शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

नाशिक अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी शारदादेवी चौहाण यांची बिनविरोध निवड


नाशिक, दि. 11 : नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती शारदादेवी चौहाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीमती चौहाण या संगमनेर येथुन प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक सायं. आनंदच्या कार्यकारी संपादिका आहेत. विभागीय समितीच्या अध्यक्षपदी महिला सदस्य विराजमान होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
नाशिक येथील विभागीय माहिती कार्यालयात आज नवनियुक्त विभागीय अधिस्विकृती समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीला सदस्य सर्वश्री  यशंवत भटु पवार (चांदवड, नाशिक), नितीन भालेराव (नाशिक), नवनाथ दिघे (शिर्डी), बळवंत बोरसे (धुळे) उपस्थित होते. नाशिक विभागाचे उपसंचालक व समितीचे सदस्य सचिव सतीश लळीत यांनी सर्व सदस्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.
बैठकीच्या सुरुवातीला श्रीमती चौहाण यांना बैठकीच्या हंगामी अध्यक्षा म्हणुन सर्वानुमते निवडण्यात आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विभागीय समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती चौहाण यांचीच निवड व्हावी, असा प्रस्ताव श्री. यशवंत पवार यांनी मांडला. श्री. नवनाथ दिघे यांनी त्याला अनुमोदन दिले. अन्य सदस्यांनीही या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला. यानंतर श्री. लळीत यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांच्यावतीने श्रीमती चौहाण यांचे अभिनंदन केले. 
सर्वांच्या सहकार्याने काम करु : चौहाण
सर्व सहकारी सदस्यांची प्रतिनिधी म्हणुन आपण काम करणार असुन त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे ठरेल आणि ते आपल्याला मिळेल, असा विश्वास श्रीमती चौहाण यांनी व्यक्त केला. अध्यक्षपद देऊन आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ करु, असे सांगुन त्यांनी सर्वांचे आभार मानले.


सहमतीचा निर्णय महत्वाचा : पवार
            श्रीमती शारदादेवी चौहाण यांना अध्यक्षपदी निवडण्याचा समितीचा निर्णय सहमतीचा असल्याने खुप महत्वाचा आहे, असे सांगुन श्री. यशवंत पवार म्हणाले की, श्रीमती चौहाण या राज्य आणि विभागीय समित्यांवरील एकमेव महिला सदस्य आहेत. त्यांची निवड करण्याच्या आपल्या प्रस्तावाला अनुमोदन देऊन सर्व सदस्यांनी एक चांगला पायंडा पाडला आहे.
पत्रकारांना न्याय देऊ : भालेराव
            श्रीमती चौहाण यांचे अभिनंदन करुन श्री. नितीन भालेराव म्हणाले की, समितीसमोर येणाऱ्या प्रत्येक अर्जावर नि:पक्षपातीपणे व मेरिटनुसार निर्णय घेण्यात येईल. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न समिती करेल.
अभिनंदनीय पायंडा : दिघे
            समितीच्या अध्यक्षपदी महिलेची एकमताने निवड करुन नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीने अभिनंदनीय पायंडा पाडला आहे. नाशिक विभागातील पत्रकारांचे हित जपण्याचा आपण समितीच्या माध्यमातून आटोकाट प्रयत्न करु, असे श्री. नवनाथ दिघे यांनी सांगितले.
पत्रकारांचे हित पाहु : बोरसे
            विभागीय समितीचा सदस्य म्हणुन काम करताना आपण पत्रकारांचे हित साधण्याचा नेहमीच प्रयत्न करु, असे श्री. बळवंत बोरसे यांनी सांगितले. ते म्हणाले की, विभागातील पात्र पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळवुन देण्याचा आपण प्रयत्न करु.
            या बैठकीला नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, अहमदनगरचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, धुळे व नंदूरबारचे जिल्हा माहिती अधिकारी रणजित राजपूत, सहायक संचालक किरण वाघ, माहिती सहायक रवींद्र. म. घोगे उपस्थित होते. श्री. मोघे यांनी आभार मानले.

००००००००

पालघर जिल्ह्याकरिता 524 रिक्त पदे तात्काळ भरणार - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

 मुंबईदि. 10 :- नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर या जिल्ह्याला आवश्यक पदे भरण्याची मागणी सातत्याने होत होती. ही रिक्त पदे भरण्याचा  प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.  याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन लिपिक संवर्गातील 151 पदे व तलाठी संवर्गातील 41 पदे असे 197 पदांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री (महसूल) संजय राठोड यांनी दिली.
          गणेशोत्सव मुहुर्तावर पालघर वासियांना दिलासा द्यावा, त्यांची कामे तात्काळ व प्रभावीपणे व्हावी,  यासाठी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची आग्रही भूमिका होती. त्यांच्या सहकार्यामुळे नवनिर्मित पालघर जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येत असल्याचेही श्री.राठोड यांनी यावेळी सांगितले.
          संपूर्ण राज्यामध्ये तलाठी व लिपिक संवर्गीय पदांच्या भरतीचा निर्णय जुलैमध्ये घेण्यात आला होता. त्यास वित्त विभागाची मान्यता घेऊन वित्त विभागाकडून 75 टक्के रिक्त जागा भरण्याची परवानगी घेण्यात आली आहे आहे. त्यामुळे प्रस्तावित भरतीच्या जागांमध्ये 400 पदांची वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हयातील सरळसेवेतील 49 रिक्त पदे व पालघर जिल्हयातील 106 लिपिक वर्गीय पदांची भरती होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
          नोंदणी विभागात एकूण 918 कनिष्ठ लिपिकांची पदे मंजूर आहेत, त्यापैकी 437 पदे रिक्त आहेत. वेतनावरील खर्च नियंत्रणाकरिता वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 2 जून 2015 अन्वये रिक्त पदांपैकी 50 टक्के किंवा मंजूर पदांच्या 4 टक्के यापैकी जे कमी आहे तेवढेच पदे भरता येतील म्हणजेच नोंदणी विभागात केवळ 37 इतकीच पदे भरता येणार होती. तथापि, नोंदणी विभागाची वसूली ही 19,959/- कोटी इतकी आहे. 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये हे उद्दिष्ट 21,000/- कोटी एवढे आहे. ही वसूली 40 टक्के रिक्त असतांना करणे शक्य नसल्याने रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या भरतीमुळे महसूल विभागाचे रू. 6 हजार कोटींची वसुली व नोंदणी विभागामार्फत होणारी रू.21 हजार कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट येत्या आर्थिक वर्षामध्ये साध्य केले जाणार आहे. महसूल विभागाच्या या प्रस्तावास मान्यता घेऊन 327 कनिष्ठ लिपिकांची पदे भरण्याचा निर्णय सामान्य नागरिकांना दिलासा देणारा असल्याचेही महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.
000

सीईटी परीक्षेसाठी स्वतंत्र कक्ष करावा – विनोद तावडे

मुंबई दि 10 : राज्यातील अभियांत्रिकीऔषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून (सन 2016-17) एकच सामायिक परीक्षा (एमएचटी-सीईटी) होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकनियमावली तयार करण्यासाठी स्वतंत्र सीईटी सेल तयार करावाअसे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अभियांत्रिकीवैद्यकीयशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्रासाठी (2016-17) घेण्यात येणाऱ्या सामायिक परीक्षा अर्थात एमएच-सीईटी संदर्भातील तयारीसाठी आज मंत्रालयात श्री. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदेसामायिक परीक्षेचे आयुक्त निर्मलकुमार देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे सहसंचालकसंबधित अधिकारी उपस्थित होते.
शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व सीईटी परीक्षेचे वेळापत्रक तयार करणेकोणत्या अभ्यासक्रमांना सीईटी आणि कोणत्या अभ्यासक्रमांना कॅप परीक्षा आहे याबाबतही माहिती तयार करावीअशा सूचनाही श्री. तावडे यांनी दिल्या आहेत. वास्तुविद्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश राष्ट्रीय स्तरावरील "नाटाद्वारे (नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्‍चर) घेतले जातात. सदर परीक्षा कुठल्या अभ्यासक्रमावर आधारित असावी याबाबत नियमावली विधी व न्याय विभागाकडून तपासून घ्यावीनर्सिंग क्षेत्रात सध्या कमी मनुष्यबळ दिसत असल्याने नर्सिंग अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा ठेवता येईल का याबाबतही अभ्यास करण्यात यावाडिप्लोमा/पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी माहितीपुस्तिका तयार करण्यात यावीया माहितीपुस्तिकेत विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी असावीअशा सूचनाही श्री. तावडे यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सीईटी परीक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाने सीईटी परीक्षांबाबतचे वेळापत्रकप्रत्येक अभ्यासक्रमाची माहिती व नियमावली तयार करावी आणि सीईटीसाठी स्वतंत्र नोडल ऑफीसर नेमण्यात यावा, असेही श्री. तावडे यांनी या बैठकी दरम्यान स्पष्ट केले.
0000

कोयासन विद्यापीठात अभूतपूर्व उत्साहात पुतळ्याचे अनावरण डॉ. बाबासाहेबांना 125व्या जयंतीवर्षात लंडनपासून टोकियोपर्यंत वैश्विक मानवंदना


मुंबई, दि. 10 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यंदा 125वे जयंती वर्ष साजरे करण्यात येत असतानाच त्यांना आज महाराष्ट्र शासनातर्फे सातासमुद्रापार झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून जणू वैश्विक मानवंदना देण्यात आली. जपानच्या कोयासन विद्यापीठात अपूर्व उत्साहात झालेल्या अनोख्या कार्यक्रमात बाबासाहेबांच्यापूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.बाबासाहेबांचे वास्तव्य असलेली इंग्लंडमधील वास्तू खरेदीची प्रक्रिया मार्गी लावतानाच जपानमधील पुतळ्याच्या अनावरणातून राज्यघटनेच्या थोर शिल्पकाराच्या गौरवाचे एक चक्र जणू राज्य शासनाने पूर्ण केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे यंदा डॉ. बाबासाहेबांचे 125वे जयंती वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे. या वर्षात इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाच्या उभारणीचा प्रश्न सरकारने मार्गी लावला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी बाबासाहेबांचे लंडनमधील वास्तव्य असलेली वास्तू खरेदी करण्याची प्रक्रियाही गेल्याच आठवड्यात मार्गी लागली आहे. या पाठोपाठ आज जपानमधील या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाने बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.
या अतिशय शानदार आणि भावपूर्ण सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा येथील पुतळा महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेकडून कोयासन आणि जपानच्या नागरिकांना दिलेली एक अमूल्य भेट आहे. वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रामदास आठवले, खासदार अमर साबळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे आदी यावेळी उपस्थित होते.
कोयासन आपल्या स्थापनेचे 1200वे वर्ष साजरे करीत असून भारतासह जगभरात बाबासाहेबांचे 125वे जयंतीवर्ष साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे औचित्य जुळून आले आहे, असे गौरवोद्‌गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेब जगातील आघाडीच्या बुद्धिस्ट नेत्यांपैकी एक होते. प्रख्यात विधिज्ञनेते आणि समाजसुधारक अशी त्यांची जगभर ओळख होत. बुद्ध धम्माच तत्त्व आणि शिकवण त्यांनी आयुष्यभर जपली, त्यातून त्यांनी अनेकांचे आयुष्य समृद्ध केले.
बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी भारतीय समाज विषमताग्रस्त होता. मात्र त्यांनी समतेच्या मुल्यांची आम्हास शिकवण दिली. समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ते आग्रही होते. त्यादृष्टीने त्यांनी भारतीय राज्यघटनेत विविध बाबींची तरतूद केली. बाबासाहेबांनी जेथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्याच नागपूर शहरातून मी आलो आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही भावोत्कट उद्‌गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारणीच्या कार्यात सहकार्य केल्याबद्दल वाकायामाचे गव्हर्नर निसाका आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह कोयासन मंदिर व्यवस्थापन आणि कोयासन विद्यापीठाचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
वाकायामाचे गव्हर्नर श्री. निसाका यावेळी म्हणाले, जपानमधील कोयासनसारख्या बौद्धसंस्कृतीच्या सर्वाधिक प्राचीन अध्ययन केंद्रात बाबासाहेबांचे स्मारक होणे ही बाब अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि गौरवास्पद आहे. येथील बुद्ध‍िस्ट सॅंक्च्युरीचे प्रवर्तक भंते कोबो डायशी यांनी भारतातील बौद्ध परंपरांचा जपानला परिचय करून दिला. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी आधुनिक भारताला पुन्हा बौद्ध तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली. जपानमधील पर्यटक भविष्यात अजिंठा, वेरूळ या बौद्ध संस्कृतीच्या प्रमुख पर्यटन केंद्रांसह नागपूरची दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसलाही मोठ्या प्रमाणात भेटी देतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोयासन विद्यापीठाचा परिसर आज सकाळपासूनच गजबजून गेला होता. मुख्यमंत्र्यांसह या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र संस्कृतीचे प्रतीक म्हणून उपस्थित पाहुण्यांसह जपानी नेत्यांनीही उत्साहात भगवे फेटे बांधले. तुतारी वाजवून सर्वांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण भारावलेले होते. यानिमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे डॉ. आंबेडकर आणि बुद्धिझम याविषयावरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात पोवाडे व लेझीम नृत्याचा समावेश होता.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोसायन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू यावेळी उपस्थित होते. या दोन्ही विद्यापीठांमध्ये संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर या करारातून भर देण्यात आला आहे.
दरम्यान आज सकाळी वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांनी मुख्यमंत्र्यांचेस्वागत केले. त्यासोबत त्यांनी कोयासन येथे बौद्ध भिक्खूंसोबत प्रार्थना करण्यासोबतच 1200 वर्षे जुन्या कोयासन सॅंक्च्युरी येथील बौद्ध भिक्खू कोबो डायशी यांच्या पुतळ्याला तामागावा नदीचे शुद्ध जल अर्पण केले.  
00000