बुधवार, २५ जानेवारी, २०१२

अभिमान ! मतदार असल्याचा. . .


लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या प्रक्रियेत निर्भयमुक्त वातावरणात पार पडणाऱ्या निवडणुका आणि मतदारांचे मत या दोन्ही गोष्टींना अनन्य साधारण असं महत्व आहे. एकीकडे आपल्या आवडीचा सक्षम नेता निवडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमातून मतदारांना मिळत असतांना दुसरीकडे सशक्त लोकशाहीची पायाभरणी होत असते. ही एकप्रकारे  आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची एक चांगली गुंतवणूक देखील मानली जाते. त्यामुळे मतदार असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगायला हवा आणि ज्या ज्या स्तरावर म्हणजे विधानसभा-लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या ज्या वेळी होतात तेव्हा आपला हा मौल्यवान अधिकार बजावायला हवा.
            राज्याचे मुख्य निवडणुक  अधिकारी कार्यालय 25 जानेवारी 2012 ला दुसरा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करते आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाचा मुलभूत अधिकार बजावण्याचे आवाहन करणारी, जन प्रबोधन करणारी प्रत्येक बाब लक्षवेधी ठरणार आहे.
            निवडणूका आल्या की मतदारयादीत नाव नसणं, नावात- रहिवाशी पत्त्यात चुका असणं किंवा बदल     झालेला असणं, छायाचित्र ओळखपत्र नसणं यासारख्या अनेक तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. पण त्यासाठी मतदार म्हणून आपण स्वत: किती दक्ष असतो, आपल्या नावातील- पत्त्यातील बदल, सुधारणा करून घेण्यास आपण किती प्रयत्न करतो हे समजून घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आपण पात्र असताना मतदानाचा हक्क बजावणं ही.  जी व्यक्ती वयाची 18 वर्षे पूर्ण करते त्या व्यक्तीला मतदानाचा मुलभूत हक्क प्राप्त झाला आहे. पण या मुलभूत हक्काची आपण कितीजण अंमलबजावणी करतो ? हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. मतदानाच्या टक्केवारीवरून हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
            आपल मत- आपला हक्क - आपलं मतदान केंद्र याबाबतीत जागरूक राहताना मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं, मतदानाचा मुलभूत अधिकार बजावावा आणि मतदानाला न जाण्याची आणि मतदान न करण्याची उदासीनता मनातून काढून टाकावी यासाठी विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जात असते.
            तरूणांना आपण देशाचा आधारस्तंभ मानतो. याच आधारस्तंभाने पुढे येऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं, समृद्ध, सशक्त लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक वर्षी 25 जानेवारी  हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.  लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिला आणि युवकांचे मतदानाचे प्रमाण वाढावे, त्यांनी पुढे येऊन निर्भयपणे आपला मतदानाचा आणि घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करावा या उद्देशाने या कार्यक्रमात महिला आणि युवकांना समोर ठेऊन विशेष जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
            दि. 25 जानेवारी 2012 रोजी नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर हॉलमध्ये सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय मतदार दिवसाच्या राज्य स्तरीय  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव
थँक्सी थेकेकरा, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वंदना कृष्णा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
            राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यादृष्टीने एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.  मतदार असल्याचा अभिमान- मतदानासाठी सज्ज, जागृत मतदार, समृद्ध लोकशाहीचा आधार, तुमचे मत- तुमची निर्णयशक्ती, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा सहभाग अशा प्रोत्साहनात्मक स्वरूपात मोहीम राबविण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय योगदान देण्याबद्दल, सहभागी होण्याबद्दल आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विविध प्रसार माध्यमांचा उपयोगही करून घेण्यात आला आहे. 18 ते 19 वयोगटातील मतदारांना त्यांनी त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी एक विशेष मोहीम देखील या निमित्ताने हाती  घेण्यात आली आहे. 
            ज्या मतदाराचा जन्मदिनांक 1 जानेवारी 1992 ते 1 जानेवारी 1994 या दरम्यान आहे,  अशा 18 ते 19  या वयोगटातील मतदारांना, त्यांचे नाव मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची  विशेष संधी यानिमित्ताने मिळणार असून त्यासाठी त्याने  मतदार नोंदणीचा नमुना अर्ज क्रमांक 6,  रंगीत छायाचित्रासह मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी यांच्या कार्यालयात द्यावयाचा आहे.  ज्या पात्र तरुण नागरिकांनी  अद्याप त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवले नसेल त्यांनी त्वरित मतदार नोंदणी करावी  आणि दि. 25 जानेवारी 2012 या ‘¸üÖ™ÒüßµÖ मतदार פü¾ÖÃÖ’ कार्यक्रमात छायाचित्र मतदार ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन ही या निमित्ताने करण्यात आले आहे.
            राज्यात  आजमितीस एकूण 7 कोटी, 87 लाख, 21 हजार 472 नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये 4 कोटी 14 लाख, 75 हजार 360 एवढे पुरुष तर 3 कोटी 72 लाख, 45 हजार 842 महिला मतदार आहेत. यापैकी   82.34 टक्के मतदारांना त्यांचे छायाचित्र ओळखपत्र वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.
            राज्यात नव्याने सुमारे 19 लाख मतदारांची नाव नोंदणी झाली आहे. नव्याने नोंदणी झालेल्या 18 ते 19 वयोगटातील 5 लाख 50 हजार 386 युवक-युवतीना छायाचित्र ओळखपत्र तसेच मतदार दिन बिल्ला  वाटपाचे काम  प्रत्येक मतदान केंद्रावर केले जाणार आहे. यामध्ये 3 लाख 62 हजार 114 पुरुष तर 1 लाख 88 हजार 272 महिला मतदाराचा समावेश आहे.त्याचप्रमाणे नव्याने नोंदणी झालेल्या 20 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या एकूण 13 लाख 50 हजार 588 इतकी आहे. त्यांनाही यावेळी फोटो ओळखपत्र तसेच मतदार दिन बिल्ला वाटप केले जाणार आहे. यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 47 हजार 043 तर महिला मतदार 6 लाख 03 हजार 545 इतक्या आहेत.
             दि. 25 जानेवारी 2012 रोजी एस. एन. डी. टी. महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात 20 युवतींना प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात छायाचित्र मतदार ओळखपत्र व मतदार दिन बिल्ला  सन्मानपूर्वक वितरित केला जाणार आहे.
मुख्य निवडणूक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी विकसित केलेल्या http://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरही  निवडणूक प्रक्रियेसंबंधीची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले असून हे अर्ज भरुन ते संबंधित मतदारसंघातील यादीत नोंदविण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी, यांच्या कार्यालयात नेऊन देता येतील.
            राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आपण मतदार असल्याचा अभिमान बाळगून मतदानासाठी सज्ज राहतांना सुदृढ आणि सशक्त लोकशाही च्या निर्मितीमधील आपला सहभाग अधिक बळकट करुया. 

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करता येईल -नीला सत्यनारायण


मुंबई, दि. 24 : प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते संबंधित जिल्ह्यात ध्वजारोहण करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
आचारसंहितेच्या कालावधीत प्रजासत्ताक दिन येत असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे विचारणा केली जात होती. त्यासंदर्भात हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास हरकत नसली तरी नेहमीच्या ध्वजारोहण स्थळात बदल करण्यात येऊ नये, या समारंभात करण्यात येणारी भाषणे देशासाठी हुतात्मे झालेल्यांचा आणि देशाच्या गौरवापुरतीच मर्यादित असावीत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक प्रचाराची भाषणे होणार नाहीत आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत.  
0-0-0

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज - 2022 दोन हजार कोटी रुपयांचे रोखे 24 जानेवारी रोजी विक्रीला


मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र शासनाने 10 वर्ष मुदतीचे दोन हजार कोटी रुपयांचे रोखे एका अधिसूचनेद्वारे विक्रीला काढले असून हे रोखे भारतीय रिझर्व बँकेमध्ये मंगळवार, दिनांक 24 जानेवारी, 2012 रोजी विक्रीसाठी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत उपलब्ध होतील. रिझर्व बँकेच्या फोर्ट, मुंबई कार्यालयात या रोख्यांचा लिलाव करण्यात येणार असून या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या भांडवली खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल.
          शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र, वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त 1 टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.
          भारतीय रिझर्व बँकेच्या फोर्ट, मुंबई शाखेमध्ये दिनांक 24 जानेवारी, 2012 रोजी लिलाव आयोजित करण्यात येईल. गुंतवणूकदारांनी स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे निगोशिएटेड सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 12.30 वाजेपर्यंत तर अस्पर्धात्मक बिडस् 10.30 ते 11.30 या वेळेत सादर करावेत. लिलावाचा निकाल रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 25 जानेवारी, 2012 रोजी करण्यात येईल. कर्जरोख्याचा कालावधी हा 10 वर्षाचा असेल आणि तो दिनांक 25 जानेवारी, 2012 पासून सुरु होईल तर दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परफेड करण्यात येईल. या कर्ज रोख्यास व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कुपन दरावढा असेल आणि हे व्याज प्रतिवर्षी दिनांक 25 जुलै आणि 25 जानेवारी रोजी सहामाही पद्धतीने देण्यात येईल.
          महाराष्ट्र शासनाने याबाबतची अधिसूचना असाधारण राजपत्र भाग-1 मध्य, उपविभामध्ये दिनांक 20 जानेवारी, 2011 रोजी प्रसिद्ध केली आहे.
000

मुंबई शहर कार्यक्षेत्रातील उद्योजक व आस्थापनांनी 31 जानेवारी पर्यंत ईआर - 1 विवरणपत्र पाठवावे


मुंबई, दि. 20 :  मुंबई शहर कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित उद्योजक आणि आस्थापनांनी 31 डिसेंबर 2011 रोजी संपणाऱ्या त्रैमासिकात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती 31 जानेवारी 2012 पूर्वी पाठवावी.
            सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 व अधिनियम 1960 नुसार त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1 (ER-1) विहीत नमुन्यात स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक आहे. तरी मुंबई  शहर कार्यक्षेत्रातील (मुंबई शहर जिल्हा) सर्व संबंधितांनी विवरणपत्र जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मुंबई या कार्यालयात दिनांक 31 जानेवारी 2012 पूर्वी पोहचतील अशारितीने पाठवावी, असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी केले आहे.
            या कायद्यातील सर्व अटी, नियम व विवरणपत्राची माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
000

ग्राम आणि कुटीर उद्योगाकडे लक्ष दिल्यास बचतगट चळवळीस वेग --मुख्य सचिव


मुंबई, दि. 20 : ग्राम आणि कुटीर उद्योगांकडे लक्ष दिल्यास राज्यात बचतगट चळवळीच्या विकास आणि विस्तारास होण्यास वेग येईल, असे राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी सांगितले.
            ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, ग्रामविकास विभाग- महाराष्ट्र शासन आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस 2012 या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोधकुमार, ग्रामविकास विभागाचे सचिव सुधीर ठाकरे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुरुंदकर यांच्यासह पारितोषिक पात्र बचतगटांचे तसेच प्रदर्शनात सहभागी झालेल्या बचतगटांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.   
            श्री. गायकवाड म्हणाले की, बचतगटांनी घेतलेल्या कर्ज परतफेडीचे प्रमाण हे खू चांगले असल्याने बँकांचा बचतगटांवरील विश्वास वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांना मिळणारा वित्तपुरवठा हा अधिक सुरळित आणि वाढला आहे. कुटीर उद्योगातील सर्वात कच्चा दुवा हा विक्री व्यवस्थेशी निगडित असतो, तो मजबूत करण्याचे काम ग्रामविकास विभागामार्फत करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर कायम स्वरूपी विक्री केंद्र विभागामार्फत सुरु करण्यात आली आहेत.
            राज्यात बचतगट चळवळीचा विकास होत असला तरी राज्याने आत्मसंतुष्ट राहता इतर राज्यांनी केलेले काम लक्षात घ्यावे  असे सांगून ते पुढे म्हणाले की, बचतगटांतील सदस्यांनी नियमितपणे एकत्र येऊन, विविध विषयांवर चर्चा करून माहितीचे आदान-प्रदान केले पाहिजे तसेच ग्राम सुधारणा, तंटामुक्ती, कुपोषण निर्मुलन, दारूबंदी यासारख्या समाजोपयोगी कामात योगदान दिले पाहिजे. राज्यात वृक्षलागवडीचा एक महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कामात बचतगटांनी योगदान दिल्यास हा कार्यक्रम निश्चित यशस्वी होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले
            स्वयंसहाय्यता बचतगटांच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांचे सक्षमीकरण होत असल्याचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशभरात 75 लाख बचतगटांची बँकांमध्ये खाती आहेत. केवळ धनिक लोकच उद्योग-व्यवसाय  करू  शकतात. हे  बचतगटांच्या
                                                                                                                                                 ..2/-
ग्राम आणि कुटीर उद्योगाकडे लक्ष..                   : 2 :
माध्यमातून एकत्र आलेल्या गरीब लोकांनी खोटे ठरवले आहे. देशभरात गेल्यावर्षी बचतगटांना जवळपास 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण बँकांनी केले असून बचतगटांच्या कर्ज परतफेडीचे प्रमाण जवळपास 97 टक्के असल्याने बचतगट हे बँकांच्या विश्वासार्हतेला पात्र ठरले आहेत.
            ग्रामीण भागात हस्त कौशल्याचे उत्तम ज्ञान असून हे ज्ञान आणि त्यांची कारागिरी जनतेसमोर आणण्यासाठी हे प्रदर्शन एक चांगले माध्यम आहे असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोधकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, बचतगटांच्या माध्यमातून उत्पादन करणे सोपे असते परंतू, त्या उत्पादनांची विक्री करणे आव्हानात्मक काम आहे. हे आव्हान यशस्वीरित्या पेलण्यासाठी बचतगटांनी उत्पादन निर्मितीमध्ये नाविन्य जपणे, बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन करणे गरजेचे आहे.
            राज्यात सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत 2 लाख 60 हजार बचतगटांची स्थापना झाली आहे. बचतगटांची स्थापना, त्यातील सदस्यांना प्रशिक्षण, बचतगटाचे महासंघ स्थापन करणे, बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु किंवा उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देणे, त्यांची कौशल्य वृद्धी करणे यासाठी विभागाकडून मोठ्याप्रमाणात सहकार्य करण्यात येत असल्याचे ग्रामविकास सचिव सुधीर ठाकरे यांनी सांगितले. यावर्षी राज्याच्या 33 जिल्ह्यात बचतगटांच्या स्तुंचे जिल्हास्तरीय प्रदर्शने भरविण्यात आली होती त्यात सुमारे 10 हजार बचतगटानी सहभाग घेतला आणि 11 ते 12 कोटी रुपयांची उलाढाल या माध्यमातून झालीदरवर्षी या प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद हा नावाप्रमाणेच `सरस` असून ग्रामीण कारागिरांच्या हस्तकौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांनी तयार केलेल्या वस्तु पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी रसिक जनतेने आवर्जुन या प्रदर्शनाला भेट द्यावी, वस्तुंची खरेदी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            यावेळी मुख्य सचिवांच्या हस्ते पुणे आणि कोकण विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या बचतगटांना `राजमाता जिजाऊ स्वावलंबन` पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच महालक्ष्मी सरस-2012 या स्मरणिकेचे, बचतगटांच्या यशोगाथा या पुस्तकाचे तसेच राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्राप्त बचतगटांच्या यशकथांच्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
000