शुक्रवार, ५ जून, २०१५

परिवहन विभागाच्या गट क लिपिक वर्गातील पदे भरतांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा प्राधान्यक्रमात समावेश - दिवाकर रावते

मुंबई दि. 4:    परिवहन विभागाच्या गट क लिपिक वर्गातील पदे भरतांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा प्राधान्यक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
शासनाच्या गट क संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील पदे भरतांना शासनाने विहित केलेले विविध प्रवर्गाचे आरक्षण लागू आहे.  ही पदभरती करतांना घ्यावयाच्या परिक्षेत उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ताक्रम लावण्यासाठी दि. 27 जून 2008 च्या शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमाचे निकष  निश्चित करून देण्यात आले आहेत.  यामध्ये  उच्च शैक्षणिक अर्हता, त्यानंतर मागसवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत अ.जा., अ.ज., भ.ज., वि.मा.प्र, वि.जा,भ.ज. व इतर मागास वर्ग त्यानंतर अपंग आणि त्यानंतर माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आणि त्यानंतर वय असा क्रम निश्चित करण्यात आला आहे. यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा समावेश करण्यात आला असून सध्या हा निर्णय परिवहन विभागासाठी लागू करण्यात आला आहे.
शासनाच्या सर्व विभागांना हा निर्णय लागू करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने तसे आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे, अशी मागणी करणारा प्रस्ताव परिवहन विभागाने सादर करावा असे आदेश आपण विभागाला दिल्याचेही श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.
नवीन चालकांना द्यावे लागणार शपथपत्र
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आस्‍थापनेवर 7630 चालकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पुर्णत्वास येत असून, या भरतीद्वारे नेमणूक करण्यात येणाऱ्या सर्व चालकांकडून ते कामावर असतांना तंबाखू, दारू तसेच इतर नशापान करणार नाहीत, असे शपथपत्र घेतले जाईल, हे शपथपत्र दिल्याशिवाय नोकरीवर रूजू करून घेण्यात येणार नाही, असे आदेशही विभागाने निर्गमित केले आहेत.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा