मंगळवार, ३० जून, २०१५

वृत्तपत्रांनी सकारात्मक आणि विश्वास निर्माण करणारी माहिती देण्यास प्राधान्य दयावे - मुख्यमंत्री

मुंबई दि.28- माध्यमातील आजच्या स्पर्धेच्या युगात वर्तमानपत्राचे महत्व अबाधित असूनमागील 65 वर्षापासून नवभारत टाईम्स  या वृत्तपत्राने आपल्या वार्तांकनांने  स्वत:ची एक वेगळी ओळखनिर्माण केली आहे. इतर वृत्तपत्रानीही नवभारत टाईम्स प्रमाणे सकारात्मक आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारी माहिती छापण्यास प्राधान्य द्यावे ,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केले.
                नवभारत टाईम्स च्या 65व्या वर्धापण दिनानिमित्त आयोजीत ' नवभारत उत्सव ' या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी  गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर, नवभारत टाईम्सचे संपादक सुंदरचंद ठाकूर, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, अभिनेत्री  मिनाक्षी शेषाद्री, अभिनेत्री विद्या बालन, अभिनेत्री जुही चावला,गायक कैलास खेर, आदी मान्यवर उपस्थितीत होते.

                वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की,  वृत्तपत्र  हे केवळ बातम्या देणारे साधन नाही.तर विविधांगी माहिती पुरवून जनतेशी संवाद साधणारी संस्था आहे.या वेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्‍मान करण्यात आला.

राज्याच्या विकासासाठी मुंबई शहर परिवहन प्रकल्प-3 वेळेत पूर्ण करणार -मुख्यमंत्री

मुंबई दि. 28- राज्याचा जलद गतीने विकास होण्यासाठी आवश्यक असणारा मुंबई शहर परिवहन प्रकल्प-3 (MUTP-3) हा महत्वाकांक्षी प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीया प्रकल्पाच्या शुभारंभाप्रसंगी केले.
          येथील सहयाद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत जयगड पोर्ट जोडण्यासाठीJSW आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. यांच्यामध्ये सवलत करारावर हस्ताक्षर तसेच मध्य रेल्वे आणि राज्य सरकारच्या एस.पी.व्हीसाठी सामंजस्य करारावर हस्ताक्षर करण्यात आले त्याचबरोबर मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन  (MRVC) मध्येई -ऑफिसचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई शहर परिवहन प्रकल्प-3 (MUTP-3) या महत्वाकांक्षी प्रकल्पाची किंमत 11 हजार 440 कोटी रुपये इतकी आहे.
               यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार सर्वश्री. रामदास आठवले, राजन विचारे, अरविंद सावंत, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मंगलप्रभात लोढा, मंदाताई म्हात्रे,  परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव गौतम चटर्जी, जेएसडब्लूचे प्रमुख सज्जन जिंदाल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सुद यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.             याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, 11 हजार 440 कोटींचा मुंबई शहर परिवहन प्रकल्प-3 ची सुरुवात महत्वपूर्ण आहे. राज्यातील मागास भागास रेल्वे मार्गाने जोडण्यात आल्यास त्या भागाचा विकास होण्यास मदत होते. यासाठी हा प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील अपूर्ण असलेले रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणे आणि प्रलंबित असलेले रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येतील.या प्रकल्पामुळे विविध बंदरे, रेल्वे आणि मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार आहे. तसेच बंदरांची क्षमता वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे. संपूर्ण परिवहन व्यवस्थेचे एकत्रीकरण करणे इतकेच नव्हे तर सिंगल टिकीटिंग मॉडेल आणण्याचाही विचार आहे.
      यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, राज्य आणि केंद्र एकत्र येऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, पुढची दिशा ठरविण्यासाठी हे करार अत्यंत महत्वाचे आहेत. मुंबईत देशभरातुन प्रवाशी  रेल्वेने येतात. त्याचबरोबर 75 लाख प्रवाशीदररोज लोकलचा प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेचा विकास देशाचा विकास आहे. तर डिजिटल इंडिया होण्यासाठी,ई -ऑफिसचा शुभारंभमहत्वपूर्ण  आहे.
        यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई व महाराष्ट्राकरीता असलेल्या रेल्वे प्रकल्पांची तसेच प्रलंबित प्रकल्पांची माहिती दिली तर खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेसंबंधी समस्यांबाबत तसेच आपत्ती काळात महिलांसाठी  महिला डब्यांमध्ये टॉयलेटची व्यवस्था असण्याची सुचना मांडली.
सिंहस्थ कुंभमेळयासाठी नाशिक शहरात मोठया प्रमाणात भाविक येणार असून येणाऱ्या भविकांची गर्दी लक्षात घेऊन महापर्वणीच्या अगोदर दोन ते तीन दिवस भाविक शहरात दाखल होतात. महापर्वणीचे स्नान झाल्यानंतर सर्वाना परत जायचे असते ही बाब लक्षात घेऊन एकाच वेळी दोन ते तीन लाख भविकांच्या परतीच्या प्रवासाचा आराखडा रेल्वे विभागाने तयार केला आहे.  प्रवाशांच्या सोई-सुविधेसाठी दर वीस मिनिटांनी रेल्वे सोडण्यात येणार आहे. याबाबत माहिती देणारे होर्डिंग्स, वेळोवेळी उद्घोषणा ही करण्यात येणार आहे. तसेच याकाळात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई शहर परिवहन प्रकल्प-3 (MUTP-3) अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार- डहाणू 126 कि.मी-2 हजार 555 कोटी रुपये,पनवेल-कर्जत ही नवीन उपनगरीय मार्गीका जोडण्यात येणार असून त्याची लांबी 56 कि.मी. असणार आहे. या प्रकल्पाची किंमत 2 हजार 24कोटी रुपये आहे. त्याचबरोबर ऐरोली आणि मध्य रेल्वे मार्गावरील कळवा यादरम्यान 8 कि.मी. नवीन उपनगरीय मार्गीका जोडण्यात येणार आहे. या प्रकलपाची किमत 428कोटी रुपये आहे. याशिवाय रोलींग स्टॉकसाठी 565 युनिट लागणार असून यासाठी 2 हजार 899  कोटी रुपये, तर पश्चिम (11), मध्य ( 8) आणि हार्बर (2) या तीन्ही रेल्वे मार्गावरील 21 स्थनाकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.यासाठी 1 हजार 950 कोटी रुपये खर्च येणार आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील ट्रेसपास कंट्रोलसाठी 22 मध्य विभाग असून यासाठी 520 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि राज्यातील उद्योग जगताला आयात-निर्यातीसाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बंदरांचा विकास करण्याला प्राधान्य राहणार आहे. याचाच एक भाग म्हणून जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रकल्पाचा सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
कोकण रेल्वे महामंडळाने जयगड बंदर ते डिगणी (संगमेश्वर) हा जोड रेल्वेमार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जयगड ते डिगणी हा 33.7 कि.मी. चा हा नवीन रेल्वे  मार्ग असेल.

 या प्रस्तावित एकेरी मार्गाचा खर्च 771कोटी रूपये आहे. हा प्रकल्प कोकण रेल्वे, मेरीटाईम बोर्ड आणि जयगड पोर्ट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. सुमारे 30 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

शुक्रवार, २६ जून, २०१५

युवकांनी सामाजिक समतेचा संदेश समाजात रूजवावा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


  धुळे, ‍िद. 26 :-  भारत जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश आहे.  सृमृध्द देश निर्माण करावयाचा असेल तर युवकांनी पुढे येऊन सामाजिक समतेचा संदेश समाजात रूजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
             26 जून हा दिवस राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन तसेच व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात समता दिंडी व संदेश यात्रेचे आयोजन केले होते. या समता दिंडीचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुळवले यांनी  दीप प्रज्ज्वलन व हिरवी झेंडी दाखवून  शुभारंभ केलायाप्रसंगी माजी आमदार धरमचंद चोरडिया, जिल्हा कोषागार अधिकारी बी. डी. पाटील,  उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त           श्रीमती वैशाली हिंगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व्ही. . पाटील, विभागीय जात पडताळणी समिती क्र. 2 उपायुक्त पी. बी. नाईक, संशोधन अधिकारी राकेश पाटील, विशेष अधिकारी समाज कल्याण श्रीमती हर्षदा बडगुजर,  विलास करडक  उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, भारतात विविध जाती धर्माचे लोक आहेत.  त्यांच्यात
समानतेचा बंधुभाव रहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.  भारत हा जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश आहे.  त्यात 65 टक्के तरूण आहेत, असेही त्यांनी सांगितले.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समतेचा संदेश आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.  महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुध्दा स्वातंत्र्यपूर्व काळात समता प्रस्थापित करण्यासाठी मौलिक कार्य केले आहे. 
            तरूणांनी कुठल्याही व्यसनांना बळी पडू नये.  व्यसन नव्या पिढीला लागू नये याचा आज आपण संकल्प करू या असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी समता दिंडी व संदेश यात्रा  शहरातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. या समता दिंडीमध्ये शहरातील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल, न्यू सिटी हायस्कूल, अग्रसेन महाराज हायस्कूल, नूतन पाडवी माध्यमिक विद्यालय, कमलाबाई कन्या हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, महाराणा प्रताप हायस्कूल या विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. शाहीर सुभाष कुळकर्णी यांनीही व्यसनमुक्तीपर संदेश दिला. तर साक्री रोडवरील कल्याण भवन, शिवतीर्थ येथे कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ व मान्यवर उपस्थितांच्या हस्ते मादक पदार्थ प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. समारोपप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी  उपस्थितांना स्वच्छ भारत व व्यसनमुक्तीची शपथ दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुदाम राठोड यांनी केले.

                                    00000

नाशिक विभागाचा, संकल्प स्वच्छतेचा शनिवारी मनपा व नगरपालिकांची एक दिवसीय कार्यशाळा

नाशिक, दि.25 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान(नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ची अंमलबजावणी सुरु झाली असून या अभियानाचाच एक भाग म्हणून नाशिक विभागातील सर्व महानगरपालिकांचे महापौर, आयुक्त आणि नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची एक दिवसाची कार्यशाळा व ‘नाशिक विभागाचा, संकल्प स्वच्छतेचा’ या कार्यक्रमाचे आयोजन 27 जून रोजी सकाळी 9.30 ते 4.30  या दरम्यान डॉ. मुंजे इन्स्टिट्युट भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे  करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यशाळेला  उपस्थित महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त आणि मुख्याधिकारी यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस स्वच्छतेचा संकल्प देणार आहेत.  कार्यक्रमास पालकमंत्री गिरीष महाजन,  नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, नगरविकास विभागाच्या सचिव व अभियानाच्या नोडल सचिव मनिषा म्हैसकर, संचालक तथा आयुक्त नगरपालिका प्रशासन मीता राजीव लोचन, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मान्यवर घनकचरा व्यवस्थापनाच्या  विविध शास्त्रोक्त पद्धतींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
शहरे स्वच्छ व्हावीत यासाठी कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट, शौचालयाचा 100 टक्के वापर , कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया,  सांडपाण्यावर प्रकिया, स्वच्छ व हरित महाराष्ट्र, स्वच्छता उपक्रमातील  लोकसहभाग आणि उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार यावर आधारित स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या ‘सप्तपदी स्वच्छतेची’ ही संकल्पना पुढे आली आहे.
राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांमधून साधारण 20 हजार मेट्रीक टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाटसुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने होणे आवश्यक आहे, या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

*****

मेघालयचे राज्यपाल श्री.व्ही शन्मुगनाथन यांचा दौरा कार्यक्रम

नाशिक दि. 25 :- मेघालय राज्यपाल श्री.व्ही शन्मुगनाथन दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार 30 जून 2015 रोजी सकाळी 10.00 वा.  राजभवन येथून वाहनाने इगतपुरीकडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. इगतपुरी सर्कीट हाऊस येथे आगमन व राखीव.दु.2.00 वाजता इगतपुरीहून शिर्डी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडे प्रयाण. दु.4.30 वाजता शिर्डी  व्हिआयपी विश्रामगृह येथे आगमन.
बुधवार 1 जुलै 2015 रोजी दु.3.00 वाजता  शिर्डी विश्रामगृह येथून मोटारीने इगतपुरी सर्कीट हाऊसकडे प्रयाण. संध्याकाळी 5.30 वाजता इगतपुरी सर्कीट हाऊस येथे आगमन व राखीव व सायंकाळी 6.00 वाजता . इगतपुरी सर्कीट हाऊस येथून राजभवन मुंबईकडे प्रयाण.

***********

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत पुरस्कारासाठी पत्रकारांनी 30 जून पर्यंत प्रस्ताव पाठवावेत

          नाशिक, दि. 25 :- महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी यशस्वीरीत्या राबविण्यामध्ये पुरक प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिद्धी देणाऱ्या वृत्तपत्राच्या पत्रकारांना जिल्हास्तरावर तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत.
          पत्रकारांना जिल्हास्तरावर देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार रुपये 25 हजार, द्वितीय पुरस्कार 15 हजार आणि तृतीय पुरस्कार 10 हजार रुपये आहे. यासाठी पत्रकारांनी आपले प्रस्ताव तीन  प्रतीत 30 जून 2015 पर्यंत सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, सारडा संकुल, तिसरा मजला, एम.जी.रोड, नाशिक या पत्त्यावर पाठवावे.

          या प्रस्तावामध्ये उमेदवारांनी आपले पुर्ण नाव, पत्ता, जन्म तारीख, शिक्षण, पत्रकारितेतील अनुभव, विकास विषयक पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा तपशिल, आणि  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा प्रचार प्रभावी यशस्वी राबविण्यामध्ये पुरक प्रबोधनात्मक बातम्याच्या माध्यमातुन  2 मे 2014 ते 1 मे  2015  या कालावधीत दिलेल्या वस्तुनिष्ठ प्रसिद्धी साहित्याचा तपशील आदिंचा समावेश  असणे आवश्यक आहे. तरी पत्रकार बांधवांनी आपले प्रस्ताव तीन प्रतीत 30 जून 2015  पर्यत जिल्हा माहिती कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी नाशिक यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नाशिक दि. 25 :- शासनाच्यावतीने देण्यात येणारे 2015 चा राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार,   विशेष नेपुण्य पुरस्कार  तसेच 2014 व 2015 या वर्षातील राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कारासाठी प्रस्ताव  मागविण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,नाशिक यांनी कळविले आहे.

या पुरस्काराची  नियमावली  व निकष केंद्र शासनाचे वेबसाईटवर www.ewd.nic.in उपलब्ध आहे.  प्रस्ताव 1 जुलै 2015 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक पत्ता नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक येथे पाठविण्यात यावे. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी 0253-2236368 या क्रमांकावर संपर्क साधावा