सोमवार, ५ मार्च, २०१२

स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे प्रभावी उपाय - रत्नाकर गायकवाड


मुंबई, दि. 3 : महाराष्ट्रात खासदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने प्रभावी पावले उचलली आहेत. राज्याला 90.95 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध झाला आहे. एकुण 829 कामे पूर्ण झाली आहेत तर 700 कामे प्रगती पथावर असून 1529 कामांना सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी आज येथे दिली.
स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात सुरु असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी 1 ते 3 मार्च या कालावधीत राज्यसभेची संसदीय समिती महाराष्ट्रात आली आहे. या समितीचे समन्वयक खासदार गोविंदराव आदिक होते. यावेळी ए.ए.जिन्हा, देवेंद्र वर्मा, शशी बिहारी, बाळ आपटे, पियुष गोयल, माया सिंग, आर.पी.तिवारी, राकेश शर्मा, अनित निर्मल आदी समिती सदस्य उपस्थित होते. राज्य शासनाच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, सा.प्र.वि.चे प्रधान सचिव के.पी.बक्षी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिव मालिनीशंकर, ग्रामविकास विभागाचे सचिव सुधीर ठाकरे, सा.बां.विभागाचे सचिव धनंजय धवड तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, लातूर, जळगाव, नागपूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, यवतमाळ आणि अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
राज्यातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना यशदामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी उपआयुक्त तसेच जिल्हा पातळीवरील अधिकारी यांच्यासाठी लवकरच कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. खासदार फंडातून 1993 साली प्रत्येक खासदारांसाठी 5 लाख रुपयांचा निधी होता. आता या निधीत भरीव वाढ झाली असून  प्रत्येक खासदारांसाठी 5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. त्यामुळे अशी कामे यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळत आहे, असे सांगून श्री.गायकवाड म्हणाले की, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी या विकास कामांचा वारंवार आढावा घेतात. राज्यातील जनतेला समतोल आणि शाश्वत विकास साधणाऱ्या विकास योजना देण्याचा राज्य शासनाचा मुळ उद्देश आहे. एम.यु.टी.पी. आणि वर्ल्ड बँकेच्या अर्थ सहाय्यातून अनेक योजना राज्यात साकारण्यात येत आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शौचालये, बालवाड्या, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेच्या ऑडीटसाठी सर्व जिल्ह्यांत सनदी लेखापाल नियुक्त करण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या योजनांसाठी खासदार फंडातून कामे करण्यास खासदारांना निधी मिळतो. महाराष्ट्राने राज्यात अनेक विकासकामे करुन इतर राज्यांना आदर्श घालून दिला आहे असे, समितीचे समन्वयक खासदार गोविंदराव आदिक यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमाचा आढावा घेतला तर शेवटी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक यांनी आभार मानले.
-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा