धुळे, दि. 2 :- धुळे शहरालगत असलेल्या
नगांव बारी शिवारात केंद्रीय विद्यालयाची सुसज्ज इमारत अत्याधुनिक सेवा सुविधांसह
तयार असून पाणी पुरवठा व वीज पुरवठा आदी महत्वपूर्ण सेवा संबंधित यंत्रणांकडून
प्राप्त करून घेतल्यानंतर केंद्रीय
विद्यालयाच्या स्थलांतराची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना आज
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या आहेत.
केंद्रीय
विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी काल जिल्हाधिकारी
यांची भेट घेऊन सध्या 80 फुटी रोड-स्टेशन रोड लगत असलेल्या जागेत सुरू असलेल्या
केंद्रीय विद्यालयात होत असलेल्या अडीअडचणींबाबत गाऱ्हाणी मांडली होती. या पार्श्वभूमिवर नगांव बारी परिसरातील नवनिर्मित केंद्रीय
विद्यालयास दिलेल्या भेटी प्रसंगी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. नामदेव
भोसले, धुळ्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, महानगरपालिकेचे रचनाकार विसपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे
कार्यकारी अभियंता विजय भदाणे , केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एच. जे. शेडमेघे,
इमारतीचे ठेकेदार केतन गोसर आदी उपस्थित
होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. मिसाळ
म्हणाले, केंद्रीय विद्यालयाची सुमारे 8 कोटी रूपये खर्च करून सुमारे 10 एकर जागेत
प्रशस्त इमारत प्राचार्य व शिक्षकांच्या निवासस्थानांसह तयार असून या इमारतीचे
बांधकाम अत्यंत दर्जेदार झाले आहे. पाणी
पुरवठा व वीज पुरवठा तसेच रस्त्यांचे कामकाज तातडीने पूर्ण करून तात्काळ केंद्रीय
विद्यालय स्थलांतरीत करावे. केंद्रीय
सार्वजनिक बांधकाम विभागास सुरक्षा भिंत बांधणे, क्रीडांगण, रंगमच यांच्या
निर्मिती संदर्भातील सुधारित 3 कोटी रूपयांच्या प्रस्तावासंदर्भात पाठ पुरावा करून
कामकाज तातडीने पूर्ण करण्यात यावे. केंद्रीय विद्यालयात शिकत असलेल्या
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जाबाबत कुठलीही तडजोड स्वीकारली जाणार नाही व कामात
कुचराई करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ
यांनी सांगितले.
केंद्रीय
विद्यालयाने पाणी पुरवठा जोडणी संदर्भातील विहीत कार्यवाही केल्यास धुळे महानगर पालिके मार्फत 15 दिवसात
पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. नामदेव भोसले
यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मिसाळ यांनी रस्ता, प्राचार्य व शिक्षक
निवासस्थान, प्रयोगशाळा, क्रीडांगण, वर्ग खोल्या व स्वच्छतागृहे यांची पाहणी
केली.
0000000