गुरुवार, ९ जुलै, २०१५

बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे -जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे

         धुळे, दि. 9 :- धुळे जिल्ह्यात  1 लाख 14 हजार 811 शेतकऱ्यांना बँकांनी 378 कोटी 6 लाख 28 हजार रूपये खरीप पीक कर्ज वाटप  दि. 30 जून अखेर केले आहे.  हे प्रमाण उद्दिष्टाच्या  54 टक्के असून उर्वरित पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे यांनी दिली.
            जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धुळे यांच्या दालनात जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे यांच्या अध्यक्षतेखाली सन 2015-16 या कालावधीतील पीक कर्ज वाटपाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अरविंद बोरसे, भारतीय स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर बुध, बँक ऑफ बडोदाचे मीना, देना बँकेचे दीपक राज, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे संजय गुरव, जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी आर. बी. वीरकर,  कॅनरा बँकेचे गुप्ता, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अशोक देसले, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दत्तात्रय धनराळे, युको बँकेचे सहाय्यक प्रबंधक गोपाल प्रसाद, राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.
            जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे म्हणाले की, शासनाच्या पीक विमा योजनेबाबत सर्व बँकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना माहिती देऊन जास्ती-जास्त शेतकऱ्यांना पीक विमा घेण्यासाठी प्रवृत्त करावे.  जेणेकरून नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल.  महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना लागू केली आहे.  या योजनेचाही शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी त्यांचे प्रस्ताव तालुका उप, सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000000

धुळे मनपा क्षेत्रात मुलींचा जन्मदर समाधानकारक -डॉ.संजय पाटील

          धुळे, दि. 9 :- धुळे महानगरपालिका क्षेत्रात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर समाधानकारक आहे.  ही स्वागतार्ह बाब आहे,  मुलींच्या जन्मदरात उत्तरोत्तर वाढ व्हावी यासाठी प्रबोधन करण्याचे काम अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी करावे, असे प्रतिपादन धुळे महानगरपालिका पीसीपीएनडीटी समितीचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले.
            महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयातील सभागृहात पीसीपीएनडीटी समितीची बैठक डॉ.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, आरोग्याधिकारी डॉ.महेश मोरे, कायदेशिर सल्लागार ॲड. विवेक सूर्यवंशी, बालरोग तज्ज्ञ    डॉ. हर्षदा मदाणी, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सरोज कदम, पीसीपीएनडीटी प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, झोनल ऑफिसर डॉ.अविनाश पाटील, डॉ.विजय बागुल, डॉ.जगदीश पाटील, डॉ. आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.
            धुळे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मुलींचा जन्मदर वाढत आहे.  सन 2014-15 या वर्षात मुलींचा जन्मदर दरहजारी मुलांच्या तुलनेत 970 एवढा नोंदविला गेला आहे.  हा जन्मदर वाढून समाजात मुलांचे व मुलींचे प्रमाण समान व्हावे, अशी अपेक्षाही डॉ. संजय पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
       समाजात मुलींचे प्रमाण वाढावे, स्त्री भ्रूणहत्या होऊ नये, प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करू नये  यासाठी  धुळे महानगरपालिका क्षेत्रात जनजागृती करण्यात यावी.  यात पथनाटय, प्रदर्शने, चित्रकला स्पर्धा अशा विविध माध्यमांचा वापर करावा, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

00000

चांदवड येथील महाआरोग्य शिबीरात 1207 रुग्णांची तपासणी व औषधोपचार

      नाशिक दि. 09 : चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित महाआरोग्य शिबीरात 1207 रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यांत आले अशी  माहिती चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिली.
          यावेळी ट्रामा केअर युनिट, अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाचे उदघाटन पालकमंत्री  गिरीष महाजन , सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते नुकतेच करण्यांत आले.  यानंतर  महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते.  या शिबीरात नेत्ररोगाचे 594, अस्थिरोग 245, मेडिसीन 192, कान-नाक-घसा 32, स्त्रीरोग 84 इतर 60 असे एकूण 1207 रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यांत आले.
          रुग्णांच्या तपासण्या जे. जे. हॉस्पीटलचे डीन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (नेत्रतज्ज्ञ), नेत्रचिकित्सक डॉ. रागिणी पारीख, बी.जे. मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. अजय चंदनवाले, डॉ. दिलीप कदम, बालरोगतज्ज्ञ डॉ. नितू कुटे, ट्रामा हॉस्पीटलच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजश्री कटके, एम.एस. वैद्य हॉस्पीटलचे डॉ. विक्रम वैद्य यांनी केल्या.
          या शिबिराचे आयोजन आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ई. डी. माले यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यांत आले होते.

0 0 0