मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी शुभारंभ सोहळ्याचे राष्ट्रपतीच्या हस्ते उद्घाटन




मुंबई, दि. 21 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दि. 12 मार्च 2012 रोजी मुंबई येथे करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
     स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. 13 मार्च 2012 पासून सुरु होऊन ते 12 मार्च 2013 रोजी पूर्ण होईल. या जन्मशताब्दी वर्षात राज्य शासनामार्फत विविध योजना, कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर करावयाच्या कार्यक्रमाची निश्चिती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची आज बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. जन्मशताब्दीवर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्याशी संबंधित निवडक पुस्तकांचे संच सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची सुचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
     यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मदार उल्हास पवार,  जन्मशताब्दी वर्षात राबविण्यात येणाऱ्या योजना आणि कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य गिरीश गांधी, कलप्पा आवाडे, राम प्रधान, मदार शशिकांत शिंदे यांच्यासह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे  आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
     स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा दि. 12 मार्च 2012 रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे करण्याचे प्रस्तावित आहे. सांयकाळी 6 ते 9.30 या वेळेत मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत या मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या तसेच  वर्षभर आयोजित करावयाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यात  दर महिन्याच्या 12 तारखेला एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल, यामध्ये विविध विभागांचा सहभाग असेल असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
     स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचे विविध पैलू उलगडून दाखविणारे हे कार्यक्रम राज्याच्या सर्व भागात आणि नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येतील. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची रा सांभाळलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रीय स्तरावर परराष्ट्र, गृह आणि सरंक्षण यासारखी महत्वाची खाती सांभाळली. त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगला संपर्क होता. त्यांनी सहकार, शिक्षण, साहित्य, ग्रामविकास, कृषी, औद्योगिक विकास यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. नव्या पिढीला त्यांच्या कार्यकतृर्त्वाची माहिती होण्यासाठी तसेच त्यांचे विचार आणि कार्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी हे कार्यक्रम आयजित करण्यात येत असून यामध्ये होणाऱ्या परिसंवाद आणि चर्चासत्रांसाठी विभागांनी विषय आणि संकल्पना सुचवाव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
. . .

वृक्षांना दत्तक घेणारं अनगर गाव



 
            ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरेêü’ असं सांगून संत तुकारामांनी आपल्या जीवनातील वृक्षांच महत्व अधोरेखित केले आहे. जीवनाचा श्वास आणि जगण्याची आस देणारी हिरवीगार वनराई आपल्याला नेहमीच आकर्षित करते. म्हणूनच माणसानं झाडांशी आपलं आगळं वेगळं नातं नेहमी जपलं आहे. याचं अनोखं उदाहरण आपल्याला पहायला मिळते ते सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अनगर गावात. या गावांने वक्षांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे.
            सोलापूर जिल्ह्यात मोहोळ माढा रस्त्यावर तालुका मुख्यालयापासून 12 कि.मी अंतरावर वसलेल्या या गावाची जशी कलावंतांचे आश्रयस्थान म्हणून ओळख आहे तशीच ती वृक्षांना दत्तक घेणारं गावं म्हणूनही.  गावची लोकसंख्या 8,000. यात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतांना दिसतात.
            आपला गावं सुंदर असावा, स्वच्छ असावा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो पर्यावरण संरक्षित असावा म्हणून या गावानं पुढाकार घेऊन ग्रामविकास विभागाच्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत सहभाग घेतला. ग्रामसभा, फलक, लोकनाट्य, कलापथके यासारख्या अनेक माध्यमांचा उपयोग करीत त्यांनी या योजनेचे महत्व आणि त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविले. शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना योजनेत सहभागी करून घेतांना वृक्षदिंड्या काढल्या. याचा परिणाम साहजिकच योजनेमध्ये लोकसहभाग वाढण्यात झाला.  गावातील लोकांची मानसिकता बदलू लागली. ‘अरेêü, गावात प्लॅस्टिक बंदी केलीच पाहिजे. . . नाही तर पर्यावरणाचे संरक्षण कसे होणार ?  अन्  आपल्याच श्वासांसाठी गावात झाडं लावाया नको ? असं एकमेकांना विचारत लोक वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात हीरिरीने सहभागी   झाले. गाव स्वच्छ असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहील ही कल्पना लोकांच्या मनात रुजू लागली. लोक जोमाने योजनेतील निकष पूर्ण करण्याच्या कामाला लागले.
            ज्या गावाला सुरुवातीला हे आणखी एक काय नवं ? असा प्रश्न पडला होता त्याच गावाने आता योजनेचे सगळे नियम पाळत आपली ग्रामपंचायत पर्यावरण संरक्षित समृद्ध ग्राम योजनेत सगळ्यात पुढे कशी असेल, ती यातील निकषाला पात्र ठरून पुरस्कार कशी मिळवेल यासाठी मनापासून प्रयत्न केले.

                                                                                                                                                ..2/-

वृक्षांना दत्तक घेणारं अनगर गाव..              :2:
            अपुरा लोकसहभाग, महिलांची पाण्यासाठी वणवण, वीजेचा तुटवडा, गावात झाडं नसणं यासारखं गावाचं पहिलं चित्र या लोकांनी आपल्या इच्छाशक्तीनं पार पुसुन टाकण्याचा प्रयत्न केला. एकदा योजनेत सहभागी व्हायचं ठरवल्यानंतर गावातील प्रत्येक व्यक्तीस दत्तक स्वरूपात झाडांचं वाटप करण्यात आलं. एवढंच नाही तर दत्तक दिलेलं हे झाडं जिवंत राहावं, वाढावं यासाठी या झाडांच्या दत्तक पालकांवर त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी सोपविण्यात आली.
            गावानं वैयक्तिक बायोगॅस सुरु करून दैनंदिन उर्जेची गरज पूर्ण केली. त्याचबरोबर स्वंयस्फुर्तीने वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम आणि त्याचा वापर सुरु केला.
            गावाचा विकास करायचा असेल, गावात विविध विकासकामे करायची असतील तर गावाची घरपट्टी-पाणीपट्टी यासारखी कर वसुली ही थकित राहाता कामा नये, ती वसुल झाली पाहिजे हे लक्षात घेऊन या योजनेमध्ये पहिल्यावर्षी कर वसुलीचे उद्दिष्ट 60 टक्के इतके ठेवण्यात आले होते. परंतू गावाने पाहिल्याच वर्षी 100 टक्के करवसुली केली.  लोकवर्गणीतून सोलर प्लांट आणि पाण्याची टाकी बसवून घेतल्याने गावाची पाण्याची अडचण दूर झाली.
            गावाने सांडपाणी व्यवस्थापनासाठी  कमी खर्चात बांधलेल्या भूमिगत गटारी तर जिल्ह्यात अनगर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. वाड्या-वस्त्यांवर सौर पथ दिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. याच्यापुढे जाऊन गावाने सौर अभ्यासिकेची सुरुवात केली असून  योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी लावलेल्या फळ झाडांमुळे त्यांना शेती बरोबर पूरक व्यवसायाची जोड देखील मिळाली आहे.
            गावाचं हे बदलेलं रूपडं पाहतांना आज गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद आहे. आता यापुढे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतून पवनचक्की उभारून संपूर्ण गाव वीजेच्या बाबतीत स्वंयपूर्ण करण्याचा गावाने निर्धार केला आहे. एकजुटीची ताकद खुप मोठी असते. हीच ताकद गावांच्या विकासासाठी सकारात्मक पद्धतीने उपयोगात आणली तर गावाचा चेहरामोहरा बदलायला वेळ लागत नाही हेच जणू अनगर गावच्या गावकऱ्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं आहे.
                                             . . .                    डॉ. सुरेखा मुळे
वरिष्ठ सहाय्यक संचालक  (माहिती)         

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची नवी संधी - राजेश टोपे


मुंबई, दि. 18 : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची नवी संधी मिळून त्यांचा सामाजिक आर्थिक विकास करणारी  भारती वालमार्ट सोबतची प्रशिक्षण योजना ठाणे, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. त्याचा राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठया प्रमाणात लाभ होईल, असे प्रतिपादन उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केले.
            उच्च तंत्र शिक्षण विभाग भारती वालमार्ट या जागतिक स्तरांवरील मार्केटिंग कंपनी यांच्या दरम्यान एक सामंजस्य करार मंत्रालयात करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. उच्च तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार, सह सचिव जी.जे. रसाळ, भारती वालमार्टच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आरती सिंग, स्मिता नायर, व्यवसाय प्रशिक्षण महासंचालनालयाचे सहसचिव एस.जे. देवडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
            श्री. टोपे म्हणाले की, राज्यातील युवकांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याची शासनाची महत्वपूर्ण योजना आहेच. या योजनेमुळे व्यवसायाच्या विविध क्षेत्रात कुशल असे मनुष्यबळ राज्यात उपलब्ध होत आहे. भारती वालमार्ट बरोबर झालेल्या या करारामुळे राज्यातील युवकांना रोजगार  मिळू केल त्यामुळे त्यांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचाही   सामाजिक आर्थिक विकास  होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील तीन शहरात भारती वालमार्टची
प्रशिक्षण योजना
भारती वालमार्टची प्रशिक्षण  योजना सध्या प्रायोगिक तत्वावर ठाणे, औरंगाबाद, जालना या शहरात राबविण्यात येणार आहे. ही योजना मोफत असून प्रत्येक केंद्रावर दरमहा 125 विद्यार्थ्यांना या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल. यापूर्वी या  संस्थेमार्फत दिल्ली, अमृतसर, बेंगलोर येथे जवळपास 9500 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. विविध व्यावसायिक क्षेत्रामध्ये अथवा मॉल मध्ये ग्राहकांशी साधावयाचा संवाद तसेच मॉल मधील विविध विभागांशी निगडीत असलेली कामे इत्यादी प्रशिक्षण युवकांना देण्यात येणार आहे.
भारती वालमार्टने ही प्रशिक्षण योजना तयार केली असून  त्याचा लाभ महाराष्ट्रातील  युवकांना व्हावा यासाठी झालेल्या या करारावर भारती वालमार्टच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आरती सिंग आणि व्यवसाय प्रशिक्षण महासंचालनालयाचे सहसचिव एस.जे. देवडेकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. लवकरच ही योजना  कार्यान्वित होणार आहे.
0 0 0 0 0