बुधवार, १४ डिसेंबर, २०११

गुरुवारी ज्येष्ठ साहित्यिकाची प्रकट मुलाखत व समारोप


धुळे,दि. 14 :- दर्जेदार ग्रंथ जनतेपर्यंत पोचण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दि. 13 ते 15 डिसेंबर, 2011 पर्यंत आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव कार्यक्रमाचा गुरुवार दि. 15 डिसेंबर, 2011 रोजी सायंकाळी 6 ते रात्रो 9 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात प्रथितयश लेखकांची प्रकट मुलाखत व ग्रंथोत्सवाचा समारोप आयोजित करण्यात आला आहे.  सुप्रसिध्द मराठी साहित्यिक प्रा. अनिल सोनार यांची मुलाखत मी महाराष्ट्र वाहिनीचे संचालक चंद्रशेखर पाटील हे घेणार आहेत. या मुलाखतीचा जनतेबरोबर महाविद्यालयीन तरुण, तरुणींना भावी जीवनात लाभ होईल त्यादृष्टीने उपस्थित राहणे आवश्यक आहे.    
       यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  तरी शासकीय व खासगी ग्रंथ विक्री केंद्रात अल्पदरात मान्यवर लेखकांचे साहित्य, संत वाडमय आदि उपलब्ध होणार असल्याने साहित्य प्रेमी, नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा तसेच ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी केले आहे.  

ग्रंथोत्सवात रंग शाहिरी कलेचा कार्यक्रम संपन्न




     धुळे, दि. 14 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ग्रंथोत्सव-2011 च्या दि. 13 ते 15 डिसेंबर पर्यंत आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पहिल्या ‍िदवशी सायंकाळी 6 ते रात्रो 9 पर्यंत शाहीर शिवाजीराव पाटील आणि मंडळी यांनी  रंग शाहिरी कलेचा कार्यक्रम सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.
      शाहीर शिवाजीराव पाटील यांचेसोबत शाहीर नामदेव पाटील, लोटन महाजन, शंकर पाटील, सिताराम महाजन, गोकुळ पाटील, नितीन पाटील, जितेंद्र भांडारकर आदिंनी ग्रंथांचा महिमा, बहिणाबाईंची अहिराणी गीते,  हिंदी-मराठी भाषेत लोक प्रबोधन, स्त्री भ्रूण हत्या, भ्रष्टाचार ग्रंथ पोवाडे, अहिराणी लोकगीते, सर्व धर्म समभाव असलेले स्व:लिखीत गितांचा दर्जेदार कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप साळुंखे यांनी केले.  कार्यक्रमास सुप्रसिध्द मराठी साहित्यिक प्रा. अनिल सोनार, जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील, मान्यवर, पत्रकार आदि उपस्थित होते.

वाचनाची आवड वृध्दीगंत होण्यासाठी ग्रंथोत्सवाचा जनतेने जाणिवपूर्वक लाभ घ्यावा. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन





धुळे, दि. 13 :- ग्रंथ, साहित्य वाचल्याने आपला वैयक्तिक विकास होतो. लोकांमध्ये वाचनाची आवड वृध्दीगंत व्हावी या उद्देशाने शासनाच्या वतीने ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  जिल्हयातील व  शहरातील जनतेने ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांचा तसेच ग्रंथ विक्री केंद्राचा जाणिवपूर्वक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी केले.
      राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे सुरु असेलेल्या ग्रंथोत्सव अभियानाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पारोळा रोड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात दि. 13 ते 15 डिसेंबर, 2011 पर्यंत आयोजित ग्रंथोत्सव-2011 कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन उदघाटन आज झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  महानगरपालिका आयुक्त हनुमंत भोंगळे, महाराष्ट्र साहित्य परिषद, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रा. अनिल सोनार, महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते रविंद्र काकड, नगरसेवक भुपेंद्र लहामगे, नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रसाद वसावे, जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील, जिल्हा शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुभाष साबळे आदि उपस्थित होते.
      विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून ग्रंथ तसेच महात्मा फुले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा. सावरकर यांच्या साहित्यांचे आवर्जून वाचन करणे आवश्यक असून जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, वाचन संस्कृतीमुळे शब्दसंग्रह वाढून विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत त्याचा मोठया प्रमाणात फायदा होऊन, विद्यार्थी त्यात यशस्वी होतील. शासकीय ग्रंथालय तसेच शहरातील  ग्रंथालयाचे वर्गणीदार होऊन आपणास व कुटुंबियांना मोठया प्रमाणात साहित्य उपलब्ध करुन घ्यावे.
      जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, शहरातील शासकीय ग्रंथालयाच्या जागेच्या अडचणी तसेच कर्मचा-यांच्या अडचणी त्वरीत सोडविण्यात येतील. 
        सामान्य माणसापर्यंत दर्जेदार ग्रंथ पोचविण्यासाठी शासनाने ग्रंथोत्सवाचे आयोजन केले असल्याचे सांगून प्रा. अनिल सोनार म्हणाले की, जीवनाची समग्रता समजण्यासाठी थोर ग्रंथ वाचले पाहिजे.  थोर महात्म्यांची पुस्तके वाचनीय असतात, त्यामुळे वाचनाची अभिरुची वाढवून आपले जीवन सार्थकी करावे. शासनाने ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून अल्पदरात संत ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आदि ग्रंथ तसेच साहित्यीकांची पुस्तके विक्रीसाठी ठेवली आहेत. त्याची सर्वांनी आवर्जून खरेदी करावी
      भावनांक वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून प्रा. अनिल सोनार म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिंची पुस्तके संस्कार करणारी आहेत. ललित वाड.मय तसेच ललित ग्रंथ त्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत.
      वाचनाशिवाय आपली प्रगती होणार नाही असे सांगून महानगरपालिका आयुक्त हनुमंत भोंगळे म्हणाले की, वाचनाची आवड कमी होत आहे. टी.व्ही. पाहण्याची संस्कृती वाढत आहे. या संस्कृतीमुळे ज्ञान प्राप्त होते असे नाही.  ग्रंथाचा प्रचंड साठा आहे.  ग्रंथ वाचनाने नितीमूल्ये जोपासली जातात.  आपणही थोर साहित्यीकांचा तसेच समीक्षक प्रा. अनिल सोनार यांच्या साहित्याचा अवश्य उपयोग करावा.
       उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून आयुक्त हनुमंत भोंगळे म्हणाले की, टी.व्ही. कार्यक्रम पाहण्याचे आपण नियंत्रण करावे.  जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज पहाटे त्राटक ध्यान करावे.  चांगल्या मित्र, मैत्रिणीची सोबत करुन आपल्या जीवनाचा विकास साध्य करावा.
      प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविकात ग्रंथोत्सवाची माहिती देऊन उपसंचालक (माहिती) प्रसाद वसावे म्हणाले की, राज्यभरात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  ग्रंथ गुरु मानले पाहिजे.  ज्ञान संपादित करण्यासाठी ग्रंथ वाचनाची  आवड वाढविली पाहिजे.  माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे करमणुकीच्या साधनात वाढ झाली असली तरी मराठी प्रकाशन, पुस्तक विक्रीस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या लोकराज्य मासिकातील शासकीय योजना, मान्यवर साहित्यीकांच्या माहितीचा जनतेने लाभ घेण्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
     ग्रंथ विक्री केंद्राचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उदघाटन
     जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते ग्रंथोत्सवात आयोजित केलेल्या शासकीय व खाजगी ग्रंथालय विक्री केंद्राचे फीत कापून उदघाटन करुन ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली.  यावेळी त्यांचेसमवेत मान्यवर उपस्थित होते.  ग्रंथविक्री केंद्रात  शासन मुद्रण, लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई, जिल्हा माहिती कार्यालयाचे लोकराज्य, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, संशोधन मंडळ, समर्थ वाग्देवता मंदिर, किर्ती प्रकाशन, कविता रती आदिंचे ग्रंथविक्री केंद्र सहभागी झाले आहेत.
     ग्रंथदिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद
      जिल्हा शासकीय ग्रंथालयापासून ग्रंथोत्सवाच्या आयोजित केलेल्या ग्रंथदिंडीचे सकाळी सुप्रसिध्द मराठी साहित्यिक प्रा. अनिल सोनार यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.  यावेळी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, महानगरपालिका महापौर सौ.मंजुळाताई गावीत, आयुक्त हनुमंत भोगळे, नगरसेवक हिरामणआप्पा गवळी, भुपेंद्र लहामगे, माहिती उपसंचालक प्रसाद वसावे, ग्रंथपाल सुभाष साबळे आदि उपस्थित होते. कमलाबाई कन्या हायस्कूलच्या विद्यार्थीनीं ग्रंथदिंडीत सहभागी झाल्या होत्या. ग्रंथदिंडी शहरातील प्रमुख मार्गावरुन काढून कार्यक्रमस्थळी ग्रंथदिंडीचा समारोप झाला.  यावेळी शाहीर सुभाष कुळकर्णी, एकविरा देवी हायस्कूलचे विद्यार्थ्यांची लेझिम पथक, जिजामाता कन्या हायस्कूलच्या विद्यार्थीनी, नागरिक, पत्रकारांनी, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.       
      कमलाबाई कन्या हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत तर शाहीर शिवाजीराव पाटील आणि मंडळींनी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप साळुंके यांनी केले तर जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी कवी जगदीश देवपूरकर, मान्यवर, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थीनी आदि उपस्थित होते. ग्रंथोत्सव यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयातील टी.एन.धाकड, राजेश सोनार, संदिप गावीत, सा. ये. जगताप, रा. ना. मोरे, अरुण ओगले, अब्दुलगनी मन्सुरी, श्रीमती यमुनाबाई सोनवणे आदिंनी परिश्रम घेतले.