गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

केबल चालकांनी करमणुक शुल्काचा तात्कांळ भरणा करावा

धुळे दि.27 जिल्हयातील सर्व बहुविध यंत्रणा परिचालक (मल्टीसिस्टीम ऑपरेटर) व केबल परिचालक तसेच स्थानिक केबल परिचालक यांना कळविण्यात येते की त्यांनी शासन निर्णय दि.3 मार्च,2014 अन्वये बहुविध यंत्रणा परिचालक (एम.एस.ओ) यांनी सॅटेलाईटद्वारे त्यांचे मार्फत केबल ऑपरेटरांना पुरविण्यात आलेल्या केबल सेवेबाबत शासकीय करमणुक शुल्क प्रती जोडणी महानगरपालिका क्षेत्रासाठी रु.45/-, नगरपरिषद क्षेत्रासाठी रु.30/- व ग्रामीण क्षेत्रासाठी रु.15/- असे प्रती ग्राहक यांचेकडून वसुल करुन शासकीय खजिन्यात भरण्याची जबाबदारी बहुविध यंत्रणा परिचालक (एम.एस.ओ) व केबल परिचालक यांचेवर सोपविण्यात आलेली आहे.त्याचप्रमाणे सर्व बहुविध यंत्रणा परिचालक (ए.एस.ओ)  केबल ऑपरेटर यांच्याकडे असलेल्या जोडण्यांच्या संख्येबाबत जिल्हाधिकारी,धुळे यांच्याकडे घोषणापत्र करुन देणे बंधनकारक आहे.
जिल्हातील सर्व जोडण्याचे रॅण्डम पध्दतीने सर्वेक्षण करण्यात येणार असून केबल चालकांनी प्रतिज्ञापत्रात घोषित केलेल्या जोडण्या व्यतिरिक्त्‍ अधिक जोडण्या तपासणीत आढळून आल्यास महाराष्ट्र करमणुक शुल्क (सुधारणा व पुढे चालू ठेवणे ) अधिनियम,2014 नुसार प्रत्येक अपराधाबद्दल कमीत कमी रु.50,000/- किंवा झालेल्या महसूल हानीच्या 10 पट यापैकी जी रक्कम जास्त होईल ती रक्कम वसुल करण्यात येईल.
तसेच सर्व केबल जोडणी धारकांनी त्यांनी घेतलेल्या सेवेपोटी  केबल ऑपरेटर यांना देय असलेली रक्कम दरमहा अदा करावी.केबल जोडणी सर्वेक्षण तसेच करमणुक शुल्क भरणाबाबत अडथळा निर्माण करणा-या विरुध्द चौकशीअंती आवश्यक वाटल्यास फौजदारी स्वरुपाची देखील कारवाई करण्यात येईल.
तरी सर्व केबल जोडणी धारकांनी त्यांचेकडील थकीत असलेली करमणुक शुल्काची रक्कम केबल ऑपरेटर यांचेकडेस जमा करावी व अनाधिकृत केबल जोडणीचा वापर करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी,अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
                                                            00000
           


नाशिक पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या धुळे व मंडळांतर्गत विभाग व उपविभागाच्या नावात बदल

धुळे, दि. 27 :- जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय  17 जून, 2015 नुसार नाशिक पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे व मंडळातर्गत विभाग व उपविभागाच्या नावात झालेले बदल 1 जुलै, 2015 पासून अंमलात आणण्यात आले असल्याची माहिती धुळे मध्यम प्रकल्प विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी एका परिपत्रकान्वये दिली.
क्र.
कार्यालयाचे मूळ नाव
नावात केलेला बदल
1
कार्यकारी अभियंता,
धुळे मध्यम प्रकल्प विभाग क्र.1, धुळे
कार्यकारी अभियंता,
धुळे मध्यम प्रकल्प विभाग, धुळे
2
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
मध्यम प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा
3
उपविभागीय अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्र. 1, धुळे
उपविभागीय अभियंता,
निन्मपांझरा कालवा उपविभाग, धुळे
4
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
नाग्या साक्या कालवा उपविभाग,
शेवाडी ता. शिंदखेडा जि. धुळे
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
वाडी शेवाडी प्रकल्प उपविभाग,
शेवाडी ता. शिंदखेडा जि. धुळे
5
उपविभागीय अभियंता,
सोनवद कालवा उपविभाग,
सुलवाडे ता. शिंदखेडा जि. धुळे
उपविभागीय अभियंता,
सुलवाडे बॅरेज उपसा सिंचन उपविभाग,
सुलवाडे ता. शिंदखेडा जि. धुळे
6
उपविभागीय अधिकारी,
सोनवद धरण उपविभाग क्र. 2,
दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे
उपविभागीय अधिकारी,
सारंगखेडा प्रकल्प उपविभाग,
दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे

            वरीलप्रमाणे विभाग व उपविभागाच्या नावात बदल झाल्याने पुढील सर्व पत्रव्यवहार नवीन नावाने करण्यात यावा, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

00000

3 सप्टेंबर रोजी विमाछत्र योजनेची कार्यशाळा

धुळे, दि. 27 :- जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुखांना, आहरण व संवितरण अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी यांना  3 सप्टेंबर, 2015 रोजी डॉ. गौतम ताम्हणे (TPA (Nashik) MD India हे विमाछत्र योजनेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे.  सदर विमाछत्र योजना ही सेवानिवृत्तीच्या अखेरच्या वर्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सक्तीची असून त्यासंबंधीची कार्यशाळा ही जिल्हा परिषद, धुळे यांच्या सभागृहात दुपारी 3-00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.  सर्व आहरण व संवितरण अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधींनी आवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी बी. डी. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0000000 

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०१५

महाराजस्व अभियानातून वंचितांचे ‘समाधान’ करण्याची संवेदनशिलता दाखवावी - जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 25 :- महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतीमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने राज्यात गेल्या चार वर्षात सुवर्ण जयंती राजस्व अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.  सदर अभियानात काही नवीन लोकाभिमुख व प्रशासकीय घटकांचा समावेश करून महाराजस्व हे महत्वाकांक्षी अभियान 1 ऑगस्ट पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.  या महाराजस्व अभियानाच्या विस्तारीत समाधान योजनेतून जिल्ह्यातील शेवटच्या वंचित घटकांचे समाधान करण्याची संवेदनशिलता सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सातपुडा सभागृहात  महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजना राबविण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.  या बैठकीत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपसंरक्षक एस. जी. हलमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) बी. ए. बोटे,  समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे,  जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. पी. वाघ, मध्यम प्रकल्प विभाग क्र. 1 चे उप कार्यकारी अभियंता एस. के. भदाणे,  उप विभागीय अधिकारी राहूल पाटील (शिरपूर) जे. आर. वळवी (धुळे), तहसिलदार दत्ता शेजूळ (धुळे) नितीन पाटील (शिरपूर), माणिक आहेर  (साक्री), पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, विस्तारीत समाधान योजनेअंतर्गत विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट दिवशी ग्राम, मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करणे संकल्पित आहे.  या विस्तारित समाधान योजनेंतर्गत शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राम, मंडळ स्तरावर महिन्यातून एका विशिष्ट पूर्व नियोजित दिवशी एकत्र यावे व जनतेस शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष देण्याची कार्यवाही करावी.  त्यासाठी या विस्तारीत समाधान योजनेचे अत्यंत सूक्ष्म नियोजन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी करून त्यामध्ये सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय  विभागांना योग्य प्रकारे सामावून घ्यावे व त्यास व्यापक पूर्वप्रसिध्दी द्यावी.  प्रत्यक्षात कार्यक्रमांचे आयोजन लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
सर्वसामान्य जनतेस शैक्षणिक व अन्य कामाकरिता विविध स्वरूपाच्या दाखल्यांची आवश्यकता असते.  यासंबंधी प्रक्रिया सुकर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रमाणपत्रांकरिता सहामाही, वार्षिक परिक्षेच्या पूर्वी व सुटीच्या दिवशी तसेच सर्वसाधारण जनतेस आवश्यक दाखल्यांसाठी जनतेच्या सोयीच्या मध्यवर्ती अशा मंडळ स्तरावर  शिबिरे आयोजित करून त्याठिकाणी दाखल्यांकरिता आवश्यक ते अर्ज व कागदपत्रे याबाबत जनतेस माहिती व त्याच ठिकाणी अर्ज भरून घेऊन विविध दाखले निर्गमित करण्यात यावेत, असे सांगून   जिल्हाधिकारी म्हणाले, यासाठी  प्रथम तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांची तसेच अन्य वाटप केंद्रांची संख्या निर्धारित करण्यात यावी, त्यानंतर तेथे घ्याव्याच्या दाखले वाटप शिबीरांच्या तारखा निश्चित करण्यात याव्यात व त्यास व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी, शिबिरासाठी निश्चित केलेल्या शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना विविध प्रमाणपत्रांकरिता आवश्यक असलेले अर्जाचे छापीन नमुने व आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांची यादी पुरविण्यात यावी.  जेणेकरून शिबीराच्या दिवशी परिपूर्ण विहीत नमुन्यात भरलेले अर्ज विद्यार्थ्यांकडून प्राप्त करून घेता येतील, शिबीराच्या दिवशी आवश्यक असलेला सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग शिबीरास उपस्थित राहील हे सुनिश्चित करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यास, अर्जदारास त्याच दिवशी  प्रमाणपत्रे, दाखले पुरविता येतील अशी कार्यपध्दती अवलंबवावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.
  यावेळी बोलतांना निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे म्हणाले, महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजनेद्वारे शासनाचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राम व मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेस शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तालुकानिहाय जिल्ह्यात एकूण 39 शिबिरांचे ऑगस्ट 2015 ते  जून 2016 पर्यंत  नियोजन करण्यात आले आहे.  त्यात धुळे तालुक्यात-12, साक्री तालुक्यात-10, शिरपूर तालुक्यात-7, शिंदखेडा तालुक्यात 10 गावांचा समावेश करण्यात आला आहे.  तालुकानिहाय व गांवनिहाय  तारखा पुढीलप्रमाणे आहेत. 
धुळे तालुका- लामकानी येथे 19 ऑगस्ट रोजी शिबिर झाले असून आर्वी (16 सप्टेंबर,2015), बोरकुंड (21 ऑक्टोंबर,2015),शिरूड (18नोव्हेंबर,2015), मुकटी (16 डिसेंबर,2015), फागणे (20 जानेवारी, 2016), नगांव (16 फेब्रुवारी, 2016), सोनगीर (17 मार्च, 2016), नेर (21 एप्रिल, 2016), कुसुंबा (19 मे, 2016), धुळे शहर (21 जुलै, 2016).
साक्री  तालुका- पिंपळपाडा येथे 15 ऑगस्ट 2015 रोजी शिबिर संपन्न झाले असून मालगांव (8 सप्टेंबर, 2015), ब्राम्हणवेल (20 ऑक्टोबर, 2015), शेणपूर (17 नोव्हेंबर, 2015), मैंदाणे (8 डिसेंबर, 2015), साक्री (12 जानेवारी, 2016), निजामपूर (9 फेब्रुवारी, 2016), दुसाणे ( 8 मार्च, 2016), कुडाशी (12 एप्रिल, 2016), म्हसदी प्र. नेर (10 ऑक्टोबर, 2016).
शिरपूर तालुका- शिरपूर (12 सप्टेंबर,2015), सांगवी (10 ऑक्टोबर, 2015), बोराडी (14 नोव्हेंबर,2015), अर्थे (12 डिसेंबर, 2015), जवखेडा (9 जानेवारी, 2016), होळनांथे (13 फेब्रुवारी, 2016), थाळनेर (12 मार्च, 2016)
शिंदखेडा तालुका- शिंदखेडा (26 ऑगस्ट, 2015), चिमठाणे (23 सप्टेंबर, 2015),शेवाडे (28 ऑक्टोबर, 2015 व 22 जून, 2016), वर्षी (25 नोव्हेंबर, 2015), खलाणे (23 डिसेंबर, 2015), नरडाणा (27 जानेवारी, 2016), बेटावद (24 फेब्रुवारी, 2016 व 27 जुलै, 2016), विरदेल (23 मार्च, 2016), विखरण (27 एप्रिल, 2016), दोंडाईचा (25 मे, 2016)


संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज गांवनिहाय आराखडा तयार करून पिण्याचे पाण्याचे करणार नियोजन -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 25 :- जिल्ह्यात आजपावेतो सरासरी 55 टक्के पाऊस झाला असून गेले 15 दिवस पाऊस पडलेला नाही.  अशा परिस्थितीत संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रत्येक तालुका स्तरावरून गांवनिहाय सूक्ष्म आराखडा तयार करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.
            आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सातपुडासभागृहात पिण्याच्या पाण्याकरिता धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या संबंधित यंत्रणांच्या बैठकीत बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मिसाळ बोलत होते.  यावेळी  जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपसंरक्षक एस. जी. हलमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) बी. ए. बोटे, धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. वाघ, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. पी. वाघ,मध्यम प्रकल्प विभाग क्र. 1 चे उप कार्यकारी अभियंता एस. के. भदाणे, उप विभागीय अधिकारी राहूल पाटील (शिरपूर) जे. आर. वळवी (धुळे), तहसिलदार दत्ता शेजूळ (धुळे) नितीन पाटील (शिरपूर), माणिक आहेर  (साक्री), पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च महत्व असून त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांच्या पाणी पुरवठा विभागाने गांवनिहाय व प्रभागनिहाय टंचाईचा सूक्ष्म आराखडा तयार करावा.  जिल्ह्यातील पर्जन्यमानाची परिस्थिती  अशीच राहिल्यास ऑक्टोबर-15 नंतर टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.  हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील मोठया व लघु जलस्त्रोतांचे पाणी आरक्षित करणे गरजेचे आहे.  त्यादृष्टीकोनातून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका यांनी आपल्या कार्यक्षेत्रात लागणाऱ्या संभाव्य जलसाठ्यांचे पाणी आरक्षित करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनास तात्काळ सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिल्या.
              जुलै-2016 पर्यंत पुरेल एवढ्या जलसाठ्याची आवश्यकता असून ही आवश्यकता लक्षात घेऊन जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठया धरणांच्या पात्रात असलेल्या जीवंत पाण्याच्या साठयाचे नियोजन करणे आवश्यक आहे.  सदरचे नियोजन करत असतांना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या व शेतकऱ्यांच्या  समन्वयानेच हे नियोजन करावे.  जिल्ह्यातील 10 धरणांमधील आजच्या उपयुक्त साठ्याची टक्केवारी एकूण 27.90 टक्के इतकी असून त्यातील पांझरा-57.31 टक्के, मालनगांव-75.38 टक्के, जामखेडी-100 टक्के, बुराई-13.8 टक्के, करवंद-87.68 टक्के, अनेर-41.93 टक्के, वाडी शेवाडी-0.14 टक्के इतकी असून कनोली, सोनवद व अक्कलपाडा येथील पाणीसाठ्याची टक्केवारी निरंक असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
            महानगरपालिकेने संभाव्य टंचाईचा आराखडा तयार करतांना ऑक्टोबर-2015 अखेर महानगरपालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या संभाव्य ग्रामपंचायतींचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे.  सद्य:स्थितीत जिल्ह्यात वारूड ता. शिंदखेडा व धामणदर-पारगांव ता. साक्री या  दोन ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून 37 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.  कुंडाणे, वेल्हाणे  व वलवाडी या गावांनीही टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी उद्भवचा प्रवाह सुरू असून नकाणे तलावात 90 द.ल. घ.फू. म्हणजे 25 टक्के, डेडरगाव तलाव-51 द.ल.घ.फू. (42 टक्के), शिरपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या करवंद धरणात-16.01 द.ल.घ.फू. (87.68 टक्के) तसेच दोंडाईचा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी-सारंगखेडा बॅरेजच्या पाण्याची पातळी 112.80 मीटर इतकी असून 1,601.18 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग आहे.  तर शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी-सुलवाडे बॅरेजच्या पाण्याची पातळी 123.70 मीटर इतकी असून 1,440.50 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग असल्याची माहिती यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.
            जिल्ह्यातील सर्व धरणांचे पाणी मिळून सध्या जिल्ह्यात 4 हजार 834 द. ल. घ.फू. साठा असून 3 कोटी 28 लाख द.ल.घ.फू. पाणी साठयाची क्षमता सर्व धरणांची आहे.  जिल्ह्यातील पशुधनासह 22 लाख लोकसंख्येला दर दिवशी 140 लिटर याप्रमाणे 257 दिवस पुरेल एवढा पाणी साठा सध्या जिल्ह्यात शिल्लक असल्याची माहिती धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. वाघ यांनी यावेळी दिली.
 दृष्टीक्षेपात संभाव्य टंचाई...
·        जिल्ह्यात आजपावेतो सरासरी 55 टक्के इतका पाऊस.
·        असेच पर्जन्यमान राहिल्यास ऑक्टोबर-2015 अखेर  जाणवणार टंचाई.
·        जुलै-2016 पर्यंत पुरेल  इतक्या  पिण्याच्या पाण्याचे करणार नियोजन.
·        जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 27.90 टक्के पाणी.
·        कनोली, सोनवद व अक्कलपाडा येथील पाणी साठा निरंक.
·        जिल्ह्यात दोन ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा, 37 विहिरींचे अधिग्रहण.
·        कुंडाणे, वेल्हाणे व वलवाडी (ता.धुळे)  गावांनी टँकरद्वारे पाणी पुरवण्याची केली मागणी.

000000

गोंदीया जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे गतीमान करा - मुख्यमंत्री


 दि.25गोंदीया जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांना गती देण्यात यावी,असे निर्देश मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री श्रीफडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज गोंदीया जिल्ह्यातीलविकास कामांबाबत बैठक झालीत्यावेळी ते बोलत होतेयावेळी आमदार गोपालदास अग्रवाल,नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकरपाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचेप्रधान सचिव राजेश कुमारमुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकरगोंदीयाचे जिल्हाधिकारी विजयसुर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
डांगुर्ली बंधाऱ्याचे काम गतिमान करण्यासाठी आंतरराज्यीय सिंचन मंडळासोबतलवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला जाईलनवेगांव डेवरी उपसा सिंचन योजनेचे काम मार्गीलावण्यासाठी आपण राज्यपालांशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावूअसे मुख्यमंत्री म्हणाले.जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना ग्रामस्थांना विविध योजना एकत्र करुन घरे देतायेतील का याचा विचार करावाअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गोंदीया शहरात जनरल नर्सिंग कोर्स महाविद्यालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय सुरुकरण्याबाबतही याप्रसंगी चर्चा झालीवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठीआराखडाअंदाजपत्रक तयार करणेप्रशासकीय मान्यता घेणे आदी कामे तातडीने पूर्ण करुन याकामाला गती देण्यात यावीतसेच जनरल नर्सिंग कोर्स महाविद्यालयासाठी आवश्यकपदनिर्मितीसही मंजुरी देण्यात यावीअसे निर्देश त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनादिले.
गोंदीया शहरात समाजभवन उभारणेमध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणेयासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध करुन द्यावीअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळीदिलेयाशिवाय गोंदीया शहरातील बाह्य वळण रस्त्याच्या बांधकामांसही आवश्यक निधीचीउपलब्धता करुन देऊन हा वळण मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावाअसे ते म्हणाले.
०००

एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन व टंकलेखन परिक्षेसाठी अर्ज पाठवावेत

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र शासनाच्या एतदर्थ मंडळामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर  2015 मध्ये घेण्यात येणाऱ्या मराठी टंकलेखन परिक्षा (30 शब्द प्रति मिनिट गति) साठी दि. 11 सप्टेंबर 2015 पर्यंत व मराठी लघुलेखन परिक्षा (80 शब्द प्रति मिनिट गति) साठी 18 सप्टेंबर 2015 आवेदन पत्र पाठवावेत, असे आवाहन भाषा संचालक व अध्यक्ष एतदर्थ मंडळ मराठी टंकलेखन व लघुलेखन परिक्षा यांनी केले आहे.
            मराठी टंकलेखन परिक्षा इंग्रजी टंकलेखनाचे काम करणारे टंकलेखक व लिपिक टंकलेखक तसेच इंग्रजी लघुलेखक, इंग्रजी लघुटंकलेखक यांच्यासाठी बुधवार दि. 14 ऑक्टोबर 2015 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या ठिकाणी घेण्यात येईल. मराठी टंकलेखन परीक्षा संगणकावर घेण्यात येणार असून ती 30 श.प्र.मि. गतीची असेल यासाठी आय.एस.एम. (ISM V6) सॉफ्टवेअरमध्ये DVOT-SurekhMRहा फाँट टंकलेखनासाठी वापरण्यात येईल. संगणकाची व्यवस्था परीक्षा केंद्रावर मंडळामार्फत करण्यात येणार आहे. मराठी लघुलेखन परीक्षा इंग्रजी लघुलेखक (निवड श्रेणी, उच्चश्रेणी, निम्न श्रेणी)व इंग्रजी लघुटंकलेखक यांच्यासाठी मंगळवार दि. 27 ऑक्टोबर 2015 रोजी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येईल. या परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची विहीत नमुन्यातील आवेदन पत्रे त्यांच्या कार्यालय प्रमुखामार्फत त्या-त्या विभागातील भाषा संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या (नवी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद) या विभागीय कार्यालयांकडे विहीत मुदतीत पाठवावे. परीक्षेचे आवेदनपत्रे भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडे परस्पर पाठवू नयेत. परीक्षेचे आवेदनपत्रे विहीत मुदतीत न पाठविल्यास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
            विभागीय कार्यालयाचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
            मुंबई व कोकण विभाग - विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण भवन, 3 रा मजला, नवी मुंबई-400 614 दुरध्वनी क्रमांक : 022-27573542
            पुणे व नाशिक विभाग - विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे-411 001 दुरध्वनी क्रमांक : 020-26121709
            नागपूर व अमरावती विभाग - विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440 001 दुरध्वनी क्रमांक -0712-2564956
            औरंगाबाद विभाग - विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद-431 001 दुरध्वनी क्रमांक : 0240-2361372
            मराठी टंकलेखन परीक्षेसाठी व मराठी लघुलेखन परीक्षेसाठी वेगवेगळी आवेदनपत्रे कार्यालय प्रमुखांमार्फत पाठवावीत. सदर आवेदनपत्रात उमेदवाराचे पूर्ण नाव, कार्यालयाचा पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्त पीन कोड क्रमांकासह नमूद करणे आवश्यक आहे.

००००००