शुक्रवार, ५ जून, २०१५

“जय महाराष्ट्र” कार्यक्रमातून संकल्प स्वच्छतेचा

मुंबई, दि. 4 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात संकल्प स्वच्छतेचा या कार्यशाळेचा वृत्तांत दि. 5 जून रोजी रात्रौ 7.15 ते 8 या वेळेत दाखविण्यात येईल.
          स्वच्छतेच्या संकल्पासह राज्यात स्वच्छ अभियानाला नियोजनबद्ध पद्धतीने सुरुवात करण्यात आली असून नगरविकास विभागाच्यावतीने संकल्प स्वच्छतेचा या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्त्रबुद्धे, लोकप्रिय अभिनेते आमीर खान, नगरविकास विभागाच्या सचिव आणि अभियानाच्या नोडल सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, कोकण विभागाचे आयुक्त राधेश्याम मोपलवार, नगर परिषद प्रशासनाच्या संचालिका तथा आयुक्त मीता राजीव लोचन, कोकण विभागातील महापालिकांचे महापौर, आयुक्त, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, कचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ या कार्यशाळेला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता अभियानाचेमहत्व उपस्थितांना सांगून शासनाचे संपूर्ण सहकार्य स्थानिक प्रशासन संस्थांना राहील, अशी ग्वाही दिली आणि स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प दिला.
          पुढील काळात स्वच्छतेसाठी जी शहरं पुढाकार घेतील त्यांनाच केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी करुन घ्ज्ञेतले जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
          स्वच्छता अभियान यशस्वी करण्याचा संकल्प मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केला.
          कोणत्याही गोष्टीचा ध्यास असल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही त्यामुळे महाराष्ट्र आणि पर्यायाने देश स्वच्छ करण्याचा ध्यास निर्माण झाला तर महाराष्ट्र देशातील पहिले कचरा मुक्त राज्य बनेल, असा विश्वास लोकप्रिय अभिनेते आमीर खान यांनी व्यक्त केला.
          स्वच्छतेचा प्रश्न हा बहुआयामी आहे. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाबरोबरच स्वयंसेवी संथांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
          स्वच्छ महाराष्ट्र अभियान महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी प्राधान्याने करण्यात येत असलेल्या तसेच आगामी काळात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबद्दल नगरविकास विभागाच्या सचिव आणि अभियानाच्या नोडल सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी उपस्थितांना माहिती दिली तसेच 2 ऑक्टोबर, 2015 पर्यंत राज्यातील किमान 50 शहरे 100 टक्के हागणदारी मुक्त होतील, असा विश्वास व्यक्त केला.
          कोकण विभागाचे विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार यांनी स्वच्छता अभियानात कोकण विभाग आघाडी घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
          स्वच्छता अभियानाविषयी महानगरपालिका, नगरपालिका यांच्याकडून असलेल्या अपेक्षा नगरपरिषद प्रशासनाच्या संचालिका तथा आयुक्त मीता राजीव लोचन यांनी यावेळी मांडल्या.
          तत्पूर्वी झालेल्या उद्‌घाटन सत्रात कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका तसेच पार्श्वभूमी नगरविकास विभागाच्या सहसचिव सीमा ढमढेरे यांनी सादरीकरणातून मांडली.
          दिवसभराच्या कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध शास्त्रोक्त पद्धतींविषयी तज्ज्ञांनी सादरीकरणातून मार्गदर्शन केले.
          कार्यशाळेला उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानाविषयीचा आपला संकल्प व्यक्त केला.
          ही एक दिवसीय कार्यशाळा म्हणजे हरित आणि स्वच्छ महाराष्ट्राचा संकल्प लवकरात लवकर साकार करण्याच्यादृष्टीने उचललेले आश्वासक पाऊल ठरली.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा