शुक्रवार, २४ जुलै, २०१५

दहिवद येथे 29 जुलै रोजी ‘रोजगार मेळावा’

        धुळे, दि. 24 :- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, धुळे व रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि., दिसान कोटेक्स प्रा. लि. दहिवद ता. शिरपूर जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार   दि. 29 जुलै, 2015 रोजी सकाळी 11-00 वाजता ‍ शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि. येथे इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण असलेल्या  उमेदवारांच्या रोजगार सहाय्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या रोजगार मेळाव्याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
             या मेळाव्यासाठी रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि. व दिसान कोटेक्स प्रा. लि. दहिवद येथील उद्योजक मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची जागेवरच निवड करणार आहेत.  त्‍यासाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलेल्या किमान एस.एस.सी., एच.एस.सी. उत्तीर्ण व 18 ते 35 वर्षे या वयोमर्यादेतील ज्या उमेदवारांची खाजगी क्षेत्रातील उद्योजकांकडे काम करण्याची तयारी आहे, त्यांनी उपस्थित रहावे.  सोबत येतांना शैक्षणिक प्रमाणपत्र,  बायोडाटा यासह स्व:खर्चाने उपस्थित रहावे, असेही पत्रकात नमूद केले आहे.

000000000

जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते तंबाखू मुक्त शाळा आणि परिसर भित्तीपत्रकाचे विमोचन

        धुळे, दि. 24 :- येथील समर्थ कॅन्सर फाऊन्डेशन तर्फे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते तंबाखू मुक्त शाळा आणि परिसर या उपक्रमांतर्गत भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, बीआरजीएफ योजनेचे समन्वयक अशोक पाटील, फाऊन्डेशनचे मुख्य विश्वस्त डॉ. तुषार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
         जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, उपचार करण्यापेक्षा उपाययोजना राबविणे महत्वाचे असते.  तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने शारिरीक हानी  होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर रहावे, असे यावेळी सांगितले.
        डॉ. तुषार पाटील म्हणाले की, शहरातील समर्थ कॅन्सर फाऊन्डेशन अनेक वर्षांपासून कॅन्सर मुक्ततेसाठी विशेष प्रयत्न करीत आहे.  शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही वर्षात तंबाखूजन्य पदार्थांचे आकर्षण वाढत आहे.  त्यामुळे सहाजिकच कॅन्सरग्रस्त रूग्णांची संख्या वाढत चालली  आहे.  त्यासाठी तंबाखूमुक्त शाळा आणि महाविद्यालय हा उपक्रम घेऊन जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.  या उपक्रमांतर्गत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दर्शविणारे भित्तीपत्रक तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

0000000

रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यांवर वाहतुकीची चिन्हे व गतिरोधके बसवा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे, दि. 24 :- जिल्ह्यात रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित  ठेवणे आवश्यक आहे. रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर, शहरातील रस्त्यांवर वाहतुकीची चिन्हे, वेग मर्यादा फलक आवश्यक तेथे गतिरोधके संबंधित यंत्रणांनी 15 दिवसाच्या आंत बसवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज दिल्या.
            गतिरोधक समिती व रस्ता सुरक्षा उपाययोजना समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, महानगरपालिका उपआयुक्त     डॉ. प्रदीप पठारे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, मनपाचे अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. भदाणे, उप अभियंता एस.डी. सूर्यवंशी,  राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 चे  प्रकल्प संचालक  एम. के. वाठोरे,  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  एन. आर. जगदाळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सी. डी. थवील, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक  अशोक देवरे आदि उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, गतिरोधक समिती व रस्ता सुरक्षा करावयाच्या उपाय योजना समितीच्या दि. 10 मार्च, 2015 रोजी झालेल्या सभेतील विषयानुसार  राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर, सुरत-धुळे रस्ता, पारोळा रोड, शिवाजी पुतळा चौक,  धुळे मनपा हद्दीतील जिल्हा न्यायालय समोरील स्टेशनरोड, चाळीसगाव रोड, 80 फुटीरोड चौफुली आदि रस्त्यांवर गतिरोधके बसविण्याची, वाहतुकीची चिन्हे, वेगमर्यादा फलक लावण्याची कार्यवाही करावी.  जेणेकरून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल.  त्यामुळे वाहन चालकांना वाहनांचा वेग नियंत्रीत करणे सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
            उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची, पार्कींग लॉटस करण्यासाठी समितीच्या अहवालाची माहिती  यावेळी दिली.
0000000


शहरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हॉकर्स, पार्कींग, वाहतूक सिग्नल व्यवस्थेसाठी समन्वय साधावा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 24 :- शहरात रस्त्यावरील वाहतूक  सुरक्षित ठेवणे  आवश्यक आहे.  शहरातील  वाहतुकीची कोंडी होणार नाही याकरिता पोलीस, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागांनी  हॉकर्स, सार्वजनिक पार्कींग तसेच वाहतूक सिग्नल आदींची व्यवस्था समन्वयाने करण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात धुळे शहरातील वाहतूक समस्या बाबतची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे,  उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे(धुळे) राहूल पाटील (शिरपूर), महानगरपालिका उपआयुक्त  डॉ. प्रदीप पठारे, मनपाचे अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. भदाणे, नगररचनाकार एस. बी. विसपुते, उप अभियंता एस.डी. सूर्यवंशी,  राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 चे  प्रकल्प संचालक  एम.के. वाठोरे,  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  एन. आर. जगदाळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सी. डी. थवील, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक  अशोक देवरे आदि उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, महानगरपालिकेने स्थानिक हॉकर्सच्या मागणीनुसार शहरातील विविध भागांमध्ये महानगरपालिकेच्या असलेल्या जागांवर त्यांची पर्यायी व्यवस्था  करून द्यावी. त्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल, असेही त्यांनी सांगितले.
            शहरातील  सार्वजनिक पार्कींग व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी म्हणाले की, शहरातील महानगरपालिका शाळा क्र. 1, देवपूर, साक्रीरोड, भारतीय स्टेट बँक  अशा भागात दुचाकी, चार चाकी वाहनांकरिता स्वतंत्र पार्कींग व्यवस्था करून त्याठिकाणी त्याबाबतचे फलक लावण्याची व्यवस्था महानगरपालिकेने करावी.  त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे.  वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होणार नाही अशी अतिक्रमणे काढावीत.  शहरातील सावरकर पुतळयाजवळ असलेल्या फर्निचर दुकानदारांनी रस्त्यावर वस्तु ठेऊ नये, ठेवल्यास त्या वस्तु जप्त करण्याची कारवाई संबंधितांनी करावी. तसेच जाहिरात फलकांचा कायम आणि तात्पुरत्या स्वरूपाचा आराखडा महानगरपालिकेने त्वरित करावा.
            पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील म्हणाले की, शहरातील आग्रा रोड, संतोषी माता चौक तसेच जास्त वर्दळीच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजुला पांढरे पट्टे टाकावेत.  त्यामुळे संबंधित परिसरातील दुकानदार आपल्या वस्तुंचे प्रदर्शन रस्त्यावर करणार नाहीत.  तसेच शहरातील एस. टी. बसेस थांब्याच्या डाव्या बाजुस थांबवून प्रवाशांची वाहतूक करणे आवश्यक आहे.  त्यासाठी एस. टी. महामंडळाकडून बसचालकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.  जेणेकरून  रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहील, असेही त्यांनी सांगितले.
000000