मुंबई, दि. 11 : महानगरपालिका
निवडणुकीच्या मतदार यादीसंदर्भातील हरकती आणि सूचना संबंधित महानगरपालिकेत 12 ते 17
जानेवारी 2012 या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत, तसेच निवडणूक होत असलेल्या दहा
महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांसाठी 9225320011 या क्रमांकावर हेल्पलाईनची आणि 56677
या क्रमांकावर एसएमएसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त
नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली.
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे,
पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या दहा महानगरपालिकांच्या
सार्वत्रिक निवडणुका 16 फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहेत. त्यासाठी 5 जानेवारी 2012
रोजी मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असून या मतदार यादीवरून महानगरपालिका निवडणुकीसाठी
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 12 जानेवारी 2012 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर
17 जानेवारी 2012 पर्यंत संबंधित महानगरपालिका किंवा महानगरपालिकेने निर्देशित केलेल्या
ठिकाणी मतदारांना हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 23 जानेवारी 2012 रोजी प्रभागनिहाय
मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जातील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याची घटनात्मक जबाबदारी राज्य निवडणूक
आयोगावर सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना मतदार याद्यांचा कार्यक्रम
योग्यरीतीने राबविणे आवश्यक असल्याने आयोगाने आवश्यक ती काळजी घेतली आहे.
हेल्पलाईन आणि संकेतस्थळ
या दहा महानगरपालिका क्षेत्रातील
मतदारांना मतदार यादीतील आपले नाव, त्यासंदर्भातील तपशील आणि मतदान केंद्राबाबतची माहिती
मिळविण्यासाठी 9225320011 या हेल्पलाईन सुविधेचा लाभ घेता येईल. ही हेल्पलाईन सकाळी
8 ते रात्री 8 या वेळेत कार्यरत राहील.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या
दृष्टीने www.mahasec.com हे अद्ययावत संकेतस्थळही
तयार केले आहे. या संकेतस्थळावर संबंधित महानगरपालिकांच्या निवडणूकविषयक संकेतस्थळाचीही
लिंक उपलब्ध आहे. त्याद्वारेदेखील मतदारांना मतदारयादीतील आपले नाव शोधता येईल. तसेच
या संकेतस्थळांवर प्रभागाचा नकाशा आणि अन्य तपशीलही उपलब्ध असल्याचे श्रीमती नीला सत्यनारायण
यांनी सांगितले.
मतदारांना एसएमएसद्वारे माहिती
मतदारांना मतदार यादीतील आपल्या
नावाबाबतची माहिती 56677 क्रमांकावर मिळू शकेल. या एसएमएससेवेसाठी प्रत्येक महापालिकेसाठी
स्वतंत्र कोड तयार करण्यात आला आहे. महापालिकानिहाय कोड असे : मुंबई- mcgm, पुणे- pmc,
नागपूर- nmc, पिंपरी-चिंचवड- pcmc, नाशिक- nsmc, अकोला- akmc, अमरावती- ammc, सोलापूर-
smc, ठाणे- tmc आणि उल्हासनगर- umc.
माहिती मिळविण्यासाठी मतदाराचे नाव आणि वय इंग्रजीत
टाईप करून 56677 या क्रमांकावर एसएमएस पाठवल्यास आपल्याला माहिती मिळू शकेल. उदा. मुंबई
महानगरपालिका क्षेत्रातील मतदारास माहिती हवी असल्यास `voter <स्पेस>
mcgm <स्पेस> rahul
ramchandra rane <स्पेस> 35`†ÃÖê
टाईप करून 56677 या क्रमांकावर एसएमएस पाठवल्यास आपल्याला माहिती मिळेल.
गडचिरोलीत दोन टप्प्यात मतदान
सुरक्षिततेच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन टप्प्यात घेण्याचा
निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज,
आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चार्मोशी आणि मुलचेरा या 8 तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी
आणि पंचायत समित्यांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 7 फेब्रुवारी 2012 रोजी मतदान होईल. अहेरी,
एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या 4 तालुक्यांतील जिल्हा परिषद गटांसाठी आणि पंचायत
समित्यांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार 12 फेब्रुवारी 2012 रोजी मतदान होईल. जिल्ह्यातील
सर्व ठिकाणी एकाच दिवशी 14 फेब्रुवारी 2012 रोजी मतमोजणीस होईल.
0-0-0