सोमवार, १५ जून, २०१५

जलयुक्त शिवार अभियानातून सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध होईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस









धुळे, दि. 15 : राज्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे पारदर्शकपणे सुरू असून काम शास्त्रीय पध्दतीने माथा ते पायथा सुरू आहे. यामुळे पाणी पातळी वाढेल. जलयुक्त शिवार अभियानातूनच सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध होईल. राज्यात जलयुक्त शिवार योजनेची 93 हजार कामे सुरू आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, जळगावचे खासदार ए. टी. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सरलाताई पाटील, महापौर जयश्री अहिरराव, आमदार सर्वश्री अनिल गोटे, जयकुमार रावल, अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, शिरीष चौधरी, मुख्यमंत्री सचिवालयातील सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील सर्व जलसिंचन प्रकल्प पूर्ण झाले, तरी त्यातून 50 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येवू शकते. उर्वरित 50 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचे विकेंद्रित साठे तयार करावे लागतील. जलसंधारण व मृदसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खरा विकास होवू शकतो. त्यासाठी राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचे स्ट्रक्चरल मॅपिंग करावे, अशी सूचना त्यांनी केली.
कमी वेळेत जास्त पाणी कसे उपलब्ध होईल याचा विचार झाला पाहिजे. जुनी कामे शोधून त्यांच्या दुरुस्तीवर लक्ष दिले पाहिजे. त्यातून कमी वेळेत जास्त पाणी उपलब्ध होवू शकेल. पुढील वर्षी 25 टक्के निधी दुरुस्तीसाठी उपलब्ध करुन देवू. पुढील वर्षाचा आराखडा तयार करताना त्या परिसरातील जलस्त्रोतांचा एकत्रित विचार झाला पाहिजे. त्यातून नद्याही वाहत्या होतील. सर्व विभागांच्या समन्वयामुळे या योजनेची कामे चांगली झाली असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत, असेही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.
सिमेंट बांध, तलावाच्या बाजूला जमिनीची धूप थांबविण्यासाठी वृक्षारोपण करावे. हे अभियान जनतेचाच कार्यक्रम आहे.  लोकप्रतिनिधी व नागरिकांचा वाढता सहभाग ही आनंदाची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी हा उपक्रम हाती घेणे ही अभिनंदनीय बाब आहे. शिरपूर पॅटर्नबरोबर राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पॅटर्न  पुढे आले. आपापल्या भागातील पॅटर्ननुसार सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जेणेकरुन पुढील दोन वर्षात आपल्या भागातील दुष्काळ नाहीसा झाला पाहिजे. राज्यात सुरू असलेल्या 93 हजार कामांची नोंद संकेतस्थळावर करण्यात आली आहे. त्यामुळे कुठे काम झाले आहे याची तत्काळ माहिती मिळू शकेल.
काही बँका अद्यापही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना दिसत नाहीत. याबाबत लिड बँकेला सांगितले आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा. जिल्हा बँकेबरोबरच राष्ट्रीयकृत, व्यावसायिक बँकांनी कर्ज देण्याचे प्रमाण वाढविले पाहिजे. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणार नाहीत, शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत, अशा बँकांच्या विरोधात कडक भूमिका घेण्याची आवश्यकता असून वेळप्रसंगी गुन्हे दाखल करावे लागतील, असेही त्यांनी नमूद केले. आमदार पटेल, महापौर अहिरराव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी मिसाळ यांनी पॉवर पाईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातील एकूण 129 गावांची निवड करण्यात आली आहे. एकूण मंजूर कामांपैकी 1 हजार 261 कामे पूर्ण झाली आहेत. लोकसहभाग, प्रतिसाद चांगला मिळत असून, गाळ काढणे, नाला खोलीकरण आदी कामे सुरू आहेत. याशिवाय कंपार्टमेंट बंडिंग, ओघळ नियंत्रण, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध दुरुस्ती, शेततळे, विहीर पुनर्भरण, वन तलाव, नाला सरळीकरण, नाला बांध दुरुस्ती, जामखेली नदी पुनर्रजीवन आदी कामे सुरू आहेत. या कामांच्या मूल्य मापनासाठी वेगवेळ्या संस्थांची मदत घेण्यात आली असून, त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्याचा वार्षिक ऋण आराखडा 1,643 कोटी रुपयांचा असून, आतापर्यंत 271 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे, असेही जिल्हाधिकारी मिसाळ यांनी नमूद केले. उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

        जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची पाहणी

        तत्पूर्वी मा. मुख्यमंत्री महोदयांनी धुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत केलेल्या कामांची पाहणी  केली.  त्यात पुरमेपाडा ता. धुळे येथील वन विभागाने केलेल्या सलग समतल चर, ओघळ नियंत्रण कामाची पाहणी करून वन विभागातर्फे पुरमेपाडा परिसरात करावयाच्या 1 लक्ष 67 हजार वृक्षारोपणाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.  त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिंदखेडा तालुक्यात हातनूर येथील नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण या कृषि विभागाने केलेल्या कामांची पाहणी केली.  त्याच बरोबर विखरण येथील जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने केलेल्या तलावातील गाळ काढणे, जोगशेलू येथील देशबंधू मंजू गुप्ता फाऊंडेशन तर्फे करण्यात आलेल्या जुन्या जलसंधारण कामांची दुरूस्ती व नाला खोलीकरण कामांची पाहणी केली.
            जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी करतांना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री तथा  सहकार राज्यमंत्री  दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख,  उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे (धुळे), धुळे वन विभागाचे उपवनसंरक्षक डी. यु. पाटील, शिवसेना शहर प्रमुख सतीष महाले, प्रदीप कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

00000

शनिवार, १३ जून, २०१५

वर्ष एक आरंभ अनेक अभियानांतर्गत दुसाणे येथे जनजागरण कार्यक्रमांचे आयोजन

धुळे, दि. 12 :- वर्ष एक आरंभ अनेक अभियान अंतर्गत माहिती व प्रसारण मंत्रालय, जळगाव व ग्राम पंचायत कार्यालय, दुसाणे ता. साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 जून, 2015 रोजी दुसाणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या अभियानांतर्गत गावात जनजागरण होण्यासाठी प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रचार फेरी नंतर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.  कार्यक्रमस्थळी बेटी बचाव, बेटी पढाव यांचे फोटो प्रदर्शन लावण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी उल्हास कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा

धुळे, दि. 12 :- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत पहिली व पाचवीत प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागातर्फे राबविण्यात येते.  ज्या पालकांना, पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश द्यावयाचा आहे.  त्यांनी प्रवेश अर्जासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांच्याकडे दि. 17 जून, 2015 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एस. बी. तोरणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            याअंतर्गत पाचवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा दि. 9 मे, 2015 रोजी घेण्यात आली होती.  या परीक्षेत विद्यार्थी संख्येचा लक्षांक पूर्ण झालेला नाही म्हणून पाचवीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.  इयत्ता पहिली व पाचवीसाठी ज्यांनी यापूर्वी फॉर्म भरले असतील.  त्यांनी पुन्हा फॉर्म भरू नये.
            साक्री तालुक्यातील मुलां, मुलींसाठी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे  येथे शिरपूर तालुक्यातील मुलां, मुलींसाठी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, शिरपूर (चोपडा जीन) ता. शिरपूर जि. धुळे येथे व शिंदखेडा जि. धुळे येथे दि. 20 जून, 2015 रोजी इयत्ता  पाचवीच्या प्रवेशासाठी  परीक्षा  होणार आहे.  या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनी अनुसूचित जमातीचा असावा.  दारिद्रय रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक द्यावा, पालकाची उत्पन्न कमाल मर्यादा एक लाखापर्यंत असावी.  पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे वय 5 वर्ष पूर्ण असावे. 

00000

नव्या सरकारची ध्येय धोरण तयार करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची पुणे येथे उद्या बैठक -- महसूल मंत्री एकनाथराव खडसे

धुळे, दि. 12 :- राज्यात नवीन स्थापन झालेल्या शासनाच्या ध्येय धोरणांद्वारे सामान्य जनतेपर्यंत विकासाचे कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांची बैठक उद्यापासून दोन दिवस पुणे येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे महसूल, कृषी पदुम, मदत पुनर्वसन मंत्री श्री. एकनाथराव खडसे यांनी दिली.
            गेल्या 31 ऑक्टोबर, 2014 रोजी खडसे यांचेकडे महसूल विभागाची जबाबदारी आली आहे. राज्यामध्ये सत्तांतर होऊन महाराष्ट्रातील जनतेने नव्या सरकारला निवडून दिले आहे. या नवीन सरकारचा सामान्य जनतेच्या हिताच्या आणि विकासाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वाचा वाटा असतो. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महसूल विभागातील प्रांत, तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी यांच्याद्वारे जनतेच्या दैनंदिन तसेच विकासाची कामे पार पाडत असतात. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुध्दा महसूल विभागाचे महत्वाचे योगदान असते. या पार्श्वभूमीवर नव्या सरकारची ध्येय धोरणे, भविष्यातील आगामी कार्यक्रम, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अथवा महसूली अधिकारी यांना येत असलेल्या अडचणी यांचा ऊहापोह करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 15 16 जून, 2015 रोजी पुणे येथील यशदा सभागृहात आयोजित केलेली आहे. यावेळी जिल्ह्यातील मुख्य प्रश्नांची माहिती संबंधित जिल्हाधिकारी महसूल मंत्री श्री. खडसे यांना अवगत करणार आहेत. नव्या सरकारच्या ध्येय धोरणाद्वारे सध्या प्रशासनासमोर असलेल्या अडचणी दूर करुन सुप्रशासन, गतीमान प्रशासन कसे आणता येईल, याबाबत या बैठकीमध्ये विचारमंथन होणार असल्याचे श्री. खडसे यांनी सांगितले. लोकशाही लोकविकास या दोन संकल्पनामध्ये -गव्हर्नन्सचा वापर करुन जनहिताची कामे त्वरेने कसे करता येतील यावर महसूल विभागाचे लक्ष केंद्रित करण्याबाबत श्री. खडसे यांनी यापूर्वी सर्व विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या असून शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची कामे मंत्रालयापर्यंत येता स्थानिक पातळीवरच कसे सोडविता येतील, याबाबत काही धोरण तयार करता येतील काय, याबाबत सुध्दा या बैठकीत विचार होणार असल्याची माहिती श्री. खडसे यांनी याप्रसंगी दिली. सदर बैठकीसाठी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच इतर महत्वाचे अधिकारी येत आहेत. सदर बैठकीस राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री श्री. खडसे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी पुणे विभागीय आयुक्त श्री. चोकलिंगम यांचेकडे देण्यात आली असून महसूल मंत्री खडसे हे स्वत: बैठकीसाठी रविवार पासून तीन दिवस पुणे येथे उपस्थित राहणार आहेत.

000000

गुरुवार, ११ जून, २०१५

परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना

मुंबई, दि.8 : परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली असून या बाबतची  अधिसूचना रोजी निर्गमित करण्यात आली आहे.
          या परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्यमंत्री (सार्वजनिक बांधकाम), राज्यमंत्री (परिवहन), राज्यमंत्री (गृह), अपर मुख्य सचिव (गृह), अपर मुख्य सचिव (परिवहन),सचिव, सार्वजनिक बांधकाम (राज्य व राष्ट्रीय महामार्ग), आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पोलीस सह आयुक्त (वाहतूक), मुंबई, संचालक, मार्ग परिवहन मध्यवर्ती परिवहन संस्था, पुणे हे सदस्य असून परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे सदस्य सचिव आहेत.
या परिषदेच्या बैठकींसाठी विशेष निमंत्रित अधिकारी म्हणून अपर मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य), प्रधान सचिव (नगर विकास-2), प्रधान सचिव (शालेय शिक्षण), महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण; महासंचालक, माहिती व जनसंपर्क ;तसेच अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन, मुंबई; संचालक, मुंबई दूरदर्शन केंद्र वरळी,; अध्यक्ष, महाराष्ट्र ट्रक टेम्पो ओनर्स असोसिएशन हे असणार आहेत.
 प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी अथवा पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ते सुरक्षा समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले असून या समितीमध्ये  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपरिषदेचा मुख्याधिकारी किंवा महानगरपालिकेचा नगरपालिका उपआयुक्त हे सदस्य असतील तर प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.

००००

दहावी व बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून लगेचच फेरपरीक्षा -विनोद तावडे

मुंबई, दि.8: दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून लगेचच फेरपरीक्षा घेण्यात येईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज जवाहर बालभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन  करुन श्री. तावडे  म्हणाले की, जे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी निराश न होता अंगभूत कौशल्य ओळखून पालकांच्या मदतीने पुढील दिशा ठरवावी. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुढील वर्षापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर करुन अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल असे श्री. तावडे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, फेरपरीक्षेचा निकाल लगेचच जून महिन्यामध्ये जाहीर करण्यात येईल. यावर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत  अशा प्रकारची फेरपरीक्षा घेता येईल का, याबाबत सध्या विचार सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल चांगला लागला असून उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्यात एकूण 14 लाख 37 हजार 922 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्यभरात 11 वीच्या प्रवेशासाठी 15 लाख 68 हजार 664 जागा उपलब्ध आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षेत केवळ 8 टक्के विद्यार्थी नापास झाले असून या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या शाळांनी करिअर विषयकउपक्रम राबवावेत, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढची दिशा ठरविता येईल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
000


बुधवार, १० जून, २०१५

औरंगाबाद प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्रात प्रवेश अर्ज 30 जून पर्यंत स्वीकारणार

धुळे, दि. 10 :- औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेले शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद या संस्थेत सन 2015-16 या चालू शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे.  प्रवेश  अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 असून गरजूंनी प्रत्यक्ष किंवा पत्राद्वारे या संस्थेस संपर्क साधून प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन औरंगाबाद शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
             विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज अर्जदारांनी कार्यालयीन वेळेत अधीक्षक, शासकीयच प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. 13, एन-12, हडको, टी.व्ही. सेंटर रोड, औरंगाबाद येथून विनामूल्य प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावे.  अर्जासोबत अपंगत्वाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, पालकाचा उत्पन्नाचा दाखला, इयत्ता 4 थी, इयत्ता नववी पासचे गुणपत्रक, तीन पासपोर्ट साईज फोटो जोडावेत.
             या संस्थेत शिवणकला, आर्मेचर वायडींग (विद्युत), हस्त जुळाई व छपाई, पुस्तक बांधणी तसेच सर्व प्रशिक्षणार्थीसाठी फिटर या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते.  शिवणकला व पुस्तक बांधणीसाठी चौथी उत्तीर्ण व हस्तजुळाई व छपाई तसेच आर्मेचर वायडिंग (विद्युत) साठी उमेदवार नववी उत्तीर्ण असावा.  या संस्थेत वय 16 ते 45 या वयोगटातील अस्थिव्यंगानाच प्रवेश दिला जातो.
000000