मुंबई, दि. 18 : राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे प्रकाशित होणाऱ्या
महाराष्ट्र अमुचा-डिरेक्टरी
2012 चे प्रकाशन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात
आले.
यावेळी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे, राज्य संघटक रमेश
जंजाळ, संघटन सचिव समीर भाटकर, उपाध्यक्ष राजेश गायकवाड हे उपस्थित होते.
शासकीय अधिकारी –कर्मचाऱ्यांपासून
ते जनसामान्यांपर्यंत अशा सर्वांनाच अत्यंत उपयुक्त असलेल्या या डिरेक्टरीचे मुख्य
सचिवांनी कौतुक केले. ते म्हणाले, राजपत्रित अधिकारी महासंघ नेहमीच विधायक कामे
करीत आलेले आहे. महाराष्ट्र अमुचा डिरेक्टरी ची निर्मिती हासुद्धा एक स्तुत्य
उपक्रम आहे. हा उपक्रम असाच पुढे सुरु राहावा यासाठी श्री.गायकवाड यांनी महासंघास
शुभेच्छा दिल्या.
148 पृष्ठांच्या या डिरेक्टरीमध्ये राज्याचे मंत्रिमंडळ,
विविध कार्यालये, कार्यालय प्रमुख, जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे अधिकारी, शासकीय
विश्राम गृहे, केंद्र शासनाची महत्त्वाची कार्यालये, प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक
यांची नावे आणि दूरध्वनी क्रमांक याबरोबरच वर्ष 2012 मधील शासकीय सुट्टया, रेल्वे
वेळापत्रक, राज्य शासनाच्या विविध विभागांची संकेतस्थळे, कार्यसंस्कृती अभियान,
महासंघाचे पदाधिकारी, संलग्न संघटना आदी विषयांबाबतची माहिती प्रकाशित करण्यात आली
आहे.
सर्वांनाच अत्यंत उपयुक्त असलेल्या या डिरेक्टरी – 2012 ला सर्वच स्तरातून मोठया प्रमाणात
चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास महासंघाचे सरचिटणीस श्री. कुलथे यांनी व्यक्त
केला. आणि महासंघाकडून अशाच प्रकारचे उपक्रम पुढेही सुरु राहतील असेही त्यांनी
सांगितले.
या डिरेक्टरीची किंमत रु. 120 असून ही नवीन प्रशासकीय
भवनाच्या तळमजला येथील महासंघाच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
000