गुरुवार, ९ जुलै, २०१५

धुळे मनपा क्षेत्रात मुलींचा जन्मदर समाधानकारक -डॉ.संजय पाटील

          धुळे, दि. 9 :- धुळे महानगरपालिका क्षेत्रात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर समाधानकारक आहे.  ही स्वागतार्ह बाब आहे,  मुलींच्या जन्मदरात उत्तरोत्तर वाढ व्हावी यासाठी प्रबोधन करण्याचे काम अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी करावे, असे प्रतिपादन धुळे महानगरपालिका पीसीपीएनडीटी समितीचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले.
            महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयातील सभागृहात पीसीपीएनडीटी समितीची बैठक डॉ.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, आरोग्याधिकारी डॉ.महेश मोरे, कायदेशिर सल्लागार ॲड. विवेक सूर्यवंशी, बालरोग तज्ज्ञ    डॉ. हर्षदा मदाणी, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सरोज कदम, पीसीपीएनडीटी प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, झोनल ऑफिसर डॉ.अविनाश पाटील, डॉ.विजय बागुल, डॉ.जगदीश पाटील, डॉ. आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.
            धुळे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मुलींचा जन्मदर वाढत आहे.  सन 2014-15 या वर्षात मुलींचा जन्मदर दरहजारी मुलांच्या तुलनेत 970 एवढा नोंदविला गेला आहे.  हा जन्मदर वाढून समाजात मुलांचे व मुलींचे प्रमाण समान व्हावे, अशी अपेक्षाही डॉ. संजय पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
       समाजात मुलींचे प्रमाण वाढावे, स्त्री भ्रूणहत्या होऊ नये, प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करू नये  यासाठी  धुळे महानगरपालिका क्षेत्रात जनजागृती करण्यात यावी.  यात पथनाटय, प्रदर्शने, चित्रकला स्पर्धा अशा विविध माध्यमांचा वापर करावा, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा