मुंबई,िद. 16 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता
10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेसाठीच्या प्रचलित शिक्षासूचीचे
अद्ययावत प्रारुप मंडळाच्या www.msbshse.ac.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिक्षासूचीचा प्रभावीपणे व सकारात्मक परिणाम
होण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विविध संघटना, विद्यार्थी, पालक यांच्याकडून
अभिप्राय मागविले आहेत.
सर्व संबंधितांनी आपले अभिप्राय मंडळाच्या संकेतस्थळावर अथवा
विभागीय मंडळ कार्यालयाकडे लेखीस्वरुपात 20 जानेवारी 2012 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन
विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई
विभाग, वाशी, नवी मुंबई यांनी केले आहे.
मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10 वी व 12 वीच्या
परीक्षेपूर्वी, परीक्षेच्या वेळी व परीक्षेनंतरच्या काळात काही विद्यार्थी,
शिक्षक, मुख्याध्यापक तसेच समाजातील अनेक घटकांकडून विविध प्रकारचे गैरप्रकार होत
असतात. प्रत्येक गैरप्रकाराच्या स्वरुपानुसार मंडळस्तरावर चौकशी अधिकाऱ्यांमार्फत
चौकशी करण्यात येते आणि दोषींवर प्रचलित शिक्षासूचीनुसार शिक्षा करण्यात येते.
ऑक्टोबर, 2004 पासून परीक्षा पद्धतीमध्ये विविध सुधारणा
करण्यात आल्या. बारकोड पद्धतीचा अवलंब करण्यात आला. परीक्षापद्धतीतही बदल करण्यात
आला. त्याचप्रमाणे गैरप्रकारांच्या स्वरुपातही बदल झालेला आहे. त्या अनुषंगाने
प्रचलित शिक्षासूचीमध्ये आमुलाग्र बदल करणे अपरिहार्य झाले आहे. यासाठी उपसमितीने
सांगोपांग विचार करुन शिक्षासूचीचा अद्ययावत मसुदा तयार केला आहे.
000