मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

दहावी व बारावी परीक्षेच्या शिक्षासूचीच्या प्रारुपावर 20 जानेवारीपर्यंत अभिप्राय पाठवा


मुंबई,‍िद. 16 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेसाठीच्या प्रचलित शिक्षासूचीचे अद्ययावत प्रारुप मंडळाच्या www.msbshse.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिक्षासूचीचा प्रभावीपणे व सकारात्मक परिणाम होण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विविध संघटना, विद्यार्थी, पालक यांच्याकडून अभिप्राय मागविले आहेत.
            सर्व संबंधितांनी आपले अभिप्राय मंडळाच्या संकेतस्थळावर अथवा विभागीय मंडळ कार्यालयाकडे लेखीस्वरुपात  20 जानेवारी 2012 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभाग, वाशी, नवी मुंबई यांनी केले आहे.
            मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10 वी व 12 वीच्या परीक्षेपूर्वी, परीक्षेच्या वेळी व परीक्षेनंतरच्या काळात काही विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच समाजातील अनेक घटकांकडून विविध प्रकारचे गैरप्रकार होत असतात. प्रत्येक गैरप्रकाराच्या स्वरुपानुसार मंडळस्तरावर चौकशी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येते आणि दोषींवर प्रचलित शिक्षासूचीनुसार शिक्षा करण्यात येते.
            ऑक्टोबर, 2004 पासून परीक्षा पद्धतीमध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या. बारकोड पद्धतीचा अवलंब करण्यात आला. परीक्षापद्धतीतही बदल करण्यात आला. त्याचप्रमाणे गैरप्रकारांच्या स्वरुपातही बदल झालेला आहे. त्या अनुषंगाने प्रचलित शिक्षासूचीमध्ये आमुलाग्र बदल करणे अपरिहार्य झाले आहे. यासाठी उपसमितीने सांगोपांग विचार करुन शिक्षासूचीचा अद्ययावत मसुदा तयार केला आहे. 
000

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आज उद्घाटन


मुंबई,‍िद. 16 : कला संचालनालयाच्या 52 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग) 2011-12 चे उद्घाटन उद्या मंगळवार दि. 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार यांच्या हस्ते होणार आहे.
        ठाणे कला भवन, जुना मुंबई-आग्रा रोड, कापूरबावडी जंक्शनजवळ ठाणे येथे होणाऱ्या या उद्‌घाटन समारंभास ठाणे महानगरपालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अभय वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
        हे प्रदर्शन दिनांक 17 ते 22 जानेवारी, 2012 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याचे कला संचालनालयाचे प्रभारी कला संचालक जी. बी. धनोकार यांनी कळविले आहे.
000

पर्यावरण संरक्षणासाठी तेल आणि गॅस बचतीची गरज --डॉ. अश्विनी जोशी


मुंबई, दि. 16 : पृथ्वीवरील वातावरणात झालेला बदल लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षणासाठी तेल आणि गॅस यांची बचत करण्याची गरज असल्याचे नियंत्रक शिधावाटप तथा संचालक, नागरी पुरवठा डॉ. अश्विनी जोशी यांनी आज येथे सांगितले.
            पेट्रोलियम कॉर्पोरेशन रिसर्च ऑरगनायझेशन व सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ते 31 जानेवारी 2012 पर्यंत तेल आणि गॅस बचत पंधरवडा साजरा करण्यात येतो. या पंधरवड्याचे उद्घाटन येथील सह्याद्री अतिथीगृहात झाले त्यावेळी डॉ. जोशी बोलत होत्या. पेट्रोलियम कॉर्पोरेशन रिसर्च ऑरगनायझेशनचे संचालक  टी. बक्षी, गेलचे के. टंडन,  तसेच बी. जे. परमार, परमिंदर सिंग आदी तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, तेल कपंन्याचे वितरक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
            डॉ.जोशी म्हणाल्या की,  ग्रामीण भागामध्ये सौर ऊर्जा तसेच सोलर कुकर, बायोगॅस आदींच्या वापरा संबंधी प्रसार करुन या बाबतच्या तांत्रिक शिक्षणासाठी कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.
            यावेळी उपस्थितांना तेल आणि गॅस वाचविण्याबाबतची शपथ देण्यात आली. तसेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. या संदेशात श्री. देशमुख म्हणतात की, भारताला परदेशातून पेट्रोलजन्य पदार्थ आयात करावे लागतात आणि याचा थेट परिणाम आपले परकीय चलन कमी होण्यावर होत असतो. त्यामुळे पेट्रोलजन्य पदार्थांची बचत करणे हे आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे आणि ऊर्जेची बचत ही आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच बनला असून हा बचतीचा साठा उद्यासाठी आणि भावी पिढीसाठी फार गरजेचा आहे.
            तेल कंपन्यांच्यावतीने या पंधरवड्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप यावेळी करण्यात आले.
000

ग्रंथ निवडीबाबत 21 जानेवारीपर्यंत आक्षेप पाठवावेत


मुंबई, दि. 16 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या समान निधी योजनेंतर्गत ग्रंथभेट योजना कार्यान्वित आहे.
          37 व्या ग्रंथसंच भेट योजनेंतर्गत 2010 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी खरेदी करण्यासाठी निवडण्यात आलेल्या 424 ग्रंथांची (मराठी-345, हिंदी-39 व इंग्रजी-40) यादी संचालनालयाच्या www.dolmaharashtra.org.in व शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेत स्थळांवर  दिनांक 21 जानेवारी 2012 पर्यंत अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे.
          या संदर्भ यादीतील कोणताही ग्रंथ आक्षेपार्ह असल्यास ते आक्षेप दिनांक 21 जानेवारी 2012 पर्यंत संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगरभवन, मुंबई यांच्याकडे लेखी स्वरुपात, हस्त बटवडयाने, पोस्टाने अथवा कुरिअरने कार्यालयीन वेळेत पाठवावेत. या मुदतीनंतर प्राप्त सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.
0 0 0 0

ए.पी.एल. शिधापत्रिकाधारकांसाठी जानेवारी महिन्याचे अन्नधान्य परिमाण


मुंबई, दि. 16 : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात ए. पी. एल. योजनेकरिता माहे जानेवारी 2012 साठी 22,108 मेट्रिक टन गहू व 3,622 मेट्रिक टन तांदूळ इतके नियमित नियतन मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच गव्हाचे 11,457 मेट्रिक टन इतके अतिरिक्त नियतन मंजूर करण्यात आले आहे.
            ए. पी. एल. शिधापत्रिका धारकास एकूण 15 किलो धान्य वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये त्यांना 10 किलो गहू व 5 किलो तांदूळ घेता येईल. एपीएल योजनेंतर्ग जानेवारी 2012 करिता परिमंडळ कार्यालयाकडून प्राप्त मागणीनुसार नियमित गहू नियतनाचे परिमंडळनिहाय वाटप करण्यात येत असून ए. पी. एल. योजनेंतर्गत जानेवारी 2012 करिता प्राप्त तांदूळ नियतन हे परिमंडळ कार्यालयाकडून प्राप्त मागणीच्या 29.48 टक्के इतके असल्याने त्याच्या मागणीच्या याच टक्केवारीनुसार परिमंडळनिहाय वाटप करण्यात येणार आहे. गरजू व पात्र शिधापत्रिकाधारक योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत व अधिकृत शिधावाटप दुकाने कोरडी राहणार नाहीत याची दक्षता उपनियंत्रक शिधावाटप यांनी घ्यावी, अशी सूचना नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी केली आहे.
            सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना विहित वेळेत अन्नधान्य पोहचण्याच्या दृष्टीकोनातून सदर योजनेचे माहे जानेवारी 2012 करिताचे वितरण आदेश उपनियंत्रकांनी त्वरित द्यावेत आणि संलग्न संस्थांनीही या योजनेतील अन्नधान्याची 20 जानेवारी 2012 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत 100 टक्के उचल करावी.
            गोदामातून उचल केलेले अन्नधान्य विहित मुदतीत सर्व संबंधित शिधापत्रिकाधारकांना पोहचेल यासाठी सर्व परिमंडळ उपनियंत्रक शिधावाटप यांनी खबरदारी घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी.
            अन्न महामंडळाच्या गोदामातून गहू व तांदूळ स्वीकारताना शासनाच्या निर्देशानुसार संयुक्तपणे नमुने घेऊन धान्याचा दर्जा तपासून तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच धान्याची उचल करावी. अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी अन्नधान्याची मागणी न नोंदविल्यास अथवा संघटीत संस्थांनी मुदतीत 100 टक्के धान्याची उचल न केल्यास त्यांच्या विरुध्द नियमानुसार कारवाई करावी. तसेच शिधापत्रिकाधारकास अधिकृत शिधावाटप दुकानाच्या माध्यमातून सदर धान्याचे वाटप होत असल्याची खात्री करावी व अधिकृत शिधावाटप दुकानांच्या नियमाप्रमाणे तपासण्या कराव्यात अशा सूचना नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी सर्व परिमंडळातील उपनियंत्रक शिधावाटप यांना दिल्या आहेत.
0 0 0 0

सोमवार, १६ जानेवारी, २०१२

रस्ता सुरक्षा पंधरवडा`


रस्ता सुरक्षा संदर्भात अधिक जनजागृती व्हावी यासाठी राज्य शासनाने १ ते १५ जानेवारी पर्यंत `रस्ता सुरक्षा पंधरवडा` पाळण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानंतरही सातत्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे. लातूर येथील प्रादेशिक परिवहन, शहर वाहतुक नियंत्रण शाखा आणि महामार्ग पोलिस यांच्या वतीने १ जानेवारी पासून महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानास प्रारंभ झाला आहे. त्या निमित्ताने रस्त्यावरुन जातांना कोणते नियम पाळावेत, यावर आधारित लेख . .

देशात दरवर्षी सुमारे एक लाख लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात. यात प्रामुख्याने १५ ते ४४ या वयोगटातील तरूणांची संख्या ६० टक्के पेक्षा अधिक आहे. नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू रस्त्यावरील अपघातामुळे होतात. आपला दोष नसताना अनेक वेळा इतरांच्या चुकीमुळे अपघात होऊन जिवितहानी होते. प्रामुख्याने अपघात होण्यास वाहनचालकाचा ८३ टक्के तर पादचाऱ्याचा ६ टक्के निष्काळजीपणा कारणीभूत आहे. रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्वाची गरज असून अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.

पादचाऱ्यांसाठी
• पादचाऱ्याने रस्त्यावरुन जातांना फुटपाथचा वापर करावा. फुटपाथ नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे.
• रस्ता ओलांडतांना झेब्राक्रॉसिंग वरुनच रस्ता ओलांडावा.
• रस्ता ओलांडायाचा असेल तर प्रथम उजवीकडे आणि नंतर डावीकडे पाहून, रस्त्यावर वाहन येत नाही याची खात्रीकरुनच रस्ता ओलांडावा. रस्ता ओलांडतांना अचानक वाहन आल्यास जागेवरच थांबावे.
• वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून रस्त्याच्याकडेने चालावे.
• अंध, अपंग, वृध्द, लहान मुले यांना रस्ता ओलांडण्यास मदत करावी. दुर्देवाने अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी.

सायकलस्वारांसाठी

• सायकल सरळ रेषेत व डाव्या कडेने चालवावी. रस्ता वळण्यापूर्वी योग्य इशारा करावा.
• मोठ्या वाहनाच्या साखळीला धरुन सायकल चालवू नये.
• सायकलचे मागील मडगार्ड अर्धे पांढरे व अर्धे लाल रंगाने रंगवावे. तसेच मागील बाजूस तांबडा परावर्तक (रिफ्लेक्टर) बसवावा.
• रात्री सायकलला दिवा लावावा.
• दोन्ही ब्रेक चांगले आहेत याची खात्री करावी.
• आपल्या उंचीला योग्य अशीच सायकल वापरावी.

मोटारसायकल चालकांसाठी

• मोटार सायकल ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय चालवू नये. लायसन्स व इतर कागदपत्रे सोबत ठेवावीत.
• वाहनाचे हेडलाईट, ब्रेकलाईट, टेललॅम्प, साईड इंडीकेटर, आरसे सुस्थितीत असल्याची खात्री करावी.
• मोटार सायकल भरधाव वेगाने चालवू नये. वाळू, पालापाचोळा, पाणी, चिखल, ऑईल यावरुन वाहन सावधपणे चालवावे
• दोन मोठ्या वाहनांच्या मधून ओव्हरटेक करु नये. मोटार सायकल थांबवितांना दोन्ही ब्रेकचा वापर करावा.
• हेलमेटचा वापर करावा.
• दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवास करुन नये. तो कायद्याने गुन्हा आहे.

रिक्षाचालकांसाठी

• रिक्षाचालकाने प्रवाशांशी सौजन्याने वागावे.
• अधिकृत रिक्षा स्टँडवरच वाहने उभी करावीत. रहदारीला अडथळा होईल असे पार्किंग करु नये.
• प्रवाशांचे सामान अथवा मौल्यवान वस्तु वाहनात विसरल्यास परत करावे किंवा पोलीस स्टेशनमध्ये जमा करावे.
• प्रवाशांना जवळच्या मार्गाने त्यांच्या इच्छीतस्थळी न्यावे.
• संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळून आल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवावे.
• पाचपेक्षा जास्त शालेय मुलांची वाहतूक करु नये. वेगावर नियंत्रण ठेवावे.
• वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावीत. अधिकृत टेरीफ प्रमाणेच भाडे आकारावे.
• आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेऊ नयेत. वृध्द व स्त्रियांना मदत करावी.

मोटारकार चालकांसाठी

• कार चालवतांना सिटबेल्टचा वापर करावा.
• ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नये. लायसन्स, विमा, नोंदणी प्रमाणपत्र, पीयुसी दाखला, कर पुस्तिका नेहमी सोबत ठेवावी.
• वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करावी.
• झीजून गुळगुळीत झालेले टायर त्वरीत बदलावेत. हेडलाईट, ब्रेकलाईट, टेललॅम्प, इंडीकेटर, वायपर्स व आरसे सुस्थित असावेत.

शिस्त पाळणे

वाहन चाल‍वतांना मोबाईल फोनवर बोलणे. गाणे ऐकणे त्यातील संदेश वाचणे. मोबाईलवरुन संदेश पाठवणे. त्यावर गेम खेळणे कायद्याने गुन्हा आहे. वाहन सिग्नलजवळ किंवा ट्रॅफिकमध्ये थांबले तरीही मोबाईलचा वापर करण्यास मनाई आहे. वाहन चालवितांना मोबाईचा वापर केल्यास दंड भरुन सुटका होणार नाही, तर ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकते. लेनची शिस्त पाळावी. ओव्हरटेक नेहमी पुढील वाहनाच्या उजव्या बाजूनेच करावी.

मादक पदार्थाचे सेवन करुन वाहन चालवू नये. इतरांना अडचण होईल अशा ठिकाणी वाहन पार्किंग करु नये. नंबर प्लेटमध्ये दादा नाना अशा स्वरुपाची अक्षरे लिहू नयेत. मुलांची नावे व नक्षी काढू नयेत. वाहनाची नंबर प्लेट नियमाप्रमाणे रगवावी. रात्री गॉगल किंवा नाईट ड्रायव्हिंग ग्लासेस वापरु नये. वाहन चालवतांना काच आतून बाहेरुन स्वच्छ पुसून घ्यावी.

उतारावरून खाली उतरतांना इंजन बंद करुन वाहन चालवू नये किंवा न्यूट्रल गिअरचा वापर करू नये. चढावर पुढे जाणाऱ्या वाहनांना अगोदर जाऊ द्यावे. अवघड किंवा न दिसणाऱ्या वळणावर दिवसा हॉर्नचा तर रात्री लाईटचा वापर करुन समोरुन येणाऱ्या वाहनचालकाला सावध करावे. हॉर्नचा आवाज कर्कश असू नये. वाहनाच्या समोरच्या बाजूस पांढऱ्या रंगाचे आणि मागच्याबाजूस लाल रंगाचे रिफ्लेक्टिव टेप लावावे

जेंव्हा वळणावर रस्ता दृष्टीक्षेपात नसतो. तेथे दुहेरी अखंड पांढरा/पिवळा पट्टा रंगवलेला असतो. या ठिकाणी कोणत्याही दिशेच्या वाहनाने आपल्या बाजूचा पट्टा ओलांडू नये किंवा ओव्हरटेक करु नये. आपण ज्या गिअरमध्ये घाट चढतो. त्याच गिअरमध्ये घाट उतरावा. रात्री अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे रात्री, शक्यतो पहाटे २ ते ४ या वेळेत वाहन चालवू नये. रस्त्यात बंद पडलेली तसेच संथगतीने चालणाऱ्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवून वाहन चालवावे.

पावसात वाहन चालविणे धोकादायक असते. गार्डस्टोन पाण्यात बुडाले असल्यास वाहन पाण्यातून नेऊ नये. आपल्या वाहनामुळे पायी चालणाऱ्या लोकांच्या अंगावर चिखल उडणार नाही याची काळजी घ्यावी.


व्यावसायिक वाहनाच्या बाबतीत योग्यता प्रमाणपत्र व परवाना असावा. वेगावर नियंत्रण ठेवावे. ड्रायव्हिंग लायसन्स आणि बॅच असल्याशिवाय वाहन चालवू नये.

आदेश देणाऱ्या चिन्हांचे पालन करावे. रस्त्यावरील चिन्हे संभाव्य धोक्याची पूर्ण कल्पना देऊन सावध करतात या चिन्हांकडे लक्ष द्यावे. माहिती देणा-या चिन्हांमुळे रस्त्यावरील सोयी-सुविधांची कळते.

या नियमांच्या आणि शिस्त पालनामुळे स्वत:च्या जिवितासह, इतरांचे जिवितहानी टाळता येते. मालमत्ता आणि इतर नुकसान टळून वाहतूक सुविधेचा सर्वांनाच पूरेपूर लाभ घेता येईल. एकमेकांच्या विकासाला, राष्ट्र विकासाला हातभार लावता येईल.

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

अनुसूचित जातीच्या जनतेने विशेष घटक योजनांचा लाभ घेऊन सर्वांगिण विकास साधावा : आ. प्रा.शरद पाटील



       
 धुळे, दि. 13 :- सामाजिक विषमता दूर होण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसूचित जातीच्या (विशेष घटक योजना) कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. विशेष घटक योजनांच्या विविध योजनांचा लाभ  ग्रामीण भागातील तळागाळातील अनुसूचित जातीच्या जनतेने घेऊन सर्वांगिण विकास साधावा, असे आवाहन धुळे (ग्रामीण) चे आ. प्रा. शरद पाटील यांनी केले.
       धुळे तालुक्यातील सोनगीर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सामाजिक न्याय विभागाच्या  विशेष घटक योजनांचा प्रचार, प्रसिध्दी  ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने उडाणे येथील क्रांती कृषि युवा बहुउद्देशीय संस्थेमार्फत आयोजित कलापथकाचे उदघाटन आ. प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते काल झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे विशेष जिल्हा समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक विलास करडक, जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील,  माजी उपसरपंच कैलास वाणी, माजी सरपंच हाजी पठाण, ग्राम पंचायत सदस्य हसन पठाण, पराग देशमुख, केदार मोरे, आधार अण्णा, नेरकर, उपसरपंच प्रकाश गुजर हे होते.
       आ. प्रा. शरद पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात संघर्ष करुन देश स्वातंत्र्य झाला.  परंतु श्रीमंत-गरीब ही दरी अजूनही दूर झाली नाही.  सामाजिक विषमता दूर होण्यासाठी कलापथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचे प्रबोधनाचा करण्याचा उद्देश चांगला आहे.
       क्रांती कृषि युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष शिंदे व त्यांचे सहकारी रोहित बागुल, संदीप सोनवणे, मनोहर कांबळे, प्रविण मोरे,आशा बि-हाडे, वर्षा  सुर्यवंशी, शितल पगार, मुकेश भामरे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेच्या  राबविण्यात येणा-या शासकीय कल्याणकारी योजनेतील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी ई-स्कॉलरशिप योजना, शिक्षण फी, परीक्षा फी योजना (फ्रिशिप), राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतीगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, पुस्तकपेढी योजना, सैनिकी शाळेतील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच मोटार वाहन चालक प्रशिक्षण, दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, पॉवर टिलर वाटप योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, पुरस्कार, कन्यादान योजना, अनुसूचित जाती, जमाती कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्य, घरकुल योजना तसेच शौचालय, एक व्यक्ती एक झाड  आदि योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या उद्देशाने कलापथकाच्या माध्यमातून विशेष जनजागृती केली.
       मान्यवरांचे स्वागत जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन केले तर प्रास्ताविकात वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक विलास करडक म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या व शासनाच्या विविध कल्याणकारी व्यक्तीगत व सामुहिक योजनांचा लाभ घेऊन आपला सर्वांगिण विकास करावा. शेवटी अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सोनगील पंचक्रोशीतील महिला-पुरुष, विद्यार्थी-विद्यार्थीनी आदि बहुसंख्येने उपस्थित होते.
     शिरपूर येथे कलापथकाचा कार्यक्रम संपन्न
     शिरपूर येथील खालचेगांवातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित कलापथक कार्यक्रमाचे उदघाटन त-हाडी महात्मा फुले युवक मंडळ व बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष कचरु अहिरे यांच्या हस्ते काल झाले.  यावेळी क्रांती कृषि युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष शिंदे व त्यांचे सहका-यांनी अनुसूचित जाती उपयोजनेच्या (विशेष घटक योजना) विविध योजनांवर आधारित कलापथकाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मान्यवर, महिला-पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.