बातमी व फोटो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बातमी व फोटो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी शुभारंभ सोहळ्याचे राष्ट्रपतीच्या हस्ते उद्घाटन




मुंबई, दि. 21 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दि. 12 मार्च 2012 रोजी मुंबई येथे करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
     स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. 13 मार्च 2012 पासून सुरु होऊन ते 12 मार्च 2013 रोजी पूर्ण होईल. या जन्मशताब्दी वर्षात राज्य शासनामार्फत विविध योजना, कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर करावयाच्या कार्यक्रमांची निश्चिती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची आज बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. जन्मशताब्दीवर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्याशी संबंधित निवडक पुस्तकांचे संच सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची सुचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
     यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, आमदार उल्हास पवार,  जन्मशताब्दी वर्षात राबविण्यात येणाऱ्या योजना आणि कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य गिरीश गांधी, कलाप्पा आवाडे, राम प्रधान, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे  आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
     स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा दि. 12 मार्च 2012 रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे करण्याचे प्रस्तावित आहे. सांयकाळी 6 ते 9.30 या वेळेत मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत या मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या तसेच  वर्षभर आयोजित करावयाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यात  दर महिन्याच्या 12 तारखेला एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल, यामध्ये विविध विभागांचा सहभाग असेल असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
     स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचे विविध पैलू उलगडून दाखविणारे हे कार्यक्रम राज्याच्या सर्व भागात आणि नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येतील. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रीय स्तरावर परराष्ट्र, गृह आणि सरंक्षण यासारखी महत्वाची खाती सांभाळली. त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगला संपर्क होता. त्यांनी सहकार, शिक्षण, साहित्य, ग्रामविकास, कृषी, औद्योगिक विकास यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. नव्या पिढीला त्यांच्या कार्यकतृर्त्वाची माहिती होण्यासाठी तसेच त्यांचे विचार आणि कार्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यामध्ये होणाऱ्या परिसंवाद आणि चर्चासत्रांसाठी विभागांनी विषय आणि संकल्पना सुचवाव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
. . .

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

कुष्ठरोग्यांनाही समाजाने सन्मानाची वागणुक द्यावी :- जिल्हाधिकारी प्रकाश महाजन




धुळे दि.9 :- कुष्ठरोग ही समस्या पिढयान पिढया हाताळणे कठीण असून पुर्वी कुष्ठरोग्यावर बहिष्कार टाकला जात होता.परंतू भारतासारख्या विकसित देशाला ही चिंतेची बाब असून कुष्ठरोगीही समाजाचा एक घटक असून त्याला सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी आज केले.
      आज नवनिर्माण समाजसेवक संघाच्या कुष्ठरोग अभियान योग विद्यावर्घिनी सस्थेच्या रंजना नेवे व प्रतिभा नेवे यांनी लावलेल्या वृक्षांना वृक्षवंदना कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी वृक्ष मित्र वसंतराव ठाकरे, लखन भतवाल, प्रा.न.म.जैन,अतुल सोनवणे,मुकूंद भावे,प्रभाकर बेंद्रे, डॉ.तिवारी  यावेळी उपस्थित होते.
      कृष्ठधामात जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते नवीन वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी ते मार्गदर्शन करतांना म्हणाले की,समाजात सामाजिक प्रतिष्ठा महत्वाची मानली जाते त्यामुळे कुष्ठरोगासारखा आजार लपवला जातो भारतात कुष्ठरोगाचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.मालेगाव सारख्या शहरात पल्स पोलिओच्या डोस घेण्यासाठी विरोध होतो.तर या रोगाची काय परिस्थिती असेल तरी समाज सेवकांनी सामाजिक भावनेने या रोग्यांना  मुख्य प्रवाहात आणावे . दानशुर व्यक्ती,स्वंयसेवी संस्थानी पुढे येवून अशा आश्रमांना मदत करावी असेही आवाहन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी आज केले.
00000

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

असंरक्षित, माथाडी व घरेलू कामकागारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु -- ना. राजेंद्र गावीत



धुळे दि. 26 जाने.12 :- असंरक्षित व माथाडी कामगार मंडळाचे व घरेलू कामगारांचे प्रश्न सोडविणयासाठी आपण प्रयत्नशिल असून त्यासाठी नाशिक येथे विभागीय स्तरावर धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्हयाच्या बैठकीचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास, कामगार, लाभक्षेत्र व फलोत्पादन राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांनी आज दोंडाईचा विश्रामगृहात आयोजित माथाडी कामगार मंडळाच्या बैठकीत बोलतांना केले.
       दोंडाईचा येथे आज राज्याचे आदिवासी विकास व कामगार राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांच्या अध्यक्षतेखाली असंरक्षित व माथाडी कामगार व घरेलू कामगार महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, माजी आ.राकृष्ण पाटील, माथाडी कामगार मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
       यावेळी ना. गावीत यांनी माथाडी कामगार व कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते यांच्याशी चर्चा करुन म्हणणे ऐकुण घेतले. तसेच कृषी उत्पन्न बाजारी समितीत शेतकऱ्यांच्या मालाला तीन वेळा लेव्ही लागते ती कमी करुन एक किंवा दोन वेळा करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.यावर निश्चित मार्ग काढू असेही त्यांनी यावेळी सांतिगतले. तसेच कामगार मंडळाचे प्रश्न लवकरच मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       ते पुढे म्हणाले की, कामगारांच्या मागण्यांबाबत निश्चित विचार करुन त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे सांगितले.
000
       




भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण
राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांच्या हस्ते संपन्न
                धुळे दि. 26 जाने. 12:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे आदिवासी विकास, कामगार, लाभक्षेत्र व फलोत्पादन खात्याचे राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर शानदार सोहळयात संपन्न झाला. यावेळी मंत्रीमहोदयांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन परेडची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
       यावेळी ना. गावीत यांनी उपस्थित जनतेला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छापर संदेशात  सांगितले की, जिल्हयात अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांची उभारणी होत असून त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा अशा दोंडाईचा औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी मेथी-विखरण या दोन्ही गावातील 435.87 हेक्टर आर जमिन संपादित करण्यासाठी 10 लाख रुपये प्रतिहेक्टरी वाढीव दराने मोबदला देण्याच्या भुधारकांच्या मागणीनुसार आणि प्रशासनाच्या शिफारशीनुसार शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जमीन खरेदीस सुरवातही झालेली आहे. दोन हजार कोटी रुपयांचा साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे सौर ऊर्जा महा प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 460 हेक्टर वन जमिनीचा प्रस्ताव भारत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरीडॉर प्रकल्पांतर्गत मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर 10 हजार हेक्टर क्षेत्रावर कार्गोहब प्रकल्पाची उभारणी, 500 कोटी रुपयांचा लुपीन फौंडेशन संस्थेतंर्गत जिल्हयातील 225 गावांचा पायाभूत विकास  होत असून  सोनगीर येथे रुपये 3,400 कोटी गुंतवणूक करुन 48 हेक्टर क्षेत्रावर 567 के.व्ही. उप केंद्रासाठी मंजुरी मिळाली आहे. अशा अनेक प्रकल्पातून सुशिक्षित बेरोजगार, सर्वसामान्य माणसाच्या हातास काम मिळणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे सातत्याचे प्रयत्न आहेत.                                                                                              
       जिल्हयातील साक्री व शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांना वन हक्काच्या 67,023.25 एकर जमिनीचे 13,260 लाभार्थ्यांना  वाटप करण्यात आले असून त्यामुळे आदिवासीच्या जीवनांत नवी पहाट निर्माण झाली आहे. राज्य शासन कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने विचार करत असून कामगारांना त्यांच्या कामाचा पुरेपूर मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्हयात दोन मोठे बॅरेज व अक्कलपाडा धरणाचे काम अंतीम टप्प्यात असल्यामुळे शेतक-यांना सिंचनाची मोठया प्रमाणात सोय झाली असून धुळे शहरासह जिल्हयाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. जिल्हयात शैक्षणिक संस्थांचे जाळे मोठया प्रमाणात विणले गेले  आहे.
       जिल्हयातील शेतक-यांनी शेतीला जोड धंदा म्हणून फलोत्पादनासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करावेत यासाठी शासन मोठया प्रमाणात सबसिडी देते. त्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा.  त्याच बरोबर शेततळयांना मोठया प्रमाणावर प्राधान्य देऊन शेततळयांच्या माध्यमातून शेतक-यांना वेगवेगळे पिके घेण्यास मदत होईल.
       जिल्हयाच्या विकासाला ख-या अर्थाने चालना मिळते ती दळणवळणांच्या साधनांपासून. धुळे जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 च्या चौपदरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.  नागपूर ते सुरत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या चौपदरी-करणाची निविदाही काढण्यात आली असून या कामास लवकरच चालना मिळणार आहे. चौपदरीकरणामुळे जिल्हयाच्या विकासात निश्चित भर पडणार आहे.श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे काम मोठया प्रमाणावर प्रगतीपथावर असून लवकरच सामान्य रुग्णांसाठी  ते खुले केले जाईल.
       ते पुढे म्हणाले की घरेलू कामगार महिलांचा प्रश्नही गंभीर असून घरेलू कामगारांची नोंदणी सुरु केलेली आहे.यावेळी ना. गावीत यांच्या हस्ते महानगरपालिकेने राबविलेल्या स्वच्छता उत्सवानिमित्त शहरातील महाविद्यालये व विद्यालयांना प्रमाण्पत्रांचे वाटप करण्यात आले त्यात  जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवपुर, धुळे, कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे, न्यु सिटी हायस्कुल, धुळे, कानोसा कॉन्व्हेट हायस्कुल, धुळे, जे. आर. सिटी हायस्कुल, धुळे आणि एकविरा हायस्कुल, धुळे या शाळांना निर्मलशाळा व निर्मल महाविद्यालय पुरस्कार देण्यात आला. यावेळी मंत्रीमहोदयांनी वेगवेगळया शाळांनी आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमाचा लाभ घेतला.
       यावेळी महापौर मंजुळा गावीत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कलाताई ठाकरे, उपाध्यक्ष सुभाष देवरे, न्यायमूर्ती बी.एन. देशपांडे, महानगरपालिका आयुक्त हनुमंत भोंगळे,अधिक्षक अभियंता बेंद्रे, वैद्यकीय अधिष्ठात डॉ. गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड , शाम सनेर, युवराज, करनकाळ,एम.जी. ढिवरे,पदाधिकारी , स्वातंत्र्य सैनिक , ज्येष्ठ नागरीक , लोकप्रतिनिधी, पत्रकार , अधिकारी, कर्मचारी ,विद्यार्थी मोठया संख्येने  उपस्थित होते.
000