गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

मतदानासाठी नऊ महापालिका हद्दीत आज सार्वजनिक सुट्टी


मुंबई दि. 15 ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान गुरुवार दि. 16 फेब्रुवारी 2012 रोजी होत  आहेमतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित महापालिका हद्दीत सदर दिवशी  सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
            यासंबंधीची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. 15 फेब्रुवारी 2012 रोजी निर्गमित केली आहे.
            क्रमांक संकीर्ण 2012/ प्र.क.47/2012/29 परक्राम्य संलेख अधिनियम 1881 (1881 चा 26) च्या कलम 25 मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक 39/1/68 जेयूडीएल-तीन  दि. 8 मे 1968 अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने ही सुट्टी जाहीर केली आहे.
. . .

गेटवे येथे उद्यापासून सप्तरंग महोत्सव


मुंबई, दि. 15 :  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित चौथा सप्तरंग महोत्सव दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी 2012 या कालवधीत गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे आणि दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी 2012 या कालावधीत डॉ. काशीनाथ नाट्यगृह, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात गायन, वादन, नृत्ये, नाटय, चित्रपट अशा विविध कलांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
            या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात येणार आहे. उद्घाटना नंतर स्वरजल्लोष  हा दर्जेदार मराठी गीतांचा विविधरंगी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
            दिनांक 18 फेब्रुवारी 2012 रोजी पहाटे 6.30 वाजता अनुराधा पौडवाल यांच्या भक्तीगीतांचा भक्तीतरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 6.30 वाजता आरती अंकलीकर- टिकेकर यांच्या शास्त्रीय गायनाचा शिंपल्यातील स्वरचांदणे  हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्रौ 8 वाजता  सोनिया परचुरे नृत्यलहरी हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच त्यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली शरयू नृत्य कलामंदिरचे विद्यार्थी  बुध्दीबळ : एक नृत्याविष्कार  हे समूह नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊ मराठे करणार आहेत.
            दिनांक 19 फेब्रुवारी 2012 रोजी पहाटे 6.30 वाजता स्वरमंथन हा अश्विनी भिडे- देशपांडे यांच्या शास्त्रीय तसेच भक्तीसंगीत गायनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 6.30 वाजता सुबल सरकार यांना नृत्य श्रध्‍दांजली अर्पण करणाऱ्या स्मृतीगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन किशू पाल, सोनिया परचुरे व मयूर वैद्य यांनी केले आहे.
            दिनांक 21 फेब्रुवारी 2012 रोजी डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृह, ठाणे येथे रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी रंगभूमीवर अनेक वर्षे मोलाची कामगिरी बजावलेल्या प्रसाद सावकार व सुधा करमरकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
            दिनांक 22 फेब्रुवारी 2012 रोजी सायंकाळी 6.30 वाजता श्रीनिवास खळे यांना संगीतमय श्रध्दांजली वाहण्यात येणार असून यशवंत देव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमात श्रीनिवास खळे यांची गाजलेली गाणी सादर करण्यात येतील.
            दिनांक 23 फेब्रुवारी 2012 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मूर्तीमंत अस्मिता या स्मिता पाटील यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            सहा दिवस रंगणारा महाराष्ट्र शासनाचा हा महोत्सव म्हणजे नामवंत कलाकार व गायकांना पाहण्याची व ऐकण्याची सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. शासनाचा हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशिका सर्व नाट्यगृहांवर उपलब्ध आहेत. तरी या कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी मोठया संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
0 0 0 0 0

महाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे - 2022 दोन हजार कोटी रुपयांचे रोखे 21 फेब्रुवारीस विक्रीला


मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनाने 10 वर्ष मुदतीचे दोन हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे एका अधिसूचनेद्वारे विक्रीला काढले असून भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये मंगळवार, दिनांक 21 फेब्रुवारी, 2012 रोजी विक्रीसाठी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत उपलब्ध होतील. रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट, मुंबई कार्यालयात या रोख्यांचा लिलाव करण्यात येणार असून या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या भांडवली खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल.
शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र, वैयक्तिक संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त 1 टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेमध्ये दिनांक 21 फेब्रुवारी, 2012 रोजी लिलावाचे स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे निगोशिएटेड डिलींग सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत तर अस्पर्धात्मक बिडस् सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 22 फेब्रुवारी, 2012 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई खात्यात देय असलेले धनादेशाद्वारे बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी करण्यात येईल.
 कर्जरोख्याचा कालावधी हा 10 वर्षाचा असेल आणि तो दिनांक 22 फेब्रुवारी , 2012 पासून सुरु होईल तर दिनांक 22 फेब्रुवारी, 2022 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परफेड करण्यात येईल. या कर्जरोख्यास व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कुपन दरावढा असेल आणि हे व्याज प्रतिवर्षी दिनांक 22 ऑगस्ट आणि 22 फेब्रुवारी रोजी सहामाही पद्धतीने देण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाने ही अधिसूचना राजपत्र असाधारण भाग-1 मध्ये, उपविभाग, दिनांक 15 फेब्रुवारी , 2011 रोजी प्रसिद्ध केली आहे.
-----

क्रीडा मार्गदर्शक पदांच्या 21 ते 25 फेब्रुवारीला मुलाखती


मुंबई, दि. 12 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर मानधनतत्त्वावर भरण्यात येणाऱ्या 153 क्रीडा मार्गदर्शक पदांच्या मुलाखतीचे दि. 21 ते 25 फेब्रुवारी 2012 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीचा दिनांक व खेळनिहाय कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 21 फेब्रुवारी आर्चरी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सींग, क्रिकेट ;  22 फेब्रुवारी हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो ; 23 फेब्रुवारी सायकलिंग, फेन्सिंग, फूटबॉल, जिम्नॅस्टिक्स, शुटींग, स्विमिंग ;
24 फेब्रुवारी कबड्डी- खो खो, पॉवरलिफ्टिंग, सॉफ्टबॉल, टेबलटेनिस, वेटलिफ्टिंग; 25 फेब्रुवारी व्हॉलीबॉल, कुस्ती, रोलरस्केटिंग, स्केटिंग, वुशू, टेनिस यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
मुलाखतीचे पत्र प्राप्त झालेल्‍या उमेदवारांनी त्यांच्या खेळानुसार नमूद दिनांकास सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे संचालक, क्रीडा व युव‍क सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.
0 0 0 0 0