शुक्रवार, १० जुलै, २०१५

अनुसूचित जातीच्या कारागिरांनी विशेष घटक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

        धुळे, दि. 10 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जातीच्या कारागिरांसाठी केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत विशेष घटक योजना राबविण्यात येत असून यात लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी 51,500 रूपये आणि ग्रामीण भागासाठी  40, 500 रूपये आहे.  तरी जास्तीत जास्त कारागिरांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  एस. डी. दळवी  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
           या योजनेत कारागिरांना बँकेमार्फत 100 टक्के मंजूर कर्जाचे वाटप केल्यानंतर कर्ज रक्कमेतून युनिट उभारणीनंतर 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रूपये अनुदान दिले जाते.  या योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, धुळे दूरध्वनी क्रमांक  02562-246292 वर संपर्क साधून प्रत्यक्ष माहिती घ्यावी.

000000

बागाईतदार शेतक-यांनी पाणी अर्ज 31 ऑगस्ट पूर्वी सादर करावेत

       धुळे, दि. 10 :- धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी, नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांचा पाण्याचा फायदा घेणा-या तमाम बागाईतदारांनी दि. 1 जुलै, 2015 ते 14 ऑक्टोबर, 2015 या कालावधीसाठी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दि. 31 ऑगस्ट, 2015 पर्यंत सायंकाळी 5-45 वाजेपर्यंत सादर करावे, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
         दि. 1 जुलै, 2015 पासून सुरु झालेला खरीप हंगाम 2015-16 मध्ये भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पीके आदी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे.  पाणी अर्ज स्वीकारण्याच्या अटी व शर्ती नियमानुसार राहतील, असेही पत्रकात नमूद केले आहे.

00000

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन

धुळे, दि. 10 :-11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून राज्य व जिल्हास्तरावर साजरा करण्यात येतो. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
            यावर्षी जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमाचे घोषवाक्य मंत्र सुखी संसाराचा दोन मुलांमध्ये तीन वर्ष अंतराचाअसे  आहे.  दि. 11 जुलै ते 24 जुलै, 2015 लोकसंख्या स्थिरता पंधरवाडयात कुटुंब आरोग्य मेळावा पंधरवाडा साजरा करण्यात येणार  आहे.
           लोकसंख्या स्थिरता पंधरवाडयातील उपक्रम  
       विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत तपासणी व सुविधा राबविणे आणि तांबी बसविणे, स्त्री व पुरूष नसबंदी करणे यासारख्या कुटुंब नियोजनाच्या सुविधा पुरविणे, उपलब्ध कुटुंब नियोजन पध्दतीचे प्रदर्शन आयोजित करणे, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम तसेच एच.आय.व्ही. एडस या कार्यक्रमातील महत्वाच्या बाबींचा या कार्यक्रमात समावेश करणे, लाभार्थ्यांना योग्य पर्याय निवडण्याबद्दल समुपदेशन करणे, सर्व आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधांचे फलक भिंतीपत्रके ठळकपणे दिसून येतील अशा ठिकाणी प्रदर्शित करणे, सर्व गावांमध्ये माहिती पत्रके वाटप करण्यात येईल.
 लोकसंख्या स्थिरता पंधरवाडयामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात तसेच तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी देखील कुटुंब आरोग्य मेळाव्याचे आयोजन करून मेळाव्यात आरोग्य सेवा संबंधित चित्रफिती दाखविणे लोकसंख्या स्थिरीकरण्याच्या संबंधातील पोस्टर्स लावणे, कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर करणे व पाळणा लांबविण्याच्या पध्दती तसेच माता बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उशिरा वयात विवाह व पहिले अपत्य याची गरज याकरिता लोकांच्या समुपदेशनासाठी स्टॉल्स उभारणे, लोकसंख्या स्थिरता पंधरवाडयामध्ये स्थानिक खासदार, आमदार व पंचायत समिती सदस्या यांना उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात येईल.
            दि. 27 जून ते 10 जुलै, 2015 पर्यंत दांपत्य संपर्क पंधरवाडा उपक्रमांतर्गत आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती मार्फत पाहणी सर्व्हेक्षण यादी अद्ययावत करून योग्य जोडप्याची निवड करून कुटुंब नियोजन पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रवृत्त करणे सुकर झाले.  या कार्यक्रमाची जनजागृती, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध पध्दती व सेवा याबाबत माहितीचा प्रचार करण्यात आला.

0000

वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण




 मुंबईदि. 10 : वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे आज वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
          वसंतराव  नाईक कृषी पुरस्कार 2015 चे मानकरी :
          ग्रामविकास समिती अध्यक्ष चैत्राम पवार  यांना वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार देण्यात आला. 51 हजार रूपयेशालश्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कुलगुरू डॉ.बी.वेंकटेश्वरलू यांना कृषी पुरस्कार,तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांना फलोत्पादन पुरस्कारसोमनाथ आंबेकर यांना भाजीपाला उत्पादन पुरस्कारदामोदर माळी यांना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुरस्काररघुनाथ पाडवी यांना कृषी प्रक्रिया उद्योग पुरस्कारप्रकाश शहा यांना वनशेती पुरस्कारमाधव गो.कोटस्थाने यांना जलसंधारण पुरस्कारडॉ. टी. एस. मोटे यांना कृषी साहित्य पुरस्कारडॉ. नागेश शंकरराव टेकाळे यांना कृषी पत्रकारिता पुरस्कारराजेंद्र दत्तात्रेय बोरस्ते यांना कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार आणि सुभाष भट्टे यांना फुलशेती उत्पादन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 हजार रूपयेशालश्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
          यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीकै. वसंतराव नाईक यांनी आपल्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत केलेली कामगिरी ऐतिहासिक व पथदर्शी आहे. जोपर्यंत शेतकरीसामान्य माणूस विकासाच्या धारेत येत नाहीतोपर्यंत विकास होणे शक्य नाही. हे ओळखून कै.वसंतराव नाईक यांनी 1972 च्या दुष्काळात मूलभूत कामे केली होती. त्यांनी हरितक्रांती आणून ती सामान्य शेतकऱ्यांच्या शेतीत पोहचविली. त्याचबरोबर जलसंधारणमृदसंधारण या मूलभूत प्रश्नांवरही त्यांनी काम केले आहेअसे ते यावेळी म्हणाले.
          आपण जोपर्यंत गावे स्वयंपूर्ण करणार नाही तोपर्यंत शाश्वत शेती करणे शक्य होणार नाही. त्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याच्या विकेंद्रीत साठ्याचे काम करणे आवश्यक आहे. यासाठी राज्याने जलशिवार योजनांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

          विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले कीसन 1963-64 पूर्वी राज्य अन्नधान्याने स्वयंपूर्ण नव्हते. यावेळी कै.वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्य अन्नधान्याने स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केला. सन 1972 च्या दुष्काळात कै.वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजना सुरू करून लोकांना काम देण्याचे काम केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावाला जोडणारे रस्ते निर्माण झाले असल्याचेही ते म्हणाले.
          सध्या शेतकऱ्यांच्या विहीरी कोरड्या पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पडलेले पावसाचे पाणी गोळा करून ते विहिरीत किंवा खड्डा करून साठवणे आवश्यक आहे. यामुळे 100 टक्के शेती करता येणे शक्य होईल. शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाद्वारे शेती करण्याची आवश्यकता असल्याचेही श्री.बागडे यांनी सांगितले.
          यावेळी श्री. बागडे यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी पुरस्कार स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
          या वितरण पुरस्कारास वसंतराव नाईक संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.बी.आर.बारवालेकार्याध्यक्ष अविनाश नाईकसचिव ॲड.  विनयकुमार पटवर्धनमाजी मंत्री व सदस्य मनोहर नाईकपुरस्कारार्थी आणि त्यांचे कुटुंबियउपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बी.आर.बारवाले यांनी केले तर विश्वस्त दिपक पाटील यांनी आभार मानले.
000000

‘संघर्षाला हवी साथ’ उपक्रमातील गुणवंतांचा विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार

मुंबई, दि. 10 : झी 24 तास वृत्त वाहिनीच्या वतीने आयोजित संघर्षाला हवी साथ या उपक्रमांतर्गत आर्थिक   परिस्थितीवर मात करुन दहावीच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा सत्कार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह येथे करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आमदार हर्षवर्धन पाटील, चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, मनोज जोशी, झी 24 तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, आर्थिक परिस्थितीला दोष न देता परिस्थितीशी संघर्ष करुन या गुणवंत विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.  झी 24 तासच्या वतीने हाती घेतलेला हा उपक्रम हा समाजासाठी पथदर्शी आहे. या वृत्तवाहिनीने केलेले सामान्यातलं असामान्य कर्तृत्व ओळखण्याचे केलेले कार्य आपण सर्वांनी समाजाचा घटक म्हणून करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन झी 24 तास वृत्तवाहिनीच्या वतीने जमा केलेल्या धनादेशाचे वाटप केले.
००००००००

विभागीय लोकशाही दिन 13 जुलै रोजी निवेदन दाखल करण्याबाबत जनतेस जाहिर आवाहन

नाशिकरोड दि. 10 : प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दिनांक 13 जुलै, 2015 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड, नाशिक येथे सकाळी 11.00 वाजता करण्यात आले आहे. या लोकशाही दिनाचे अर्ज नोंदणी करणे व त्यानुसार टोकन देणे बाबतचे कामकाज सकाळी  10.00 वाजता सुरू होईल.
          विभागीय लोकशाही दिनात तक्रारी/निवेदन स्विकारण्यासाठी संबंधीत तक्रारीवर जिल्हास्तरीय लोकशाही दिनात करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदार समाधानी नाही याबाबतची कारणे अर्जात नमुद करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा स्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची, टोकनाची व लोकशाही दिनाच्या उत्तराची प्रत सोबत जोडावी लागेल. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनातील अर्जाचे अनुषंगाने दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यास किंवा दोन महिन्यात उत्तर प्राप्त न झाल्यास विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार करता येईल. तथापि, आस्थापना विषयक बाबीसंबधीच्या न्यायीक बाबींवरील तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी  विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड येथे संपर्क साधावा असे  विभागीय आयुक्त,  नाशिक विभाग, नाशिक यांनी कळविले आहे

---000---

विभागीय महिला लोकशाही दिन 13 जुलै 2015 रोजी

नाशिक दि. 10 : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक‍ करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीय स्तरावर व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिन  आयोजित करण्यांत येतो.
          नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दिनांक 13 जुलै, 2015 रोजी सकाळी  11 वाजता महिला लोकशाही दिन  राबविण्यांत येणार आहे.  यादृष्टीने पीडित महिलांनी त्यांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी व सुलभ मार्गदर्शनासाठी उपरोक्त दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा असे विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास विभाग, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0 0 0

86 व्या लेखालिपीक प्रशिक्षण सत्राचे आयोजन

 दि. 10 – महाराष्ट्र शासनाच्या लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना दैनंदिन शासकीय कामकाज, प्रशासकीय व लेखा विषयक कामे, शासकीय नियम, अधिनियम व पध्दतींची सविस्तर माहिती  होण्यासाठी तसेच कामाचा जलद निपटारा, निर्णय सुलभता, कार्यक्षमता वाढ, वित्त व सेवा नियमासंबंधीचे  86 वे प्रशिक्षण सत्र  दिनांक 20 जुलै ते 24 सप्टेंबर, 2015 या 50 कामाच्या  दिवसांच्या कालावधीत घेण्यांत येणार आहे.  या प्रशिक्षणासाठी 15 मोड्युल्सप्रमाणे निश्चित केलेला तपशीलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर आणि नंदूरबार यांच्या कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे.
                   या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छुक कर्मचाऱ्यास प्रवेश देण्यात येईल. प्रशिक्षणासाठी 50 दिवसांच्या अभ्यासक्रमतासाठी प्रवेश घेणे बंधनकारक नसून इच्छेनुसार विशिष्ट मोड्युल्सना प्रवेश घेण्याची मुभा कर्मचारी यांना असेल त्यानुसार नाशिक विभागातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्याकडील लिपीकवर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आवाहन  बाळासाहेब घोरपडे, सहसंचालक लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी  केले आहे.

0 0 0

प्रकाशा येथील रोहित्राचे लोकार्पण

नंदुरबार दि. 10 : प्रकाशा सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभुमीवर विविध विकास कामे करण्यात येत असून झालेल्या कामांमध्ये प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रोहित्र उभारणीच्या कामाचे लोकार्पण आज अपर जिल्हाधिकारी टी.एम. बागुल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
          यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सिंहस्थ पर्वणी ध्वजारोहण सोहळा स्थायी समितीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे, तहसिलदार नितीन गवळी, पोलीस निरिक्षक, संजय महाजन विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
          प्रकाशा सिंहस्थ पर्वणीला लाखो भाविक हजेरी लावतात त्यांच्या सोयीसाठी शासन स्तरावरुन विविध विकास कामे करण्यात येत असून कामे अंतिम स्वरुपात आहेत.   ही कामे जिल्हा परिषद, यात्रास्थळ विकास कार्यक्रम, पर्यटन विकास, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, ग्रामपंचायत प्रशासन आदिच्या माध्यमातून प्राप्त निधीतून करण्यात येत असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे.
चार दिवसांवर पर्वणी सोहळा आला असून अंमलबजावणी यंत्रणेकडून कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून यामध्ये गौतेमेश्वर, संगमेश्वर, केदारेश्वर मंदीर परिसरातील व अन्य भागात झालेली विकास कामे, मनोरे, बॅरेकेटींग्स, पथदिवे, आदि कामांची पाहणी करण्यात आली.  यात यावेळी उपूर्ण तसेच उणीवा असलेल्या कामांसदर्भात मागदर्शक सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. बागुल यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
0 0 0 0 0 0 0



सिंहस्थ पर्वणीनिमित्त महाप्रसाद वाटप

नंदुरबार दि. 10 : प्रकाशा येथील सिंहस्थ पर्वणी सोहळा निमित्त मानकरी बन्सीलाल जाधव पाटील यांच्या कुटूंबामार्फत ब्राम्हणभोजन तसेच प्रकाशा येथील ग्रामस्थ व भाविकांना महाप्रसाद वाटप आज करण्यात आले.
            प्रकाशा येथील सिंहस्थ पर्वणी 14 जुलै रोजी संपन्न होत आहे.  त्या निमित्ताने आजपासून धार्मिक विधींना सुरुवात झाली. 8 जुलै रोजी मानकरी यांच्यामार्फत त्यांच्या घरी ब्राम्हण भोजन तसेच आज प्रकाशा ग्रामस्थांसह परिसरातील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.  सर्वप्रथम मानकरी बन्सीलाल जाधव पाटील व सुमनबेन बन्सीलाल पाटील यांच्या घरुन त्यांच्यासह हजारो भाविकांनी वाजत-गाजत, भजन किर्तनासह महाप्रसादाचा नैवद्य घेवून गौतमेश्वर महादेव मंदीरात पुजा-आरती करुन नैवद्य दाखविला.  यानंतर आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले.  तसेच भजन-किर्तन करत परिसरातील गोमती नदी, मरीमाता, दुधेश्वर आदि मंदिरात नैवद्य दाखवून भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
            परंपरेनुसार मानकरी यांच्या प्रांगणात प्रकाशा ग्रामस्थांसाठी तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.  सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत गावातील ग्रामस्थ व परिसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

0 0 0 0 0 0 0 0 0