मंगळवार, ७ जुलै, २०१५

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडावे -प्रकल्प अधिकारी एस. बी. तोरणे

धुळे, दि. 7 :- जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक शाळा, अनुदानित/विना अनुदानित माध्यमिक शाळा, नगर पालिका, महानगर पालिका यांच्यामार्फत सुरू असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजने मार्फत शिष्यवृत्ती अदा करण्यात येते.  या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात वर्ग करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे बचत खाते त्वरित उघडावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी एस.बी. तोरणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
 काही शाळेतील विद्यार्थ्यांचे बचत खाते सुरू करण्यात आलेले नाही त्याऐवजी मुख्याध्यापकांचे (शाळेचे) खाते क्रमांक नमूद केले जातात. ही बाबत अनुचित आहे. सन 2013-14 व सन 2014-15 या वर्षातील देयके विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आलेली आहेत .  ही रक्कम संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे.  तरी सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
            सन 2015-16 या शैक्षणिक वर्षात सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करतांना सर्व विद्यार्थ्यांचे (पालकांचे) खाते क्रमांक आवश्यक आहे.  अपूर्ण प्रस्ताव, खाते क्रमांक नसलेले किंवा मुख्याध्यापकांचे खाते क्रमांक नमूद केलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.  विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहिल्यास किंवा शिष्यवृत्ती वेळेवर मिळाली नाही तर त्यास मुख्याध्यापक जबाबदार असतील याची नोंद घ्यावी, परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा.  जेणेकरून शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करणे सुलभ होईल, असेही पत्रकात नमूद केले आहे.

0000000

प्रकाशा सिंहस्थाला प्रथमच लाभली बोधचिन्हाची रुपेरी किनार -टि. एम. बागुल


नंदुरबार दि. 7 : भारताची दक्षिण काशी म्हणून प्रकाशाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्व आहे.  त्याचबरोबर नाशिक व त्रबंकेश्वरच्या सिंहस्थ पर्वणी सोबतच प्रकाशा येथेही सिंहस्थ पर्वणीची परंपरा सुमारे साडेतीनशे शतकांपासून सुरु असून या महान परंपरेला प्रतिकात्मक ओळख देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रथमच बोधचिन्ह तयार करण्यात आले असून आजपासून प्रकाशाच्या सिंहस्थ पर्वणीला या बोधचिन्हाद्वारे प्रतिकात्मक ओळखच नाही तर रुपेरी किनार लाभली आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी तथा सिंहस्थ पर्वणी समन्वय समितीचे अध्यक्ष टि. एम. बागुल यांनी केले.
            सिंहस्थ पर्वणी जिल्हा समन्वय समिती, सिंहस्थ पर्वणी ध्वजारोहण सोहळा स्थायी समिती व  जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने आयोजित प्रकाशा येथील धर्मशाळेत प्रकाशा सिंहस्थ पर्वणीच्या बोधचिन्ह लोकार्पण कार्यक्रमात श्री. बागुल बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सिंहस्थ पर्वणी ध्वजारोहण सोहळा स्थायी समितीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपविभागीय दंडाधिकारी नितीन गावंडे, तहसिलदार नितीन गवळी, मोहन चौधरी, हरि पाटील विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी व पत्रकार यावेळी उपस्थित होते. 
            यावेळी श्री. बागुल म्हणाले,  प्रकाशा हे गांव तापी व गोमाई व पुलिंदा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.  याठिकाणी पुरातन, ऐतिहासिक, निसर्गरम्य, भव्य व कलात्मक मंदिरे असून ते एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे.  याठिकाणी केदारेश्वर मंदिर, गौतमेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, पुष्पदंतेश्वर मंदिर, माता मन्सापुरी मंदिर, गणपती मंदिर, सिंहस्थ ठिकाण गटी परिसर व मिरवणुकीचे मुख्य ठिकाण तसेच तापी परिसर पर्यटनस्थळ असून त्यास दक्षिण काशी असेही संबोधले जाते.  दर 12 वर्षांनी कुंभमेळा पर्वणी उत्सव भरतो.  नाशिक व प्रकाशा येथील दोन्ही उत्सव सारखे आहेत.  यावेळी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यातून लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.  हा उत्सव 12 महिने पर्वणी काळात सुरु राहतो.   प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभुमीवर करावयाच्या आवश्यक ती कामे करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी उरलेला आहे.   आगामी काही तासात पाऊस देखील पडण्याची शक्यता असून कामे पूर्ण करतांना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ येवू शकते.  त्यादृष्टीने सर्व विभागांनी त्यांचेमार्फत सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत ज्या कामांना निधी उपलब्ध नाही परंतु भाविकांची गैरसोय तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सदर कामे निकडीचे असल्याने संबंधित विभागांनी त्यांच्यामार्फत कामांसाठी तातडीने निधी मंजूर करणेबाबत कार्यवाही करावी.
            जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी  प्रादेशिक पर्यटन विकास, जिल्हा वार्षिक योजना- यात्रास्थळ विकास कार्यक्रम, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, खासदार स्थानिक विकास कार्यक्रम याअंतर्गत एकूण 8 कोटी 67 लाख 4 हजार इतका निधी प्रकाशा सिंहस्थासाठी मंजूर करण्यात आला असून त्यातील 7 कोटी 30 लाख 87 हजार इतका निधी शासनाकडून प्राप्त झाला असून 7 कोटी 15 लाख 87 हजार इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. 
सिंहस्थाकरिता विविध योजनांतून प्राप्त निधीचा गोषवारा
अ.क्र.
योजनेचे नाव
वर्ष
प्रशासकीय मंजुरी
शासनाकडुन प्राप्त निधी
वितरीत निधी
1

प्रादेशिक पर्यटन विकास

2010-11
130.00
130.00
130.00
2012-13
65.00
65.00
65.00
2013-14
167.70
81.53
81.53
2014-15
90.61
40.61
40.61
एकुण
453.31
317.14
317.14
2

जिल्हा वार्षिक योजना - यात्रास्थळ विकास कार्यक्रम (3604)

2013-14
160.00
160.00
160.00
2014-15
230.00
230
230
एकुण
390.00
390.00
390.00
3

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम

2010-11
10.00
10.00
10.00
2014-15
3.73
3.73
3.73
एकुण
13.73
13.73
13.73
4

खासदार स्थानिक विकास कार्यक्रम

2013-14
10.00
10.00
10.00
एकुण
10.00
10.00
10.00
एकुण (1+2+3+4)
867.04
730.87
715.87

            जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सिंहस्थ पर्वणी ध्वजारोहण सोहळा स्थायी समितीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी प्रकाशा सिंहस्थ पर्वणी सोहळ्याचे स्वरुप विषद करतांना 10 जुलै ते 14 जुलै, 2015 या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली, ती अशी…

दिनांक 10 जुलै, 2015 महाप्रसाद
Ø  मानकरी श्री. बन्सीलाल जाधव पाटील यांच्या गढीवरील निवासस्थासमोरील प्रांगणात
Ø  महाभोजनाचा कार्यक्रम सकाळी 10.00 वाजेपासून सुरु होईल.
Ø  महाभोजनासाठी सुमारे  25 हजार भाविक उपस्थित राहतील असा अंदाज.
दिनांक 13 जुलै, 2015 पेहरामणी मिरवणूक
Ø  सकाळी 9.00 ते 11.00 वाजता पेहरामणी मिरवणूक. (मानकरी यांची गढी ते गौतमेश्वर मंदीर पर्यंत)
Ø  सकाळी 11.00 वाजता पेहरामणी विधी संपन्न होईल.
Ø  सकाळी 11.00 ते 12.30 वाजता पेहरामणी मिरवणूक (गौतमेश्वर मंदीर ते मानकरी यांचे गढीपर्यंत त्याच मार्गाने परत येईल)
Ø  सकाळी 12.30 ते दुपारी 1.00 वाजता गढी येथे ध्वजस्थापना होईल.
Ø  दुपारी 1.00 ते रात्री 8.00 वाजता मानकरी दर्शन व ध्वजदर्शनासाठी रांगा लागतील. (गढीच्या दरवाज्यापासून खाली)
Ø  रात्री 8.00 वाजता मुख्य ध्वज मिरवणूकीस सुरुवात (मानकरी यांची गढी ते गौतमेश्वर मंदीर)
Ø  मुख्य ध्वज मिरवणूक रात्रभर चालेल. (अंदाजे 50,000) भाविक मिरवणूकीत असतील)
दिनांक 14 जुलै, 2015 सिंहस्थ पर्वणी ध्वजस्थान
Ø  सकाळी 6.26 वाजता मिरवणूक गौतमेश्वर येथे पोहचणार
Ø  सकाळी 6.26 ते 10.15 वाजता पूजा विधी
Ø  सकाळी 10.15 वाजता ध्वज नदीत बुडविणार त्याचवेळी भाविक स्नान करणार (यावेळी स्नानासाठी सुमारे 2 लाख भाविक उपस्थित राहतील)
Ø  स्नानाचे ठिकाण-गौतमेश्वर मंदीर, केदारेश्वर मंदीर व संगमेश्वर मंदीर.
Ø  सकाळी 11.00 ते रात्री 11.00 वाजता गौतमेश्वर मंदीर दर्शन.

बोधचिन्हाची संकल्पना
      प्रकाशा सिंहस्थ पर्वणीचे बोधचिन्ह जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या मार्गदरशनाखाली व जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह साकारणारे निर्मिती ग्राफिक्स मुंबईचे अनंत खासबारदार व शिरीष खांडेकर यांनी साकारले असून या बोधचिन्हात प्रामुख्याने गौतमेश्वर मंदीर, ध्वजपरिक्रमेचा ध्वज, केदारश्वर मंदीराजवळील भव्य दिव्य दिपमाळ व संस्कृतीचे प्रतीक म्हणून शंख व उगवता सुर्य दाखविण्यात आला आहे.

आभार प्रदर्शन सिंहस्थ पर्वणी ध्वजारोहन सोहळा स्थायी समितीचे कार्याध्यक्ष हरी पाटील यांनी मानले.

0 0 0 0 0 0 0 0

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

मुंबईदि.6: राज्यातील वनेत्तर क्षेत्रामध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी वन विभागाच्यावतीने सन 2013 साठीचे ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.
महसूल विभाग (वृत्तस्तर) संवर्गनिहाय पुरस्कार व्यक्तीग्रामपंचायतशैक्षणिक संस्था,सेवाभावी संस्था व ग्राम /विभाग/जिल्हा या सर्व  संवर्गासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांचा  प्रथम पुरस्कार  व 30 हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार देण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय संवर्गनिहाय पुरस्कार व्यक्तीग्रामपंचायतशैक्षणिक संस्थासेवाभावी संस्था व ग्राम /विभाग/जिल्हा या सर्व  संवर्गासाठी प्रथम पुरस्कारासाठी  प्रत्येकी एक लाख रुपये; द्वितीय पुरस्कारासाठी 75 हजार रुपये तर 50 हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे.
वृत्तस्तरीय विजेते
 पुणे वृत्तातील प्रथम पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मोहरे येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ यांना जाहीर झाला आहे.
ठाणे वृत्तातील प्रथम पुरस्कार पालघर तालुक्यातील एडवन येथील आदर्श शिक्षण संस्थेचे विद्याभवन तर द्वितीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथील माध्यमिक विद्यालय यांना जाहीर झाला आहे.
नाशिक वृत्तातील व्यक्ती संवर्गातून नंदुरबार येथील अनिल अमृत पाटील यांना प्रथम पुरस्कार तर अहमदनगर येथील सुरेश सोपानराव खामकर यांना द्वितीय पुरस्कार ; ग्रामपंचायतसंवर्गासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंप्री सय्यद ला प्रथम पुरस्कार आणि शैक्षणिक संस्थासंवर्गातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील भुईकोट किल्ला येथील मालेगाव एज्युकेशन सोसायटीला प्रथम पुरस्कार तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूलला द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 
औरंगाबाद वृत्तातील व्यक्ती संवर्गासाठी नांदेड जिल्ह्यातील विनोद अच्युतराव कुटे पाटील यांना प्रथम पुरस्कार तर शैक्षणिक संस्था संवर्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील अमन विश्व हायस्कूलधरतीधन सोसायटी यांना प्रथम पुरस्कार व लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेला द्वितीय पुरस्कार जाहीर झालेला आहे..
अमरावती वृत्तातील व्यक्ती संवर्गातील यवतमाळ जिल्ह्यातीलबोथबोडन येथील अमर कैजिनाथ दिनकर यांना  प्रथम पुरस्कार तर शैक्षणिक संस्था संवर्गातील बुलडाणा जिल्ह्यातील एडेड हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय चिखल रोड यांना प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
नागपूर वृत्तातील व्यक्ती संवर्गातील भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील रामधन नकटू धकाते यांना प्रथम पुरस्कार ; ग्रामपंचायत संवर्गातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील ग्रामपंचायत सिरुड यांना प्रथम पुरस्कार ; शैक्षणिक संस्था संवर्गातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील नीळकंठ मुरार घटवाई विद्यालय व विज्ञान / कला कनिष्ठ महाविद्यालयवडनेर यांना प्रथम पुरस्कार तर भंडारा जिल्ह्यातील विनोद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली यांना द्वितीय पुरस्कार. सेवाभावी संस्था संवर्गातील भंडारा जिल्ह्यातील प्रगती मागासवर्गीय महिला सेवाभावी संस्था यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
राज्यस्तरीय विजेते
राज्यस्तरीय विजेते व्यक्ती संवर्गातील नंदुरबार जिल्ह्यातील अनिल अमृत पाटील यांना प्रथम पुरस्कारयवतमाळ जिल्ह्यातील अमर कैजिनाथ दिनकर यांना द्वितीय पुरस्कारभंडार जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील रामधन नकटू धकाते यांना तृत्तीय पुरस्कार,ग्रामपंचायत संवर्गातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सिरुड ग्रामपंचायतीस प्रथम पुरस्कार तर नशिक तालुक्यातील पिंप्री सैय्यद या ग्रामपंचायतीस द्वितीय पुरस्कार,शैक्षणिक संस्था संवर्गातील एडेड हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयचिखली रोडबुलडाणा यांना प्रथम पुरस्कार,सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळमौजे मोहरेता. पन्हाळा
जि. कोल्हापूर यांना द्वितीय पुरस्कार तर नीळकंठ मुरार घटवाई विद्यालय व विज्ञान / कला कनिष्ठ महाविद्यालय
वडनेरता. हिंगणघाटजि. वर्धा यांना तृतीय पुरस्कार,सेवाभावी संस्था संवर्गातील प्रगती मागासवर्गीय महिला सेवाभावी संस्थाभंडारा विदर्भ हाऊसिंग कॉलनीजि. भंडारा यांना प्रथम पुरस्कार
 मिळाला आहे.
            वृक्ष लागवडीच्या कामात खासगी संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराच्या धर्तीवर वृक्षमित्र पुरस्काराचे प्रतीक म्हणून मानचिन्ह व 25 हजार रुपये रकमेचा पुरस्कार देण्यात येणार आहेत.
सन 2013 साठी वृक्षमित्र पुरस्कारांकरिता राज्यस्तरीय मूल्यमापन समितीच्या मान्यतेनुसार कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टसपकाळ नॉलेज हबनाशिक आणि सरस्वती विद्यालय,शेगाव (कुंड)            ता. हिंगणघाटजिल्हा वर्धा या दोन संस्थांची निवड करण्यात आली आहे.
हा निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201506251854069819 असा आहे.
०००००

सर्व विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रकाचे सुयोग्य नियोजन करावे - विनोद तावडे

मुंबई, दि. 6 : वार्षिक शैक्षणिक नियोजनाच्या दृष्टीने सर्व विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया, पात्रता प्रक्रिया व परीक्षा एकाच वेळी सुरु झाल्यास महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन अधिक चांगले होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्व विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रकाचे सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिल्या.
श्री. तावडे म्हणाले की, शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार व कधी संपणार या तारखा विद्यापीठ स्तरांवर ठरविणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया व परीक्षा पध्दतीत सुसूत्रता येईल.यासाठी 3 ते 4 जणांची देखरेख समिती स्थापन करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची राज्याच्या उच्च शिक्षणाबाबत भविष्यकालीन धोरणे, योजना, प्रशासन व अंमलबजावणी याबाबतची बैठक श्री. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरु व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2014, विद्यापीठ स्तरावरील विविध समस्या, सेवार्थ प्रणाली विद्यापीठांमध्ये लागू करण्याबाबत अहवाल तयार करणे, सेवा हमी कायदा लागू करणे, ॲकॅडमी ऑडिट, रुसा, विद्यापीठीय प्राधिकरणे व विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका, परदेशातील विद्यापीठे, महाविद्यालये व संस्था, उद्योग यांच्याशी विद्यापीठांनी केलेले करार आदी विविध विषयांबाबत यावेळी श्री. तावडे यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंशी सविस्तर चर्चा  करुन आवश्यक कार्यवाहीबाबत सूचना केल्या.
००००

उत्सवासाठी वर्गणी गोळा करतांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी आवश्यक

मुंबईदि. 7 :  नैसर्गिक  आपत्ती   तसेच  विविध सण-उत्सव इत्यादीसाठी वर्गणी  गोळा करण्यासाठी  खासगी  संस्था, व्यक्ती, अशासकीय संस्था (एनजीओ)  (सार्वजनिक विश्वस्त व्यवस्‍थेव्यतिरिक्त इतर ) यांच्यामार्फत  वर्गणी  गोळा करणे तसेच त्याचा वापर करण्यासंदर्भात विधि व न्याय विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
          वर्गणी, देणगी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयाची लेखी परवानगी आवश्यक आहे; वर्गणी, देणग्या गोळा करतांना अनुक्रम असलेल्या छापील पावत्या देणे आवश्यक आहे, अशा खर्चाचे व्हाऊचर्स ठेवणे व गोळा करण्यात आलेली वर्गणी, देणगी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याचे सनदी लेखापालाकडून लेखा परीक्षण होणे आवश्यक आहे, अशा खर्चाची हिशोब पत्रके त्या त्या व्यक्ती, संस्थांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात जमा करणे असून गोळा करण्यात येणारी वर्गणी, देणगी रक्‍कम प्रथमत: ज्या हेतूसाठी गोळा करण्यात आलेली आहे त्याच हेतूसाठी वापरण्यात आली पाहिजे व त्यानंतर वर्गणी, देणगी शिल्लक राहत असेल तर धर्मादाय आयुक्त यांच्या परवानगीनेच इतर हेतूसाठी ती खर्च करता येईल;
          या तरतुदीचे पालन करणे बंधनकारक असून पालन न करणरऱ्या व्यक्तीस सार्वजनिक विश्वस्त अधिनियम , 1950 मधील कलम 67 नुसार दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ  शकतो.
०००००००