बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१२

पर्यावरण विकास रत्न पुरस्कार प्राप्त गावांच्या यशोगाथा 'विकासरत्न' नसडगाव


विकासात्मक ध्यास आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर सामुहिक प्रयत्नातून गावाचा विकास कसा करता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यातील नसडगाव ! जालना शहरापासून 35 कि.मी अंतरावर वसलेल्या नसडगावने  आतापर्यंत ग्रामविकासात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळवले आहेत. गावाने एकीच्या बळातून गावाचं केवळ रूप बदललं नाही तर स्वच्छ आणि स्वावलंबी गाव होण्याचा नावलौकीकही मिळवला आहे.
            ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या नसडगावला सन 2005-06 मध्ये 2 लाख रुपयांचा निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर गावाने मागे वळून पाहिलेच नाही. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत 23 लाख रुपयांचे काम हाती घेऊन 100 टक्के नळ योजना आणि नळ जोडणी  करून गाव थांबले नाही तर प्रत्येक घराला पाणी वितरण मीटर बसवून गावाने पाणी वापरावर नियंत्रण ठेवले आहे. 'पाण्याचे ऑडिट' ही संकल्पना भल्या भल्यांना रुचत नसताना गावाने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन ही कल्पना प्रत्यक्षात आणली.           
            गावाला 'जीवन' देणाऱ्या 'कल्याणी' नदीवर भूमीगत बंधारा घेतल्याने सार्वजनिक विहिरीला चांगले पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे गावाचा बारमाही पाण्याचा प्रश्न मिटला. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट रस्ता आणि समाज मंदिराचे काम करताना गावातील महिलांनी 'सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजने'  चा आधार घेत स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. योजनेतून गावातील अनेक महिलांनी स्वयंरोजगाराची नवी वाट चोखाळली.  रोजगार हमी योजनेंतर्गत गावात वृक्ष लागवड, शेततळे घेण्यात आले. यावर्षी रोहयो अंतर्गत सिंचन विहिरी आणि पाणंद रस्त्याची कामे हाती घेण्यात येत आहेत.
            गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असून महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, एक गाव एक गणपती सारख्या नाविन्यपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीत गाव आघाडीवर आहे. श्रमदानातून 25 लाख रुपयांचे सामाजिक सभागृहाचे काम प्रगतीपथावर असून श्रमदानातून 4 कि.मी  लांबीच्या जोडरस्त्याचे काम हाती घेण्यात येत आहे.
गावाने  मिळवलेले पुरस्कार
*    निर्मल ग्राम पुरस्कार 2005-06  - पारितोषिक  -  2 लाख रुपये 
*    संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तर पुरस्कार 2005-06 - पारितोषिक    3 लाख रुपये 
*    संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तर पुरस्कार 2007-08 - पारितोषिक  3 लाख रुपये  
*    संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागस्तर पुरस्कार 2007-08 - पारितोषिक    10 लाख रुपये
*    फुले-शाहू-आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती अभियान -जिल्हास्तर- पारितोषिक   5 लाख रुपये
*    यशवंत पंचायतराज अभियान 2007-08 विभागस्तर पुरस्कार - पारितोषिक -   1 लाख रुपये
*    यशवंत पंचायतराज अभियान 2008-09 विभागस्तर पुरस्कार - पारितोषिक -2 लाख रुपये
*    महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान जिल्हास्तरावर विशेष पुरस्कार - पारितोषिक 1.25 लाख रुपये
*    आदर्श आंगणवाडी पुरस्कार जिल्हास्तर  पुरस्कार 2009-10- पारितोषिक 0. 25 लाख रुपये

                                                                                                                                                . . 2/-

(विशेष लेख ) 'विकासरत्ननसडगाव  . . 2/-


            गावात 100 टक्के भूमीगत गटारे असून यातील पाण्यातून परसबागा फूलवण्यात आल्या आहेत. गावात 27 सौर पथदिवे आहेत, दारिद्र्य रेषेखालील 47 कुटुंबांकडे सौर दिवे आहेत. हे काम संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि फुले शाहु आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती अभियानांतर्गत प्राप्त पुरस्कारातून करण्यात आले. यासाठी 7.5 लाख रुपयांचा खर्च आला. गावाने घन कचरा व्यवस्थापन, गांडुळ खत, बायोगॅस, घर तिथे वृक्ष यासारख्या नाविन्यपूर्ण कल्पना गावात राबविल्या आहेत.
            विकासात्मक कामात स्वत:ची आगळी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नसडगावाने विविध क्षेत्रातील नामवंत लोकांना स्वत:कडे आकर्षित केले आहे. श्रीलंका, बांग्लादेश, इंडोनेशिया यासारख्या देशातील पथकांनी या गावास भेटी देऊन गावाच्या विकास कामांची पाहणी केली आहे, गावाच्या सामुहिक कार्याचा अभ्यास केला आहे.
            गावाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत सहभाग तर घेतलाच शिवाय गावात 100 टक्के प्लास्टिक बंदी आणि शौचालय वापर सुरु केला आहे. गावात 1054 वृक्षांची लागवड झाली आहे. मग्रारोहयोअंतर्गत 5 हजार वृक्षांची रोपवाटिका  हाती  घेतांना झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती आणि कुटुंब प्रमुखांनी आपणहून घेतली आहे.  सामुहिक प्रयत्नातून गावाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेणाऱ्या या गावाची दखल जागतिक बँकेने घेतली असून जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डॉ. मार्वन मुशेर यांनी  गावाने केलेल्या विकास कामांची पाहणी केली. यावेळी  त्यांनी संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत गावाने केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. यात प्रामुख्याने वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा वापर, सांडपाणी व्यवस्थापन, 100 टक्के कर वसुली, ग्रामपंचायत क्षेत्रात केलेला अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, श्रमदानातून झालेला गावाचा विकास इ. चा समावेश होता.
            विकासाचा ध्यास घेऊन प्रगतीकडे केलेल्या वाटचालीमुळेच पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत विकासरत्न पुरस्कार देऊन नसड गावाला गौरविण्यात आले आहे.
. . .

विक्रीकर विभागाच्या आर्थिक बुद्धीसंपदा शाखेचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


            मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य विक्रीकराच्या बाबतीत मागे राहू नये म्हणून या विभागाने अनेक आधुनिक सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. अशाच आर्थिक बुद्धीसंपदा शाखेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माझगाव येथील विक्रीकर भवनात झाले. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, विक्रीकर आयुक्त संजय भाटिया, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक प्रमोद नलावडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची श्री.भाटिया यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यामध्ये व्यापाऱ्यांचे 'ई' रजिस्ट्रेशन, 'ई'- रिटन्स, 704 ऑडिट, पेमेंट करण्याच्या सुविधा, व्यापारी सांख्यिकीय माहिती ठेवणाऱ्या सुविधा या विशेष कक्षात असतील विक्रीकर विभागास 'ई' सुविधा लागू केल्यामुळे विक्रीकर वसुलीत सुधारणा होतील. कर चुकवेगिरी, कर चोरी उघडकीस येण्यास यामुळे मदत होईल. लवकरच विक्रीकर विभागाची पुनर्रचना करण्यात येणार असून त्यामुळे विक्रीकर वसुलीत लक्षणीय वाढ होऊन राज्याच्या उत्पन्नात भर पडेल. विक्रीकर भवनात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्यवसाय लेखा परिक्षण मोड्युलचे उद्घाटन झाले. नंतर श्री. भाटिया यांनी या मोड्यूलच्या सादरीकरणाची माहिती दिली.
0 0 0 0 0
रजक/

'' मस्त मेजवानी '' महाराष्ट्र खाद्य महोत्सव-2012 आजपासून रविंद्र नाट्य मंदीर येथे


मुंबई, दि. 21 : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे 22 ते 28 फेब्रुवारी 2012 या कालावधीत अकादमीच्या  कलांगणात '' मस्त मेजवानी '' महाराष्ट्र खाद्य महोत्सव-2012 आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, 22 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 6.00 वाजता रविंद्र नाट्य मंदीर येथे या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
 ग्रामविकास व मुंबईचे पालक मंत्री जयंत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान तसेच खासदार एकनाथ गायकवाड, आमदार नितीन सरदेसाई आणि प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल कामत, नामांकित शेफ संजीव कपूर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या खाद्य महोत्सवात पुणे, नाशिक, कोकण, अमरावती, नागपूर, औरंगाबाद या सहा प्रशासकीय विभागात माहिर असलेल्या गावरान, शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मासवडी, शिंगोळया, वडा कांदा, भाकरी, पांढरा व तांबडा रस्सा, कोकणातील आंबोळ्या, मोदक, कुळथाचे पिठले व भाकरी, विविध प्रकारचे मासे, उत्तर महाराष्ट्रातील हुरड्याचे थालीपीठ, भरली वांगी, वऱ्हाडी पुरणपोळी, मराठवाड्यातील दही धपाटा, वांग्याचे भरीत आदी खाद्यपदार्थांची चव खवय्यांना चाखता येणार आहे.
लिम्का व गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड यांनी गौरविलेल्या पुण्याच्या विलास करंदीकर संग्रहीत भातुकलीच्या संस्कृती प्रदर्शनाचे 23 फेब्रुवारी पासून दररोज सकाळी 10.00 ते रात्री 9.00 यावेळेत आयोजन करण्यात आले आहे. या भातुकली प्रदर्शनात हुबेहुब भांड्यांची प्रतिकृती असलेली तांबे, पितळ, दगड, माती, लाकूड व चांदी या पासून बनविलेली विविध प्रकारची दीडहजार भांडी रसिकांना पाहण्याची संधी मिळणार आहे.तर चिमुकल्यांना विस्मृतीत गेलेले खेळ प्रत्यक्षात खेळावयास मिळणार आहेत.
या खाद्य मेजवानीबरोबरच दररोज सायंकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत पारंपरिक आदिवासी नृत्ये, कोकण विभागातील कोळी नृत्ये, बाल्यानृत्ये, पश्चिम महाराष्ट्र, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या विभागातील  लोकनृत्ये, गाणी इत्यादी विविध लोककलाविष्काराचे दर्शन रसिकांना होणार आहे.
            विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील प्रख्यात पाकशास्त्र निपुणांना दररोज दुपारी 2.00 ते 4.00 या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिध्द खाद्य पदार्थांचे प्रात्यक्षिक सादर करण्याकरिता आमंत्रित करण्यात आले असून प्रत्येक दिवशी दुपारी 4.00 ते रात्री 10.00 पर्यंत खाद्य पदार्थांचे स्वतंत्र स्टॉल्स वाजवी दरात खुले असतील. या महोत्सवाद्वारे महिलांच्या पाककला गुणांना चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील महिला बचत गटांना दिलेले मोफत स्टॉल्स हे या खाद्य महोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे, असे कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका श्रीमती सुप्रभा अगरवाल यांनी कळविले आहे.
0 0 000

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना अंमलबजावणीबाबत आढावा बैठक


मुंबई, दि. 21 : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी आढावा घेतला.
आज मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव जयंतकुमार बाँठीया, सचिव भूषण गगराणी, जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेशन, आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          जीवनदायी योजनेचे प्रकल्प कार्यालय, जिल्हा कार्यालये, आरोग्य मित्रांना देण्यात येणारे ॲप्रन, रुग्णालयातील योजनेच्या मदत केंद्रांची डिझाईन तसेच या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
          या योजनेंतर्गत 26 फेब्रुवारीपासून आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याविषयी तसेच सहभागी रुग्णालयांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्यमंत्री श्री. शेट्टी यांनी आरोग्य कार्ड वाटपाचा आढावाही घेतला.
0 0 0 0 0

दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 15 टक्के जागा सेवांतर्गत दंतशल्यचिकित्सक उमेदवारांना आरक्षित


            मुंबई, दि. 21 : राज्यातील शासकीय दंत महाविद्यालयातील दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 15 टक्के जागा सेवांतर्गत दंतशल्यचिकित्सक उमेदवारांना आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनाने 30 जानेवारी 2012 रोजी घेतला आहे. या सेवांतर्गत दंतशल्यचिकीत्सक उमेदवारांच्या प्रवेशाचे नियम कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे.
नियम व कार्यपद्धती
1.         उमेदवाराने दंत पदवी अभ्यासक्रम (बी.डी.एस.) महाराष्ट्रातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातून उत्तीर्ण होणे तसेच या अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा जास्तीत जास्त तीन प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
2.         सेवांतर्गत दंत पदव्युत्तर प्रवेशाकरिता दंतशल्यचिकित्सक या पदावर राज्य शासनाचे शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये या संस्थांमधील कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तात्पुरत्या सेवेतील कार्यरत दंतशल्य चिकित्सक निवडीकरिता पात्र असणार नाही.
3.         दंत शल्यचिकित्सकाचे सेवांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्ज सादर करतेवेळी वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
4.        सदर सेवांतर्गत कोट्याकरिता राज्य शासनामार्फत घेण्यात येणारी पीजीडी-सीईटी ही सामाईक प्रवेश परीक्षा देणे व पात्र होणे आवश्येक आहे. भविष्यात पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता पीजी-एनईईटी परीक्षा धेण्यात आल्यास सदरची परीक्षा सुद्धा देणे व पात्र होणे आवश्यक आहे.
5.        सेवांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता घेण्यात येणाऱ्या सामाईक पूर्व परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी ही सर्वसामान्य उमेदवारांपेक्षा वेगळी ठरवून ती वेगळी जाहीर करण्यात येईल.
6.         सेवांतर्गत दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कोट्यामध्ये संविधानिक आरक्षण ठेवण्यात येईल व दर पाच वर्षाकरिता त्याचे रोस्टर ठरविण्यात येईल. नियमित दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशांप्रमाणे त्याचे नियम रहातील.
7.        सेवांतर्गत उमेदवाराने पदव्युत्तर पदवी (एम.डी.एस.) अर्हता प्राप्त केल्यानंतर त्या उमेदवाराने त्याचा मोबदला म्हणून 10 वर्षें सेवा देणे बंधनकारक राहील. याबाबतीत उमेदवाराने अटी व शर्ती न पाळल्यास 50 लाख रुपये इतका दंड आकारण्यात येईल.
8.        राज्य शासन, केंद्र शासन, सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता निश्चित करण्यात आलेली कार्यपद्धत अवलंबिण्यात येईल.
-----

अपंग अधिकारी/कर्मचाऱ्यांना सहायक तंत्रज्ञान/उपकरणे सात दिवसात मागणी नोंदवा


मुंबई, दि. 21 : राज्य शासनाच्या आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाचे मुख्यालय, विभागीय  व जिल्हा कार्यालये तसेच औषध नियंत्रण प्रयोगशाळेत कार्यरत असणाऱ्या अंध, क्षीणदृष्टी, मुकबधिर व अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांना सहायक तंत्रज्ञान / उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
          संबंधित अपंग कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी त्यांच्या कार्यालय प्रमुखांमार्फत सात दिवसाच्या आत आयुक्त, अन्न व औषध प्रशासन या कार्यालयाकडे सादर करावी, असे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी कळविले आहे.
0 0 0 0 0 

खासगी विना अनुदानित महाविद्यालयात आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती


मुंबई, दि. 21 : राज्यातील खासगी विनाअनुदानित महाविद्यालयात सन 2011-12 या वर्षी आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षास  (वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार व नर्सिंग) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची अंशत: प्रतिपूर्ती करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने 19 जानेवारी 2012 रोजी घेतला आहे.
          शिक्षण शुल्क समितीने प्रमाणित केलेल्या शैक्षणिक शुल्काच्या 50 टक्के रक्कम प्रतिपूर्तीपोटी देण्यात येईल. पात्र विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख अथवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहेकुटुंबातील दोन अपत्यांसाठीच ही योजना लागू आहेही योजना अभिमत विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू रहाणार नाही
          विनाअनुदानित खासगी महाविद्यालयात एकूण प्रवेश क्षमतेच्या 15 टक्के जागा अनिवासी भारतीयांसाठी राखीव असून या कोटयात प्रवेशित झालेल्या उमेदवारांना या शिष्यवृत्तीचा लाभ अनुज्ञेय असणार नाही.
          एखादा विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या एखाद्या वर्षाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्या वर्षाच्या परीक्षेत उत्तीर्ण होईपर्यंतच्या कालावधीत सदर शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहणार नाही.
          आर्थिक मागास प्रवर्गाचे उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र हे संबंधित तहसिलदार यांचे असणे आवश्यक आहे.
          जे विद्यार्थी महाराष्ट्राचे अधिवासी असतील म्हणजे आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास ज्या सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे त्यांना प्रवेश मिळाला,त्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या दिनांकारोजी ज्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रातील वास्तव्य किमान 15 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचे आहे, असेच विद्यार्थी ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पात्र राहतील.
          हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक 2012011909305605001 असा आहे.
0 0 0 0 0

नागरी सेवा मुलाखत परीक्षेसाठी 10 व 11 मार्च रोजी विनामूल्य प्रशिक्षण


मुंबई, दि. 21 : ऑक्टोबर-नोव्हेंबर-2011 मध्ये झालेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा (आयएएस/आयएफएस/आयपीएस इ.) निकाल मार्च-2012 च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहेया परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण संस्था, हजारीमल सोमाणी मार्ग,छत्रपती शिवाजी टर्मीनस समोर, मुंबई येथे दि. 10 11 मार्च 2012 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत मुलाखत प्रशिक्षण  कार्यक्रम (मॉक इंटरव्ह्यू टेक्नीक प्रोग्रॅम ) आयोजित करण्यात आला आहे.
          ज्या उत्तीर्ण उमेदवारांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी फोटो लावलेला विहित  नमुन्यातील  अर्ज  (6 प्रती) व सोबत नागरी सेवा परीक्षेच्या हॉल तिकीटाची  छायाप्रत  6 मार्च, 2012 पर्यंत (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) कार्यालयास सादर करावा. विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयात व वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. तसेच मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होणार नाही असेही कळविण्यात आले आहे. असे संस्थेचे प्रभारी संचालक डॉ.. बा. भिडे यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेसाठी 31 मार्च पूर्वी अर्ज करावेत


मुंबई, दि. 21 : राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तरांचल) प्रवेश पात्रता परीक्षा दि. 1 2 जून रोजी श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, शिवाजीनगर, पुणे येथे घेण्यात येणार आहेया परीक्षेसाठी 31 मार्च 2012 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.
          ही परीक्षा फक्त मुलांसाठीच असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय 1 जानेवारी 2013 रोजी 11 वर्ष 6 महिने ते 13 वर्ष इतके असणे आवश्यक आहे. म्हणजेच  विद्यार्थ्याची जन्म तारीख 2 जानेवारी 2000 पासून 1 जुलै 2001 दरम्यान असावी. तो कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असावा किंवा 1 जानेवारी 2013 रोजी सातवी पास असावा.
          परीक्षेसाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनची विहित नमुन्यातील आवेदन पत्रे दि. 7 फेब्रुवारी 2012 पासून उपलब्ध झाली आहेत. विद्यार्थ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा 350 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट कमांडंट, आर.आय.एम.सी., डेहराडून, पेएबल ॲट डेहराडून (तेल भवन बँक, कोड नं. 01576) यांच्या नावाने काढून आवेदन पत्र व 5 वर्षाचा प्रश्न पत्रिका संच आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद यांच्या कार्यालयाकडून किंवा राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावेत.  परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17, डॉ.आंबेडकर मार्ग, पुणे 411001 यांच्याकडे 31 मार्च 2012 पर्यंत स्वीकारण्यात येतील.
          आवेदनपत्रासोबत जन्मतारखेच्या व जातीच्या दाखल्याच्या (अनुसूचित जाती/ जमातींसाठी) छायांकित प्रती व शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटच्या दोन प्रती जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत कमांडंट, आर.आय.एम.सी., डेहराडून, यांच्या नावे 50 रुपयांचा स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा डिमांड ड्राफ्ट परीक्षा फी साठी जोडावयाचा आहेअनूसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी 5 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जोडावा. 31 मार्च 2012 नंतर प्राप्त झालेली आवेदन पत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी कळविले आहे.
परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्य ज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतीलपरीक्षार्थींना गणित व सामान्य ज्ञाना या विषयाचा पेपर इंग्रजी किंवा हिंदी भाषेत लिहिता येईल. या विषयांच्या प्रश्नपत्रिकाही इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध होतील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती दि. 5 ऑक्टोबर 2012 रोजी घेण्यात येतील.
0 0 0 0 0

स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सोहळ्याचा 12 मार्चला राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ


            मुंबई, दि. 21 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते 12 मार्च 2012 रोजी मुंबई येथे करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
            स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. 13 मार्च 2012 पासून सुरु होऊन 12 मार्च 2013 रोजी पूर्ण होईल. या जन्मशताब्दी वर्षात राज्य शासनामार्फत विविध योजना, कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर करावयाच्या कार्यक्रमाची निश्चिती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची आज बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. जन्मशताब्दीवर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्याशी संबंधित निवडक पुस्तकांचे संच सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
            यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मदार उल्हास पवार, समितीचे सदस्य गिरीश गांधी, कलप्पा आवाडे, राम प्रधान, मदार शशिकांत शिंदे यांच्यासह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे  आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
            स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा 12 मार्च 2012 रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे करण्याचे प्रस्तावित आहे. सायकाळी 6 ते 9.30 या वेळेत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत या मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या तसेच  वर्षभर आयोजित करावयाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यात  दर महिन्याच्या 12 तारखेला एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल, यामध्ये विविध विभागांचा सहभाग असेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचे विविध पैलू उलगडून दाखविणारे हे कार्यक्रम राज्याच्या सर्व भागात आणि नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येतील. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची रा सांभाळलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रीय स्तरावर परराष्ट्र, गृह आणि सरंक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगला संपर्क होता. त्यांनी सहकार, शिक्षण, साहित्य, ग्रामविकास, कृषी, औद्योगिक विकास यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. नव्या पिढीला त्यांच्या कार्यकतृत्त्वाची माहिती होण्यासाठी तसेच त्यांचे विचार आणि कार्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी हे कार्यक्रम आयजित करण्यात येत असून यामध्ये होणाऱ्या परिसंवाद आणि चर्चासत्रांसाठी विभागांनी विषय आणि संकल्पना सुचवाव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 0 0 0 0
रजक/