मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना

धुळे, दि. 11 :-सन 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व  माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी पात्र पाल्यांकरिता लाभ घ्यावा, या शिष्यवृत्ती योजनेचे फॉर्म्स मिळण्यासाठी 15 ऑक्टोबर, 2015 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन धुळे व नंदुरबार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर (निवृत्त) सोपान डोके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी पुढील पात्रता पूर्ण करणाऱ्या पाल्यांचे  शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी तपशिलवार अर्ज  पाठवावेत.  सन 2014-15 मध्ये शालांत परीक्षा दहावी, बारावीत कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा व पुढील शिक्षण घेत असावा, पदवी, पदविका परीक्षा कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा व पुढील शिक्षण घेत असावा, असेही पत्रकात नमूद केले आहे

विशेष मोहिमेचा संस्था, न्यासाच्या विश्वस्तांनी लाभ घेण्याचे आवाहन

धुळे, दि. 11 :-  धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या 4 जुलै, 2015 च्या परिपत्रकानुसार  24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 2015 या कालावधीत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,  धुळे येथे विशेष मोहीम राबवून संस्थांचे, न्यासाचे, विश्वस्तांचे फेरफार अर्ज अंतिम आदेश देऊन निकाली काढण्यात येणार आहे.  या विशेष मोहिमेचा संस्था, न्यासाच्या विश्वस्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे विभागाचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त-1 श्रीमती व्ही. आर. मिश्रा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            ज्या संस्थेच्या/ न्यासाचे विश्वस्त बदलाबाबत फेरफार अर्ज (मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22 प्रमाणे ) प्रलंबित असतील अशा सर्व न्यासाचे फेरफार अर्ज  24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 2015 या कालावधीत विशेष मोहीम राबवून अंतिम आदेश देऊन निकाली काढण्यात येणार आहे.  तरी संबंधित न्यासाचे विश्वस्तांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त-1, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात येऊन आपल्या न्यासाचे फेरफार अर्ज वरील कालावधीत कोणत्या तारखेस नेमलेले आहेत याची माहिती घेऊन त्या तारखेस व वेळेवर फेरफार अर्जाच्या संबंधित कागदपत्रासह आपण स्वत: अथवा वकीलासह उपस्थित राहून  सहकार्य करावे.  तसेच संस्थेशी, न्यासाशी संबंधित असलेल्या वकीलांनी ही बाब विश्वस्तांच्या निदर्शनास आणावी, असेही पत्रकात नमूद केले.

000000000

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा - पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील

धुळे, दि. 11 :- दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन देशभर साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये  केले आहे.
            राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा.  या संदर्भात शासनामार्फत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत.  तसेच जाणीवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 चे कलम 2 अनुसार कारवाई करण्यात येते.  काही वेळा राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच कला, क्रीडा प्रसंगी वैयक्तीक रित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्तत: टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.  जेणेकरून नंतर हे छोटे-छोटे राष्ट्रध्वज रस्त्याच्या रस्त्याच्या कडेला किंवा इतस्तत: ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात.  हे दृश्य राष्ट्रीय प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाचे वापरानंतर एकतर त्याचा योग्य तो मान राहील याप्रमाणे ते ठेवण्यात यावे अन्यथा जर राष्ट्रध्वज खराब झालेले असतील तर त्यांचा योग्य तो मान राखून ते ध्वजसंहितेतील तरतुदी अनुसार नष्ट करणे आवश्यक असते.
            रस्त्यात  पडलेले इतस्तत: विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लॅस्टिकचे असतील तर प्लॅस्टिक बरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज बरेच दिवस त्या ठिकाणी दिसतात.  राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही  बाब  गंभीर असल्याने केंद्र शासनाच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता नाही. 
            जनतेच्या वैयक्तीक वापरासाठी छोटया कागदी ध्वजाचा वापर करण्यात यावा तथापि अशा कागदी ध्वजाचा वापर करतांना त्याचा योग्य तो मान राखणे आवश्यक आहे.  तसेच असे राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून  देऊ नये, असे राष्ट्रध्वज खराब झालेले आहेत, असे आढळल्यास ते ध्वज संहितेतील तरतुदी अनुसार नष्ट करण्यात यावे.  राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही पत्रकात नमूद केले आहे. 

0000000000