बुधवार, १८ जानेवारी, २०१२

मुंबईतील किनारी मार्गाचा प्रकल्प अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर


मुंबई, दि. 17 :  मुंबईतील वाहतुकीमध्ये आमूलाग्र बदल घडविणाऱ्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा अंदाजे 10 हजार कोटी रुपये खर्चाच्या किनारी मार्ग प्रकल्पाबाबतचा अहवाल राज्य सरकारने यासाठी नेमलेल्या संयुक्त तांत्रिक समितीने तयार केला आहे. या समितीचे अध्यक्ष व मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार यांनी आज या प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर करून याबाबतचा अहवाल सादर केला.
            मुंबई बेट शहरामध्ये रस्ते वाहतुकीची समस्या अत्यंत जटील झाली आहे.  वांद्रे-वरळी जोडणाऱ्या राजीव गांधी सागरी सेतुच्या माध्यमातून त्यावर काही प्रमाणात तोडगा काढण्यात आला असला तरी मुंबई, उपनगरे आणि भविष्यात विस्तारणारा मुंबई महानगर प्रदेश यातील वाहतुकीच्या सोयीसाठी किनारी मार्ग (कोस्टल रोड) उभारण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार या मार्गाचा अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्यासाठी श्री.सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली होती.  या समितीचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला.
            शासनाने नेमलेल्या या संयुक्त तांत्रिक समितीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन विभागाच्या सल्लागार डॉ.नलिनी भट, राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेचे संचालक एस.आर.शेट्ये, पवई आयआयटीचे प्रा.डॉ. तरुण कांत, वास्तूरचनाकार चंद्रशेखर प्रभू, जे. जे. स्कूल ऑफ आर्कीटेक्चरचे प्राध्यापक राजीव मिश्रा, वास्तूरचनाकार हाफिज कॉन्ट्रॅक्टर, पी.के.दास, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वाहतूक शाखेचे प्रमुख पी.आर.के.मूर्ती आणि प्राधिकरणाचे मुख्य अभियंता शरद सबनीस यांचा समावेश होता.
            या सादरीकरणाच्यावेळी  मुख्यसचिव रत्नाकर गायकवाड, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव टी.सी.बेंजामिन, मनुकुमार श्रीवास्तव, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव धनंजय धवड, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त एस.श्रीनिवासन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
                                                                                                                                                 ..2/-
मुंबईतील किनारी मार्गाचा..                    : 2 :
           
            मुंबईच्या वाहतूक समस्येवर प्रभावीपणे तोडगा असणारी सुमारे 35 किलो मीटर लांबीची व साधारणत: दहा हजार कोटी रुपयांची महत्वपूर्ण अशी ही किनारी मार्गाची योजना आहे.  नरिमन पॉईट येथील मनोरा आमदार निवास पासून सुरु होणारा हा मार्ग कांदिवली येथील पश्चिम द्रुतगती मार्गास मिळणारा आहे.  या मार्गावर एकूण 18 ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर येण्यासाठी प्रवेश व बाहेर जाण्याचे मार्ग जोडण्यात येणार आहेत. हा प्रस्तावित सागरी मार्ग सागरी पर्यावरण, कांदळवने यांच्या अस्तित्वाला बाधा येणार नाही अशा पध्दतीने आखण्यात आला असल्याचे सुबोधकुमार यांनी सादरीकरणाच्या दरम्यान सांगितले. पाच वर्षाच्या कालावधीत हा मार्ग पूर्ण करण्याची योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली.
            शासनाने नेमलेल्या या समितीच्या आतापर्यंत 10 बैठका झाल्या आणि त्यात या प्रस्तावित मार्गाच्या उभारणीच्या अनुषंगाने सर्वसमावेशक व व्यापक चर्चा करण्यात आली.  सागरी सेतू किंवा स्टिल्टवर रस्त्याची उभारणी करण्यासंदर्भात विविध पर्यायांचा अभ्यास करणे, प्रस्तावित किनारी मार्गाचा तांत्रिक शक्याशक्यता अहवाल तयार करणे, त्याचा पर्यावरणीय आघात अभ्यासणे, पर्यावरणाला कोणतीही बाधा न आणता वाहतुकीची समस्या सोडवित असतानाच खुल्या जागा आणि हरित पट्टयांचा शाश्वत विकास साधण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय सुचविणे, अशी या समितीची कार्यकक्षा होती.  
            समितीने आपल्या अहवालात या प्रस्तावित किनारी मार्गाची लांबी 35.60 कि.मी. असेल.  रस्त्याच्या काही भागात पूल, बोगदा, स्टिल्टवरील बांधकाम, उड्डाण पूल आणि काही ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले रस्ते यांचा समावेश असणार आहे. काही ठिकाणी अतिशय अल्पप्रमाणात भराव टाकून कृत्रिम जमीन तयार करावी लागणार आहे. अशी जमीन तयार केल्यानंतर रस्त्याच्या बांधकामानंतर उरणारी जमीन ही सार्वजनिक उद्याने किंवा हरितपट्टा म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे. या संपूर्ण मार्गाच्या उभारणीचा आराखडा तयार करताना समुद्र किनाऱ्याच्या सौदर्यीकरणाचा आणि सागरी दृष्यात अडथळा येणार नाही याचा काटेकोर विचार करण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वने खात्याची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरु होईल. 
000
                                         

स्वस्त घरबांधणीमधील अडचणी त्वरित सोडवाव्यात हाऊसिंग चेंबरची मुख्यमंत्र्यांना विनंती


मुंबई, दि. 17 : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश येथे स्वस्त व भाडेतत्वावर राबविण्यात येणाऱ्या घरबांधणी योजनेतील अडचणीं सोडविण्याबाबत शासनाने त्वरेने पावले उचलावीत, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पारस गुंदेचा यांनी आज केली.
            श्री. गुंदेचा यांच्या नेतृत्त्वाखालील चेंबरच्या शिष्टमंडळाने आज श्री. चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर स्वस्त घर बांधणीबाबत सादरीकरण केले. शिष्टमंडळात हाऊसिंग इंडस्ट्रीजचे सचिव बोमन इराणी  आदी  सदस्यांचा समावेश होता.
            यावेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चटर्जी, पर्यावरण सचिव श्रीमती वल्सा नायर- सिंग आदी वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ  हाऊसिंगचे सदस्य उपस्थित होते.
            महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजने राज्य शासनाबरोबर पाच वर्षात पाच लाख घरे बांधण्यासाठी सामंजस्य करार केला असून हे काम जलदगतीने पार पाडण्यासाठी या कामात येणारे अडथळे त्वरित दूर करण्यात यावेत तसेच मुंबई  महानगर प्रदेश सर्व दृष्टीने एक आदर्श महानगर व्हावे यासाठी या महानगरातील  सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकास नियंत्रण नियमावली समान असावी, अशी मागणी चेंबरच्या वतीने करण्यात आली.
            तसेच म्हाडाच्या जमिनीवर भाडेतत्त्वावर घरे बांधणे, म्हाडा सार्वजनिक - खासगी यांच्या एकत्रित सहभागाने योजना राबविणे, सध्या रेडी रेकनर मधील दरात 46 टक्क्यापर्यंत वाढ होत असल्यामुळे घरांच्या किंमती सामान्य जनतेला परवडणार नसल्याने हा दर सन 2011 च्या दराएवढा ठेवणे, विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करणे आदी बाबतही यावेळी सादरीकरण करण्यात आले.
000

टोल फ्री क्रमांकावरील 2135 तक्रारींवर परिवहन कार्यालयाची कारवाई


मुंबई, दि. 17 : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 1800 - 22 - 0110 या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर मुंबई विभागातून एप्रिल ते नोव्हेंबर 2011 या कालावधीत एकूण 3816 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2135 तक्रारींबाबत कारवाई करण्यात आली आहे.
वरील टोल फ्री क्रमांकावर 24 तास सार्वजनिक सेवा वाहन चालकांविरुद्ध जनतेस तक्रार नोंदविता येते. संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे तक्रारीतील नमूद वाहन चालकांविरुद्ध व परवाना धारकांविरुद्ध 15 दिवसांच्या आत कार्यवाही करण्यात येते. केलेल्या कार्यवाहीबद्दल तक्रारकर्त्यास मोबाईलवर एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येते.
मुंबई शहर व उपनगरे येथील सार्वजनिक सेवा प्रवाशी वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांनी 1800 - 22 - 0110 या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकाचा रिक्षा, टॅक्सी, बस इत्यादींबाबत तक्रार करण्यासाठी वापर करावा, असे आवाहन परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.
000

माध्यमिक शाळांनी शालेय प्रतवारी 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन भरावी



          मुंबई, दि. 17 : राज्यातील सर्व माध्यमिक शाळांनी शालेय प्रतवारी ऑनलाईन भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. 2010-2011 या वर्षाच्या माहितीवर आधारित शालेय प्रतवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.gradation.msbshse.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुधारित स्वरुपात शालेय प्रतवारी तयार केली असून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांनी दिनांक 31 जानेवारी 2012 पर्यंत शालेय प्रतवारी ऑनलाईन भरावी, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव,  पुणे यांनी कळविले आहे.
          प्रतवारीच्या माहितीचा उपयोग राज्यातील सर्व शासकीय संस्था, शिक्षण संचालक, एस.सी. ई.आर.टी, बालभारती व महाराष्ट्र शासन यांना होतो.
0 0 0 0

सहा महिने मुदतीचा व्यवसाय अभ्यासक्रम 20 जानेवारीपर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारणार


मुंबई, दि. 17 : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून सहा महिने मुदतीच्या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी फेब्रुवारी-2012 पासून सुरु होणाऱ्या सत्राची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रवेश अर्जाची विक्री व स्वीकृतीची मुदत 20 जानेवारी, 2012 पर्यंत आहे.
          याबाबतची माहिती पुस्तिका (प्रवेश अर्ज व प्रवेशाच्या वेळापत्रकासह) सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेची किंमत सर्वसाधारण उमेदवारांसाठी 30 रुपये व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 20 रुपये आहे. इच्छूक उमेदवारांनी ते ज्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी पात्र आहेत त्याच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अचूक, सुस्पष्ट प्रवेश अर्ज विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.
          प्रवेशासंबंधी आवश्यक असलेली माहिती, शैक्षणिक अर्हता, अटी इत्यादी बाबी माहिती पुस्तिकेत देण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधावा, असे सहायक संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांनी कळविले आहे.
000

चिल्ड्रन इन महाराष्ट्रा` संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त --मुख्य सचिव


मुंबई, दि. 17 : राज्यातील बालकांच्या स्थितीबद्दल संकलित माहिती असणारी `चिल्ड्रन इन महाराष्ट्रा-ॲन ॲटलस ऑफ सोशल इन्डीकेटर्स` ही पुस्तिका बालकल्याण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त आहे, असे मुख्यसचिव रत्नाकर गायकवाड यांनी आज येथे सांगितले.
महाराष्ट्र शासनाचा नियोजन विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या `चिल्ड्रन इन महाराष्ट्रा-ॲन ॲटलस ऑफ सोशल इन्डीकेटर्स` या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यसचिवांच्या हस्ते आज त्यांच्या दालनात करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, युनिसेफचे महाराष्ट्र राज्य क्षेत्र अधिकारी तेजिंदरसिंग संधु यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन मोठ्याप्रमाणात विविध विकास कार्यक्रम, कल्याणकारी योजना राबवित आहे असे सांगून श्री. गायकवाड पुढे म्हणाले, बालकल्याण धोरण निर्मितीमध्ये आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेमध्ये या पुस्तिकेत देण्यात आलेली सर्व माहिती व आकडेवारी ही दिशादर्शक ठरणारी आहे.
लोकसंख्या आणि क्षेत्र, प्राथमिक शिक्षण, माता व शिशु आरोग्य, बालसंरक्षण आदी महत्त्वाच्या घटकांची माहिती `चिल्ड्रन इन महाराष्ट्रा` या पुस्तिकेत देण्यात आली आहे.
000