गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

हळदीचे माहेरघर असलेले एक गाव

हळद ही सर्वगुणसंपन्न अशी वनस्पती असून, हळदीचा विविध समारंभासाठी व आपल्या दररोजच्या आहारामध्ये नियमित वापर केला जातो. लग्न असो, हळदीकुंकु कार्यक्रम असो, हळदीचा वापर हा ठरलेला असतो. हे पीक जिल्ह्यात मोजक्याच गावांमध्ये घेतले जाते. विशेषत: वाशिम तालुक्यातील काटा या गावी हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेताना शेतकरी आढळून येतात. यंदा काटा या गावी ५० एकर शेतामध्ये हळदीची लागवड केलेली आहे.

हळदीच्या पिकाची लागवड ही शक्यतो जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करुन घेणे आवश्यक असते. हे पीक लवकर केल्यास झाडांच्या वाढीस जास्त कालावधी मिळतो व त्यामुळे हळदीच्या उत्पादनात बरीचशी वाढ होते. या पिकासाठी जास्त सेंद्रिय पदार्थ असलेली किंवा नरम जमिनीची निवड योग्य ठरत असल्याचे येथील शेतकरी विठ्ठलराव रामराव देशमुख यांचे म्हणणे आहे. हळदीच्या लागवडीसाठी कंदाचा वापर केला जातो. हळद लागवडीसाठी गोल बेण्याचे बियाणे वापरणे कधीही चांगले असते. ही लागवड करताना चार ते सहा इंच एवढे अंतर दोन हळदीच्या कंदांमध्ये ठेवावे लागते. या लागवडीसाठी साधारणपणे प्रतिहेक्टरी २४ ते २५ क्विंटल बियाणे पुरेसे असते.

सदर बियाणे सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. हळदी पिकाच्या अनेक सुधारित जाती लागवडीसाठी वापरल्या जातात. शक्यतो, वाशिम जिल्ह्यामध्ये शेलम जातीच्या हळदीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. ही लागवड यशस्वी करण्यासाठी विविध खतांबरोबरच चांगल्या बियाण्याचा वापरही तितकाच महत्वाचा आहे. हळद पिकासाठी खताच्या मात्रा देताना जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन द्याव्या लागतात. या पिकासाठी पालाशयुक्त खते व सेंद्रिय खते जास्त वापरल्यास उत्पादनही त्याच पटीत मिळू शकते. हळदीची लागवड केल्यानंतर हळद पक्व होण्यास ८ ते १० महिन्यांचा कालावधी लागतो. पक्व होण्याच्या कालावधित पानांचा रंग पिवळ्या रंगाचा दिसून येतो.

या पिकाच्या क्षेत्रामध्ये व पिकामध्ये दिवसेंदिवस वाढच होत असलेली दिसून येते. काटा परिसरामध्ये हळदीचे उत्पादन सरासरी एकरी १० ते २० क्विंटल या प्रमाणात होताना दिसत आहे. हळदीचा बाजारभाव सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे मिळतो. परिणामी, शेतकऱ्यांना एकरी एक ते दीड लाख रुपयाचे उत्पन्न मिळत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यामध्ये दरवर्षी जास्तीत जास्त शेतकरी सोयाबीनच्याच पिकाला महत्व देतात. मात्र, दरवर्षी तेच ते पीक शेतामध्ये घेत असल्यामुळे अळ्यांचा प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी एक वर्ष हळद व दुसऱ्या वर्षी सोयाबीन पीक घेतल्यास त्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडू शकते.

गावच्या मातीची झेप दक्षिण आफ्रिकेकडे

गावाकडच्या मातीतील मुलं मुळातच कष्टाळू, धडपडी असतात अन् याचं एक उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर पांडुरंग काळगुडे हे आहेत. श्री काळगुडे मूळचे मालेगाव तालुक्यातील झोडग्याचे रहिवासी. लष्करी सेवेत काम करत असताना हा जवान देशाच्या संरक्षण सेवेतील आपल्या विशेष नैपुण्याच्या बळावर शांतिदूत बनला. दक्षिण अफ्रिकेतील सुदान प्रदेशात भारत सरकारच्या वतीने त्याची नियुक्ती होणार आहे.सैन्य दलात मराठा बटालियनमधून भरती झालेला ज्ञानेश्वर सध्या पंजाबमधील पठाणकोट येथे नायक पदावर कार्यरत आहे. गेल्याच महिन्यात परराष्ट्रात शांतिदूत म्हणून नेमणूक करण्यासाठी पठाणकोट येथील मराठा बटालियनमधील तीन सैनिकांची निवड झाली.त्यात ज्ञानेश्वरचा समावेश करण्यात आला.यासाठी ज्ञानेश्वरचे विशेष प्रशिक्षण सुरु आहे.कला.मानवता,अहिंसा ही मूल्ये अंगी बाळगून कल्याणासाठी त्यांचा वापर करणे शक्य असलेल्या सैनिकालाच शांतिदूत म्हणून नेमले जाते. ज्ञानेश्वरने या सर्व कसोटया पार केल्या.ज्ञानेश्वर काळगुडे शांतिदूत म्हणून २६ नोव्हेंबरला २०११ ला दक्षिण अफ्रिकेतील सुदान प्रदेशाकडे सहा महिन्यांसाठी रवाना झाला.

ज्ञानेश्वरला विचारले,शांतीसैनिक कशासाठी? जगभरातून संयुक्त राष्ट्र संघटना ही विशेष मोहीम राबवित असते.भारतातील लोकशाही ही इतर देशातील नागरिकांना आदर्शवत ठरणारी आहे. एकविसाव्या शतकात झेपावणारा मानव गुलामगिरीत राहू नये,त्याने आपले स्वतंत्र जीवन अनुभवावे,त्यासाठी लागणारी मूल्ये त्याला जपता यावी त्यासाठी ही संघटना इतर देशातून शांतीसैनिक पाठवित असते. निवडीची पध्दत कशी असते? ही निवड प्रक्रिया सैन्यदलातील सहा कंपन्यांमधून केली जाते. या प्रक्रियेत चारशे सैनिक भाग घेतात.विविध चाचण्यानंतर १४४ जणांची निवड होते. यांनतर सामान्यज्ञान,लोकशाही,मूल्यांची अवगतता याबाबत परीक्षा होते. त्यातून सहा जणांची निवड होते.या सहा जणांमधून पुन्हा शारीरिक,मानसिक,बौध्दीक कसोटयांवर तिघांची निवड होत असते. असा या पदाचा प्रवास त्यांनी संवाद साधताना सांगितला.

ज्ञानेश्वर यांचे वडील पांडुरंग काळगुडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, देशाची सेवा करताना मुलाने विशेष कौशल्य दाखवित शांतीसैनिक म्हणून मान मिळविला आहे.दक्षिण अफ्रिकेत जावूनही तो यशस्वी होईल.तर आई सुभद्रा काळगुडे म्हणाल्या की,आपला मुलगा एखादया राष्ट्रात शांतीसैनिक म्हणून जात आहे. सातासमुद्रापार मुलगा जाणार असल्याने त्याच्या आठवणीने ऊर भरुन येतो. गावचे सरपंच भैय्यासाहेब देसले म्हणतात की, ज्ञानेश्वर काळगुडेच्या गरुडझेपेने गावाच्या लौकिकात भर टाकली आहे.

ज्ञानेश्वरने गावात राहून माणसाचा विकास होऊ शकत नाही या विचारांना फाटा देत या गावाच्या मातीतूनचं आपलं कर्तुत्व साऱ्या समाजापुढे आदर्शवत ठेवलं आहे.  

दिल्लीतील मराठी पाऊलखुणा


सुमारे १४८३ चौ.कि.मी. वसलेल्या दिल्ली शहराची लोकसंख्या २०११ च्या जणगणनेनुसार १,६७,५३,२३५ इतकी असून हिंदी, पंजाबी, व उर्दू या येथील प्रमुख भाषा आहेत. दिल्लीने आतापर्यंत अनेक वंशांची राज्ये उदयाला आलेली पाहिली तसेच त्यांचा अंतही पाहिला. अनेक राजवटींच्या अनेक खुणा ऐतिहासिक वास्तुच्या स्वरूपात आजही पहावयास मिळताता. असे म्हटले जाते की, महाभारतात ज्या इंद्रप्रस्थ शहराचा उल्लेख आहे ते शहर म्हणजे दिल्लीच, आजच्या आधुनिक, रेखीव दिल्लीची रचना इंग्रजांच्या काळात प्रसिद्ध इंग्रजी वास्तुशास्त्रज्ञ एडविन ल्युटिन याने केली. त्यांनी उभारलेल्या या नव्या दिल्लीने डिसेंबर २०११ मध्ये शंभर वर्ष पूर्ण केले आहे. बाकीच्या भागात वसलेले आहे ते जुने दिल्ली शहर.

दक्षिणेकडून येणाऱ्या गाडीने नवी दिल्ली रेल्वे स्थानकाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा त्यापूर्वी टिळक ब्रिज व शिवाजी ब्रिज ही खास मराठी नावे गाडीतील मराठी माणसाचे स्वागत करतात व दिल्लीबाबत उपरेपणाची भावना प्रवेश केल्यापासून नाहीशी होते. नवी दिल्ली स्थानकातून बाहेर पडताच अजमेरी गेट बाजूला मिंटो ब्रिजनजिकचा छत्रपतीच्या पुतळा व पहाडगंज विभागात असलेला बाळकृष्ण मुंजे यांचा पुतळा पहिल्यानंतर आपण महाराष्ट्रातच तर नाही ना, असे वाटते.

दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधाचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर १७०७ सालापासून १८०३ सालापर्यंतचा सलग कालखंड डोळयासमोर येतो. शहेनशहा औरंगजेबच्या मुत्युनंतर येसूबाई व इतर २०० जण दिल्लीत डेरेदाखल झाले आणि हेच दिल्लीचे पहिले मराठी निवासी होत. १७०८ ते १७६९ या काळातील अंतोजी माणकेश्वर, महादेव हिंगणे, महादजी अशा चतुर, मुत्सद्दी सरदारांनी पेशव्यांच्यावतीने दिल्लीत अंमल केला. मराठी वकिलातीचे हे पहिले पाऊल म्हणावयास हरकत नाही.

पानीपतच्या युध्दानंतरही, १७८२ मध्ये महादजी शिंदे यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली आणि मराठेशाहीचे सुवर्णयुग दिल्लीत अवतरले. दिल्लीपर्यंत येऊन मोगलांशी टक्कर देऊन वर्चस्व प्रस्थापित करण्याची किमया फक्त मराठी माणसांनीच दाखविली. महादजी शिंदे यांच्या बरोबर रघुनाथ कुलकर्णी, त्यांचे बंधु गोपाळराव, कृष्णराव, मल्हारअप्पा खंडेराव, अंबुजी इंगळे, रामजी पाटील, रामजी जाधव, बाळाजी गुळगुळे अशा त्या काळातील अनेक कर्तबगार प्रमुखांची नावे इतिहासात आढळतात. इंग्रजांनी आधुनिक शस्त्रे, नवीन विचारधारा, नवीन युद्धनीती वापरून १८०३ साली मराठयांचा पराभव केला. इंग्रज व मराठी सैन्याची दिल्लीमध्ये ज्या परिसरात लढाई झाली, तो परिसर अजूनही बाडा हिन्दुराव या नावाने ओळखला जातो. चांदणी चौकातील अप्पाजी गंगाधर यांनी बांधलेले शिवालय आजही मराठे शाहीची साक्ष देते, मराठी सैन्याचा तळ पडला होता तो येथील तालकटोरा भाग हा मराठी इतिहासाची साक्ष आहे. कालकाजी मंदिराच्या परिसरात मदनगीर म्हणजेच महादजींची गढी होती. दिल्लीतील आद्य मराठी माणसांच्या या पाउलखुणा होत.

स्वातंत्र्यलढयात दिल्ली येथे मराठी बाणा दिसून येतो. घटनेचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो ते डॉ. बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांनी भारतीय संविधान सभेच्या घटनासमितीचा अध्यक्ष पद सांभाळून भारताला समता, स्वातंत्र्य, न्याय बंधुत्वादी संविधान अर्पण केले. त्यांनी आपल्या लेखणीने दिल्लीतच नव्हेतर जगात किर्ती मिळविले. विविधतेत नटलेल्या भारताला सविंधानअंतर्गत एकरूपी माळेत विणले. महाराष्ट्रातील प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची केंद्रातील कारर्कीद नेहमीच अविस्मरणीय आहे. महाराष्ट्रातून जेव्हा-जेव्हा केंद्राला नेतृत्व देण्याची वेळ आली त्या-त्या वेळी महाराष्ट्राने आपले नेतृत्व केंद्राला अर्थातच दिल्लीला दिले आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापनाही १९६० पासून दिल्लीत झाली. दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींच चित्र राज्यात सकारात्मकरित्या उमटविण्याची जबाबदारी मागील पन्नास वर्षापासून हे कार्यालय पार पाडीत आहे.

लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या थोर महापुरूषांचे पुतळे बघुन सर्वसामान्य मराठी माणसांना अभिमान होईल असेच हे चित्र आहे. आधुनिक महाराष्ट्राची ओळख फुले-शाहु-आंबेडकरांच्या चळवळीमुळे निमार्ण झाली आहे. या चळवळीचे या तीन महापुरुषांच्या प्रतिमा संसदेच्या परिसरात पाहतांना आनंद आणि अभिमान दोन्ही दाटून येतो याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक शिवाजी महाराज यांचा मराठी बाणा असणारा पुतळा ही येथे आहे.

मराठी माणूस दिल्लीमध्ये करोलबाग, पहाडगंज, नया बाजार अशा भागात एकत्रितपणे राहातो त्यांच्यासाठी स्व. काकासाहेब गाडगीळ यांच्यासारख्या अनेक द्रष्टया मराठी नेत्यांच्या पुढाकाराने नूतन मराठी विद्यालय, चौगुले शिशुविहाराच्या इमारती दिल्लीत मोक्याच्या जागी उभ्या राहिल्या, दिल्लीमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलेल्या पहाडगंज भागातील बृहन्ममहाराष्ट्र भवनाची इमारत, त्यासमोरचे महाराष्ट्र रंगायन हे भव्य नाटयगृह रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. जनकपुरी भागातील दत्तमंदिर, रामकृष्ण पुरम भागातील विठ्ठल मंदिर लोधी रोडवरील वनिता समाज ही पण दिल्लीतील मराठी माणसांची एकत्र येण्याची सध्याची ठिकाणं आहेत. सर्वसाधारणपणे दिल्ली व आसपासच्या परिसर मिळून अंदाजे अडीच लाख मराठी माणसं आहेत.

येथील कोपर्निकस मार्गावरील राज्य शासनाचे महाराष्ट्र सदन व नजिकच्याच कस्तुरबा गांधी मार्गावरील बांधले जाणारे नविन महाराष्ट्र सदन आता नव्याने कात टाकत आहे. दिल्लीतील रस्त्‍यांना दिली गेलेली महाराष्ट्राच्या महापुरूषांची नावे तसेच या पुरुषांचे ठिकठिकाणी उभारलेले पुतळेही दिल्लीतील महाराष्ट्राची साक्ष देताना आढळतात.


  • महाराष्ट्र परिचय केंद्र,नवी दिल्ली
  • ई-लोकशाही प्रणाली व नागरी सुविधा केंद्र


    तुम्हाला सातबारा हवा आहे का ?, सेतु सुविधा केंद्रातील कोणताही दाखला हवा असल्यास, रेशन व्यवस्थित मिळत नसल्यास यासह विविध ३९ प्रकारच्या तक्रारी तुम्हाला घरबसल्या करता येणार आहेत. तर आता शासकीय कार्यालयात न जाता ही मागणी करता येणार आहे. आपला मोबाईल उचला ०२२-२७५७५९२० या क्रमांकावरती आपली तक्रार नोंदवा अथवा घरात इंटरनेट असेल तर http://kokandivision.com/ elokshahi या लिंक वर जा आणि तक्रार नोंदवा तुमच्या तक्रारीची दखल घेवून तुमचे काम त्वरीत होणार आहे. यामुळे तुम्हाला शासकीय कार्यालयात जायची गरज पडणार नाही . तसेच तुम्हाला सर्व विभागातील योजनांची माहिती लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच ठिकाणी मिळणार आहे.

    सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत ई- लोकशाही व नागरी सुविधा केंद्राची सुरूवात कोकण विभागात सर्वप्रथम करण्यात आली आहे. ई- लोकशाही दिनाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मालवण येथील रामभाऊ पांगे व दोडामार्ग येथील सुर्यकांत परमेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार सी.श्री.उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त डी.एस.डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आर.एस.बर्गे, उपजिल्हाधिकारी प्रशासन अरविंद वळंजू, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.गणेश मुळे तसेच यावेळी प्रांताधिकारी सर्व तहसिलदार, विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    लोकशाही प्रक्रिया अधिक गतीमान व सुविधाजनक होण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व विभागातील योजनांची एकत्रित माहिती मिळण्यासाठी नागरी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे.नागरी सुविधा केंद्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत सर्व योजनांची एकत्रित माहिती मिळणार आहे.

    ई-लोकशाही अंतर्गत नागरिक आपल्या निवास अथवा कोणत्याही ठिकाणाहून मोबाईल अथवा इंटरनेटवरून आपली तक्रार, निवेदन शासकीय यंत्रणेकडे दाखल करू शकतात. प्रायोगिक तत्वावर मोबाईलव्दारे ०२२-२७५७५९२० या क्रमांकावर तर इंटरनेटवर http://kokandivision.com/ elokshahi या वेबसाईटवरमध्ये तक्रार नोंद‍विता येणार आहे. या योजनेत सध्या काही त्रुटी असू शकतात. या संदर्भातील शंका अथवा त्रुटी जिल्हाधिकारी कार्यालयास लोकांनी कळवाव्यात. त्याची दखल घेतली जाईल असेही जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.

    पुणे येथील न्यू इंडिक्ट्रन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेडचे प्रतिनिधी अतुल लोंढे यांनी ई- लोकशाही प्रणालीविषयक माहिती व प्रशिक्षण उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले. तक्रार निवारण प्रणालीअंतर्गत सध्या १ जानेवारी पर्यंत ०२२-२७५७५९२० या क्रमांकावरती नागरिकांनी आपली तक्रार नोंदवायची आहे. प्रथम भाषा पर्याय येईल. नंतर जिल्हा पर्याय येईल. त्यानंतर विविध विभागांसाठी नंबर पर्याय येतील. या पर्यायानंतर ३ मिनीटांत आपली तक्रार मोबाईलव्दारे सांगावयाची आहे. ती टेप होणार असून तोच आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येईल. आपली तक्रार योग्य आहे का ?, ती जर योग्य असेल तर १ नंबर दाबावा लागेल.तर पुन्हा तक्रारीमध्ये काही बदल असल्यास २ नंबर दाबून नव्याने तक्रार नोंदविता येईल. तक्रार योग्य असल्याची खात्री आहे व आपण १ नंबर दाबल्यास आपल्याला एक टोकन नंबर सांगण्यात येईल.जेणेकरून नागरिक आपल्या तक्रारीचा नंतर आढावा घेवू शकणार आहेत. मोबाईलव्दारे जर आपण तक्रार नोंदविली तर आपल्याला तक्रार नोंद झाल्याचा संदेश येईल.मात्र दूरध्वनी वरून ही प्रक्रिया केल्यास हा संदेश मिळू शकणार नाही.

    अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा तसेच ऑनलाईनसाठी ही याच प्रकारे संबधित तक्रारीचा मेसेज त्या विभागाकडे जाणार आहे.संबधित तक्रारी सात दिवसाच्या आत त्या त्या विभागाकडे जाणार असून त्याचे निराकरण ७ दिवसांच्या आत झाले नाही तर या तक्रारीचा संदेश वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार आहे.व सर्व तक्रारींचे निराकरण तात्काळ करण्यात येणार आहे.

    ग्रंथोत्सव धुळेकरांसाठी ठरली एक पर्वणी !

    गतिमान युगात आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या क्रांतीमुळे जी गती निर्माण झाली आहे.त्यात आपण स्वत: कुठे आहोत याबाबत माणूस स्वत:ला विसरत चालला आहे.अशा परिस्थितीत ग्रंथ हाच गुरु ही चळवळ नव्यानं उभी राहत असून वाचनाची आवड अनेकांना असते, मात्र काय वाचावं, कसं वाचावं, किती वाचावं हे प्रश्न अनेक वाचकांना नेहमीच सतावत असतात आणि त्यातच वाचन संस्कृतीचा वाचक कुठे तरी भरकटतो.

    अशा भरकटलेल्या आणि गोंधळात सापडलेल्यांसाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथोत्सव २०११ हा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालय, धुळे या कार्यालयाने दि. १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर, २०११ या कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात आयोजित केला होता. या ग्रंथोत्सवास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला .

    वाचाल तर वाचाल हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, आजच्या युगात माहिती आणि त्यातून मिळणारा नवा संदेश आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे.याबाबत माणूस वाचन करताना विरंगुळा म्हणून वाचन करतो तो भाग वेगळा आणि स्वत:ला अद्यावत ठेवण्यासाठी आणि आजच्या युगात स्पर्धेत टिकून राहतो तो भाग वेगळा. वाचनातून मिळणारी माहिती, विचार, माणसाला प्रगल्भता देतात हे सांगणे नवं नाही. कारण जी माणसं सर्व अर्थानं मोठी झाली त्यांच्या चरित्रात वाचनातून मिळालेला विचारच त्यांना मोठं करण्यात समर्थपणे कामी आला असं त्यांच्या शब्दात त्यांनी लिहून ठेवलं.

    वाचणारा माणूस अनेक महत्वाचे संदर्भ बोलू शकतो, लिहू शकतो आणि नवा विचार मांडून साहित्यातून समाजाला दिशा देण्याचं काम करू शकतो. साहित्य निर्मिती ही स्‍वत:ची कधीही नसते ती लोकांची होत असते. कोणी काय लिहीलं ती उत्सुकता वाचकांना असते. आणि घरटयात पिलांनी वाट पहावी तशी वाचक मंडळी साहित्यीकानं नवं काय लिहीलं यासाठी आसुसलेली असते. त्यातूनच वाचन संस्कृती निकोप तर होत जाते पुन्हा समृध्द होत जाते.

    व्यक्तीसापेक्ष साहित्यिकांची विचारधारा स्विकारणे, नाकारणे हे वाचकांवर अवलंबून असते. म्हणून साहित्य कोणतेही असो त्याचा वाचक त्या-त्या पातळीवर स्वत:ला जे हवे ते घेवून समृध्द होण्यासाठी झपाटलेला असतो. कोणत्याही देशाची, त्याचप्रमाणे राज्य असेल, शहर असेल किंवा गाव असेल त्या गावाची समृध्दी तिथे असलेली माणसं कोणते ग्रंथ वाचतात, वाचनालय किती समृध्द आहे यावरुन मानली जाते कारण ग्रंथ हे समाजसुधारण्याचे ,समाजाला दिशा देण्याचे काम त्या-त्या विषयातून करत असतात.गावागावात पारायण ही संस्कृती जरी अध्यात्मिक असली तरी सार्वजनिक वाचन ही संकल्पना वाचन संस्कृतीशी जोडलेली आढळते. अशा विविधांगी विषयातून माणसं समृध्द होतात. ती ग्रंथ वाचनातून हे सांगणे न लगे.

    वाचन संस्कृतीची जोपासना, वाचनाची समृध्दी, वाचक घडवण्याची प्रक्रिया, वाचनातून व्यापक जीवनदर्शन निर्माण झालेल्या महान कलाकृती, सर्वंकष वाचन, आत्मशोध, ज्ञानविश्व, संत साहित्य, स्त्री-स्वातंत्र्य, समग्र परिवर्तन, ग्रामीण जीवन, पुराणकथा, बालवाड़मय, कथा, कविता, कादंबरी, नाटक, वेब विश्व, विज्ञान, इतिहास या सार्‍या गोतावळयात ग्रंथ आमच्यासाठी आम्ही ग्रंथासाठी अशी नाती भक्कमपणे निर्माण करण्याची प्रक्रिया समर्थ करण्यासाठी हा ग्रंथ महोत्सव झाला.

    तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, वृध्दांनी, महिलांनी आणि समर्थ वाचन संस्कृतीच्या प्रक्रियेत राहणार्‍यांनी या ग्रंथोत्सवात यशस्वी सहभाग नोंदविला. प्रत्येक गोष्ट माणूस विसरत चालला आहे. तेव्हा मातृदिन, बंधुदिन, प्रेमदिन असे अनेक दिवस साजरे होवू लागले आहेत. ग्रंथ हा शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत निर्माण होत राहणार आणि पुढचा येणारा वाचत रहाणार म्हणून ही संस्कृती कधीही नष्ट होणार नसली तरी नवनवीन आव्हानं समोर असताना घरात एक हक्काचं आपलं कोणीतरी असावं, जे सर्वकाळ साथ देतं आणि जीवनात अनेक वेळा मार्गदर्शक ठरतं ते एकमेव साधन म्हणजे आपला ग्रंथ होयं. या ग्रंथाशी नव्यानं नातं जोडावं. अशी भावना ! माणसाला समृध्द करण्यासाठी ग्रंथांनी जे दिलं त्याचा विसर कोणालाही पडू नये त्यासाठी धुळे येथील ग्रंथमहोत्सव पर्वणी ठरली !

    ग्रंथोत्सवाच्या दि. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या ग्रंथदिंडी, ग्रंथोत्सव कार्यक्रम, शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील आणि मंडळी यांचा रंग शाहिरी कलेचा कार्यक्रम, कवी सम्मेलन तसेच प्रथितयश लेखकाची प्रकट मुलाखतीत प्रा.अनिल सोनार, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद,धुळे जिल्हा यांची श्री. चंद्रशेखर पाटील, संचालक, मी महाराष्ट्र वाहिनी, धुळे यांनी साहित्य क्षेत्रावर आधारित घेतलेली प्रदीर्घ मुलाखत आदि बहारदार कार्यक्रमांचा साहित्य प्रेमी, कवी-कवयित्री, रसिक, नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला.

    धुळे येथील ग्रंथोत्सवात जिल्हयातील साहित्य प्रेमी, रसिकांनी शासकीय ग्रंथालय आणि खाजगी ग्रंथालय धारकांकडून संत, वाड.मय, ललित लेखकांची पुस्तकांची मोठया प्रमाणात खरेदी करुन ग्रंथस्टॉल धारकांना मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला हे विशेष.


  • जगन्नाथ पाटील 
  • लोकराज्यचा विदर्भ विशेष अंक प्रसिद्ध



                       लोकराज्यचे विशेषांक हे आता लोकराज्यचे एक वैशिष्ट्य बनले आहे. याला वाचकांचा प्रचंड प्रतिसादही लाभत आहे. याच परंपरेचा एक भाग म्हणून डिसेंबर महिन्याचा विदर्भ विशेष अंक म्हणून प्रसिद्ध झाला आहे.

    या विशेष अंकात अनेक मान्यवरांनी विविध विषयांवरील लेखाच्या माध्यमातून आपले योगदान दिले आहे. न्या.धर्माधिकारी यांचा सांस्कृतिक संक्रमण, डॉ.द.भि.कुलकर्णी यांचा पूर्व-पश्चिम संवाद, सुरेश द्वादशीवार यांचा वंचना, उपेक्षा आणि अपेक्षा, निशिकान्त मायी यांचा स्वातंत्र्य चळवळीतील योगदार, डॉ.श्रीपाद जोशी यांचा सांस्कृतिक अनुशेषाची संकल्पना, डॉ.अशोक चोपडे यांचा पुरोगामी चळवळीतील आघाडी, डॉ.श्रीकांत तिडके यांचा प्रबोधनाचे दीपस्तंभ, प्रा.भाऊ लोखंडे यांचा दलित नेतृत्वाचा उदय आणि विकास, डॉ.प्रदीप गायकवाड यांचा डॉ.आंबेडकर : एक नवा अन्वयार्थ, नरेश मेश्राम यांचा विश्वशांतीची गंगोत्री, प्राचार्य मदन धनकर यांचा विदर्भातील ज्ञानपीठे या लेखांचा यात समावेश आहे. 

    या व्यतिरिक्त डॉ.रमेश जनबंधु, डॉ.मधुकर वाकोडे, प्रा.विठ्ठल वाघ, डॉ.सुनंदा देशपांडे, राम जाधव, डॉ.हरिश्चंद्र बोरकर, डॉ.प्रमोद मुनघाटे, डॉ.श्रीकृष्ण राऊत, डॉ.सदानंद देशमुख, अनिल महात्मे, वासंती मार्कन्डेयवार, डॉ.रमाकांत पितळे, ॲड.मधुकर किंमतकर, मोहन अटाळकर, मारूती चितमपल्ली, डॉ.विनायक तुमराम, प्रवीण बर्दापूरकर, डॉ.प्रदीप मेश्राम, अनिल ठाकरे, डॉ.सतीश वटे, प्रकाश कुंभारे, डॉ.चंद्रशेखर गुप्त, हेमंत देसाई अशा मान्यवरांच्या लेखांचाही या अंकात समावेश आहे.