सोमवार, ८ जून, २०१५

साक्री तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्प अंतर्गत रिक्त पदासाठी अर्जाची मुदत 18 जून

धुळे, दि. 8 :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, साक्री अंतर्गत ग्रामपंचायतीच्या गावी  अंगणवाडी सेविका-2, मदतनीस-9 आणि मिनी अंगणवाडी सेविका- 1 रिक्त पदे आहेत.   स्थानिक रहिवासी (ग्रामीण) भागातील महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी ग्रामपंचायतींना रिक्त पदे कळविण्यात आले आहे.  रिक्त पदे व अटी शर्ती पूर्ण करणा-या  ग्रामीण भागातील महिलांनी 18 जून, 2015 पर्यंत प्रकल्पस्तरावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन साक्री  एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            संबंधीत ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर अर्जाचा नमुना अटी, शर्ती नोटीस फलकावर तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्प, साक्री कार्यालयात  उपलब्ध आहे.

00000

शनिवार, ६ जून, २०१५

वृक्षारोपण चळवळ ही लोकचळवळ व्हावी -पालकमंत्री दादाजी भुसे पर्यावरण सप्ताह निमित्त आर्वी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्ष लागवड





धुळे, दि. 6 :- वृक्षारोपण चळवळ ही लोकचळवळ व्हावी.  प्रत्येक नागरिकाने जर एक झाड लावले तर शासकीय उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण होईल.  त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे वृक्षारोपण करावे, असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
धुळे तालुक्यातील आर्वी येथे स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ  दि. 3 ते 9 जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण सप्ताह निमित्त राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मधुकर गर्दे, दरबारसिंग गिरासे, उपजिल्हाधिकारी श्रीमती हेमांगी पाटील, उप विभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, आर्वीच्या सरपंच श्रीमती श्रीमती मंगलताई केले, धुळे पंचायत समिती उपसभापती सखाराम पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाणे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे, गट विकास अधिकारी जी. ए. पाटील, उप विभागीय कृषि अधिकारी प्रल्हाद सोनवणे, तहसिलदार अरूण शेवाळे, तालुका कृषि अधिकारी अण्णासाहेब दागळे,  आर्वीचे उपसरपंच किशोर देवरे, वसंत ठाकरे, नागेश देवरे, सतीश महाले, हिलाल माळी, भगवान देवरे, वाल्मिक बागडे, शेनपडू पवार, विनायक केले आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे त्याच बरोबर गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दरवर्षी पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  पर्यावरणाच्या ऱ्हासाचे गंभीर परिणाम निसर्ग व माणसांवर होत असल्याचे सांगून ते म्हणाले की,   मागील महिन्यात नेपाळमध्ये झालेला भूकंप, महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट ही निसर्गाचे संतुलन बिघडल्याचे संकेत आहेत.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल होत आहे.  या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर आहे.  या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत केली आहे.  ज्या गावाची आणेवारी 50 पैश्यापेक्षा कमी आहे.  त्या गावाला मदत देण्यात आली आहे.  ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे त्या कर्जाचे पुनर्गठन 5 वर्षासाठी करण्यात येणार आहे.  पुनर्गठित कर्जाचे पहिल्यावर्षीचे व्याज सरकार भरणार असून त्यापुढील वर्षासाठी 6 टक्के व्याज आकारणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, आपण झाडे खूप लावली पण त्यापैकी किती झाडे दुसऱ्यावर्षी जगली याचा आढावा घेतला पाहिजे.  लावलेल्या झाडांपैकी 75 टक्के झाडे जगली पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजे.  वृक्षारोपण ही लोकचळवळ बनली पाहिजे ज्यातून जास्ती-जास्त वृक्ष लागवड होईल. हवामानाची माहिती 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एस.एम.एस. व्दारे शासनाकडून दिली जाते ही संख्या वाढवून 10 लक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहण्याचे उद्दिष्ट शासनाचे आहे.
            यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली असली तरी अनेक लोकांना घरे नाहीत, पुरेसे कपडे नाहीत, पुरेसे अन्न नाही, तळागाळातील व्यक्तिंचा विकास करण्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन एकत्रितपणे काम केले तर महाराष्ट्र व देशाचा विकास होऊ शकतो. 
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, जिल्ह्यात 25 लक्ष वृक्ष लागवड या पावसाळयात करण्याचे नियोजन आहे.  वन विभाग, कृषि विभाग, ग्राम पंचायती  यांचा त्यात सहभाग घेण्यात येणार आहे.  पुढील पाच वर्षात 6 हजार गावे जलयुक्त शिवार अभियानात घेण्यात येणार आहे.  वृक्ष लागवडीचा उपक्रम हा जलयुक्त शिवार अभियानास पुरक कार्यक्रम आहे.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, वृक्ष लागवडीसाठी लोकांनी सहभाग घेतला तर उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण जिल्ह्यात करण्यात येईल.  लोकसहभाग असेल तर ती योजना प्रभावीपणे राबविण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मधुकर गर्दे म्हणाले की, वने वाढविण्याची अत्यंत आवश्यकता आहे.  वने कमी होत असल्यामुळे पयावरणाचे संतुलन बिघडले आहे.  भविष्यात जर पर्यावरणाचे संतुलन राखावयाचे असेल तर निसर्गाचे संवर्धन करणे आवश्यक आहे.  दरवर्षी लळींग कुरणात वृक्षारोपण करण्यात यावे.  कुऱ्हाड बंदी, चराई बंदी करण्याची लळींग कुरणात अत्यंत आवश्यकता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोहर पाटकर यांनी केले. 
000000

            

शुक्रवार, ५ जून, २०१५

शासकीय आश्रमशाळेत प्रवेशाकरिता जाहीर आवाहन

धुळे, दि. 5 :- आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांच्या कार्यक्षेत्रातील साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील एकूण 22 शासकीय आश्रमशाळांमध्ये सन 2015-16 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये प्रवेशाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली  आहे.  तरी पालकांनी  आश्रमशाळेत प्रवेशाकरिता संबंधित तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक यांचेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी एस. बी. तोरणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यापासून इयत्ता दहावी तसेच उच्च माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता बारावी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण मोफत तसेच सर्व शैक्षणिक सुविधा, गणवेश, शैक्षणिक साहित्य, सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, अंथरूण-पांघरूण तसेच वैद्यकीय सुविधा शासनामार्फत पुरविण्यात येतील.

0000000

धुळे जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश 15 जून पर्यंत लागू

धुळे, दि. 5 :-  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी अण्णासाहेब मिसाळ  यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश  दि. 2 जून पासून दि. 15 जून, 2015 चे 24-00 वाजेपावेतो संपूर्ण धुळे जिल्ह्यात लागू  करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

00000

पर्यावरण सप्ताहानिमित्त आर्वी येथे आज पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपण

धुळे, दि. 5 :- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ  दि. 3 ते 9 जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण सप्ताह निमित्त राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज    दि. 6 जून, 2015 रोजी सकाळी 9-00 वाजता आर्वी ता.जि.धुळे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

0000

पालक मंत्री दादाजी भुसे यांचा धुळे जिल्हा दौरा कार्यक्रम

              धुळे, दि. 5 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे  यांचा धुळे जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
              शनिवार दि. 6 जून, 2015 रोजी सकाळी 8-45 वाजता मालेगावहून शासकीय वाहनाने आर्वी ता. जि. धुळे कडे प्रयाण, सकाळी 9-30 वाजता आर्वी येथे आगमन व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड व पर्यावरण सप्ताह बाबतच्या कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10-10 वाजता आर्वी येथून जिल्हाधिकारी, धुळे कार्यालयाकडे मोटारीने प्रयाण, सकाळी 10-30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह  येथे  महाराष्ट्र भुजल विकास व व्यवस्थापन अधिनियम 2009 नुसार कार्यशाळेस उपस्थिती.

000000

आज 22 हजार स्वच्छतादूत राबविणार ‘गोदावरी स्वच्छता अभियान’ विविध सव्वाशे सामाजिक संस्था करणार 69 ठिकाणी व्यापक स्वच्छता

नाशिक, दि. 4- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हरितकुंभ संकल्पनेंतर्गत आणि  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून. 5 जून रोजी शहर-परिसरातील नदीकाठावर  ‘गोदावरी स्वच्छता अभियानराबविण्यात येणार आहे. विविध शासकीय-निमशासकीय विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच सव्वाशे सामाजिक-शैक्षणिक संस्था सुमारे 22 हजार स्वच्छतादूतांसह नदीकाठच्या 69 ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. नाशिककर जनतेनेही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यंदाच्या सिंहस्थ-कुंभमेळ्यातील हरितकुंभ संकल्पनेतून विविध पर्यावरणपूरक उपक्रम शहरात राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत पर्यावरण दिनानिमित्त गोदावरी, कपिला, वाघाडी, नासर्डी या नदीकाठच्या परिसरासह शहरातील सर्व बसस्थानके, मार्केट यार्ड, भाजी मार्केट, घाट, पूल, शहरातील चौक, रस्ते अशा 69 ठिकाणी   ही व्यापक स्वच्छता मोहिम सकाळी 7 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक समूहावर नेमून दिल्याप्रमाणे विशिष्ट भाग स्वच्छ करावा लागणार आहे.
या स्वच्छता अभियानात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांचेसह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,पोलीस आयुक्त एस्.जगन्नाथन्,  मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदी वरिष्ठ अधिकारी आणि सर्व विभागांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.
 विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकासार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, प्रांताधिकारी-तहसील कार्यालये, एस.टी., महावितरण, एमटीडीसी, एमआयडीसी,जीवन प्राधिकरणासारख्या शासकीय-निमशासकीय विभागांबरोबरच शहरातील विविध शैक्षणिक संस्था, समाजकार्य महाविद्यालये, सामाजिक संस्था, महिला मंडळे, घरेलू कामगार संघटना, भारतीय कामगार महासंघ, महिला बचत गट, आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप्स, नेहरु युवा केंद्र, क्रीडा शिक्षक संघटना, प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालय, हिंदू जनजागृती समिती आदी सामाजिक- सेवाभावी संस्थांचे सुमारे 22 हजार स्वच्छतादूत या अभियानांतर्गत नाशिक शहर-परिसराची स्वच्छता करणार आहेत.
या स्वच्छता अभियानासाठी नाशिक महानगरपालिकेने प्रत्येक ठिकाणी स्वच्छता संपर्क सहाय्यकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नाशिक शहर परिसरातील जनतेनेगोदावरी स्वच्छता अभियाना सहभागी होऊनस्वच्छ,सुंदर-हरित नाशिककरण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

* * * * * * * * * *