सोमवार, ५ मार्च, २०१२

नागपूर इन्फोसिसमधून येत्या दहा वर्षात 14 हजार अभियंत्यांना रोजगार .. मुख्यमंत्री सामजंस्य करारामुळे मिहानला गती


नागपूर,दिनांक 04:  येत्या दहा वर्षात 14 हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या इन्फोसिस कंपनी सोबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा आज मिहान विशेष आर्थिक झोन मधील केंद्रीय सुविधा इमारतीच्या सभागृहात सामंजस्य करार झाला. या ऐतिहासिक समारंभास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री  मुकूल वासनिक उपस्थित होते.            
             एम.एडी.सी.चे उपाध्यक्ष यू.पी.एस. मदान, आणि इन्फोसिस कंपनीचे  व्यवस्थापकीय संचालक  व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी.  शिबुलाल यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.
            मिहान परिसरात इन्फोसिस कंपनीस 142 एकर जागा देण्यात आली आहे. येत्या तीन वर्षात कंपनीचे प्राथमिक काम पूर्ण करण्यात येईल. पहिल्या पाच वर्षात 100 कोटी रूपयांची गुंतवणूक करून दोन हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
            इन्फोसिस कंपनीचे नागपुरातील केंद्र महाराष्ट्रातील दुसरे केंद्र असून देशातील  बारावे विकास केंद्र आहे. पुणे हे राज्यातील इन्फोसिस कंपनीचे न पहिले केंद्र आहे. पुण्यात 28 हजार लोकांना प्रत्यक्ष तर 75000 लोकांना अप्रत्यक्षपणे  इन्फोसिस कंपनीत रोजगार मिळाला आहे.
                                                मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
            या सामंजस्य करार समारंभात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,  मिहानच्या स्वप्नपूर्तीचे इन्फोसिस कंपनी ही एक नवे पाऊल आहे.  " एव्हिएशन हब " निर्माण करण्याचे वेगाने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात नागपुरात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण होऊन येथील विशेष आर्थिक क्षेत्राचा झपाट्याने विकास होण्यास मदतच होणार आहे.
            विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीबदल बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, या धावपट्टीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादन व पुनर्वसन या दोन्ही प्रक्रिया सोबत चालवायच्या असल्यामुळे ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील. धावपट्टी निर्मितीसाठी कंत्राट देण्याची प्रक्रिया सुध्दा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी  यावेळी सांगितले.
                                                                                                                                    ..2 ..

इन्फोसिसमधून 10 वर्षात 14 हजार अभियंत्यांना नोकऱ्या     ..2..
                                   
                                                                        मुकुल वासनिक
            इन्फोसिस कंपनी ही आय.टी क्षेत्रातील कोहिनूर आहे. मुख्यमंत्री एम.ए.डी.सी कंपनीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी व्यक्तिश: विशेष आर्थिक क्षेत्रात मोठया कंपन्या येण्यासाठी प्रयत्न केले.  मिहानसाठी जमीन देणाऱ्या भूमिपुत्रांना योग्य मोबदला मिळावा म्हणून, काही  नवे निर्णयही घेतले.   यासाठी मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीची साथ मिळाली. त्यामुळे विदर्भातील  मिहान प्रकल्पात लवकरच मोठया कंपन्या येतील यात शंका नाही. मिहान मध्ये उद्योगांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत, असेही मुकुल वासनिक यांनी आपल्या भाषणात सांगितले.
                                                                  एस. डी. शिबुलाल
       नागपूर हे भारतातील मध्यवर्ती ठिकाण आहे. आसपासच्या परिसरात 70 च्यावर अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सुविधाही मिहानमध्ये असल्यामुळे इन्फोसिस कंपनीने येथे विकास केन्द्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकरी एस.डी. शिबुलाल यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्यानंतर उपस्थितांसमोर आपले मनोगत  व्यक्त केले.
            महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यू.पी.एस. मदान यांनी यावेळी पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मिहानच्या सोयी सुविधांचे वृत्तचित्रही पाहुण्यांना दाखविण्यात आले.
या समारंभास पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोहयोमंत्री डॉ. नितिन राऊत, अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक, इन्फोसिस कंपनीचे उपाध्यक्ष चंद्रकेतू झा, निलाग्री, मृत्यूंजय सिंग, आमदार सर्वश्री. सुनील केदार, दीनानाथ पडोळे, एस. क्यू. जमा, विजय घोडमारे, निलेश पारवेकर, माजी आमदार यादवराव देवगडे, रमेश बंग,सतीश चतुर्वेदी, रोहिदास पाटील, गेव्ह आवारी, अशोक धवड, जि.प. अध्यक्ष सुरेश भोयर, नाना गावंडे, दीपक काटोले, बाबा डवरे, वेदचे विलास काळे, विदर्भ इंन्डस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल दोशी, जयप्रकाश गुप्ता, विकास ठाकरे, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव अजीत कुमार जैन, सचिव डॉ. पी.एस. मीना, विशेष कार्य अधिकारी एस. शहजाद हुसेन, विभागीय आयुक्त वेणू गोपाल रेड्डी, पोलिस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय, जिल्हाधिकारी सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अमित सैनी  उपस्थित होते                                                                 
            कार्यक्रमाचे संचालन एम.ए.डी .सी जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी केले.
                                                                        ****

गेट वे ऑफ इंडिया 6 ते 12 मार्च पर्यटकांसाठी बंद


मुंबई, दि. 3 : गेट वे ऑफ इंडिया 6 ते 12 मार्च 2012 या कालावधीत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
        गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र, काही कारणास्तव 6 ते 12 मार्च 2012 या कालावधीत गेट वे ऑफ इंडिया बंद ठेवण्यात येणार आहे. याची कृपया पर्यटकांनी नोंद घ्यावी.
0 0 0 0

व्यवसाय वाढीसाठी आव्हानांचा सामना करतांना नाविन्याचा शोध घेणे गरजेचे -- जयंत पाटील


मुंबई दि. 3:  व्यवसाय वाढीसाठी आव्हानांचा सामना करताना नाविन्याचा शोध घेणेही गरजेचे असते असे मत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
आम्ही उद्योगिनी पुरस्कारांचे वितरण श्री. पाटील यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एमईडीसीचे अध्यक्ष विठ्ठल कामत, आम्ही उद्योगिनी या संस्थेच्या संस्थापक मीनल मोहाडीकर, बँका तसेच उद्योग क्षेत्रातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
दुसऱ्याने उडी टाकल्यानंतर तो बुडला नाही, तरंगून वर आला तर आपण उडी मारायची अशी वृत्ती उद्योग -व्यवसायासाठी ठीक नाही. व्यवसाय सुरु करतांना येणाऱ्या नवीन आव्हानांचा विचार करून त्याला सामोरे जाण्याची क्षमता आपल्यात विकसित केली पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येत नाही. आपण आव्हान स्वीकारायला घाबरतो. त्याचे मुळ आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे असे मला वाटते असे सांगून श्री. पाटील म्हणाले की, जगाच्या स्पर्धेत उतरण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक चौकट अधिक व्यापक करतांना विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबर पुस्तकाबाहेरचे शिक्षण देण्याचीही गरज आहे असेही ते म्हणाले.
उद्योग-व्यवसाय सुरु केला की त्याचे चांगले पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंग झाले पाहिजे तर तो ब्रॅण्ड विकसित करायला आपल्याला वेळ मिळतो असे सांगून श्री. पाटील पुढे म्हणाले की, राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत सुमारे 2 लाख 60 हजार बचतगट स्थापन झाले आहेत. या बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंच्या आकर्षक पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंग साठी विभागाने तज्ज्ञ बाजारपेठ मार्गदर्शक संस्थेची नियुक्ती करण्याचे ठरवले असून त्यामुळे बचतगटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ व योग्य भाव मिळू शकेल अशी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.
उद्योग- व्यवसाय करताना बाजारपेठेत कोणत्या उत्पादनांचा अभाव किंवा रिक्तता आहे हे लक्षात घेऊन म्हणजे तो गॅप ओळखून आपण कोणते उत्पादन तयार केले पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे म्हणजे उद्योगाचे मॅपिंग केले पाहिजे आणि नंतर ते उत्पादन बाजारपेठेत आणून ती बाजारपेठ टॅप अर्थात काबीज केली पाहिजे असे यशस्वी उद्योगाचे मर्म स्पष्ट करताना विठ्ठल कामत यांनी उत्पादनांच्या ब्रॅण्डिंगचे महत्त्व उपस्थित महिलांना समजावून सांगितले.
श्रीमती मीनल मोहाडीकर यांनी यावेळी आम्ही उद्योगिनी या संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची आणि यानिमित्ताने आज पार पडलेल्या राज्यव्यापी उद्योजकांच्या महिला परिषदेचे अनुभव आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही उद्योगिनी या संस्थेच्यावतीने काढण्यात आलेल्या उद्यमशील महिलांच्या मुखपत्राचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
0 0 0 0

डबल डेकर लोकल सुरु कराव्यात नसीम खान यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी


            
            मुंबई, दि. 3 : मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात ने आण करुन उपनगरीय रेल्वे एक महान कार्य करीत आहे. या सेवेवरील दिवसेंदिवस वाढणारा ताण लक्षात घेता मुंबईत डबल डेकर लोकल सुरु कराव्यात तसेच यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात यावा, अशी मागणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ़मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
            दररोज सुमारे 72 लाख प्रवाशांची ने आण करणाऱ्या मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या सेवेमध्ये दर्जेदार सुधारणा होण्यासाठी तसेच लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी केंद्रीय रेल्व मंत्री दिनेश त्रिवेदी यांना लिहिलेल्या पत्रात श्री.खान यांनी 13 मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याच रेल्वे स्थानकांवर फलाट आणि रेल्वेच्या डेकमधील अंतर अत्यंत जास्त  असते  त्यामुळे लहान मुले, महिला, अपंग आणि वृध्दांना चढ-ऊतार करताना त्रास होतो. यामुळे बऱ्याच वेळी अपघातही होतात, हे अंतर कमी आणि सुलभ करण्यात यावे, महिलांच्या डब्यांमध्ये रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत सुरक्षा पुरविण्यात यावी, विविध नागरी सुविधांसह सर्व रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, रेल्वे फलाटांवर स्त्री आणि पुरुषांना (विशेषत: स्त्रियांना) स्वच्छ आणि व्हेंटीलेटेड स्वच्छतागृहे बांधावीत तसेच फलाटांवरील स्टॉल्सवर स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण असावे. अन्नपदार्थांचा दर्जा उत्तम असावा, फलाटांवर सिसिटिव्ही कॅमेऱ्यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असाव्यात,  स्वच्छतागृहे, जिन्याखालील मोकऴ्या जागांमध्ये चालणाऱ्या गैरकृत्यांवर आळा घालावा.
रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्या प्रकाराला पूर्ण आळा घालावा, हेल्पलाईन यंत्रणा कायम कार्यान्वित असावी, प्रत्येक फलाटावर पोलीस उपलब्ध असावेत, बऱ्याच वेळा मलेरियासारख्या साथीच्या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या रेल्वे ट्रॅकच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, रेल्वे ट्रॅकवर येणारे सांडपाणी किंवा रेल्वे मार्गावर येणाऱ्या गटारी नाले आदींबाबत महापालिकेशी समन्वय साधून हे प्रश्न निकाली काढावेत, रेल्वे ट्रॅकवर दरवर्षी साडेतीन हजारापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. ही बाब गंभीर असून याबाबत सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात.
            फैजाबादला सध्या आठवड्यात एकदा जाणारी साकेत एक्सप्रेस दर दिवशी सोडण्यात यावी तसेच ही एक्सप्रेस 3 दिवस सध्याच्याच सुलतानपूर मार्गे सोडण्यात यावी तर 4 दिवस शहागंज-आयोध्यामार्गे सोडण्यात यावी. यामुळे मुंबईतून आयोध्येला जाणाऱ्या यात्रेकरुंची सोय होईल. 
            रेल्वे स्थानके चहुबाजूंनी कायमच खुली असतात, त्यामुळे ही स्थानके अतिरेक्यांचे सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. त्यामुळे सर्वच स्थानकांवर कडक सुरक्षा व्यवस्था करणे गरजेचे आहे, असेही श्री. खान यांनी या पत्रात म्हटले आहे.
000000000

निसर्गमय रंगपंचमीसाठी पर्यावरणपूरक रंगाची उपलब्धता


मुंबई, दि. 3 :  निसर्गमय रंगपंचमी साजरी करण्यासाठी पर्यावरण  विभागांतर्गत  कार्यरत पर्यावरण माहिती प्रणाली (ENVIS) केंद्राद्वारे पर्यावरणपूरक रंगांची उपलब्धता 5 6 मार्च रोजी मंत्रालय मंत्रालयीन परिसरात करून देण्यात येणार आहे.
रंगपंचमीसाठी वापरण्यात येणारे रंग हे घातक धातू अन्य रासायनिक दार्थांचा वापर करून बनविले जात असल्याने  ते मानवी रोग्यास अपायकारक तर आहेतच शिवाय ते पर्यावरणासही घातक ठरत आहे. अशा रंगाच्या वापराऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करणे हितकारक आहे.
पर्यावरण विभागाकडून आयोजित केलेल्या या उपक्रमात हळद, लिंबू रस, तांदूळ पीठ, जास्वंद, निर्गुडी, नीळ ग्लिरीसिडिया या वनस्पतींची पाने इत्यादी नैसर्गिक घटकांपासून हे रंग बनविण्यात आले आहे. हे रंग पुणे येथील इकोएग्झिस्ट (Ecoexist)  या संस्थेमार्फत बनविण्यात आले असून पिवळा, लाल, हिरवा, निळा, केशरी रंगांच्या प्रत्येकी  50 ग्रॅमची पाकिटे उपलब्ध आहेत.
0 0 0 0