सोमवार, ६ जुलै, २०१५

डिजीटल इंडिया सप्ताह ई-गर्व्हनन्स अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन


धुळे, दि. 6 :- केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी असलेल्या डिजीटल इंडिया सप्ताहा निमित्त  ई-गर्व्हनन्स अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांना देणे आणि त्यांना प्रशिक्षित करून या उपक्रमांत त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने आधार लिकींग व ई-लॉकर प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले होते.
  जिल्हा सूचना विज्ञान केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित  करण्यात आलेल्या प्रशिक्षणाप्रसंगी   उप जिल्हा निवडणूक अधिकारी जे. आर. वळवी, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे, नरेंद्र भामरे,  प्रकाश बसवा, महा-ई सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक बी. बी. साळुंके, नायब तहसिलदार प्रशांत कुलकर्णी (निवडणूक), गिरीश कुलकर्णी (सामान्य), महाऑनलाईन लिमिटेडचे जिल्हा समन्वयक संदीप वानखेडकर,  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
            डिजीटल इंडिया सप्ताह व आधार संलग्न राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण व प्रमाणीकरण या दोन्ही राष्ट्रीय कार्यक्रमांची सांगड घालून मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक संलग्न करता यावा यासाठी नायब तहसिलदार प्रशांत कुळकर्णी यांनी महा-ई सेवा केंद्रांचे संचालक आणि महासंग्राम केंद्रांचे संचालक यांना ऑनलाईन प्रशिक्षण देऊन त्यांच्या शंकांचे निरसन यावेळी केले.
            डिजीटल लॉकर ही संकल्पना नरेंद्र भामरे यांनी विषद करून  सांगितले की,  नागरिकांना लागणारे सर्व दाखले, महत्वाची कागदपत्रे उदा. जन्म दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र, शैक्षणिक दाखले आदींचे वैयक्तिक संगणकीकृत लॉकरमध्ये ठेवण्याची सुविधा www.degitallocker.gov.in या वेबसाईटद्वारे संगणकीकृत लॉकरमध्ये सुरक्षित ठेवता येते.  यासाठी नागरिकांचा आधार क्रमांक असणे आवश्यक आहे.  नागरिकांना याद्वारे संगणकीकृत लॉकरमधून हवे तेव्हा, हवे तेथे कागदपत्रे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
000000


महानगरपालिका लोकशाही दिनी चार अर्ज प्राप्त

             धुळे, दि. 6- महानगरपालिकेत 6 जुलै, 2015 रोजी महानगरपालिका  उपआयुक्त एच. पी. कौठळकर  यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  या लोकशाही दिनात  महानगरपालिकेत चार अर्ज  प्राप्त झाले असून  पुढील कार्यवाहीसाठी सदर अर्ज  सबंधीत विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. यावेळी  संबंधित अधिकारी  उपस्थित होते.  6 जुलै रोजी आयोजित केलेल्या लोकशाही दिनात नगररचना विभाग-03, पाणी पुरवठा विभाग-01  अशा एकूण 04 अर्जांचा  समावेश आहे.
000000


सैनिकी व नागरी अशा दोन्ही सेवेतील कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञेय

धुळे,दि. 6 :- सैनिकी सेवेतून सेवानिवृत्त होऊन दि. 1 नोव्हेंबर, 2005 पूर्वी राज्य शासनाच्या सेवेत नागरी पदावर पुनर्नियुक्त झालेल्या माजी सैनिकांचा सेवेत असतांना, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास सैनिकी व नागरी अशा दोन्ही सेवेतील कुटुंब निवृत्ती वेतन शासन निर्णय दि.27 एप्रिल, 2015 अन्वये अनुज्ञेय करण्यात आले आहे. अशी माहिती धुळे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर (निवृत्त) सोपान डोके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

0000

अनुसूचित जाती, जमाती गटाच्या पशुपालकांनी 3 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

धुळे, दि. 6 :- पशुपालकांसाठी नाविण्यपूर्ण योजनेतंतर्गत सन 2015-16 या वर्षासाठी  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती गटाच्या   पशुपालकांना 6 दुधाळ गायी, म्हैस वाटप, अंशत: ठाणबंद पध्दतीने 10 शेळी व एक बोकड वाटप, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षी वाटप (ब्रॉयलर) याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना पशुसंवर्धन खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.  तरी पशुपालकांनी 3 ऑगस्ट, 2015 पर्यंत पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे अर्ज जमा करून पोच घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. यु. डी. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            या योजनेचे आर्थिक निकष, मार्गदर्शक सूचना, महत्वाच्या अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.  सर्वसाधारण गटासाठी 50 टक्के अनुसूचित जाती, जमातीसाठी 75 टक्के अनुदान देय राहील.  या योजनेंतर्गत 3 टक्के अपंग, विकलांग व 30 टक्के महिला लाभार्थ्यांना निवड प्रक्रियेत लाभ देण्यात येईल.  जे लाभार्थी त्यांच्या हिश्याची रक्कम स्वत: उभारतील किंवा बँकेकडून कर्ज रूपाने उपलब्ध करून घेतील अशा लाभार्थींची निवड प्राधान्याने करण्यात येईल.  परंतु विहीत वेळेत काही लाभार्थी स्वत:च्या हिश्याची रक्कम न उभारू शकल्यास किंवा रक्कम उभारण्यास असमर्थता दर्शविल्यास प्रतिक्षा यादीतील जे लाभार्थी स्वत:च्या हिश्याची रक्कम उभारण्यास तयार आहेत त्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.  या योजनेखाली दुधाळ जनावरांची खरेदी शक्यतो राज्याबाहेरील जनावरांच्या बाजारातून करण्यात येईल, जेणेकरून राज्याच्या दुग्धोत्पादनामध्ये वाढ होऊ शकेल.  दुधाळ जनावरे खरेदी केल्यानंतर या जनावरांची वाहतूक लाभार्थींच्या गावापर्यंत करण्यासाठी येणारा खर्च,  जनावरांच्या ट्रांझीट विम्याचा खर्च लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी विहीत अर्जाचा नमुना व योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेकडे संपर्क साधावा, असेही पत्रकात नमूद केले आहे.

0000000

शनिवार, ४ जुलै, २०१५

जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत विशेष मोहीम -उप निबंधक किशन रत्नाळे

धुळे, दि. 4 :-मुख्यालय असलेल्या सर्व राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व सहकारी संस्थांचे दि. 1 जुलै पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.  त्यानुसार धुळे जिल्हा सहकार खात्याचे प्रशासन व लेखापरिक्षण विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.  सर्व सहकारी संस्थांनी संस्थेचे सर्वेक्षण विशेष मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन धुळे तालुका सहकारी संस्थेचे उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            तरी जिल्ह्यातील धुळे मुख्यालय असलेल्या सर्व राज्य, विभाग, जिल्हा तसेच तालुक्यातील सर्व संस्थाचे सर्वेक्षण कामकाज पूर्ण करून घेण्यासाठी सहकार्य करावे.  ज्या सहकारी संस्थांनी कामकाजास सुरवात केलेली नाही, काम करण्याचे बंद केलेले आहे, रूपये 500 पेक्षा अधिक नाही इतक्या किंमतीचे भाग किंवा सदस्यांच्या अनामत रक्कम संस्थेच्या ताब्यात आहेत, संस्थेचा पत्ता व ठावठिकाणा नाही, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नियम 1961 व 97 घटना दुरूस्ती प्रमाणे अधिनियमातील किंवा नियमातील किंवा उपविधीती नोंदणी व व्यवस्थापन बाबतच्या कोणत्याही शर्तीचे पालन करणे बंद केलेल्या अशा संस्था अवसायनात घेण्यात येऊन त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल, याची संस्थेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी, असेही पत्रकात नमूद केले आहे.

000000

सहाय्यक (पूर्व) परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात कलम 144 (2 ) चे मनाई आदेश जारी

    धुळे, दि. 4 :-रविवार दि.  5 जुलै, 2015  रोजी सकाळी 10-30 ते  दुपारी 12-00 वाजेपर्यंत  महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत सहाय्यक (पूर्व) परीक्षा-2015  या पदासाठी धुळे येथील जे. आर. सिटी हायस्कूल, धुळे, छत्रपती शिवाजी हायस्कूल, धुळे,  कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल, धुळे भाग-अ, कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल, धुळे भाग-ब  या  परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात कुणीही गर्दी, गोंधळ निर्माण करू नये या उद्देशाने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने धुळे भागाचे उपविभागीय दंडाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी धुळे शहरातील वरील परीक्षा केद्राच्या आवारापासून 200 मीटर अंतरापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) चे मनाई आदेश  दि. 5 जुलै, 2015 रोजी सकाळी 10-30 ते दुपारी  12-00 वाजेपावेतो परीक्षा केंद्राच्या परिसरात लागू केले आहेत.
             या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षार्थी शिवाय इतर कोणासही प्रवेश असणार नाही, कोणतेही शस्त्र बाळगता येणार नाही किंवा शारीरिक दुखापती, इजा होईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेता येणार नाही, परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरातील झेरॉक्स फॅक्स, ई मेल, इंटरनेट सुविधा केंद्रे बंद राहतील, परीक्षार्थींना मोबाईल, पेजर, गणकयंत्र इ. चा वापर सदर परीक्षा केंद्राच्या परिसरात करता येणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000

औद्योगिक प्रयोजनाला चालना देण्यासाठी औद्योगिक अकृषिक वापर साह्यभूत समिती गठीत -जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख

धुळे, दि. 4 :- खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनाकरिता जमिनीचा अकृषिक वापर सुलभ करण्याकरिता उद्योजकास आवश्यक अधिकृत माहिती विविध विभाग व प्राधिकरण यांच्याकडून एक खिडकी संरचनेंतर्गत एकत्रित रित्या उपलब्ध होण्याकरिता जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक वापर साह्यभूत समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिली.
            औद्योगिक अकृषिक वापर साह्यभूत समितीची पहिली बैठक आज जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी स्वप्नील लिंगडे, नगर रचनाकार विभागाचे नगर रचनाकार बी. एल. वाणी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एल. बरडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता सी. के. वाणी, उपवनसंरक्षक डी. यु. पाटील, धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. वाघ, धुळे मध्यम प्रकल्प विभागाचे  कार्यकारी अभियंता एस. के. भदाणे, पाटबंधारे उपविभाग क्र.2 चे उप अभियंता जे. बी. माळी  आदी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, राज्यामध्ये गुंतवणुकीच्या प्रमाणामध्ये वाढ करणे व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मेक इन महाराष्ट्र हे अभियान हाती घेण्यात आले आहे.  या अभियानाच्या अनुषंगाने राज्यात उद्योगांना वाढीसाठी, विकासासाठी आवश्यक घटकांची कारण मिमांसा करून विविध स्तरावर होणारा विलंब टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना शासन करत आहे.  त्यासाठी शासनाने नुकतीच जिल्हास्तरावर औद्योगिक अकृषिक वापर साह्यभूत समिती स्थापन केली असून अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नामनिर्देशित केलेला उप मुख्य कार्यकारी दर्जाचा अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, नगर रचना जिल्हा शाखा कार्यालयाचे सहाय्यक संचालक, जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, जलसंधारण विभागाचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, महापारेषण व महावितरण या कंपन्यांचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, उप वनसंरक्षक  हे सदस्य राहतील तर निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील.
            या समितीची बैठक प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा अथवा आवश्यकतेनुसार अधिक वेळा अध्यक्षांच्या द्वारे पूर्व नियोजित वेळेत घेण्यात येईल.  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 44 अ नुसार औद्योगिक अकृषिक वापर करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी ज्या-ज्या विषयाबाबत माहिती आवश्यक असेल त्याचा उल्लेख करून सदस्य सचिवांकडे अर्ज सादर करावेत.
000000