गुरुवार, ६ ऑगस्ट, २०१५

राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे, दि. 6 :- सर्व नागरिकांनी भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करावा.  राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना करणे हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध ) अधिनियम, 1950 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे. राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
            आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सातपुडा सभागृहात भारतीय स्वातंत्र्याचा 68 वा वर्धापन दिन म्हणून 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्या बैठकीत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. मिसाळ बोलत होते.  यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, महानगरपालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, होमगार्ड जिल्हा समादेशक अनिल बागुल, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एन. सैंदाणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  प्रवीण  पाटील,  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले   आदी  उपस्थित होते. 
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, दरवर्षी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी तसेच 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो.  सदर कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात.  त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. लहान आकारातील कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री मोठया प्रमाणावर होत असते.  शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्यासह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात.       
हे ध्वज त्याचदिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी इतस्तत: टाकले जातात व त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. रस्त्याने इतस्तत: विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लास्टिकचे असतील तर प्लास्टिक बरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज बरेच दिवस त्या ठिकाणी दिसतात.  राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे.  केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही, असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. मिसाळ यांनी सांगितले.
 कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरावर तहसिलदार व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आलेले आहेत, अशी माहिती यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.
या बैठकीत भारतीय स्वातंत्र्याचा 68 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट, 2015 च्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांना करावयाच्या कामांचे वितरण करून त्याबाबतचा सर्वांगिण आढावा घेण्यात आला.
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी

·        प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी.
·        राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियमानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान दंडनीय अपराध.
·        राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.

·        कार्यक्रम पार पडल्यानंतर इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज अशासकीय संस्थांमार्फत जिल्हाधिकारी
      व तहसिलदार यांना सुपूर्द करणार.
00000000