गुरुवार, ९ जुलै, २०१५

बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे -जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे

         धुळे, दि. 9 :- धुळे जिल्ह्यात  1 लाख 14 हजार 811 शेतकऱ्यांना बँकांनी 378 कोटी 6 लाख 28 हजार रूपये खरीप पीक कर्ज वाटप  दि. 30 जून अखेर केले आहे.  हे प्रमाण उद्दिष्टाच्या  54 टक्के असून उर्वरित पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे यांनी दिली.
            जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धुळे यांच्या दालनात जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे यांच्या अध्यक्षतेखाली सन 2015-16 या कालावधीतील पीक कर्ज वाटपाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अरविंद बोरसे, भारतीय स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर बुध, बँक ऑफ बडोदाचे मीना, देना बँकेचे दीपक राज, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे संजय गुरव, जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी आर. बी. वीरकर,  कॅनरा बँकेचे गुप्ता, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अशोक देसले, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दत्तात्रय धनराळे, युको बँकेचे सहाय्यक प्रबंधक गोपाल प्रसाद, राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.
            जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे म्हणाले की, शासनाच्या पीक विमा योजनेबाबत सर्व बँकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना माहिती देऊन जास्ती-जास्त शेतकऱ्यांना पीक विमा घेण्यासाठी प्रवृत्त करावे.  जेणेकरून नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल.  महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना लागू केली आहे.  या योजनेचाही शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी त्यांचे प्रस्ताव तालुका उप, सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा