शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

अनुसूचित जातीच्या जनतेने विशेष घटक योजनांचा लाभ घेऊन सर्वांगिण विकास साधावा : आ. प्रा.शरद पाटील



       
 धुळे, दि. 13 :- सामाजिक विषमता दूर होण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसूचित जातीच्या (विशेष घटक योजना) कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. विशेष घटक योजनांच्या विविध योजनांचा लाभ  ग्रामीण भागातील तळागाळातील अनुसूचित जातीच्या जनतेने घेऊन सर्वांगिण विकास साधावा, असे आवाहन धुळे (ग्रामीण) चे आ. प्रा. शरद पाटील यांनी केले.
       धुळे तालुक्यातील सोनगीर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सामाजिक न्याय विभागाच्या  विशेष घटक योजनांचा प्रचार, प्रसिध्दी  ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने उडाणे येथील क्रांती कृषि युवा बहुउद्देशीय संस्थेमार्फत आयोजित कलापथकाचे उदघाटन आ. प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते काल झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे विशेष जिल्हा समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक विलास करडक, जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील,  माजी उपसरपंच कैलास वाणी, माजी सरपंच हाजी पठाण, ग्राम पंचायत सदस्य हसन पठाण, पराग देशमुख, केदार मोरे, आधार अण्णा, नेरकर, उपसरपंच प्रकाश गुजर हे होते.
       आ. प्रा. शरद पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात संघर्ष करुन देश स्वातंत्र्य झाला.  परंतु श्रीमंत-गरीब ही दरी अजूनही दूर झाली नाही.  सामाजिक विषमता दूर होण्यासाठी कलापथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचे प्रबोधनाचा करण्याचा उद्देश चांगला आहे.
       क्रांती कृषि युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष शिंदे व त्यांचे सहकारी रोहित बागुल, संदीप सोनवणे, मनोहर कांबळे, प्रविण मोरे,आशा बि-हाडे, वर्षा  सुर्यवंशी, शितल पगार, मुकेश भामरे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेच्या  राबविण्यात येणा-या शासकीय कल्याणकारी योजनेतील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी ई-स्कॉलरशिप योजना, शिक्षण फी, परीक्षा फी योजना (फ्रिशिप), राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतीगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, पुस्तकपेढी योजना, सैनिकी शाळेतील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच मोटार वाहन चालक प्रशिक्षण, दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, पॉवर टिलर वाटप योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, पुरस्कार, कन्यादान योजना, अनुसूचित जाती, जमाती कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्य, घरकुल योजना तसेच शौचालय, एक व्यक्ती एक झाड  आदि योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या उद्देशाने कलापथकाच्या माध्यमातून विशेष जनजागृती केली.
       मान्यवरांचे स्वागत जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन केले तर प्रास्ताविकात वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक विलास करडक म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या व शासनाच्या विविध कल्याणकारी व्यक्तीगत व सामुहिक योजनांचा लाभ घेऊन आपला सर्वांगिण विकास करावा. शेवटी अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सोनगील पंचक्रोशीतील महिला-पुरुष, विद्यार्थी-विद्यार्थीनी आदि बहुसंख्येने उपस्थित होते.
     शिरपूर येथे कलापथकाचा कार्यक्रम संपन्न
     शिरपूर येथील खालचेगांवातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित कलापथक कार्यक्रमाचे उदघाटन त-हाडी महात्मा फुले युवक मंडळ व बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष कचरु अहिरे यांच्या हस्ते काल झाले.  यावेळी क्रांती कृषि युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष शिंदे व त्यांचे सहका-यांनी अनुसूचित जाती उपयोजनेच्या (विशेष घटक योजना) विविध योजनांवर आधारित कलापथकाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मान्यवर, महिला-पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. 

मानव विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील व्यक्तींचा विकास होणे आवश्यक : आयुक्त कृष्णकांत भोगे



धुळे,दि. 13 :- मानव विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील सामान्य व्यक्तीचा विकास होणे आवश्यक आहे.  त्यासाठी सर्व संबंधित शासकीय अधिका-यांनी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत तालुकानिहाय निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  या निधीतून शिक्षण, आरोग्य व बालकल्याण तसेच कृषि विभाग व स्वयंरोजगार प्रशिक्षण आदि उत्पन्न वाढीच्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करुन मानव विकास कार्यक्रमासाठी दिलेले उद्दिष्ट मार्च-2012 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना मानव विकास कार्यक्रमाचे आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी आज दिल्या.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या वतीने राबविण्यात येणा-या मानव विकास कार्यक्रम-2011-2012 च्या माहे डिसेंबर-2011 अखेर झालेला खर्चाचा आढावा बैठक आयुक्त कृष्णकांत भोगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.  यावेळी ते बोलत होते.  त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, प्रांत टी. डी. हुलवळे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. राहूल चौधरी, गट विकास अधिकारी चंद्रकांत पवार (साक्री), कोल्हे (शिंदखेडा), गोपाळ पाटील ( धुळे), शिरपूर, साक्री, शिंदखेडा, धुळे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सांगळे, आयटीआय प्राचार्य राजपूत, सर्व तालुक्यातील आयटीआयचे प्राचार्य, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
       मानव विकास कार्यक्रमाचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोचविण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे सांगून आयुक्त कृष्णकांत भोंगे म्हणाले की, शिक्षणाचा विशेष उजळणी वर्ग इ. दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 2,216 तर बारावीच्या नापास झालेल्या 489 असून जिल्हयातील विद्यार्थ्यांची उजळणी वर्गाची तालुकानिहाय स्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे.  शिक्षणाबरोबर अभ्यासिका, बालभवन, विज्ञान केंद्र, वाहतूक सुविधांचा लाभही विद्यार्थी-विद्यार्थीनींना त्वरित देण्यात यावा.
       आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी आरोग्य व बालकल्याणअंतर्गत गर्भवती महिलांची, बालकांची व मातांची आरोग्य तपासणी तसेच 475 किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण, बाळंत काळातील महिलांच्या बुडीत मजुरीचा आढावा घेतला.  बुडित मजुरीची तालुकानिहाय स्थिती जाणून घेतली.  बुडित मजुरीचा लाभ लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक त्वरीत देण्याबाबत मार्गदर्शक सूचना संबंधित अधिका-यांना यावेळी केल्या.
       आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी फिरते माती परिक्षण प्रयोगशाळा सुरु करणे, स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात परसबाग, भाजी पाला आदिंचा आढावा घेऊन त्याची अंमलबजावणी कृषि विभागाने त्वरीत करावी, असे सांगितले.
       व्यक्ती विकास ही संकल्पना समोर ठेवून गरजू 1,200 विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकल, अटोमोबॉईल्स आदि विविध विषयावर एक महिन्याचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. यावेळी आयुक्त कृष्णकांत भोंगे यांनी या प्रशिक्षणानंतर किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला तसेच व्यवसाय सुरु केला आहे याबाबतची माहिती संबंधित अधिका-यांनी घेण्याच्या सूचना यावेळी केल्या.
       आयुक्त कृष्णकांत भोंगे म्हणाले की, मानव विकास कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी संबंधित अधिका-यांनी योग्य ते नियोजन करावे. कामात कुचराई करणा-या अधिका-यांविरुध्द कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मानव विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे होण्यासाठी अंमलबजावणी करणा-या अधिका-यांचा आढावा जिल्हा नियोजन विभागामार्फत नियमीत घेण्यात यावा.         जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, मानव विकास कार्यक्रमातील योजनांची अंमलबजावणी करतांना संबंधित अधिका-यांना अडचणी आल्यास त्या  सोडविण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करु.  असे सांगितले. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सर्वांचे आभार मानले. 

त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताक देशाच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन


मुंबई, दि. 12 : त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताक देशाच्या पंतप्रधान श्रीमती कमलाप्रसाद बीस्सेसर यांचे आज छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी आगमन झाले.
          यावेळी विमानतळावर राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलीक आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0 0 0 0 0

क्रीडा मार्गदर्शक पदाच्या मुलाखती 21 फेब्रुवारीपासून


          मुंबई, दि. 12 : क्रीडा व युवक संचालनालयाच्या आस्थापनेवर मानधनतत्वावर भरण्यात येणाऱ्या 153 क्रीडा मार्गदर्शक पदांच्या मुलाखती निवडणूक आचारसहिंतेमुळे पुढे ढकलल्या असून त्या 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2012 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
          या संदर्भात डिसेंबर 2010 मधील जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्‍या अर्जामधील पात्र 151 उमेदवारांसाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2012 या काळात निवड समिती मार्फत मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते व त्याबाबतचे पत्र त्यांना 3 जानेवारी 2012 रोजी पाठविण्यात आले होते. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणूक कार्यक्रमामुळे राज्य निवडणूक आयोगामार्फत आचारसहिंता लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार आचारसहिंता कालावधीत मुलाखती घेण्यास निर्बंध असल्याने सदर मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून मुलाखतीचा पुढील कार्यक्रम दिनांक 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2012, या कालावधी मध्ये निश्चित करण्यात आला आहे व याबाबतची माहिती वैयक्तिकरित्या प्रत्येक उमेदवारास पाठविण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त यांनी कळविले आहे.
000

राज्यपालांच्या प्रकृतीत सुधारणा 2/3 दिवसात रुग्णालयातून घरी परतणार


मुंबई, दि. 12 : राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्यावर मेंदूला शुद्ध रक्त पुरवठा करणाऱ्या डाव्या रक्त वाहीणीतील अडथळे दूर करण्यासाठी काल बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून राज्यपालांना अतिदक्षता कक्षातून त्यांच्या खोलीत नेण्यात आले आहे.
          बॉम्बे हॉस्पिटलचे मानद अधिष्ठाता आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल त्यांच्यावर उपचार करीत असून राज्यपालांना 2/3 दिवसांत घरी सोडले जाईल.
          राज्यपालांना मंगळवार दि. 10 जानेवारी पासून भोवळ आल्यासारखे होत होते. नियमित तपासणी नंतर त्यांच्या मेंदूला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणाऱ्या डाव्या रक्त वाहीणीत अडथळा असल्याचे आढळून आले होते. हा अडथळा शस्त्रक्रियेने दूर करण्यात आला आहे.
          मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, आमदार कृपाशंकर सिंह यांनी काल रुग्णालयात जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
          केंद्रीय संरक्षण मंत्री ए. के. ॲन्थोनी यांनी डॉ. बी. के. गोयल यांना दूरध्वनीकरुन राज्यपालांच्या प्रकृतीची चौकशी केली
000

राजमाता जिजाऊना यांना मंत्रालयात अभिवादन


मुंबई, दि. 12 : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव के. पी. बक्षी, सचिव नंदकुमार जंत्रे यांनी गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
    यावेळी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनीही राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0 0 0 0