शुक्रवार, ५ जून, २०१५

शासकीय आश्रमशाळेत प्रवेशाकरिता जाहीर आवाहन

धुळे, दि. 5 :- आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांच्या कार्यक्षेत्रातील साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील एकूण 22 शासकीय आश्रमशाळांमध्ये सन 2015-16 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये प्रवेशाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली  आहे.  तरी पालकांनी  आश्रमशाळेत प्रवेशाकरिता संबंधित तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक यांचेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी एस. बी. तोरणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यापासून इयत्ता दहावी तसेच उच्च माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता बारावी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण मोफत तसेच सर्व शैक्षणिक सुविधा, गणवेश, शैक्षणिक साहित्य, सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, अंथरूण-पांघरूण तसेच वैद्यकीय सुविधा शासनामार्फत पुरविण्यात येतील.

0000000

धुळे जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश 15 जून पर्यंत लागू

धुळे, दि. 5 :-  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी अण्णासाहेब मिसाळ  यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश  दि. 2 जून पासून दि. 15 जून, 2015 चे 24-00 वाजेपावेतो संपूर्ण धुळे जिल्ह्यात लागू  करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

00000

पर्यावरण सप्ताहानिमित्त आर्वी येथे आज पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपण

धुळे, दि. 5 :- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ  दि. 3 ते 9 जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण सप्ताह निमित्त राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज    दि. 6 जून, 2015 रोजी सकाळी 9-00 वाजता आर्वी ता.जि.धुळे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

0000

पालक मंत्री दादाजी भुसे यांचा धुळे जिल्हा दौरा कार्यक्रम

              धुळे, दि. 5 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे  यांचा धुळे जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
              शनिवार दि. 6 जून, 2015 रोजी सकाळी 8-45 वाजता मालेगावहून शासकीय वाहनाने आर्वी ता. जि. धुळे कडे प्रयाण, सकाळी 9-30 वाजता आर्वी येथे आगमन व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड व पर्यावरण सप्ताह बाबतच्या कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10-10 वाजता आर्वी येथून जिल्हाधिकारी, धुळे कार्यालयाकडे मोटारीने प्रयाण, सकाळी 10-30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह  येथे  महाराष्ट्र भुजल विकास व व्यवस्थापन अधिनियम 2009 नुसार कार्यशाळेस उपस्थिती.

000000

आज 22 हजार स्वच्छतादूत राबविणार ‘गोदावरी स्वच्छता अभियान’ विविध सव्वाशे सामाजिक संस्था करणार 69 ठिकाणी व्यापक स्वच्छता

नाशिक, दि. 4- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हरितकुंभ संकल्पनेंतर्गत आणि  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून. 5 जून रोजी शहर-परिसरातील नदीकाठावर  ‘गोदावरी स्वच्छता अभियानराबविण्यात येणार आहे. विविध शासकीय-निमशासकीय विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच सव्वाशे सामाजिक-शैक्षणिक संस्था सुमारे 22 हजार स्वच्छतादूतांसह नदीकाठच्या 69 ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. नाशिककर जनतेनेही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यंदाच्या सिंहस्थ-कुंभमेळ्यातील हरितकुंभ संकल्पनेतून विविध पर्यावरणपूरक उपक्रम शहरात राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत पर्यावरण दिनानिमित्त गोदावरी, कपिला, वाघाडी, नासर्डी या नदीकाठच्या परिसरासह शहरातील सर्व बसस्थानके, मार्केट यार्ड, भाजी मार्केट, घाट, पूल, शहरातील चौक, रस्ते अशा 69 ठिकाणी   ही व्यापक स्वच्छता मोहिम सकाळी 7 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक समूहावर नेमून दिल्याप्रमाणे विशिष्ट भाग स्वच्छ करावा लागणार आहे.
या स्वच्छता अभियानात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांचेसह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,पोलीस आयुक्त एस्.जगन्नाथन्,  मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदी वरिष्ठ अधिकारी आणि सर्व विभागांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.
 विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकासार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, प्रांताधिकारी-तहसील कार्यालये, एस.टी., महावितरण, एमटीडीसी, एमआयडीसी,जीवन प्राधिकरणासारख्या शासकीय-निमशासकीय विभागांबरोबरच शहरातील विविध शैक्षणिक संस्था, समाजकार्य महाविद्यालये, सामाजिक संस्था, महिला मंडळे, घरेलू कामगार संघटना, भारतीय कामगार महासंघ, महिला बचत गट, आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप्स, नेहरु युवा केंद्र, क्रीडा शिक्षक संघटना, प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालय, हिंदू जनजागृती समिती आदी सामाजिक- सेवाभावी संस्थांचे सुमारे 22 हजार स्वच्छतादूत या अभियानांतर्गत नाशिक शहर-परिसराची स्वच्छता करणार आहेत.
या स्वच्छता अभियानासाठी नाशिक महानगरपालिकेने प्रत्येक ठिकाणी स्वच्छता संपर्क सहाय्यकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नाशिक शहर परिसरातील जनतेनेगोदावरी स्वच्छता अभियाना सहभागी होऊनस्वच्छ,सुंदर-हरित नाशिककरण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

* * * * * * * * * *

अनुसूचित जमातींच्या 25हजार विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमधून शिक्षण

मुंबई, दि.4: आदिवासी विकास विभागामार्फत नामांकित शाळांमध्ये दरवर्षी पाठविण्यात येत असलेल्या 2500 विद्यार्थ्यांच्या संख्येत 10 पटीत वाढ करण्यात आली असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेत शिक्षण देणे, या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचा लक्षांक वाढवून 25हजार इतका करण्यात आला आहे.
 या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना यापुढे इयत्ता 1 ली व 5 वी या दोन टप्प्यावर प्रवेश देण्यात येईल. नामांकीत शाळांची वर्गवारी करुन शुल्क निश्चित करण्यात आले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा  50 हजार रुपये, जिल्हास्तरीय मुख्यालय कार्यक्षेत्रातील शाळा  45 हजार रुपये आणि तालुकास्तरावरील  / नगरपालिका क्षेत्रातील (जिल्हा मुख्यालय वगळून) व अन्य शाळांना  40 हजार रुपये तसेच महाबळेश्वर, पाचगणी, चिखलदरा, पन्हाळा, लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणच्या शाळांना  50 हजार रुपये  शुल्क निश्चित करण्यात आले आहे, याची अंमलबजावणी या वर्षापासूनच होईल.

०००

जलयुक्त शिवार अभियानात वाढता लोकसहभाग असणाऱ्या गावांना निधीची कमतरता पडू देणार नाही - मुख्यमंत्री

उस्मानाबाद,दि.4: राज्य शासनाचे जलसंधारणांच्या कामांना प्राधान्य असून ज्या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढता आहे, त्या गावातील कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उस्मानाबाद तालुक्यातील विविध गावांतील जलयुक्त शिवार अभियानातील विविध कामांची तसेच ढोकी शिवारातील नाला खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर जलयुक्तच्या कामांची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार सर्वश्री मधुकरराव चव्हाण, राणा जगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी  सुमन रावत, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिषेक त्रिमुखे, जि.. उपाध्यक्ष सुधाकर गुंड  यांच्यासह पाटबंधारे, जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात अतिशय चांगले काम सुरु असून हा वेग वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे. ज्या गावात लोकसहभाग वाढता राहील, तेथे राज्य शासनही जलयुक्तच्या कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आता शेतकऱ्यांचीखरीप हंगामाची कामे सुरु झाली आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर फौजदारी कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिरता देणे, त्यांच्या सातबाऱ्यावरील पीककर्जाचा बोजा कमी करणे यासाठी पहिल्या वर्षी शून्य टक्के दराने तर पुढील चार वर्षे सहा टक्के दराने कर्ज दिले जाईल. सहा टक्केंचा जादा भार राज्य शासन उचलेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. टंचाईमुक्त महाराष्ट्र हे आमचे ध्येय असून त्यासाठी प्रत्येक गावांत लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून परिवर्तन आणू, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यानंतर तेर (ता. उस्मानाबाद येथील ) तेरणा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरील स्वयंचलित गेटची (सयांत्रिक द्वार उच्चालन) पाहणी केलीहे गेट गिअरद्वारे खाली वर करता येत असल्याने मजुरी आणि देखभालीचा खर्च वाचणार आहे.  तसेच कायम पाणीसाठा राहिल्याने त्याचाही लाभ होणार आहे. परिसरातील सिंचनक्षेत्रात वाढ होऊन आसपासच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या कामाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली.          पाटबंधारे विभागाच्या उपसा सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता बी.डी. तोंडे आणि कार्यकारी अभियंता व्ही.बी. कोटेचा यांनी त्यांना या प्रकल्पाची माहिती दिली.   

0000

परिवहन विभागाच्या गट क लिपिक वर्गातील पदे भरतांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा प्राधान्यक्रमात समावेश - दिवाकर रावते

मुंबई दि. 4:    परिवहन विभागाच्या गट क लिपिक वर्गातील पदे भरतांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा प्राधान्यक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
शासनाच्या गट क संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील पदे भरतांना शासनाने विहित केलेले विविध प्रवर्गाचे आरक्षण लागू आहे.  ही पदभरती करतांना घ्यावयाच्या परिक्षेत उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ताक्रम लावण्यासाठी दि. 27 जून 2008 च्या शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमाचे निकष  निश्चित करून देण्यात आले आहेत.  यामध्ये  उच्च शैक्षणिक अर्हता, त्यानंतर मागसवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत अ.जा., अ.ज., भ.ज., वि.मा.प्र, वि.जा,भ.ज. व इतर मागास वर्ग त्यानंतर अपंग आणि त्यानंतर माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आणि त्यानंतर वय असा क्रम निश्चित करण्यात आला आहे. यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा समावेश करण्यात आला असून सध्या हा निर्णय परिवहन विभागासाठी लागू करण्यात आला आहे.
शासनाच्या सर्व विभागांना हा निर्णय लागू करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने तसे आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे, अशी मागणी करणारा प्रस्ताव परिवहन विभागाने सादर करावा असे आदेश आपण विभागाला दिल्याचेही श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.
नवीन चालकांना द्यावे लागणार शपथपत्र
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आस्‍थापनेवर 7630 चालकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पुर्णत्वास येत असून, या भरतीद्वारे नेमणूक करण्यात येणाऱ्या सर्व चालकांकडून ते कामावर असतांना तंबाखू, दारू तसेच इतर नशापान करणार नाहीत, असे शपथपत्र घेतले जाईल, हे शपथपत्र दिल्याशिवाय नोकरीवर रूजू करून घेण्यात येणार नाही, असे आदेशही विभागाने निर्गमित केले आहेत.

0000

“जय महाराष्ट्र” कार्यक्रमातून संकल्प स्वच्छतेचा

मुंबई, दि. 4 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात संकल्प स्वच्छतेचा या कार्यशाळेचा वृत्तांत दि. 5 जून रोजी रात्रौ 7.15 ते 8 या वेळेत दाखविण्यात येईल.
          स्वच्छतेच्या संकल्पासह राज्यात स्वच्छ अभियानाला नियोजनबद्ध पद्धतीने सुरुवात करण्यात आली असून नगरविकास विभागाच्यावतीने संकल्प स्वच्छतेचा या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्त्रबुद्धे, लोकप्रिय अभिनेते आमीर खान, नगरविकास विभागाच्या सचिव आणि अभियानाच्या नोडल सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, कोकण विभागाचे आयुक्त राधेश्याम मोपलवार, नगर परिषद प्रशासनाच्या संचालिका तथा आयुक्त मीता राजीव लोचन, कोकण विभागातील महापालिकांचे महापौर, आयुक्त, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, कचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ या कार्यशाळेला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता अभियानाचेमहत्व उपस्थितांना सांगून शासनाचे संपूर्ण सहकार्य स्थानिक प्रशासन संस्थांना राहील, अशी ग्वाही दिली आणि स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प दिला.
          पुढील काळात स्वच्छतेसाठी जी शहरं पुढाकार घेतील त्यांनाच केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी करुन घ्ज्ञेतले जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
          स्वच्छता अभियान यशस्वी करण्याचा संकल्प मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केला.
          कोणत्याही गोष्टीचा ध्यास असल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही त्यामुळे महाराष्ट्र आणि पर्यायाने देश स्वच्छ करण्याचा ध्यास निर्माण झाला तर महाराष्ट्र देशातील पहिले कचरा मुक्त राज्य बनेल, असा विश्वास लोकप्रिय अभिनेते आमीर खान यांनी व्यक्त केला.
          स्वच्छतेचा प्रश्न हा बहुआयामी आहे. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाबरोबरच स्वयंसेवी संथांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
          स्वच्छ महाराष्ट्र अभियान महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी प्राधान्याने करण्यात येत असलेल्या तसेच आगामी काळात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबद्दल नगरविकास विभागाच्या सचिव आणि अभियानाच्या नोडल सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी उपस्थितांना माहिती दिली तसेच 2 ऑक्टोबर, 2015 पर्यंत राज्यातील किमान 50 शहरे 100 टक्के हागणदारी मुक्त होतील, असा विश्वास व्यक्त केला.
          कोकण विभागाचे विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार यांनी स्वच्छता अभियानात कोकण विभाग आघाडी घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
          स्वच्छता अभियानाविषयी महानगरपालिका, नगरपालिका यांच्याकडून असलेल्या अपेक्षा नगरपरिषद प्रशासनाच्या संचालिका तथा आयुक्त मीता राजीव लोचन यांनी यावेळी मांडल्या.
          तत्पूर्वी झालेल्या उद्‌घाटन सत्रात कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका तसेच पार्श्वभूमी नगरविकास विभागाच्या सहसचिव सीमा ढमढेरे यांनी सादरीकरणातून मांडली.
          दिवसभराच्या कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध शास्त्रोक्त पद्धतींविषयी तज्ज्ञांनी सादरीकरणातून मार्गदर्शन केले.
          कार्यशाळेला उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानाविषयीचा आपला संकल्प व्यक्त केला.
          ही एक दिवसीय कार्यशाळा म्हणजे हरित आणि स्वच्छ महाराष्ट्राचा संकल्प लवकरात लवकर साकार करण्याच्यादृष्टीने उचललेले आश्वासक पाऊल ठरली.

0000