मुंबई,दि.4 :महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न
करत असून त्यात अमेरिकेसारख्या देशाच्या भूमीवर कर्तृत्व गाजविलेल्यामराठी मंडळींनी
योगदान दिल्यास महाराष्ट्र हे एक सर्वोत्तम राज्य म्हणून नावारुपास येईल, असे आवाहनमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी लॉस एन्जेलिस (अमेरिका) येथे केले. अमेरिकेतील मराठी बांधवांशी
महाराष्ट्राचा ऋणानुबंध वाढावा यासाठी तेथे महाराष्ट्र परिचय केंद्र तातडीने कार्यान्वित
करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये
स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींच्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे लॉस एन्जेलिस
येथे 17 वे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, बृहन्महाराष्ट्र
मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, ज्येष्ठ पदाधिकारी शैलेश शेट्ये, विवेक रणदिवे आदीउपस्थित
होते.
अमेरिकेतील मराठी मंडळींनी
केलेल्या प्रगतीची विशेष प्रशंसा करुन मुख्यमंत्री म्हणाले, परकीय भूमीवर कर्तबगारी
गाजविण्याचे मोठे काम करणाऱ्या महाराष्ट्राच्यासुपुत्रांबद्दल राज्याला आनंद, समाधान
आणि अभिमान वाटतो. अमेरिकेच्या वाटचालीत महाराष्ट्रातील जनतेचा लक्षणीय वाटा आहे. कर्तृत्व
गाजविण्यासोबतच येथील मराठी माणसाच्या या पिढीने आपले मराठीपण निष्ठने जोपासले आहे,
ही बाब अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्रात परिवर्तनाचे
पर्व सुरू झाले असून राज्य आता वेगाने बदलत असल्याची माहिती या अधिवेशनातील मराठीजनांना
देताना मुख्यमंत्री म्हणाले, मेक इन इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या
यशस्वीतेसाठी मेक इन महाराष्ट्र आवश्यक आहे, कारणमहाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे. मेक
इन महाराष्ट्र हा आमचा केवळ एक नारा नाही, तर ती एक व्यापक लोकचळवळ आहे. इथल्या तरुणांना
योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार देण्याची गरज आहे, ते देण्याचे काम आमचे सरकार
करत आहे. राज्याच्या प्रशासनात आमूलाग्र परिवर्तनहोत असून ‘रेड टेप’ ऐवजी ‘रेड कार्पेट’संस्कृती आम्ही प्रस्थापित करीत आहोत.औद्योगिक क्षेत्रातील
परवानाराज आम्ही संपुष्टात आणले आहे. यासोबत जलयुक्त शिवार अभियानासारख्या
कार्यक्रमातून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. या
विकासयात्रेत मराठी मंडळींनी सहभागी व्हावे. त्यांच्या योगदानातून महाराष्ट्र एक सर्वोत्तम
राज्य म्हणून नावारुपास येईल, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मातृभूमी, कर्मभूमी आणि जन्मभूमी
यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा असे आवाहन करुन मुख्यमंत्री
म्हणाले, महाराष्ट्र आणि अमेरिका जोडण्याचा प्रयत्न येथील मराठी मंडळींच्या माध्यमातून
केला जाईल. त्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने अमेरिकेत महाराष्ट्र परिचय
केंद्र निश्चितपणे कार्यान्वित करण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून अमेरिकेतील
मराठी मंडळींचा महाराष्ट्राशी असलेला समन्वय-संवाद प्रभावीपणे विकसित केला जाईल. यासोबतच
बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि प्रस्तावित महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रात
पर्यटनासाठी येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून 25 टक्के
सवलत दिली जाईल.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र
अनलिमिटेड या त्रैमासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. या तीन दिवशीय अधिवेशनात
विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक
क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी सहभागी होत आहेत. अधिवेशनानिमित्त आयोजित या आनंदोत्सवात सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, आर्थिक
आदी विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांसाठी व्यावसायिक
चर्चासत्रेही होणार आहेत. ‘मैत्र पिढ्यांचे’ ही या अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. अमेरिका आणि
कॅनडातील 54 मराठी मंडळांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत.या अधिवेशनास अमेरिका आणि
कॅनडात स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींचा मोठा प्रतिसाद लाभत असूनजवळपास पाच हजारांहून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमास आपली
उपस्थिती लावली.
-----०-----