सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास अनुमती


मुंबई, दि. 5 : लोकसभा, विधानसभा तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाने व राज्य निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे.
          यासंदर्भात शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, दि. 5 जुन 2010 च्या परिपत्रकानुसार मतदारांना ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. तथापि, ज्या मतदारांकडे ओळख पटविण्यासाठी, शिधापत्रिकेव्यतिरिक्त अन्य विहित केलेले पुरावे उपलब्ध नाहीत, अशा मतदारांना त्यांच्या घटनादत्त अधिकारापासून वंचित रहावे लागू नये म्हणून दि. 5 जुन 2010 च्या परिपत्रकात अंशत: बदल करुन केवळ मतदानाच्या दिवशी मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास अनुमती दिली आहे.  
0 0 0 0




मुख्यमंत्र्यांना निवेदने, पत्रे पाठविण्यासाठी नवीन ईमेल पत्ता वापरण्याचे आवाहन


मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री सचिवालयाचा chiefminister@maharashtra.gov.in हा ईमेल पत्ता बंद करण्यात आला असून त्याऐवजी cm@maharashtra.gov.in आणि cm-mh@nic.in असे दोन नवीन ईमेल पत्ते तयार करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारी, निवेदने, पत्रे पाठविण्यासाठी आता जुन्या पत्त्याऐवजी नवीन पत्त्यांचा वापर करावा, असे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत कळविण्यात येत आहे.
शासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे शासनाचे धोरण असून सर्व कार्यालयांचे संगणकीकरण झालेले आहे व इंटरनेटच्या माध्यमातून सर्व कार्यालये जोडली गेलेली आहेत. ईमेलद्वारा पत्रव्यवहार झाल्यास कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरण संरक्षणासही मदत होणार आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी नव्या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                          0000000