नाशिक, दि. 4- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हरितकुंभ संकल्पनेंतर्गत आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून. 5 जून रोजी शहर-परिसरातील नदीकाठावर
‘गोदावरी स्वच्छता अभियान’ राबविण्यात येणार आहे.
विविध शासकीय-निमशासकीय विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच सव्वाशे सामाजिक-शैक्षणिक संस्था सुमारे 22 हजार स्वच्छतादूतांसह नदीकाठच्या 69 ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. नाशिककर जनतेनेही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यंदाच्या सिंहस्थ-कुंभमेळ्यातील हरितकुंभ संकल्पनेतून विविध पर्यावरणपूरक उपक्रम शहरात राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत पर्यावरण दिनानिमित्त गोदावरी, कपिला, वाघाडी, नासर्डी या नदीकाठच्या परिसरासह शहरातील सर्व बसस्थानके, मार्केट यार्ड, भाजी मार्केट, घाट, पूल,
शहरातील चौक,
रस्ते अशा 69 ठिकाणी ही व्यापक स्वच्छता मोहिम सकाळी 7 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे.
सहभागी प्रत्येक समूहावर नेमून दिल्याप्रमाणे विशिष्ट भाग स्वच्छ करावा लागणार आहे.
या स्वच्छता अभियानात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांचेसह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,पोलीस आयुक्त एस्.जगन्नाथन्, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदी वरिष्ठ अधिकारी आणि सर्व विभागांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.
विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, प्रांताधिकारी-तहसील कार्यालये, एस.टी.,
महावितरण, एमटीडीसी, एमआयडीसी,जीवन प्राधिकरणासारख्या शासकीय-निमशासकीय विभागांबरोबरच शहरातील विविध शैक्षणिक संस्था, समाजकार्य महाविद्यालये, सामाजिक संस्था, महिला मंडळे, घरेलू कामगार संघटना, भारतीय कामगार महासंघ, महिला बचत गट,
आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप्स, नेहरु युवा केंद्र, क्रीडा शिक्षक संघटना, प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालय, हिंदू जनजागृती समिती आदी सामाजिक- सेवाभावी संस्थांचे सुमारे 22 हजार स्वच्छतादूत या अभियानांतर्गत नाशिक शहर-परिसराची स्वच्छता करणार आहेत.
या स्वच्छता अभियानासाठी नाशिक महानगरपालिकेने प्रत्येक ठिकाणी स्वच्छता संपर्क सहाय्यकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नाशिक शहर व परिसरातील जनतेने ‘गोदावरी स्वच्छता अभियाना’त सहभागी होऊन ‘स्वच्छ,सुंदर-हरित नाशिक’ करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
* * * * * * * * * *
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा