲपचे उद्घाटनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.