शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

नाशिक अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी शारदादेवी चौहाण यांची बिनविरोध निवड


नाशिक, दि. 11 : नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती शारदादेवी चौहाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीमती चौहाण या संगमनेर येथुन प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक सायं. आनंदच्या कार्यकारी संपादिका आहेत. विभागीय समितीच्या अध्यक्षपदी महिला सदस्य विराजमान होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
नाशिक येथील विभागीय माहिती कार्यालयात आज नवनियुक्त विभागीय अधिस्विकृती समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीला सदस्य सर्वश्री  यशंवत भटु पवार (चांदवड, नाशिक), नितीन भालेराव (नाशिक), नवनाथ दिघे (शिर्डी), बळवंत बोरसे (धुळे) उपस्थित होते. नाशिक विभागाचे उपसंचालक व समितीचे सदस्य सचिव सतीश लळीत यांनी सर्व सदस्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.
बैठकीच्या सुरुवातीला श्रीमती चौहाण यांना बैठकीच्या हंगामी अध्यक्षा म्हणुन सर्वानुमते निवडण्यात आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विभागीय समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती चौहाण यांचीच निवड व्हावी, असा प्रस्ताव श्री. यशवंत पवार यांनी मांडला. श्री. नवनाथ दिघे यांनी त्याला अनुमोदन दिले. अन्य सदस्यांनीही या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला. यानंतर श्री. लळीत यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांच्यावतीने श्रीमती चौहाण यांचे अभिनंदन केले. 
सर्वांच्या सहकार्याने काम करु : चौहाण
सर्व सहकारी सदस्यांची प्रतिनिधी म्हणुन आपण काम करणार असुन त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे ठरेल आणि ते आपल्याला मिळेल, असा विश्वास श्रीमती चौहाण यांनी व्यक्त केला. अध्यक्षपद देऊन आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ करु, असे सांगुन त्यांनी सर्वांचे आभार मानले.


सहमतीचा निर्णय महत्वाचा : पवार
            श्रीमती शारदादेवी चौहाण यांना अध्यक्षपदी निवडण्याचा समितीचा निर्णय सहमतीचा असल्याने खुप महत्वाचा आहे, असे सांगुन श्री. यशवंत पवार म्हणाले की, श्रीमती चौहाण या राज्य आणि विभागीय समित्यांवरील एकमेव महिला सदस्य आहेत. त्यांची निवड करण्याच्या आपल्या प्रस्तावाला अनुमोदन देऊन सर्व सदस्यांनी एक चांगला पायंडा पाडला आहे.
पत्रकारांना न्याय देऊ : भालेराव
            श्रीमती चौहाण यांचे अभिनंदन करुन श्री. नितीन भालेराव म्हणाले की, समितीसमोर येणाऱ्या प्रत्येक अर्जावर नि:पक्षपातीपणे व मेरिटनुसार निर्णय घेण्यात येईल. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न समिती करेल.
अभिनंदनीय पायंडा : दिघे
            समितीच्या अध्यक्षपदी महिलेची एकमताने निवड करुन नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीने अभिनंदनीय पायंडा पाडला आहे. नाशिक विभागातील पत्रकारांचे हित जपण्याचा आपण समितीच्या माध्यमातून आटोकाट प्रयत्न करु, असे श्री. नवनाथ दिघे यांनी सांगितले.
पत्रकारांचे हित पाहु : बोरसे
            विभागीय समितीचा सदस्य म्हणुन काम करताना आपण पत्रकारांचे हित साधण्याचा नेहमीच प्रयत्न करु, असे श्री. बळवंत बोरसे यांनी सांगितले. ते म्हणाले की, विभागातील पात्र पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळवुन देण्याचा आपण प्रयत्न करु.
            या बैठकीला नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, अहमदनगरचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, धुळे व नंदूरबारचे जिल्हा माहिती अधिकारी रणजित राजपूत, सहायक संचालक किरण वाघ, माहिती सहायक रवींद्र. म. घोगे उपस्थित होते. श्री. मोघे यांनी आभार मानले.

००००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा