धुळे, दि.3 :-वीज हा आपला दैनंदिन
जीवनातील अनिवार्य घटक झाला असून राज्यातील 11 कोटी 90 लाख जनतेला शाश्वत विजेचा
पुरवठा करण्याची जबाबदारी शासनावर आहे.
धुळे जिल्ह्यातील विद्युत संबंधी विकास कामे राबविण्याकरिता ऊर्जा
विभागाकडून 250 कोटी रूपये निधी दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा, नवीन
व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
धुळे तालुक्यातील चिंचखेडा
येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचा भूमिपुजन समारंभ आज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांच्या हस्ते संपन्न झाला.
त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार कुणाल
पाटील (धुळे ग्रामीण) जयकुमार रावल (शिंदखेडा), जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ,
धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मधुकर
गर्दे, सभापती शांताराम राजपूत, महावितरणचे
संचालक (संचलन) अभिजीत देशपांडे, अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर, जळगांव
परिमंडळाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी, जळगाव परिमंडळाचे पायाभुत आराखडा अधीक्षक
अभियंता अशोक साळुंके, कार्यकारी अभियंता
(ग्रामीण) संजय सरग, कार्यकारी अभियंता
(शहर व ग्रामीण) संदीप सानप, जिल्हा परिषद सदस्य विष्णु भिल, चिंचखेड्याच्या
सरपंच रोहिणी सोनार, बबन चौधरी, अनुप अग्रवाल, प्रा. अरविंद जाधव, कमलाकर अहिरराव,
माजी महापौर भगवान करनकाळ, हिरामण अप्पा गवळी, प्रदीप कर्पे, युवराज चौधरी आणि
चिंचखेडा, अंचाळे, तांडा परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ऊर्जा
निर्मिती करता येते. परंतु ती साठवून
ठेवता येत नाही. तिचे निर्मिती सोबतच
नियोजनबध्द पध्दतीने वितरण करावे लागते.
याकरिता ग्राहकांनी सहकार्य असणे अत्यंत गरजेचे आहे. निर्मिती केलेल्या
विजेचा योग्य पध्दतीने वापर व्हावा याकरिता आपण सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक
आहे. विजेचे भारनियमन कमी
करण्याकरिता विजेचा गैरवापर थांबवला
पाहिजे, आकडे टाकून विजेचा वापर करता कामा नये,
विजेचे मिटर बंद करू नये, सीएफएल पध्दतीचे बल्ब वापरावेत, अनावश्यक
वेळी दिवे, पंखे, उपकरणे बंद करावीत. तसेच वापर केलेल्या विजेचे बिल वेळेवर भरणे
देखील आवश्यक आहे. या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या जनतेने पाळल्यास
सर्वांना आवश्यकतेनुसार वीज पुरवठा करणे वीज वितरण कंपनीला सोयीचे होईल आणि
त्यामुळे शेतकऱ्यांना शेती विकासाकरिता आवश्यक वीज पुरवठा करता येईल, असेही
त्यांनी सांगितले.
पुढे
बोलतांना मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, वीज वितरण व्यवस्थापन करतांना समाजातील
तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरूणांचा सहभाग घेऊन कार्य करण्याची एक योजना तयार
करण्यात आलेली आहे. त्यात इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग किंवा डिप्लोमा उत्तीर्ण
झालेल्या उमेदवारासोबत आय.टी.आयचा
इलेक्ट्रीकल ट्रेड उत्तीर्ण झालेले 4 तरूण अशी पाच तरूणांचे एक पथक तयार करण्यात
येईल. या पथकातील तरूणांना प्रशिक्षण देऊन
4 हजार ग्राहकांची जबाबदारी सोपविण्यात येईल.
या पथकाने चार हजार ग्राहकांपर्यंत वीज वेळेवर पोहचविणे, त्यात होणारे बिघाड
दुरूस्त करणे, अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, विजेचे वेडेवाकडे झालेले
खांबाची दुरूस्ती करणे, वीज बिलांचे वितरण करणे अशा प्रकारची कामे करावयाची असून
त्यांना 55 हजार रूपये इतका दरमहा पुरेसा मोबदला देण्याची तरतूद या योजनेत करण्यात
आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
कोळशावर वीज निर्मिती केल्याने पर्यावरणाचे नुकसान होते. या बाबीची दखल घेऊन सौरऊर्जा निर्मितीकडे ऊर्जा
विभागाचा अधिक कल आहे. त्यादृष्टीकोनातून
नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत असून दोंडाईचा परिसरात
2,500 मेगॅवॅट प्रकल्पाचा त्यात समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार
डॉ. सुभाष भामरे म्हणाले, ऊर्जा मंत्री प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठका घेत
आहेत. नवीन उपकेंद्राच्या भूमिपुजनामुळे
सुरळीत वीज पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार
कुणाल पाटील म्हणाले, जिल्ह्यात एकूण 4 हजाराच्या वर ट्रान्सफार्मर कार्यान्वीत
आहेत त्यापैकी ग्रामीण भागात वेळोवेळी
बिघाड होणारे ट्रान्सफॉर्मर 2 ते 3 आठवडे बदलले जात नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे
फार मोठे नुकसान होते. ते टाळण्याकरिता
धुळे जिल्ह्याला 300 ट्रान्सफार्मर मंजूर
करावे तसेच बंद पडलेली 21 गाव पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करावी, असे
सांगितले.
आमदार जयकुमार
रावल म्हणाले, ऊर्जा विभागाचे मोठे प्रश्न आहेत.
ऊर्जा मंत्री सातत्याने जिल्ह्यात
दौरे करून सर्वसामान्य जनतेचे ऊर्जेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रारंभी
महावितरण कंपनीच्या धुळे परिमंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंता
संजय सरग, उपव्यवस्थापक राजेंद्र महाले आणि सहाय्यक अभियंता सचिन जोशी यांच्या
मार्गदर्शनाखाली वीज सुरक्षा हीच विजेची बचत या विषयावर पथनाट्य सादर करण्यात
आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी जगदीश
देवपूरकर यांनी केले.
00000000