धुळे, दि. 3 :- लोकनेते स्व.
गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी लळींग कुरणामध्ये लोकनेते
गोपीनाथराव मुंडे स्मृतीवन उभे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी
अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या
स्मरणार्थ 3 ते 9 जून या कालावधीत राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत
आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी
अण्णासाहेब मिसाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख
यांच्या हस्ते लळींग कुरणामध्ये वृक्षारोपण करून सप्ताहाचा प्रारंभ करण्यात
आला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत
होते. यावेळी उपवनसंरक्षक डी. यु. पाटील, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनणे
(धुळे), उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, लळींगचे माजी उपसरपंच
संभाजी गवळी, उपसरपंच गोविंद गवळी, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, निवासी
नायब तहसिलदार अरूण शेवाळे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर एस. एम. पाटील, प्रदीप शिरोडे, शरद
गढरी आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी
म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांचे राज्यासाठीचे व देशासाठीचे योगदान विचारात
घेता त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी
दरवर्षी 3 ते 9 जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने
घेतला आहे.
या पर्यावरण सप्ताहामध्ये
संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम मनरेगा अंतर्गत हाती घेण्यात आला असून
यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या गावात वृक्षारोपण करण्यास
प्राधान्य देण्यात येत आहे. वृक्ष
लागवडीचा हा कार्यक्रम प्राथमिक, माध्यमिक शाळा, आंगणवाडया, आरोग्य केंद्रे, समाज
मंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या जमिनी, शासकीय व निमशासकीय कार्यालये व
रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
000000