शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

लामकानी रोपवाटिकेस जिल्हाधिकाऱ्यांची भेट



                 धुळे, दि. 8 :- शिंदखेडा वन परिक्षेत्रांतर्गत असलेल्या लामकानी रोपवाटिकेस जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज भेट दिली.  त्यांचे समवेत उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसिलदार दत्ता शेजूळ, जलयुक्त शिवार अभियान सदस्य डॉ. धनंजय नेवाडकर, वृक्षमित्र वसंतराव ठाकरे आदी उपस्थित होते.
            रोपवाटिका परिसरातून जाणाऱ्या नाल्यावर सिमेंट नाला बांध बांधण्यात यावा  व वाहून जाणाऱ्या पाण्याचा साठा करून त्याचा उपयोग रोपवाटिकेसाठी करण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
           यावेळी शिंदखेडा वनक्षेत्रपाल पी. ए. पाटील यांनी लामकानी रोपवाटिकेतील रोपांच्या बाबत माहिती दिली.  या रोपवाटिकेचे क्षेत्र एक हेक्टर असून या रोपवाटिकेतील सिताफळ, अंजन, खैर, निम, आवळा आदी रोपांची जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी पाहणी केली.  यावेळी वनपाल सविता पाटील, वनरक्षक सुवर्णा उशिरे तसेच वन कर्मचारी उपस्थित होते.
000000        


लामकानीने ठेवला पाणलोट क्षेत्र विकासाचा आदर्श --जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ



         धुळे, दि. 8 :- लामकानी गावाने लोकसहभागातून आदर्श पाणलोट क्षेत्राचा विकास केला असून लामकानीचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांनीही घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज केले.
            धुळे तालुक्यातील लामकानी एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लीश स्कूल व कै. दादासो. मगनराव पाकळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात बिजारोपण आणि वृक्षारोपणकार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसिलदार दत्ता शेजूळ, प्रभारी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील, जलयुक्त शिवार अभियान सदस्य डॉ. धनंजय नेवाडकर, वृक्षमित्र वसंतराव ठाकरे, सरपंच शिवराम तेले, उपसरपंच श्रीमती सुमित्रा बागुल, पंचायत समिती सदस्या पुष्पलता शिरोडे, संस्थेचे चेअरमन पुरूषोत्तम पाकळे, सचिव सुरेश पाकळे, प्राचार्य आर. एच. निकुम,  शिंदखेडा  वनक्षेत्रपाल पी. ए. पाटील आदी उपस्थित होते.
            लामकानी गावात  15 वर्षाच्या मेहनतीतून आदर्श पाणलोट क्षेत्राचा विकास केल्याबद्दल ग्रामस्थ, ग्राम पंचायत पदाधिकारी, डॉ. धनंजय नेवाडकर आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी म्हणाले, आदर्श पाणलोटाचा  विकास कसा करावा यासाठी एका कार्यशाळेप्रसंगी मी  हिवरेबाजार या गावी गेलो होतो.  त्यावेळी लामकानी गावाने केलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामही पाहणे आवश्यक होते, असे मला वाटते.  लामकानी गाव चराई बंदी, कुऱ्हाड बंदीचा उपक्रम राबवित असल्यामुळे पाणलोट क्षेत्राचा विकास झाला आहे.  या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींचा मोठा सहभाग असल्याने सर्व विद्यार्थी-विद्याथीनीही अभिनंदनास पात्र असल्याचे ते यावेळी म्हणाले.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले,  लामकानी गावात बॅक ऑफ बडोदा शाखा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.  त्याचबरोबर ग्रामीण रूग्णालयाच्या जागेचा प्रस्ताव तहसिलदारांनी उप विभागीय अधिकारी कार्यालयामार्फत सादर करावा तसेच शाळेची जागा नियमित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात  येणार असल्याचेही त्यांनी  यावेळी सांगितले.
         सचिव सुरेश पाकळे यांनी  शैक्षणिक संस्थेच्या विकासाची माहिती  देऊन गावाच्या अडचणी मांडतांना प्रामुख्याने ग्रामीण रूग्णालयासाठी जमिन मिळावी, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, साठवण बंधारा मंजूर करावा असे सांगितले.
            वृक्षमित्र वसंतराव ठाकरे म्हणाले, जिल्ह्यात ऐतिहासिक  फडपध्दत सुरू होती.  दूधाच्या उत्पादनात जिल्हा अग्रेसर होता.  शेताचे पाणी शेतात, गावातलं पाणी गावांत, माथा ते पायथ्याचे पाणी जिरवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
            प्रास्ताविकात डॉ. धनंजय नेवाडकर म्हणाले की, लामकानी गावात 15 वर्षापूर्वी पाणी टंचाईची समस्या भेडसावत होती.  पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी गावकऱ्यांच्या लोकसहभागातून सुमारे 450 हेक्टर क्षेत्रात 15 वर्षापासून पाणलोट क्षेत्र विकसित करण्यात आला आहे.  लामकानी गावाच्या पाणलोट क्षेत्राचा विकासात सातत्य राहण्यासाठी गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी बिजारोपण, वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.  लामकानी गावास मिळालेल्या पुरस्कारांची माहिती देऊन त्यांनी लामकानी पाणलोट क्षेत्र विकासाची पाहणी करण्यासाठी गावात माहिती केंद्र स्थापन केले असून  गावास भेटी देण्याकरिता  सहली येत असल्याचेही आवर्जून सांगितले. वसुधा संस्थेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देतांना धुळे शहराजवळील लळींग कुरण विकसीत करण्यासाठी चळवळ उभारण्यात येईल, असेही त्यांनी  सांगितले.
            प्रारंभी विद्यार्थीनींनी ईशस्तवन, स्वागतगीत, पर्यावरण गीत सादर केले.  जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते वारकरी सांप्रदायातील ज्ञानेश्वर भजनी मंडळास साऊंड सिस्टीम देण्यात आली.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख यांनी केले तर एस. एम. न्याहळदे यांनी सर्वांचे आभार मानले.  या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, मान्यवर तसेच गावकरी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थीनींनी लामकानी पाणलोट क्षेत्राच्या परिसरात  निंबोळया, कोया, जांभुळ बी, आवळा आदींचे मोठया प्रमाणात बिजारोपण केले.  यावेळी डॉ. धनंजय नेवाडकर यांनी पवन्या जातीच्या गवताची आणि इतर वृक्षांची माहिती  दिली.
000000