नाशिक
दिनांक 18 : बारा वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होत असलेल्या सिंहस्थ महाकुंभ
पर्वातील नाशिक येथील तिस-या आणि शेवटच्या शाहीस्नानासाठी सकाळी ठीक 5.45 वाजतायेथील
लक्ष्मीनारायण मंदिरापासून ढोलताशांच्या गजरात, गोविंद बोलो, हरी गोपाल बोलो, जय
श्रीरामाच्या जयघोषात मुसळधार पावसाच्या साक्षीने शाही मिरवणुकीने प्रारंभ झाला.
या मिरवणुकीची सुरुवात निर्मोही आखाड्याने
झाली. या आखाड्यात जवळपास 70 पेक्षा अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. सर्व चित्ररथ हार, फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आले होते. यावेळी परदेशी साधकही
मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरात सुरु असलेल्या पावसामुळे मिरवणुकीच्यावेळी
भाविकांची वर्दळ कमी असली, तरी या शेवटच्या पर्वणीचे शाहीस्नान करण्यासाठी साधूसंतांमध्ये
मोठा उत्साह दिसून येत होता. जसजसा पावसाचा जोर कमी झाला तसतशी साधुग्राममध्ये भाविकांची
गर्दी वाढू लागली. शाही मिरवणुकीच्या मार्गांवर दुतर्फा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
सकाळी 6.30 च्या सुमारास दिगंबर आखाड्याच्या
मिरवणुकीस सुरुवात झाली. या मिरवणुकीत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत श्री.
ग्यानदास महाराज हे आपल्या शिष्यांसह पायी सहभागी झाले होते. या मिरवणुकीत साधू, संत व स्थानिक भाविकांनी आपल्या विविध कला सादर करुन भाविकांच्या
डोळ्याचे पारणे फेडले.
तर या महाकुंभ पर्वातील शेवटच्या शाहीस्नानासाठी
तिस-या क्रमांकावर असलेला निर्वाणी आखाडयाच्या मिरवणुकीस सव्वा सात वाजता सुरुवात झाली.
या मिरवणुकीच्या अग्रभागी नाशिक शहराचे महापौर अशोक मुर्तडक सहभागी झाले होते. प्रत्येक
आखाड्याच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने चित्ररथ सामील झाले होते.
दुस-या पर्वणीच्यावेळी झालेली अफाट गर्दी
लक्षात घेता पोलीस व प्रशासनातर्फे या पर्वणीच्यावेळी चोख बंदोबस्ताचे नियोजन केल्यामुळे
कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणूक सुरळीत व वेळेत पार पडण्यास मदत झाली.
--- 000 000 ---