बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

दहावीतील नापास विद्यार्थ्यांवरील शिक्का पुसण्यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम - विनोद तावडे

मुंबई दि 9 : दहावी फेरपरीक्षा लगेचच घेण्याच्या निर्णयामुळे यावर्षी राज्यातील 55 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यात राज्य शासनाला यश आले. यापुढे दहावीच्या परीक्षेत कोणीही विद्यार्थी नापास होणार नाही याची काळजी शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणार आहे. दहावी परीक्षेत नापास झालेल्या विदयार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन करुन त्यांना कौशल्यवर आधारित अभ्यासक्रम शिकवण्यावर भर देण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत महानगरपालिका शाळांमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना टॅब वितरण समारंभाचे आयोजन आज विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटयगृहात आयोजित करण्यात आले होते. श्री. तावडे यांच्या हस्ते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना टॅब वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महापौर स्नेहल आंबेकर, उप महापौर अलका केरकर, आमदार  सुनील प्रभू, आमदार संजय पोतनीस, आमदार ॲड अनिल परब, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, शिक्षण उपायुक्त रणजित ढाकणे उपस्थित होते.

श्री. तावडे यावेळी म्हणाले की, काळाप्रमाणे शिक्षण आणि शिक्षणाची पध्दत बदलणे आवश्यक आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाचा मार्ग अवंलबून मुलांना शिक्षण देणे आवश्यक आहे. आज आठवीच्या विदयार्थ्यांना देण्यात आलेले टॅब म्हणजेच या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे, असे म्हणता येईल. आजच्या परीक्षा प्रणालीमध्ये काही बदल करीत असताना विद्यार्थ्यांना चौकटीबाहेरचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी नव्या तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.
            प्रसिध्द गीतकार गुलजार यांचे उदाहरण देतश्री. तावडे म्हणाले की, गुलजार साहेबांनी काही वर्षांपूर्वी मैं तुलसी तेरे आँगन कीहे गाणे लिहिले तर अनेक वर्षांनंतर बदलते प्रवाह लक्षात घेऊन गुलजार यांनीच चप्पा चप्पा चरखा चले अशी गाणीही लिहिली. गुलजार यांनी बदलते प्रवाह स्वीकारले आणि ते यस्वी झाले. याचाच अर्थ आजच्या शिक्षकांनीही काळाप्रमाणे आपले विचार मांडण्याची, करण्याची पध्दत बदलणे आवश्यक आहे. आज मुलांचा बुध्दयांक वाढविण्यासाठी तंत्रज्ञान आणि दृश्य माध्यमांचा उपयोग करुन घेणे आवश्यक आहे.




अवयव दानासाठी जनजागृती करा

शालेय शिक्षणाबरोबरच मी वैद्यकीय शिक्षण मंत्रीही आहे. या नात्याने मला वाटते की, महाराष्ट्रात अवयव दानासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणही यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन श्री. तावडे यांनी यावेळी केले.

टॅब म्हणजे आजची ई- पाटी ध्दव ठाकरे

या कार्यक्रमात बोलताना श्री. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शाळेत गमभनचे धडे गिरवायला लागलो तेव्हा माझी आई माझा हात धरुन मला पाटीवर गमभन शिकवायची. आता 2015 मध्ये मुलांच्या हाती टॅब देण्यात आला आहे. मला असे वाटते की, हा टॅब म्हणजे ई-पाटी आहे. या ई-पाटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सोपे होईल, असा मला विश्वास वाटतो. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विदयार्थ्यांना आपण टॅब दिले आहेत. आगामी काळात हेच महानगरपालिका शाळेत शिकलेले विद्यार्थी टॅब तयार करतील, असा मला विश्वास वाटतो.

या टॅबची ठळक वैशिष्टये सांगताना महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, या टॅबमुळे आठवीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अधिक रुची निर्माण होण्याबरोबरच विदयार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानादवारे अतिरिक्त पूरक मार्गदर्शन मिळणार आहे. याशिवाय विदयार्थी स्वयंअध्ययनास प्रवृत्त होणार आहेत. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टॅबचा वापर शालेय विदयार्थ्यांना करता येतो आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. देशात पहिले व्हर्च्युअल क्लासरुम सुरू करणाच्या मान बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आहे. आता शालेय विद्यार्थ्यांना टॅब देण्यातही देशातील पहिली महानगरपालिका होण्याचा मान आम्हाला मिळाला आहे ही अभिमानाची बाब आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी या टॅबच्या वैशिष्टयांविषयी माहिती दिली.

00000

महाराष्ट्र व ब्रिटनमध्ये आरोग्यविषयक सहकार्यासाठी सामंजस्य करार संपन्न मोटर बाइक ॲम्ब्युलन्स सेवा मुंबईत प्रायोगिक तत्वावर सुरु करणार -आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत

मुंबई, दि.9: अपघात व आपत्तीतील जखमींवर प्लॅटीनिअम टेन मिनिट वेळेत उपचार मिळावेत यासाठी मुंबई येथे पुढील वर्षापासून मोटर बाइक ॲम्ब्युलन्स सेवा ब्रिटनच्या आरोग्य सेवा यंत्रणेमार्फत प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येईल.राज्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार होण्यासाठी रुग्णालयांचे अद्ययावतीकरण, परिचारिका, डॉक्टरांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम ब्रिटनसरकारच्या सहकार्याने राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.
मंत्रालयात आज महाराष्ट्र शासन आणि ब्रिटनच्या आरोग्य सेवा यंत्रणेमध्ये आरोग्य विषयक सामंजस्य करार राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. सावंत आणि इंग्लडचे व्यापार व गुंतवणूक मंत्री लॉर्ड फ्रान्सिस मॉड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी आरोग्य मंत्री बोलत होते. इंग्लडच्या व्यापार आणि गुंतवणूक विभागाचे महासंचालक कुमार अय्यर, उपसंचालक जेन ग्रेडी तसेच राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या आयुक्त आय. ए. कुंदन, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयुष सिंग व आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार उपस्थितीत होते.
आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, ब्रिटन आणि भारत या दोन देशांमध्ये व्यापाराबरोबरच भावनिक संबंध देखील आहेत. आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या आरोग्य विभागातील पायाभूत सुविधा विस्तारण्यात मदत होणार आहे. परिचारीका, पॅरामेडिकल, डॉक्टर यांच्या प्रशिक्षणाबरोबरच राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील जी शासकीय रुग्णालये आहेत त्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी इंग्लडमधील आरोग्य यंत्रणेचे सहकार्य मिळणार आहे. राज्यात 108 क्रमांकाद्वारे आपत्कालीन वैद्यकीय सेवे अंतर्गत रुग्णवाहिकेची सुविधा देण्यात येते. मात्र मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरामध्ये गर्दीच्या ठिकाणी एखादा अपघात अथवा दुर्घटना घडली तर याठिकाणी रुग्णवाहिका पोहोचण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटनेतील जखमींवर गोल्डन अवर पेक्षा प्लॅटिनअम टेन मिनिटवेळेत उपचार झाले तर जखमींना हमखास जीवदान मिळू शकते हे लक्षात घेऊन इंग्लडच्या सहकार्याने सर्व अत्याधुनिक यंत्रणा असलेली मोटर बाइक रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात येणार आहे.
मुंबई मध्ये 10 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरु करण्यात येईल. मोटर बाइक रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना तातडीने जवळचे रुग्णालय अथवा आपत्कालिन वैद्यकीय सुविधेच्या रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविता येणे शक्य होईल. ही सेवा मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी फायदेशीर ठरेल असा विश्वास डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
या सामंजस्‍य करारामुळे भारत आणि इंग्लडमध्ये औद्योगिक तसेच आरोग्य विषयक संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातील आरोग्य सेवेला इंग्लंडच्या तंत्रज्ञानाचा नक्कीच फायदा होईल, असे इंग्लडचे व्यापार व गुंतवणूक मंत्री लॉर्ड फ्रान्सिस मॉड यांनी यावेळी सांगितले.
·         सामंजस्य कराराअंतर्गत महाराष्ट्राला गुणवत्तपूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याकामी इंग्लडच्या आरोग्य यंत्रणेमार्फत सहकार्य करण्यात येणार.
·        रुग्णांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणार.
·        डॉक्टर, परिचारिकांना प्रशिक्षण देणार.
·        ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणार.

****